व्यवसाय, धंदा की नोकरी?

माझ्याकडे येणार्‍या वेगवेगळ्या वयोगटांतील लोकांमध्ये एक समान प्रश्न असतो,

‘मी नोकरी करावी की व्यवसाय?’
‘माझी कुंडली व्यवसायाला चांगली आहे की नोकरीसाठी?’

वर वर पाहता सोपे वाटणारे हे प्रश्‍न उत्तरे द्यायला अतिशय क्लिष्ट असतात. उमेदवाराची कुंडली पाहून त्याचा स्वभाव, त्याचे चांगले ग्रह, त्याच्या दशा, त्याचे वयोमान, त्याच्या आसपासची परिस्थिती, त्याचा समाज इत्यादी गोष्टींचा सम्यक विचार करावा लागतो. तसेच उद्योगामध्ये त्याची मूळ शक्ती काय हे पाहावे लागते. आपण एक उदाहरण पाहू.

मी उच्चशिक्षित आहे. बी.कॉम. केल्यानंतर अर्थशास्त्राशी निगडित दोन डिप्लोमा केले आणि नंतर मोठ्या शेअर ब्रोकर कंपनीमध्ये लागलो. वीस वर्षे तेथे वेगवेगळ्या पदांवर काम केले. शेअर बाजारात भरपूर डील केल्या. कंपनीला करोडोंचा फायदा करून दिला. मला बर्‍याच बढत्यादेखील मिळाल्या. त्यानंतर नोकरी सोडून माझा स्वत:चा शेअर ब्रोकिंगचा व्यवसाय चालू केला.

मी कंपनीमध्ये करत होतो तेच काम पुढे चालू केले. नातेवाईकांकडून कर्ज घेऊन पैसे गुंतवले आणि गेल्या दोन वर्षांत पुरता साफ झालो. आता डोक्यावरती मोठे कर्ज आहे. व्यवसाय चालत नाही. माझ्या टिप्समुळे इतर लोक पैसे कमावतात, परंतु मी केलेली गुंतवणूक मात्र वाया जाते.

मी विकल्यावरती शेअर चढतो किंवा मी विकत घेतल्यावरती शेअर पडतो आणि मी विकल्यावरती परत चढतो. माझे timing इतके कधीच चुकले नाही जे की आता चुकत आहे. काय करावे तेच कळत नाही.

जातकाने दीर्घ सुस्कारा सोडला आणि तो त्याच्या खुर्चीत मागे रेलला. जसे की त्याच्या छातीवरचे ओझे कमी झाले होते. जेव्हा अशा प्रकारचा मोठा प्रश्न घेऊन जातक येतो तेव्हा त्याच्या प्रश्नाची कारणे अनेकपदरी असण्याची शक्यता असते.

अनेक कारणे एकत्र येऊन प्रश्न मोठा बनतो. जसे की मुंबई-पुणे एक्स्प्रेसवरती दुरुस्ती चालू असल्याने वाहनांचा खोळंबा झाला आहे, त्यातच रविवारची रात्र म्हणजे सगळे सुट्टीच्या निमित्ताने बाहेर गेलेले परत येत आहेत. त्यातच कुठे तरी truck उलटला. त्यातच अंधार. या सगळ्यांचा परिपाक म्हणजे वाहतुकीचा जबरदस्त खोळंबा. तशीच अवघड समस्या येथे दिसत होती. म्हणजे अनेक कारणे एकत्र आली असावीत असा होरा होता.

मी त्यांना दोन दिवसांनंतरची वेळ देऊन येण्यास सांगितले. मी जातकाची व्यवस्थित कुंडली बनवून घेतली. त्यानंतर कुंडलीचा वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून अभ्यास केला. जेव्हा हे गृहस्थ माझ्याकडे परत आले तेव्हा मी तयारीत होतो. मी त्यांना सांगितलेली कारणे अशी –

पत्रिकेतून आलेली कारणे

 • त्यांनी नोकरी, आता नको ही गुलामी, म्हणत सोडली असावी.
 • मी यांनाच कशाला करोडो कमावून देऊ, मीच कमावतो की, अशा प्रकारची इच्छा असावी.
 • नोकरी सोडताना भांडणदेखील झाले असण्याची शक्यता.
 • भागीदारी नको म्हणून स्वतः सगळा खर्च केला.
 • दशा छिद्र असताना नोकरी सोडली.
 • त्यांची चांगली दशा संपत आली होती आणि मध्यम दशा सुरू होत होती, तेव्हा नोकरी सोडली, वेळ चुकली.
 • बुधाच्या व्यवसायाला रवीची फार फार जरुरी असते.
 • नोकरीमध्ये त्यांची कंपनी रवीचा रोल निभावत होती. स्वत:चा व्यवसाय चालू केल्यावर रवीची साथ गेली.
 • भागीदार न घेतल्यामुळे, भागीदाराच्या नशिबाची साथ मिळण्याचा मार्ग बंद झाला.
 • एकदा पैसे गेले, ते मिळवण्यासाठी जास्त पैसे गुंतवले, ते गेल्यावरती आणखीन गुंतवले असा मला योग संपन्न झाला.
 • जातकाचे १२वे घर फारसे चांगले नसल्यामुळे कर्ज घेऊन त्याचा फायदा होण्याची शक्यता फार कमी होती.

पत्रिकेबाहेरील कारणे

अनेक वर्षे नोकरी केलेली असल्यामुळे कुटुंबास व जातकास नियमित उत्पन्नाची सवय होती. दोन-तीन महिने झाले आणि बचत खाते खाली होत चाललेले दिसल्यावरती धीर सुटणे साहजिक होते. त्याचा परिणाम व्यवसायातील वागणुकीवर (Business Behaviour) झाला.

कंपनीमध्ये असताना अनेक लोक यांच्या कृपादृष्टीसाठी प्रयत्न करावयाचे. इतर शेअर ब्रोकरदेखील यांच्या अवतीभोवती फिरायचे, कारण यांच्याकडून टिप्स मिळायच्या. त्या टिप्स यांच्या असल्या तरी त्याचा अर्थ कंपनी कुठल्या दृष्टीने मार्गक्रमणा करीत आहे याचा इतरांना अंदाज यायचा. त्यासाठी यांची मैत्री जरुरी होती. नोकरी सोडल्यावरती तो उपयोग राहिला नाही.

कंपनीमध्ये असताना फार धोकादायक गुंतवणूक करू दिली जायची नाही. सॉफ्टवेअरमध्येच तशी व्यवस्था असायची. तसेच एखादी गुंतवणूक उत्पन्न देत नाही असे दिसल्यास लगेच पैसे इतर जागी गुंतवले जायचे. भाबड्या आशेला फारसे महत्त्व दिले जायचे नाही. आता मात्र जास्त मिळवण्याच्या आशेने जास्तीत जास्त धोकादायक गुंतवणूक करणे भाग पडले. तेथे अपेक्षित यश मिळाले नाही.

कंपनीमधील काम आणि बचत खात्यातील दाम यांच्यामध्ये काहीही संबंध नव्हता. काम कसेही केले तरी महिन्याअखेरीस पगार बचत खात्यात यायचाच यायचा.

भांडवल भरपूर असल्याने फिकीर नव्हती. हा मानसिक शास्त्राचा अतिशय सुंदर नियम आहे. पाणी भरपूर असल्यास पाणी कमी वापरले जाते; परंतु पाण्याची फिकीर असल्यास पाणी बरेच वाया घालवले जाते. उद्या पाणी येईल की नाही याची शाश्‍वती नसल्याने लोक सगळी भांडी भरून ठेवतात आणि पाणी आल्यास ताजे पाणी भरण्यासाठी आधीचे पाणी टाकून देतात. स्वत:च्या व्यवसायात भांडवल कमी असल्याने ते फार काळजीपूर्वक गुंतवले आणि आशा मात्र लवकर परतावा मिळेल. अशा आशेने घोटाळा वाढला.

याचेच दुसरे उदाहरण आपण असे देऊ शकतो. सायकल नवीन शिकलेला माणूस सायकल फार जोरात चालवतो, कारण त्याला पडण्याआधी आपल्या गंतव्य ठिकाणी जाण्याची घाई असते. परंतु अनुभवी सायकलस्वार अगदी आरामात सायकल चालवतो, कारण त्याला पडायची भीती नसते.

कुणाचे मार्गदर्शन नसल्यामुळे चाचपडायला झाले. सुरक्षा कवच नसल्यामुळे जोखीम घेण्याची क्षमता कमी झाली आणि त्याचा प्रत्यय येऊ लागला.

त्यांनी या सगळ्या गोष्टी संपूर्णपणे मान्य केल्या. त्यांना सांगितलेले उपाय असे –

 • कर्ज कमी करा. ज्यांना थांबवता येत आहे त्यांना एक वर्ष थांबण्याची विनंती करा.
 • राहते घर गहाण टाकून कर्ज घ्या जे की फक्त जरुरीची कर्जे परत करण्यास वापरायचे आणि १२ महिने घरखर्चासाठी वेगळे ठेवा.
 • फक्त शेअर ब्रोकिंग करा.
 • स्वत:चे किंवा इतरांचे पैसे गुंतवण्याची जबाबदारी घेऊ नका.
 • भागीदार शोधा .
 • Insurance कंपनीची agency घ्या.
 • Networking वाढवा.
 • दर दोन महिन्यांनी आढावा घेण्यासाठी परत या, तेव्हा दशा, अंतर्दशा आणि प्रत्यंतर दशा यांचा अभ्यास करून तुम्हाला पुढचे मार्गदर्शन करू.

– आनंद घुर्ये
संपर्क : ९८२०४८९४१६
(लेखक प्राचीन भारतीय ज्ञान या विषयातले अभ्यासक आहेत)

Author

 • आनंद घुर्ये

  आनंद घुर्ये हे लौकिकदृष्ट्या अभियंता व एमबीए असून अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये त्यांनी वरिष्ठ पातळीवर नोकरी केली आहे. थायलंड येथे नोकरीनिमित्ताने असताना अनेकांनी त्यांना भारतीय प्राचीन संस्कृतीबद्दल प्रश्न विचारले. यातून प्रेरणा घेऊन त्यांनी प्राचीन भारतीय ज्ञानाचा अभ्यास सुरू केला. तसेच ते ज्योतिषी म्हणूनही कार्यरत आहेत. उद्योग ज्योतिष हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

  View all posts
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?