लग्नानंतर ‘CFP’ची पदवी मिळवून उद्योजिका झालेल्या अर्चना भिंगार्डे


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


तुमची पार्श्वभूमी सांगा. तुम्ही व्यवसायात कशा आलात?

मी काही मोठ्या व्यावसायिक घराण्यातून आलेली नाही. एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कटुंबातून आहे. माझे बाबा सेल्स टॅक्समध्ये कामाला होते. पण मी माझ्या बाबांना नोकरीशिवाय अर्धवेळ व्यवसाय करताना पहायचे. दिवाळी आली की, बाबा त्यांच्या ऑफिसमध्ये ऑर्डर घेऊन ग्रीटिंग कार्ड्स सप्लाय करायचे. त्यावेळी दाभोळकरांचे कार्ड्स खूप फेमस होते. त्यावेळी आम्ही बाबांना त्यांच्या कार्ड्सच्या कामात मदत करत असू.

याशिवाय बाबा रेसिपीजच्या पुस्तकांचापण व्यवसाय करायचे. हे सर्व बघून मी सोळाव्या वर्षी घरात शिकवण्या घेऊ लागले. या शिकवण्या कॉलेजमधून आल्यावर असायच्या. पुढे या शिकवण्या पाच वर्षं चालल्या. एकविसाव्या वर्षी माझं लग्न झालं. माझं सासरचे कुटुंब हे उद्योजक कुटुंब आहे. आमचं घर पेडर रोडला होतं, आमचं एक जनरल स्टोर होतं.

माझे पती सीए आहेत. मला नोकरी कधीच करायची नाही, हे माझं पक्कं होतं. केलं तर स्वतःचंच काहीतरी करणार, ज्यामध्ये मला वेळेचं स्वातंत्र्य असेल. दुसरं असं की नोकरीत कितीही चांगलं काम करा, तुम्हाला मिळणारा पैसा हा मर्यादितच असतो, याउलट स्वतःच्या व्यवसायात तुम्ही आकाशाला गवसणी घालू शकता. जे तुम्हाला मिळवायचं आहे, ते मिळवणं जास्त सोपं असतं.

तुम्ही सध्या करता आहात त्या गुंतवणूक सल्लागार या क्षेत्रात कशा आलात?

माझे पती सीए असल्यामुळे त्यांनी माझ्या नावे एक एच.डी.एफ.सी.ची एजन्सी घेतली. कारण त्यांना एक संस्थेचं काम आलं, ज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची होती. ते जेव्हा इन्व्हेस्टमेंटचा फॉर्म द्यायला गेले, तेव्हा त्यांना विचारले की, तुम्ही का नाही एजन्सी घेत, तुम्ही का नाही ब्रोकर होत, त्यावर माझे पती म्हणाले की, मी सीए असल्यामुळे मला ते शक्य नाही.

मग घरात कोणी दुसरं आहे का, अस विचारले, तेव्हा माझ्या पतींनी माझ्याबद्दल त्यांना सांगितले. असं करून माझ्या व्यावसायिक प्रवासाला तिथून सुरुवात झाली. ही गुंतवणूक व्यवसायात माझी पहिली मुहूर्तमेढ १९९० मध्ये माझ्या पतींकडून झाली.

पुढे पतींचे जे ग्राहक होते त्यांच्या छोट्या छोट्या गुंतवणुकी घ्यायला सुरुवात केली. प्रथम मला जरा दडपणच आलं, की मला हे जमेल का? कारण इन्शुरन्स म्हटलं की तुम्हाला बर्‍याच जणांना जाऊन भेटावं लागतं, बोलावं लागतं, जे मी कधी पूर्वी केलं नव्हतं. पण म्हटलं प्रयत्न करून बघू. मग मी आयुर्विमा, जनरल इन्शुरन्स, पोस्ट, म्युच्युअल फंड यांची एजन्सी घेतली. लोकांना बचत, विमा, गुंतवणूक याबद्दल सल्ले द्यायला सुरुवात केली.

पुढे आम्ही घर बदललं. नवीन घरी आलो. इथे मी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी घरातूनच शिकवण्या सुरू केल्या. एका विद्यार्थ्यांपासून सुरू केलेली शिकवणी वर्षभरात शंभर विद्यार्थ्यांवर गेली. त्यामुळे राहत्या घरातून करणं कठीण पडलं होतं. मग २००५ साली प्रभादेवीला हे ऑफिस घेतलं आणि काही काळ इथून शिकवण्या चालवल्या.

शिकवण्या सुरू करताना मी ठरवलंच होतं की मुलीच्या बारावीपर्यंतच त्या चालू राहतील. त्याप्रमाणे मी मुलीच्या बारावीनंतर शिकवण्यांना पूर्णविराम दिला. पण शिकवण्यांचे दोन फायदे झाले. एकतर माझी आर्थिक बाजू इतकी मजबूत झाली की, माझं स्वतःचं एक ऑफिस झालं होतं, तर दुसरीकडे शिकवण्यांमुळे माझं ज्ञान अद्ययावत होतं राहिलं.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


एक यशस्वी सी.एफ.पी.पर्यंतचा प्रवास कसा झाला?

माझं शिक्षण फक्त पदव्युत्तरपर्यंतच झालं होतं, याची मला रुखरुख होती. कारण लहानपणापासून माझी इच्छा त्यापुढे जाऊन व्यावसायिक शिक्षण घेण्याची होती, जी अपूर्ण राहिली होती. त्याच वर्षी भारतात Financial Planner Standard Board (FPSB) सीएफपी तयार करणार्‍या जागतिक संस्थेचा प्रवेश झाला.

तेव्हा मी ठरवलं की, ही परीक्षा आपण द्यायची आणि सीएफपी व्हायचेच; जेणेकरून मला व्यावसायिक शिक्षण केल्याचं समाधान मिळेल. भारतात जी सर्टिफाइड फायनान्सीयल प्लानर्सची पहिली बॅच बाहेर आली, त्यातली मी एक आहे, असं मी गर्वाने सांगू शकते.

भारतात हे क्षेत्र तेव्हा इतकं नवीन होतं की, फायनान्सीयल प्लानर म्हटलं की कोणीही म्हणजे ते एल.आय.सी. एजंटच ना असं म्हणायचे. पुढे हळूहळू मासिकांनी, वाहिन्यांनी आमची दखल घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे आम्ही जे काही भारतातले पहिलेवहिले फायनान्सीयल प्लानर्स होतो, त्यांना वरचेवर, सातत्याने टी.व्ही.वर आर्थिक नियोजनाबद्दल जागरूकतेसाठी बोलवलं जाऊ लागलं.

मलाही बरीच प्रसिद्धी मिळाली, त्यामुळेच माझे २९ वर्षापासूनचे ग्राहक माझ्याकडे आदरयुक्त दृष्टीने पाहू लागले, पैसे देऊन सल्ला घ्यायला येऊ लागले.

सध्या आमच्याकडे ९०० हून अधिक ग्राहकवर्ग आहे. मुंबई आणि रत्नागिरी असं दोन ठिकाणी कार्यालय आहे. भविष्यात मला महाराष्ट्रातल्या कानाकोपर्‍यात असलेल्या मराठी मध्यमवर्गीयांपर्यंत पोहोचण्याची ईच्छा आहे. कारण मराठी मध्यमवर्गीय लोकांत उद्योजकीय मानसिकता, गुंतवणुकीची मानसिकता फार कमी असते. आपल्याकडे पैसे येण्यापूर्वी त्याच्या खर्चाचे नियोजन झालेलं असतं, उदा. दिवाळीचा बोनस मिळण्यापूर्वीच तो कुठे खर्च करायचा हे ठरलेले असतं.

याची परिणीती मध्यमवर्गीय लोक हे नेहमीच मध्यवर्गीयच राहतात. म्हणून मला असं वाटतं की लोकांना आर्थिक परतावा देण्यापेक्षा लोकांच्या मानसिकतेवर काम करणं खूप गरजेचे आहे आणि असा बदल घडवायला मला खूप आवडेल. आर्थिक साक्षरतेचा दृष्टिकोनातून मी ब्लॉग लेखन करते, टीव्हीवरील कार्यक्रमात सहभागी होते, विविध समूह-गटांना व्याख्यानं देते.

भविष्यात मला एक आमचं संकेतस्थळ बनवायचं आहे, जेणेकरून तिथे कोणीही आला आणि त्याने त्याची गरज भरून पाठवली की, आमच्याकडून आमचे प्रतिनिधी त्यांना संपर्क करतील, त्यांची गरज व्यवस्थित समजून घेतील, त्यांच्याशी कनेक्ट होतील आणि मग  आम्ही त्यांना आर्थिक नियोजन तयार करून देऊ शकू. हे संकेतस्थळ मराठी, इंग्रजी आणि हिंदी या तीन भाषांमध्ये उपलब्ध असेल.

विश्वास, अखंड मूल्ये या गोष्टी आमच्या व्यवसायाची वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे आम्ही ग्राहकाचं नुकसान करून कोणतेही उत्पादन विकत नाही. ग्राहकांची गरज, जोखीम पत्करण्याची क्षमता या गोष्टींचं मूल्यमापन करूनच त्यांना सल्ले दिले जातात, उत्पादने आणि गुंतवणूक सुचवली जातात.

– अर्चना भिंगार्डे
9821172117


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

  • शैलेश राजपूत

    शैलेश राजपूत हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण झाल्यावर त्यांनी २००७ साली पत्रकारिता क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

    व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार असा विचार करून यावर उपाय म्हणून त्यांनी २०१४ साली उद्योजक.ऑर्ग हे वेबपोर्टल सुरू केले व २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?