आपल्या उत्पादनाची विक्री वाढण्यासाठी, आपली सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, आपल्या व्यवसायाची ओळख लोकांना व्हावी म्हणून व्हिडिओ किंवा फिल्म जाहिरातीचा वापर गेल्या ४० ते ५० वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर केला जातो.
सुरुवातीस चित्रपटगृहात दिसणार्या जाहिराती हळूहळू टीव्हीवर यायला लागल्या आणि त्यानंतर काही वर्षात व्हिडीओ जाहिराती आपल्याला कॉम्प्युटर स्क्रीनवर दिसायला लागल्या. आता तर या जाहिराती आपल्या मोबाइलमध्ये दिसतात. सध्याच्या युगात नक्की कोणत्या प्रकारे व्हिडिओ जाहिरात केली की आपला व्यवसाय वाढेल ते पाहुया.
व्हिडिओ जाहिरात आपल्याला पूर्वी चित्रपटगृहांमध्ये बघायला मिळायची. सुमारे वीस सेकंद ते एक मिनिट अवधी असलेली ती जाहिरात सर्व प्रेक्षक लक्ष देऊन बघत असत. याचे कारण काय होते?
एकतर चित्रपटासाठी एकाग्र मनोवृत्तीने आलेला प्रेक्षक, थिएटरमध्ये सर्वत्र अंधार, मोठा पडदा, मोठा आवाज प्रेक्षकांचे दुर्लक्ष होईल असा इतर कोणताही घटक नाही यामुळे प्रेक्षकाचे चित्त हे जाहिरातीवर खिळून राहणे शक्य होऊ शकत असे.
अशा चित्रपट गृहात बघितलेल्या जाहिरातींचा प्रेक्षकांच्या मनावर शंभर टक्के इफेक्ट होत असे. आपल्याला आठवत असेल तर ‘विको वज्रदंती’ हा ब्रँड याच पद्धतीने मार्केटमध्ये उत्कृष्टपणे एस्टॅब्लिश झाला होता.
पुढे या जाहिराती टीव्हीवर दिसायला लागल्या. टीव्ही बघणारा प्रेक्षक हा फक्त टीव्हीच बघत नसतो. टीव्ही बघता बघता तो इतर अनेक कामे करत असतो. अनेकदा जाहिराती लागल्या की तो आवाज म्युट करतो आणि त्या काळात आपली इतर कामं उरकून घेतो. त्यामुळे टीव्ही जाहिरात तयार करताना निर्माता, दिग्दर्शकाला आणि उत्पादकाला विशेष काळजी घ्यावी लागते.
टीव्ही जाहिरातीचा अर्थातच जनमानसावर प्रचंड मोठा परिणाम होत असतो. टीव्हीवर आपल्या उत्पादनाची, सेवेची जाहिरात करून अनेक उत्पादनांचा खप वाढला; किंबहुना टीव्हीवर जाहिरात आली याचा अर्थ त्या उत्पादनाचा दर्जा उत्तमच असणार अशाप्रकारची धारणा तयार झाली आहे.
टीव्हीवर ब्रँडेड उत्पादनांच्या जाहिराती सातत्याने आजही लागतात. टीव्हीची लोकप्रियता आजही कायम आहे आणि राहणार, पण या टीव्हीला स्पर्धा आली ती इंटरनेटची. टीव्हीप्रमाणेच कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरदेखील आपल्याला जाहिराती दिसू लागल्या. मात्र इथे एक फरक आहे.
टीव्ही किंवा सिनेमा हा चारचौघे बसून एन्जॉय करतात. तर पर्सनल कॉम्प्युटरवर एका वेळेला एकच माणूस बसून काम करतो किंवा माहिती घेतो. टीव्ही हे माध्यम एकतर्फी आहे. तर कॉम्पुटर हा इंटरॅक्टिव्ह आहे.
कॉम्पुटरवर व्हिडियो बघणार्या प्रेक्षकवर्गाचा युट्युबसारख्या प्लॅटफॉर्म्सनी योग्य तो विचार करून त्याला आवडतील असे व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली. सुरुवातीला मोफत असणार्या या युट्यूबमध्ये गेल्या काही वर्षांपासून जाहिराती प्राधान्याने दिसायला लागल्या.
पर्सनल कॉम्प्युटर हा घरामध्ये एका ठिकाणी स्थिर असायचा आणि व्यक्तीला तेथे काम करताना व्हिडीओ जाहिरात बघता यायची. लॅपटॉप आल्यानंतर या पर्सनल कॉम्प्युटरचा संचार वाढला, परंतु तरीही लॅपटॉपवर प्रवासात काम करताना काही मर्यादा होत्या. या संपूर्ण मर्यादा स्मार्टफोनमुळे कमी झाल्या.
साधारणपणे २०१४ नंतर स्मार्टफोनचा वापर जगभरात वाढला. आधी जी व्यक्ती टीव्हीला वेळ द्यायची ती कॉम्प्युटरवर जास्त वेळ बसू लागली आणि २०१५ नंतर टीव्ही, चित्रपट आणि कॉम्प्युटर या तिघांनाही मागे सारत स्मार्टफोन झपाट्याने पुढे आला.
आज भारतातीलच नव्हे तर जगभरातील व्यक्ती आपला सर्वाधिक वेळ स्मार्टफोनवर घालवते. स्मार्टफोन या साधनाने वृत्तपत्रालाही मागे टाकले आहे. अनेक घरांमध्ये वृत्तपत्राची घडीदेखील उलगडली जात नाही. त्यामुळे वृत्तपत्रातील जाहिराती किंवा त्याच्यामध्ये आलेल्या जाहिरातीच्या पॅम्फ्लेट्स याचाही परिणाम हळूहळू कमी होत आहे.
स्मार्टफोनमुळे मोठमोठ्या ब्रॅण्ड्सनी इतर माध्यमांवरील जाहिरातीचा खर्च कमी केला आहे. उदाहरणार्थ शहरांमध्ये दिसणारे मोठमोठे होर्डिंग पूर्वीच्या काळी सिग्नलवर एक-दोन मिनिटे थांबावं लागत असल्यामुळे होर्डिंगवरती केलेली जाहिरात लोकांपर्यंत व्यवस्थित पोचायची, परंतु सध्या त्या जाहिरातींना अशी दृश्यमानता कमी झाली आहे.
माणूस प्रवासात किंवा फावल्या वेळेत मोबाइलवरच आहेत. या सर्वाना मनोरंजन हवं असतं. काही तरी रंजक, उत्कंठावर्धक, धक्का देणार्या, आश्चर्यकारक अशा गोष्टी बघायला आवडतात.
पूर्वी एक मिनिटाची जाहिरात शांतपणे वाट बघणार्या व्यक्तीला आज पाच सेकंदांची जाहिरातदेखील त्रासदायक वाटते, नकोशी होते. एका बाजूला तो एक ते दोन मिनिटाचे अनेक व्हिडीओ वेळ काढून बघतो, पण आपण दाखवत असलेली पाच सेकंदाची जाहिरात त्याला जास्त वाटते.
एक उद्योजक म्हणून आपण या मानसिकतेचा अभ्यास करणे गरजेचे आहे. कारण काहीही करून आपल्या उत्पादनाचा किंवा सेवेची जाहिरात ग्राहकापर्यंत पोहोचली पाहिजे. आपण केलेली कोणत्याही प्रकारची जाहिरात जर ग्राहकापर्यंत पोहोचली तरच आपले उत्पादन विकले जाणार आहे.
यामुळे त्याला आवडेल त्या पद्धतीने पोहोचवणे हे आपले महत्त्वाचे कामच नव्हे तर कर्तव्य झाले आहे. नाही तर तो आपली जाहिरात बघणार नाही आणि आपली विक्री वाढणार नाही.
आज आणि सोशल मीडिया ही जाहिरातीची दोन प्रमुख माध्यमे झाली आहेत. एकंदरच हातामध्ये कागद किंवा पुस्तक धरून वाचायचे प्रमाण कमी झाल्यामुळे जाहिरातदारांचा ओढा प्रिंट माध्यमांकडून टीव्ही आणि डिजिटलकडे शिफ्ट झालेला दिसतो.
व्हिडीओ जाहिरात प्रेक्षकाला दृकश्राव्य असे दोन्ही पद्धतीने मेसेज पाठवत असते. यामुळे व्हिडिओ जाहिरातीचा होणारा प्रभाव हा अधिक खोलवरचा आणि दूरगामी असतो.
व्हिडिओ जाहिरातीमुळे आपला ब्रँड अधिक चांगला रुजतो. तसेच ग्राहकाने आपली वस्तू विकत घेण्याची शक्यता खूप पटीने वाढते. आपल्या उत्पादनाच्या विक्रीसाठी व्हिडिओ जाहिरात तयार करताना खालील गोष्टींचा विचार करावा लागेल.
१) एकंदरच प्रेक्षकाचा अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे. त्याचे लक्ष विचलित करणार्या शेकडो नव्हे हजारो घटना आजूबाजूला घडत असताना आपण केलेली जाहिरात त्याच्यापर्यंत पोहोचवणे हे अत्यंत जिकिरीचे, कष्टप्रद आणि तितकेच कलात्मक काम आपल्याला करावे लागेल.
आंतरराष्ट्रीय संकेतानुसार सध्या हा कालावधी फक्त आठ सेकंदांचा आहे. थोडक्यात तुम्हाला जे काही सांगायचं ते आठ सेकंदात सांगा. ही आठ सेकंद आपण जिंकलो, तर पुढचा व्हिडिओ किंवा आपली जाहिरात तो बघू शकेल. यासाठी पहिल्या आठ सेकंदांचा सोनेरी नियम वापरावा लागेल जेणेकरून आपला मेसेज ग्राहकाला व्यवस्थित पोहोचेल.
२) आपण तयार केलेली जाहिरात टीव्ही, कॉम्पुटर, स्मार्टफोन किंवा अगदी चित्रपटगृहातदेखील दाखवता आली पाहिजे.
३) आपण तयार केलेल्या जाहिरातीची दृश्य व ध्वनीची गुणवत्ता इतकी चांगली हवी की टीव्ही, कॉम्पुटर, स्मार्टफोन व चित्रपटगृह या चारही माध्यमांमध्ये ती प्रेक्षकाला खिळवून ठेवेल.
४) प्रेक्षकांचे लक्ष विचलित करणार्या अनेक गोष्टी आजूबाजूला असल्या तरीदेखील त्यांनी आपली जाहिरात पाहिलीच पाहिजे, असं काहीतरी त्या जाहिरातीत हवं.
५) डिजिटल माध्यमात जाहिरात करताना आपली जाहिरात आपण पैसे भरून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायला हवा (इनऑरगॅनिक मार्केटिंग) किंवा लोकच आपली जाहिरात एकमेकांना पाठवतील अशी वेगळ्या प्रकारची व्हायरल जाहिरात करण्याचा प्रयत्न करायला हवा.
६) आपली जाहिरात कमीत कमी कालावधीची, अधिकाधिक माहिती देणारी आणि आपली विक्री वाढवणारी असली पाहिजे.
७) आपल्या जाहिरातीमध्ये इतकी प्रचंड शक्ती पाहिजे, अशी दृश्ये पाहिजेत, असे कथानक पाहिजे की जे प्रेक्षकांचे चित्त खिळवून ठेवेल. आपल्या व्हिडिओमध्ये त्याला गुंतवून ठेवेल आणि व्हिडिओ बघता बघता आपली जाहिरात त्याच्या मनात पोहोचेल आणि अर्थातच आपली विक्री वाढून आपली व्यवसायवृद्धी होईल.
थोडक्यात व्हिडियो जाहिरात तयार करण्याची पद्धत आपण बदलणे गरजेचे आहे. ग्राहकांच्या बदलत्या आवडीनुसार, तो निश्चितपणे बघेल अशाप्रकारे व्हिडिओ जाहिरतीचे संहिता लेखन करणे गरजेचे आहे.
पूर्वी ज्या प्रकारच्या जाहिराती दाखवून हमखास विक्री व्हायची, कदाचित तशा जाहिराती यापुढे चालतीलच असे नाही. एकंदरच प्रेक्षकांची मानसिकता बदलली असल्यामुळे जाहिरातनिर्मितीची पद्धतदेखील बदलणे गरजेचे आहे.
– जगदीश कुलकर्णी : 9403774671
(लेखक व्हिडिओनिर्मिती क्षेत्रात कार्यरत आहेत.)
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.