आपल्याला ‘अल्पसंतुष्टता’ हा शाप का वरदान, असा प्रश्न अनेकदा पडू शकतो. त्याला कारणही तसंच आहे. एक जण सांगतो आहे त्यात समाधानी व्हा, सुखी रहा, तर दुसरा सांगतो, सतत पुढे जा, मोठे व्हा, श्रीमंत व्हा. अशा वेळी नेमकं कुणाचं ऐकायचं, असा संभ्रम मनात निर्माण होणं साहजिकच आहे.
अशा वेळी मी असं म्हणेन, की जर तुमचं वय साठ वर्षांपेक्षा कमी आहे तर तुम्ही यशाच्या बाबतीत, संपत्तीच्या बाबतीत, कामाच्या बाबतीत, ज्ञानाच्या बाबतीत अल्पसंतुष्ट असणं जास्त गरजेचं आहे. प्रगती करत राहणं गरजेचं आहे, परंतु जर तुमचं वय साठ वर्षांपेक्षा जास्त आहे, तर सध्याची तुमची संपत्ती, आरोग्य, स्नेहसंबंध, नाती यावर समाधान मानायला काही हरकत नाही.
आपण मात्र तुमच्या तरुण वयाबद्दल बोलू. कारण ह्याच वयात खरं तर आपल्याला यशाची गाडी हाकायला, प्रेरणेचं मुबलक ‘वंगण’ लागतं. तुमच्या बाबतीत मात्र यशाबद्दलची अशी गफलत होता कामा नये.
तुम्ही छोट्या यशावर समाधानी होऊ नका. एक यश मिळालं की, तिथे फार काळ थांबू नका. त्याचा आस्वाद जरूर घ्या; पण त्यात फारसं गुरफटून राहू नका. अशाने माणूस गाफील होतो. मित्रांनो, अपयशापेक्षा यश लवकर हुलकावणी देतं बरं का. आता हा अनुभव गाठीशी बांधून पुढील मोठ्या यशाच्या तयारीला लागा.जे पण कराल ते मोठंच करा, भव्य करा.
अल्पसंतुष्टीला (किमान तारुण्यात तरी) जवळ फिरकू देऊ नका. तरच पहिल्यापेक्षा मोठ्या गोष्टी करण्याची ऊर्मी तुमच्यात सतत राहील व पुढील प्रवास पहिल्यापेक्षा नक्कीच मोठा असेल. आयुष्य जगता आलं पाहिजे. काही गोष्टींत समाधानी आणि काही गोष्टींत असमाधानी असलं पाहिजे. यातील संतुलन राखणं हीच खरी कला आहे, असं मला वाटतं.
योग्य वेळी ‘गिअर’ बदलायला शिका
मी नेहमी म्हणतो की, आयुष्यात इच्छित ठिकाणी वेळेवर पोहोचायचं असेल, तर आपले आणि गाडीचे ‘गिअर्स’ योग्य वेळी बदलायला शिकलं पाहिजे. कारण कोणत्याही एकाच गिअरचा वापर करून आपल्याला गाडीने ठरावीक ठिकाणी योग्य वेळी पोहोचणं अवघड आहे.
म्हणूनच कदाचित गाडीला पाच (काही गाड्यांत सहा) गिअर्स हे पुढे जाण्यासाठी, तर एक ‘रिव्हर्स गिअर’ दिलेला असतो. असं का? पुढे जाण्यासाठी कधीकधी थोडं पाठीही यावं लागतं.
आयुष्यातही पुढे जायचं असेल तर कधी कधी थोडी माघार घ्यावी लागते आणि त्यात काहीही गैर नाही. परिस्थिती जर तशी असेल तर ते करणं योग्यच आहे, असं मला वाटतं. कारण स्पर्धा जिंकण्यासाठी स्पर्धेत टिकणं गरजेचं आहे. परंतु इथे अनेकांची गफलत होताना दिसते.
लोक आपल्या सोयीने या घटनेचा/परिस्थितीचा अर्थ काढताना दिसतात. मोडेन पण वाकणार नाही, हवं तर धंदा बंद करेन, पण त्यासाठी कर्ज घेणार नाही. लोकांची चांगली मागणी असली तरीही दुसरी शाखा काढणार नाही, कारण आमची कुठेही शाखा नाही, असं सांगण्यातच आम्हाला अभिमान जास्त.
धंद्यात आधुनिकता-कल्पकता आणणार नाही. कारण आपली गाडी तर चालतेच आहे. मग उगाच नसते उपद्व्याप कशाला. मी उद्योजकता प्रशिक्षणात असल्यामुळे बरेच उद्योग, खास करून लघुत्तम, लघू व मध्यम आकाराचे अनेक उद्योग तर, ‘चलता है अॅटिट्युडवर’ चालताना दिसतात व पुढे त्यांची वाढ खुंटताना दिसते. का? तर आपले ‘गिअर्स’ योग्य वेळी बदलले नाहीत म्हणून.
त्यामुळे योग्य वेळी हवे ते बदल हे केलेच पाहिजेत मग ती गाडी असो किंवा उद्योग असो. नाही तर आपल्याही आयुष्याचा ‘नोकिया 1100’ होतो. कोणीच विचारणार नाही; परंतु ही कला एकदा का आपल्याला जमली तर मग रस्ता कसाही असला किंवा आपली गाडी कोणतीही असली तरीही, मग ती उद्योगाची असो किंवा आयुष्याची, कुठे अडकत नाही; पण इथे ‘अज्ञान आणि अनिच्छा’ यामुळे अनेकदा आपली खरी गोची होताना बर्याचदा पाहायला मिळते.
तुमच्या बाबतीत आशा आहे की, तुम्ही योग्य वेळी आपले गिअर्स बदली कराल व आयुष्यात नियोजित जागी वेळेत पोहोचाल.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.