Denise ने एका लग्नाहून परतताना आपली आई Cheryl Huffton ला आपली कल्पना सांगितली की आई मी इको-फ्रेंडली वस्तूंचा एक व्ययसाय सुरू करतेय ज्यात तू माझी भागिदार आहेस. सोळा वर्षांपासून शिक्षिकेची नोकरी करत असलेली Cheryl आपल्या मुलीने अचानक समोर ठेवलेल्या या प्रस्तावाने गांगरूनच गेली आणि तिने पहिल्याच फटक्यात मुलीचा हा प्रस्ताव नाकारला.
लग्नात इको-फ्रेंडली नॅपकीन पाहून Denise च्या डोक्यात ही व्यवसायाची कल्पना आली होती. त्या रात्री Denise ला झोप लागणारी नव्हती. रात्रभर जागून तिने आपल्या डोक्यात असलेल्या महिलांसाठी तयार कपड्यांच्या काही डिझाइन्स तयार केल्या. आईने हा प्रस्ताव नाकारला असला तरी तिलाही या डिझाइन्स खूप आपडल्या होत्या.
त्याच वेळी प्रेमा या Cheryl च्या मोलकरीणीचा, जिने Denise ला अगदी लहानाची मोठी केली होती, तिचा पाय उच्च मधुमेहामुळे कापण्यात आला होता आणि तिच्या घरातल्यांनी ती निकामी झाली म्हणून तिला घराबाहेर केले होते. प्रेमा Cheryl ला आपली अनाथालयात सोय करून द्यावी यासाठी विनवणी करत होती. दोघी मायलेकींना प्रेमाची दया येत होती आणि तिला मदत करावी हे त्या दोघींना आपलं कर्तव्य वाटत होतं.
या परिस्थितीचा विचार करून Denise, Cheryl ला म्हणाली, ‘‘बघ आई आपला व्यवसाय हा अशा लोकांसाठी आधार होऊ शकतो. आपण अशाप्रकारच्या दुर्बल महिलांना व्यवसायाच्या माध्यमातून मदत करू शकतो.’’ यातूनच ‘Dream Weavers’ ची पायाभरणी झाली आणि प्रेमा ही ‘Dream Weavers’ ही पहिली कर्मचारी झाली.
व्यवसाय करायचा तर सर्व प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता करून कायदेशीररीत्याच करायचा ही Cheryl ची अट होती. त्यानुसार वेगवेगळ्या सरकारी कचेऱ्यांमध्ये चप्पल घासून आवश्यक ते सर्व परवाने इत्यादी काढूनच उद्योगाची सुरुवात झाली.
मध्यमवर्गातून आलेल्या Cheryl कडे गुंतवणूक करण्यासाठी लाखो रुपये नव्हते. केवळ पाचशे रुपयांच्या गुंतवणुकीने तिने आपल्या उद्योगाची सुरुवात केली. सुरुवातीला हफ्त्यावर एक शिवणयंत्र विकत घेतलं आणि कामाचा श्रीगणेशा केला.
प्रेमानंतर देवी, जिचा नवरा एक अपघातात अकाली गेला आणि पाठी दोन मुलांचा संसार देवीवर एकटीवर सोडून गेला, ती ‘Dream Weavers’ ला जोडली गेली. तिला काही प्रमाणात शिलाई येत होतं. मग Denise ने तिला चांगलं टेलरींग शिकवलं. त्यानंतर यांनी काही तरी युनिक प्रोडक्ट तयार करायचं ठरवलं. Denise ने डिझाइन केलेल्या ब्रा, पँटी, अॅप्रॉन्स ही पूर्णपणे हायजिनिक आणि विघटनकारी साहित्यापासून तयार करावीत व ब्युटी पार्लर व स्पा येथे पुरवावीत असे ठरले.
ब्युटी पार्लर व स्पा यांना लागू शकतील अशी ही इको-फ्रेंडली उत्पादन तयार केली आणि आता प्रत्यक्ष बाजारात त्याला ग्राहक शोधायचे होते. स्वत: Cheryl शहरभरातील ब्युटी पार्लरमध्ये गेली. अनेक ठिकाणी तर तिला लोकांनी भेटायला आणि उत्पाद पाहायलाच नकार दिला. गरीब महिलांनी तयार केलेली ही उत्पादनं त्यांना मदत म्हणून तरी घ्या अशी विनवणी अनेकांना केली पण कोणी दादच देत नव्हतं.
दुसऱ्या महिन्यात चेन्नईमधील अल्वरपेट येथे एक ब्युटी पार्लर हे पहिल्या ग्राहकाच्या रूपात मिळाले. त्याने ५ हजार रुपयांचा माल खरेदी केला. त्यातून Cheryl ने या पैशांतून आणखी एक सेकण्ड हँड शिवणयंत्र खरेदी केलं.
Cheryl ला खऱ्या अर्थाने सहकार्य कोणी केलं असेल तर ते ‘भारतीय युवा शक्ती ट्रस्ट या संस्थेने. लक्ष्मी वेंकटेशन यांच्या या संस्थेने Cheryl मधील उद्योजकतेचा विकास केला. या संस्थेच्या पुढाकारामुळेच Cheryl ला शिवणयंत्र खरेदी करण्यासाठी बँकेकडून २.५ लाखांचं कर्ज मिळू शकलं.
Cheryl यांच्या Dream Weavers या कंपनीनं दुर्बल महिलांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याचं ठरवलं आहे, त्यामुळे या कंपनीत आता फक्त अशा महिलांनाच नोकरीवर ठेवले जाते. केवळ ५०० रुपयांच्या भांडवलापासून सुरू झालेली Cheryl यांची Dream Weavers ही कंपनी आपल्या व्यवसायिक यशाची शिखरं गाठतेच आहे आणि सोबत सामाजिक उत्थानाचा गाडाही हाकत आहे.
– टीम स्मार्ट उद्योजक
‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.