कुठे जन्माला यावे हे आपल्या हातात नसतं, पण कसं जगावं हे मात्र आपल्या हातात असतं. विजय पवार यांचा प्रवास अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून सुरू झाला. विजय यांचा जन्म मुंबईचा. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट होती. रोजंदारीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालला होता.
त्यांची आई मालन ही त्यांच्या कुटुंबाचा आधार झाली. आई आणि बहिणीचे कष्ट तो पाहत होता. आज काम केलं तरच आजचं जेवण मिळेल त्यामुळे रोज पैसे कमवावे लागणार एवढं कळत होतं. इथेच उद्योगाची बीज मनात रुजली. पैसा कमवायला शिकलो, पण पैशाचे महत्त्व अनेक चुका केल्यावर कळलं, असं विजय यांना वाटतं.
जेमतेम बारावीपर्यंत शिक्षण झाल्यावर माझे अप्पा (संपत देसाई) यांनी मला मर्चंट नेव्हीत प्रयत्न करायला सांगितले. माझ्या या अप्पाचे माझ्या जीवनात खूप मोठे स्थान आहे. त्यांनी बिकट काळात खूप साथ दिली.
मर्चंट नेव्हीत पैसा मिळतो एवढंच ठाऊक होतं आणि पैसा ही आमच्या जगण्याची गरज होती. सगळ्यात खालच्या पदावरून मर्चंट नेव्हीत सुरुवात केली आणि पुढे माझ्या प्रामाणिक कामाने बढत्या घेत गेलो.
विजय सांगतात, मी अनेक स्पर्धा परीक्षा द्यायचो आणि मुख्य म्हणजे मी त्या चांगल्या पद्धतीने पासही व्हायचो. कॉम्प्युटरची अगदी लहानपणापासून आवड होती, पण त्यात शिक्षण घेता आलं नाही. आवड असल्याने त्याचे ज्ञान मात्र मी लगेच आत्मसात करायचो. याचा या नोकरीत खूप फायदा झाला आणि मी मर्चंट नेव्हीचे ट्रेनिंग पूर्ण केले. एकोणिसाव्या वर्षी कामावर रुजू होऊन दुबईला गेलो. या नोकरीने पैसा, मानसन्मान, जगभर प्रवास, घर सारं काही दिलं.
माझी वृत्ती ही प्रचंड धरसोड वृत्ती. मर्चंट नेव्हीची नोकरी वयाच्या पंचविसाव्या वर्षी सोडली. पूर्वी स्टेट बँकेसाठी काही काळ काम केलं होतं. तिथे ग्राहक सेवेत कसं काम करतात हे कळलं. तिथेही मन रमलं नाही त्यामुळे खूप अडचणींना विशेषत: स्वत: ओढवलेल्या अडचणींना सामोरं जावं लागलं.
अभ्यासू वृत्ती आणि अचूक काम केल्याने बढती मिळवत होतो, पण हळूहळू काही कारणांनी माझं यातलं मन उडत गेलं. मला अनेकांनी ही नोकरी सोडू नको असं समजावलं, पण मी नोकरी सोडली.
सुरुवातीला काही वाटलं नाही, पण घरच्या जबाबदार्या, नवीन लग्न या सगळ्यांचा विचार हळूहळू पुन्हा एकदा आर्थिक उत्पन्नासाठी मार्ग शोधू लागला. सगळे रस्ते बंद होते. मर्चंट नेव्हीत पुन्हा प्रयत्न केला तर काम झालं असतं, पण आर्थिक तडजोड करावी लागली असती. कारण कमी पगारात इथे भरती सुरू झाल्यानेच समस्या आल्या होत्या. त्यामुळे तिथे मला जायचे नव्हते.
काहीही काम मिळत नव्हतं. आयसीआयसीआय बँकेत ज्या दिवशी इंटरव्ह्यू होता, त्या दिवशी मनाशी पक्कं केलं की जर इथे काम झालं नाही, तर पुन्हा मर्चंट नेव्हीत जायचं, पण SBI MF मध्ये संधी मिळाली. इथेही काही काळ चांगला गेला. गाठीशी पैसा जमा झाला, पण पुन्हा तीच समस्या; मन काही रमत नाही.
यादरम्यान एका व्यक्तीची भेट झाली आणि माझा दृष्टिकोन बदलला. नोकरीऐवजी स्वत:चा व्यवसाय करावा, असा निश्चय केला. मग माझी शोध मोहीम सुरू झाली. ओला, उबरसारख्या व्यवसायात गुंतवणूक करून फसलो.
इथे लक्षात आलं स्वत:ला गाडी आणि ड्रायव्हिंग यातली सखोल माहिती नसेल तर या व्यवसायात उतरू नये. इथे फटका पडला. मग मला गेमिंग झोनविषयी माहिती मिळाली. यापूर्वी गरज नसतानाही कर्ज काढलेला पैसा या व्यवसायात गुंतवला. गेमिंग झोनला खूप छान प्रतिसाद मिळाला. यासोबत मी गेम एक्सेसरीजसुद्धा ठेवायला सुरुवात केली. मी खूप चांगला सेल्समन आहे, हे एव्हाना मला कळलं होतं.
सुरुवात चांगली जुळून येत होती आणि तेवढ्यात कोरोना आला. सारं काही ठप्प झालं. काही काळ इथल्या कर्मचार्यांना पगारही दिला, पण आता हळूहळू जास्त प्रॉब्लेम येऊ लागला. असलेला पैसा कर्जाचे हफ्ते फेडण्यातच जात होता. हातात काम नव्हतं. घर चालवायचं होतं. हातावर हात ठेऊन बसून चालणार नव्हतं. मग घरबसल्या मार्ग शोधू लागलो.
ऑनलाईन सॉफ्टवेअर विकायला सुरुवात केली. याचदरम्यान माझे CSC आपले सरकार ई-सेवा केंद्र संमत झालं. यासाठीसुद्धा परीक्षा पास करावी लागते. कोरोना काळात सरकारने फास्ट टॅग सुविधा सुरू केली. हे सुरू करण्यासाठी ३० हजारांची गुंतवणूक होती. मित्रांनीही मला मदत केली.
खरं तर व्यावसायिक प्रवासात स्वप्नील रसाळे, प्रकाश तेटमे, भवानी मिश्रा, सुमित आंबे, उमेश तेटमे, मंगेश माने या माझ्या मित्रांनी वेळोवेळी मदत केली. फास्ट टॅगचं काम सुरू झालं. ही सेवा ऑनलाइन देणारा इथे मी एकटाच होतो. डिजिटल प्लॅटफॉर्मचा चांगला वापर करून मी फास्ट टॅग विकले.
माझे काम चोख होतं त्यामुळे लोक माझ्याकडे येत. काम चांगलं सुरू झालं, पण लोकांना माझ्या घराखाली यावं लागे. हे मला काही पटत नव्हतं. त्यामुळे मी जागेचा शोध घेऊ लागलो. एक छोटं भाजीचं दुकान होते (रमेश वर्मा) त्यांनी मला त्यांची जागा वापरू दिली.
फास्ट टॅग विक्रीने मला माझ्या बुडत्या काळात सावरले. मग मी मागे वळून पाहिलं नाही. मी विविध सेवा द्यायला सुरुवात केली. रेल्वे, फ्लाईट तिकीट बुकिंग, मनी ट्रान्स्फर, गाड्यांचे इन्शुरन्स, फूड लायसन्स, बिझनेस रजिस्ट्रेशन अशा अनेक सेवा द्यायला सुरुवात केली. आता स्वतंत्र जागी CSC आपले सरकार ई-सेवा केंद्र सुरू केलं.
आमची खासियत म्हणजे शंभर टक्के डाटा सेक्युरिटी यावर आम्ही भर देतो. या व्यवसायात आता चांगला जम बसलाय. ग्राहकांची गोपनीयता आम्ही कटाक्षाने पाळतो. ग्राहकांना चांगली सेवा देतो. त्यामळे आमचे ग्राहक बांधले गेलेत. या व्यवसायात विश्वासार्हता खूप महत्त्वाची आहे. ४ हजार ५०० हून जास्त ग्राहक जोडले आहेत.
आम्ही ग्राहकांना अनेक माध्यमांतून जोडून ठेवतो. ग्राहकांना सेवा देताना प्रथम आम्ही त्यांना सगळं समजावून देतो. गुंतवणूक करताना कशी करावी, कुठे करावी अशा बारकाव्यावर काम करतो. त्यामुळे येणार्या ग्राहकाचा विश्वास तयार होतो.
लहानपणापासून आई मालन आणि बहीण सविता यांची खंबीर साथ लाभत आलीय. त्यांनीच मला घडवलं. संपत देसाई पदोपदी मदत तर केलीच, पण मानसिक आधारसुद्धा दिला.
मित्रांनी साथ दिली त्याचप्रमाणे माझे भाऊजी विजय नवाडकर हेही मला व्यवसायात मदत करतात. माझी बायको नम्रता हिने पदोपदी मोलाची साथ दिली आहे. भविष्यात स्वत:ची विविध ठिकाणांहून शाखा सुरू करण्याचा मानस आहे त्यासाठी काम चालू आहे, असे विजय सांगतात.
विजय यांचा हा प्रवास अनेक चढउतारानी भरलेला आहे. कमी वयात आलेले व्यवहारज्ञान, कटू अनुभव, लढण्याची जिद्द, चुका समजून घेऊन स्वत:मध्ये केलेले बदल या गोष्टी विजय यांना इतरांपेक्षा वेगळं बनवतात.
संपर्क : विजय पवार – 9137738867
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.