मराठी उद्योजकांचे प्रबोधन करण्यासाठी झटणारे सीएस हर्षद माने


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


कंपनी सेक्रेटरी या नात्याने हर्षद माने तरुण व होतकरू मराठी उद्योजकांना सल्‍ला देतात की, त्यांनी आपल्या व्यवसायांचे स्वरूप प्रोप्रायटरशिप किंवा पार्टनरशिप संस्था या स्वरूपाचे ठेवू नये. तसे स्वरूप ठेवल्यास एका ठरावीक मर्यादेपर्यंत व्यवसायाची वाढ झाल्यावर भांडवल उभारणीवर फार मर्यादा येतात.

प्रायव्हेट वा पब्लिक लिमिटेड कंपनी किंवा एलएलपी स्वरुपाची कंपनी असल्यास खुल्या बाजारात समभाग विक्री करून भांडवल उभारणी करता येते. ‘सोळावं वरीस धोक्याचं’, असे म्हटले जाते. या वयात मुले पौगंडावस्थेत प्रवेश करतात आणि अनेक नको नको त्या गोष्टींबद्दल त्यांना आकर्षण वाटू लागते.

त्यामुळे काही जण वाहवत जातात; पण सोळावे वर्ष जसे धोक्याचे असते तसेच ते मोक्याचेही असते. जगातील अनेक महापुरुषांनी वयाच्या सोळाव्या वर्षीच आपल्या जीवनकार्याची सुरुवात केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षीच तोरणा किल्‍ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले, तर संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षीच ज्ञानेश्वरी लिहिली.

प्रश्‍न वयाचा नसून ज्यांच्या जाणिवा जागृत आणि उच्च प्रतीच्या असतात त्यांना योग्य वेळीच आपल्या जीवनध्येयाची जाणीव होते, हा आहे. जोगेश्वरी येथील एक प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी हर्षद माने या महापुरुषांएवढे महान नसले तरी त्यांनाही वयाच्या सोळाव्या वर्षीच आपले जीवितध्येय गवसले होते. कंपनी सेक्रेटरी हा शब्द तेव्हा त्यांना माहीत नव्हता, पण ‘मला चिटणीस व्हायचेय’ हे त्यांनी तेव्हाच ठरवले होते.

एका सुखवस्तू मध्यमवर्गीय परिवारात आणि आटोपशीर कुटुंबात २१ मार्च १९८६ ला जन्मलेल्या हर्षद माने यांना बालपणी फारसा संघर्ष करावा लागला नाही. त्यांचे वडील दिलीप माने हे जोगेश्वरीच्या अस्मिता विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेले आहेत. त्यांच्या मातोश्री दीपाली माने याही गोरेगाव येथील महाराष्ट्र विद्यालयातून शिक्षिका म्हणून निवृत्त झालेल्या आहेत. त्यामुळे आपोआपच घरात शिक्षणाला पोषक वातावरण होते.

शालेय जीवनात त्यांना वक्‍तृत्व व नाटकांत काम करण्याची अतिशय आवड होती. वयाच्या १४-१५व्या वर्षीच त्यांना कुठून तरी कंपनी सेक्रेटरी या पदाविषयी माहिती समजली आणि या शब्दाने त्यांच्या मनात घर केले. मॅट्रिकला असताना त्यांनी एका उच्चशिक्षित शेजार्‍यांबरोबर या विषयावर चर्चाही केली आणि ‘मला चिटणीस बनायचे आहे,’ असे ठासून सांगितले होते. त्यांच्याच सूचनेनुसार मग त्यांनी विलेपार्लेच्या डहाणूकर कॉलेजला कॉमर्सला प्रवेश घेतला.

आपल्याला काय बनायचे आहे, हे सुस्पष्ट असल्याने पुढे त्यांचे करीअर व्यवस्थित घडले. इतर मुलांच्या बाबतीत होणारी धरसोड त्यांच्या बाबतीत अजिबात घडली नाही. बारावीनंतर त्यांनी कंपनी सेक्रेटरी कोर्सला अ‍ॅडमिशन घेतली. साडेपाच वर्षांचा हा कोर्स करीत असताना त्यांचे बी.कॉम.चे शिक्षणही चालूच होते.

हर्षद माने यांना सुरुवातीपासूनच कंपनी सेक्रेटरी म्हणून प्रॅक्टिस किंवा व्यवसायच करायचा होता. त्यामुळे त्यांनी या कोर्सनंतर करावी लागणारी आर्टिकलशिप जाणीवपूर्वक दोन टप्प्यांत विभागली. मोठ्या कंपन्यांच्या कामाचा अनुभव मिळावा म्हणून त्यांनी अर्धी आर्टिकलशिप एका मोठ्या कंपनीत केली, तर कंपनी सेक्रेटरी म्हणून व्यवसायाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून त्यांनी अर्धी आर्टिकलशिप एका प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरीकडे केली.

हे काहीसे धोकादायक होते; पण हर्षद माने आपल्या भूमिकेवर ठाम होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर अनुभव म्हणून त्यांनी वालचंद पीपल्स फर्स्ट या कॉर्पोरेट ट्रेनिंग देणार्‍या कंपनीत दोन वर्षे नोकरी केली. त्यानंतर ठरवल्याप्रमाणे त्यांनी ‘हर्षद माने अ‍ॅण्ड असोसिएट्स’ या नावाने आपली प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी म्हणून प्रॅक्टिस सुरू केली.

कोणत्याही व्यवसायात सुरुवातीचा काळ उमेदवारीचा असतो. तो कालखंड हर्षद माने यांच्या बाबतीतही येऊन गेला. या कालखंडात त्यांना कामे मिळवण्यासाठी फिरावे लागे आणि मिळालेली कामे स्वत:च पूर्ण करून द्यावी लागत असत.

वालचंद कंपनीतील त्यांच्या एका महिला सहकार्‍याने आपल्या पतीच्या कंपनीचे इन्कॉर्पोरेशन करण्याचे काम देऊन त्यांना पहिला ब्रेक दिला. त्यानंतर हर्षद माने यांनी कामे मिळवण्यासाठी मॅसिव्ह कँपेनिंग केले. ते विविध चार्टर्ड अकाऊंटंट व कंपनी सेक्रेटरीज्ना जाऊन भेटत. आपले बिझनेस कार्ड देत.

त्यांनी दिलेली कामे ताबडतोब करून देत. बॅलर्ड पिअर येथील एक सीए ए. के. पाटील, दादरचे अल्पेश सांवला आणि नरिमन पॉइंट येथील एक खूप मोठे सीए संदीप संघी यांनी त्यांना या सुरुवातीच्या काळात खूप मदत केली, कामे दिली. त्यांच्या सहकार्यामुळेच हर्षद माने त्यांच्या व्यवसायात तुलनेने लवकर स्थिर झाले.

हर्षद माने

आज ते अंदाजे 70 पब्लिक व प्रायव्हेट लिमिटेड कंपन्यांना एक प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी म्हणून सेवा पुरवतात. त्यांचे मुख्य काम कंपनी सुरू करण्याबाबतचे म्हणजे कंपनी फॉर्मेशन- इन्कॉर्पोरेशनचे असते. याबाबत ज्या ज्या कायदेशीर बाबी किंवा लीगल कॉम्प्लॉयन्सेस असतात त्यांची ते पूर्तता करून देतात. शिवाय ते मोठ्या कंपन्यांना मर्जरविषयी सहकार्य करतात.

कंपनी सेक्रेटरी या पदाची मुख्य जबाबदारी कोणतीही कंपनी कायदेशीररीत्या चालते की नाही, हे बघणेही असते. कंपनीकडून कोणत्याही सरकारी नियमांचा भंग होऊ नये म्हणून कंपनी सेक्रेटरीला दक्ष राहावे लागते. तीच त्याची मुख्य जबाबदारी असते.

प्रत्येक छोटीमोठी गोष्ट कंपनी लॉ आणि इतर कायद्यांच्या चौकटीत राहून करावी लागते. हर्षद माने त्यांच्या क्लायंट कंपन्यांना याबाबतची सेवा पुरवतात. याशिवाय ते कॉपीराईट्स व ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन्ससंबंधी सेवाही पुरवतात.

मध्यंतरी मोठे ऑफिस घेऊन त्यांनी व्यवसाय द्रुतगतीने वाढवण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांचे खर्च वाढले; पण उत्पन्न त्या प्रमाणात वाढले नाही. त्या चुकीपासून धडा घेऊन आता त्यांनी परत खर्चाला आळा घालून व्यवसायवाढीचे धोरण अवलंबलेले आहे.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


हर्षद माने यांचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते मराठी उद्योजकांसाठी करीत असलेली धडपड. मराठी उद्योजकांना मदत करण्यासाठी ते विविध उपक्रम राबवतात. ‘उद्योगी व्हा’ या नावाची सेमिनार्स ते आयोजित करतात. त्यात मराठी उद्योजकांना निरनिराळ्या सरकारी योजनांची माहिती ते पुरवतात, त्यांचे आर्थिक प्रबोधन करतात.

त्याचप्रमाणे ते मायक्रो व स्मॉल स्केल क्षेत्रातील उद्योजकांसाठी सेमिनार्स आयोजित करतात. त्यात त्यांना उद्योग आधारमध्ये एमएसएमईखाली नोंदणी करण्याचे फायदे समजावून सांगतात आणि आवश्यक ते सहकार्यही करतात.

प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी या नात्याने हर्षद माने तरुण व होतकरू मराठी उद्योजकांना सल्‍ला देतात की, त्यांनी आपल्या व्यवसायांचे स्वरूप प्रोप्रायटरशिप किंवा पार्टनरशिप संस्था या स्वरूपाचे ठेवू नये. तसे स्वरूप ठेवल्यास एका ठरावीक मर्यादेपर्यंत व्यवसायाची वाढ झाल्यावर भांडवल उभारणीवर फार मर्यादा येतात.

प्रायव्हेट वा पब्लिक लिमिटेड कंपनी किंवा एलएलपी स्वरुपाची कंपनी असल्यास खुल्या बाजारात समभाग विक्री करून भांडवल उभारणी करता येते. त्यामुळे विस्तारासाठी सहजतेने अर्थसाहाय्य मिळते व कंपनीची अधिक जोमाने प्रगती होऊ शकते.

प्रोप्रायटरशिप किंवा पार्टनरशिपमध्ये भांडवलवृद्धी करायची असेल तर मोठ्या गुंतवणूकदार किंवा इन्व्हेस्टर्सपुढे हात पसरावा लागतो. ते लादतील त्या अटी मान्य कराव्या लागतात. काही वेळा आपण कष्ट करून उभारलेल्या व्यवसायात त्यांना आयतेच भागीदार म्हणून घ्यावे लागते. यापेक्षा कंपनी स्वरूपात व्यवसाय असेल तर भांडवलासाठी पब्लिक इश्यूचा मार्ग चोखाळता येतो.

या विषयांसंबंधी सेमिनार्स जर दुसर्‍या संस्थेने आयोजित केली असतील तर त्यात नवउद्योजकांना संबोधित करण्याचे काही मानधन घेत नाहीत. समाजसेवा व मराठी उद्योजकांचे आर्थिक प्रबोधन करण्यासाठी ते मोफत व्याख्याने देतात. काही वेळा अशी सेमिनार्स ते स्वत: आयोजित करतात. तेव्हा मात्र जागेचे भाडे व इतर खर्च निघण्यासाठी ते काही नाममात्र शुल्क आकारतात.

याशिवाय त्यांनी मराठी उद्योजकांना मदत करण्यासाठी ‘मराठी बिझनेस एलएलपी’ या नावाने एक आस्थापना सुरू केलेली आहे. तिच्याद्वारे ते मराठी उद्योजकांचे उत्पादनांचे विपणन करण्यासाठी प्रयत्न करतात आणि ठरावीक आर्थिक मर्यादेपर्यंत पोहोचलेल्या उद्योजकांनी आयपीओ आणावा म्हणून ते प्रोत्साहन देतात.

मराठी उद्योजकांनी व ग्राहकांनी आपल्याला लागणारा माल दुसर्‍या मराठी उद्योजकांकडूनच घ्यावा म्हणून त्यांनी ‘कोकणकन्या’ नावाची एक वेबसाइट लॉन्च केलेली आहे. त्यावर मराठी उद्योजक आपली उत्पादने नोेंदवू शकतात. यावर नोंदणी करणार्‍या मराठी उद्योजकांचा आपापसांत आर्थिक व्यवहार व्हावा म्हणून ते प्रयत्नशील असतात.

अशा तर्‍हेने मराठी उद्योजकांच्या व्यावसायिक जाणिवा विस्तृत व्हाव्यात, त्यांनी छोट्या डबक्यात पोहत राहू नये, मोठ्या समुद्रात आपले व्यवसायाचे जहाज हाकारावे म्हणून हर्षद माने सतत प्रयत्न करतात. ते मराठी उद्योजकांना मोठी स्वप्ने पाहण्यास उद्युक्‍त करतात. त्यांनी मोठ्या प्लॅटफॉर्मवर जावे, उद्योजकांसाठी सरकारने आखलेल्या नवनवीन योजनांचा भरघोस प्रमाणात लाभ घ्यावा म्हणून ते उद्योजकांना सतत अपडेटेड ठेवतात.

मराठी माणसांत उपजतच उद्योजकतेची वृत्ती कमी आहे. त्यात त्याला घरातूनच विरोध फार होतो. याबाबत हर्षद माने म्हणतात की, खरे प्रबोधन मराठी पालकांचे करायला पाहिजे. मराठी तरुण हल्‍ली हिरिरीने व्यवसायात उतरू लागले आहेत. नोकरी करण्याची पारंपरिक मराठी प्रवृत्ती त्यागून मराठी तरुण पिढी व्यवसायाची कास धरू लागले आहेत.

या कामी त्यांना त्यांच्या घरच्या मंडळींकडून खरा आधार मिळाला पाहिजे. हर्षद माने यांना त्यांच्या व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात घरून पाठबळ मिळाले होते म्हणूनच ते व्यवसायात प्रगती करू शकले. ही गोष्ट ते नेहमी आवर्जून नमूद करतात.

ते सांगतात की, कोणताही व्यवसाय सुरू केला की ताबडतोब पैसा मिळत नाही याची पालकांनी जाणीव ठेवावी. सेवा क्षेत्रात भांडवल गुंतवणूक कमी असते व तुलनेने लवकर परतावा मिळू लागतो; पण मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात तर सुरुवातीला फक्‍त गुंतवणूकच करावी लागते. उत्पादन क्षेत्रात लगेच उत्पन्न सुरू होत नाही.

अशा वेळी मराठी पालकांनी आपल्या मुलांना लगेच हिणवू नये. त्यांच्याकडून लगेचच आर्थिक अपेक्षा ठेवू नयेत. उलट त्यांना धीर द्यावा, संयम बाळगावा व होतकरू उद्योजकांचे मनोधैर्य वाढवावे,

हर्षद माने मराठी उद्योजकांसाठी करीत असलेली ही धडपड, त्यामागची त्यांची तळमळ बघता त्यांचे हे विचार मराठी उद्योजकांनी आणि पालकांनी आचरणात आणले तर खराखुरा उद्योगी महाराष्ट्र घडायला वेळ लागणार नाही.

संपर्क – हर्षद माने
99677 06150


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.