स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
चार प्रकारचे भाव आपण मनात वागवले पाहिजेत. सर्वांविषयी आपण मैत्रीचा भाव ठेवला पाहिजे. दु:खितांबद्दल दयाभाव ठेवला पाहिजे. जेव्हा इतर लोक आनंदात असतील तेव्हा आपणही आनंदित व्हायला पाहिजे आणि दुष्टांची आपण उपेक्षा केली पाहिजे. याचप्रमाणे समोर येणार्या सर्व गोष्टींविषयी आपण वागले पाहिजे.
जर एखादी सुखकारक गोष्ट असेल तर तिच्याविषयी आपल्याला मैत्री वाटावयास हवी. तसेच दु:ख बघून आपल्याला करुणा वाटावयास हवी; शुभ बघून आपण आनंदित व्हावे आणि अशुभाची उपेक्षा करावी. मनापुढे येणार्या निरनिराळ्या विषयांसंबंधीच्या या दृष्टीमुळे मन शांत होते. मनाचे अशा तर्हेने नियंत्रण करू न शकल्यामुळेच आपल्या दैनंदिन जीवनातील अशांती व बहुतेक अडचणी उद्भवत असतात.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/vcM97bUGox
उदाहरणार्थ – जर एखाद्या माणसाने आपले काही वाईट केले तर आपण तात्काळ त्याचा प्रतिकार करण्यास तयार होतो. या वाईट प्रतिक्रियेवरून दिसून येते की आपण चित्ताचे नियंत्रण करण्यास असमर्थ आहोत. चित्त हे (अशा परिस्थितीत) तरंगांच्या रूपाने विषयाकडे झेप घेते आणि आपण संयम घालवून बसतो. द्वेषरूप कोणतीही प्रतिक्रीया केल्याने मनाचे नुकसानच होते. आणि प्रत्येक असद्विचार, द्वेषमूलक आचरण किंवा तशा आचारणाची इच्छा जर नियंत्रित करता आली तर त्यामुळे आपला फायदाच होणार आहे.
अशा तर्हेने स्वत:ला आवरल्याने आपली काहीच क्षती होत नाही, उलट त्यामुळे आपला कल्पनातीत लाभच होत असतो. प्रत्येक वेळी द्वेषाची किंवा क्रोधाची वृत्ती संयत केल्याने तितक्याच प्रमाणत कल्याणकारी शक्ती आपल्या ठायी साठविली जाते. ही शक्ती उच्चतर शक्तींच्या रूपात परिणत होत असते. प्रत्येक वाईट विचाराची काही ना काही प्रतिक्रिया होतेच.
एखाद्या गुहेत बसून जरी एखादा द्वेषाचा विचार मनात आणला तरी तो संचित होऊन बसतो आणि एखाद्या दिवशी कोणत्या ना कोणत्या दु:खाच्या रूपाने तो फार प्रचंड अशी प्रतिक्रीया केल्याशिवाय राहत नाही. जर तुम्ही कोणाहीविषयी द्वेष व असूयाभाव प्रकट केला तर तो चक्रवाढ व्याजनिशी तुमच्याकडे परत येईल. कोणतीही शक्ती याचा प्रतिकार करू शकत नाही. एकदा तुम्ही त्यांना चालना दिली की त्यांचा परिणाम तुम्हाला भोगावाच लागेल. हे लक्षात ठेवल्यास तुमच्या हातून वाईट गोष्टी घडणार नाहीत.
मी येथे तुम्हाला सांगू इच्छितो की, कुणाचाही द्वेष करू नका, सर्वांवर प्रेम करा ह्या नैतिक सिद्धान्ताचा अर्थ आपल्याला यावरून समजू शकतो. कारण, विजेसंबंधी जसा आधुनिक सिद्धान्त आहे की ती शक्ती विद्युत्-आधारापासून निघते आणि वर्तुळ पूर्ण करून फिरून त्या आधारात पर येते, तसेच द्वेषाचे आणि प्रेमाचेही आहे; ती देखील आपल्या उगमापाशी परत येतातच. म्हणून कुणाचाही द्वेष, ही घृणा अखेर तुम्हाला येऊन मिळणारच मिळणार.
तुम्ही जर लोकांवर प्रेम कराल तर ते प्रेमही वर्तुळ पूर्ण करून तुम्हाला येऊन मिळेल. यात काहीसुद्धा संशय नाही की माणसाच्या हृदयातून बाहेर पडलेला केवढाही कमीजास्त द्वेष पुर्या वेगाने त्या माणसाकडे परतून त्याच्यावर अंमल बसवीत असतो, काहीच त्याला थोपवू शकत नाही. हेच प्रेमालाही लागू आहे.
रहस्य जर कशात असेल तर ते मत्सराच्या अभावात आहे. आपल्या बंधूशी, आपल्या सहकार्यांशी सर्वदा सहमत होण्यासाठी तयार राहिले पाहिजे, आणि त्यांच्याशी नेहमी जुळते घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संघटित होऊन कार्य करण्याचे हेच रहस्य होय. शूरपणाने परिस्थितीला तोंड द्या. जीवन क्षणभंगुर आहे – ते एखाद्या महान कार्यासाठी वेचा.
– स्वामी विवेकानंद
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.