तुम्हाला या गणेशोत्सवात एखादं-दुसरा छोटासा व्यवसाय करून पैसे कमवायचे आहेत का? तर आम्ही तुम्हाला अगदी ५-१० हजार रुपये गुंतवून या गणपतीत करू शकाल असे ११ व्यवसाय सांगत आहोत.
१. फुलांचा व्यवसाय : गणेशोत्सव म्हटला की भरपूर सारी फुलं, हार, दुर्वा लागणारच. त्यामुळे या गोष्टींचा भावही उत्सवकाळात चांगलाच वाढलेला असतो. तुम्हाला छोट्या प्रमाणात हा व्यवसाय करायचा असेल तर तुमच्या शहरातील, जिल्ह्यातील फुलांचा घाऊक बाजार कुठे आहे याची माहिती घ्या आणि तिथून एक-दोन दिवस आधी घाऊक दराने, फुलं, पानं, बेल, तुळस, दुर्वा, पत्री असं सगळं खरेदी करून घेऊन या.
याच्या मार्केटिंगसाठी तुमच्या हातातला स्मार्टफोनच पुरेसा आहे. व्हॉट्सॲपवर लोकांना तुम्ही करत असलेल्या उद्योगाची माहिती द्या. त्यांच्या ऑर्डर्स घ्या आणि हारफुलांची घरपोच डिलिव्हरी द्या. बाजारभावापेक्षा थोडं स्वस्तात विका.
स्वस्त आणि घरपोच मिळत असेल तर कोणाला नको असणार! गौरीगणपतीच्या ५-७ दिवसांत २५ ते ५० हजार रुपयांचा सहज व्यवसाय होईल आणि १५-२० हजार रुपये तरी नक्की कमवाल.
२. भजन मंडळ : ज्यांच्याकडे बक्कळ पैसा आहे अशी लोकं सणावाराला खर्च करताना पुढे मागे बघत नाहीत. तुम्ही ५-७ जणांची टीम बनवून छानसा भजन किंवा भक्तीगीतांचा कार्यक्रम तयार करू शकता. लोकांकडून तुम्हाला याच्या सुपाऱ्या येतील. शिवाय हे कार्यक्रम फक्त रात्रीचेच केले जातात त्यामुळे आपला नोकरीधंदा सांभाळून तुम्ही करू शकता.
यासाठी साहित्य म्हणून काय लागणार तर फक्त एक मृदुंग / पखवाज, २-४ टाळाचे जोड. कोणाकडे तबला-डग्गा असेल तर उत्तमच. मोठी बिदागी मिळणार असेल तर एखाद्या बुवांना मानधन देऊन तुमच्या सोबत घेऊ शकता.
३. मखर सजावट : घरोघरी गणपतीला मखर आणि सजावट तर लागतेच. तुमच्यात थोडे कलात्मक कौशल्य असेल तर तुम्ही तयार मखर व सजावट करून देऊ शकता. छोटासा मखरसुद्धा २-५ हजाराला असतो. कमीतकमी साहित्यात घरातल्या घरात चांगले मखर बनवून तुम्ही लोकांना देऊ शकता. सँपल तयार करून लोकांना फोटो व्हॉट्सॲप केले तर व्हॉट्सॲपवरच ऑर्डर्स येतील.
४. दिवे, वीजेची तोरणे विक्री : गणपतीच्या सजावटीसाठी लागणारी ही आजची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. होलसेल बाजारातून स्वस्तात विकत घेऊन दुप्पट भावाने घरोघरी विकू शकता.
५. घरगुती साफसफाई करून देणे : बरंच मेहनतीचं पण विनाभांडवली काम आहे हे. लोकांकडे खर्च करायला पैसा आहे, पण वेळ नाही. अशा वेळी तुम्ही लोकांना ही सेवा देऊ शकता. ज्यांच्या घरी गणपती येणार, त्यांना साफसफाई, रंगकाम या गोष्टी तर लागणारच. तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही लोकांना हे करून द्या आणि त्याचा मेहनताना घ्या. हे करताना एक गोष्ट लक्षात घ्या कोणतेही काम छोटं किंवा मोठं नसतं. जिथे राबती हात तेथे हरी.
६. नाशिक बाजा : हल्ली बऱ्याच जणांना आपल्या घरचा गणपती आणायला किंवा विसर्जनाला नाचण्यासाठी वाजंत्री लागतात. एक ताशा आणि २-३ बाजा असले तरी बस झालं. एखादं तास वाजवून चांगली कमाई करू शकता. ताशे आणि बाजा दिवसभरासाठी भाड्यावर घेऊ शकता.
७. मोदक विक्री : गणपती म्हटले की कोणत्या घरी मोदक लागत नाहीत? पण हल्ली तेवढे मोदक करायला कोणाकडे वेळ नसतो. त्यामुळे बरेच लोकं ऑर्डर देऊन मोदक बनवून घेतात. २० रुपयांपासून ४० रुपयांपर्यंत प्रती नग असे उकडीचे मोदक त्या दिवशी विकले जातात. महिलांसाठी हा ५-७ दिवसांचा चांगला व्यवसाय होऊ शकतो. परिसरातल्या सर्व व्हॉट्सॲप ग्रुप्सवर जाहिरात करून तुम्ही ऑर्डर्स मिळवू शकता.
८. कॅटरिंग सेवा : जसे मोदक बाहेरून मागवले जातात तसेच बरेच लोकं संपूर्ण जेवणच बाहेरून करून घेतात. प्रचलित कॅटरर्सकडे सणाच्या दिवसात खूप जास्त ऑर्डर्स असतात त्यामुळे बऱ्याच लोकांना कॅटरर्स मिळत नाहीत.
तुम्हाला चांगला स्वयंपाक करता येत असेल तर तुम्हीही अशा छोट्या मोठ्या कॅटरिंगच्या ऑर्डर्स घेऊ शकता. कॅटरिंगच्या ऑर्डर्स घ्यायच्या असतील तर मोठी शेगडी आणि मोठी भांडी आवश्यक आहेत. ही भांडी व शेगड्या सर्व ठिकाणी भाड्यावर उपलब्ध होतात.
९. पूजेचे साहित्य विक्री : होलसेल बाजारातून गणपतीच्या पूजेचे साहित्य, आरतीची पुस्तकं, टाळ अशा गोष्टी विकत आणून तुमच्या इथे विकू शकता. ५-७ दिवसांसाठी रस्त्यावर छोटेखानी दुकानही थाटू शकता. गणेशोत्सव काळात या साहित्याची इतकी विक्री होते की महिन्याभराचे उत्पन्न ८-१० दिवसात मिळवाल.
१०. छोटे करमणुकीचे कार्यक्रम : गाण्याचे कार्यक्रम, जादूचे प्रयोग, मेमिक्री असे कोणतेही गुण तुमच्या अंगी असतील तर गणेशोत्सवानिमित्त सार्वजनिक मंडळांमध्ये कार्यक्रम करू शकता.
११. YouTube चॅनलवर व्हिडिओ आणि शॉर्ट्स : लोकांना गणपतीच्या दिवसांत फिरून वेगवेगळ्या ठिकाणचे गणपती पाहायला आवडतात. तुम्ही एखादे YouTube चॅनल सुरू करून वेगवेगळ्या ठिकाणच्या गणपतींचे दर्शन, तिथली सजावट, त्याचा इतिहास, मंडळातील कार्यकर्त्यांच्या मुलाखती अशा गोष्टींवर व्हिडिओ तयार करून तुमच्या चॅनलवर दाखवू शकता. चॅनल नवीन असेल या दिवसांत लवकर monetize होईल, कारण या १०-१५ दिवसांत गणपतीचे विषय ट्रेडिंगमध्ये असतात.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.