विक्री वाढवण्याचे उपाय
कोणताही व्यवसाय उभा राहतो तो केवळ भांडवलावर, तंत्रज्ञानावर किंवा जाहिरातींवर नाही; तो उभा राहतो ग्राहकांवर. तरीही आजच्या धावपळीच्या, स्पर्धात्मक व्यावसायिक वातावरणात आपण अनेकदा हे विसरतो की ग्राहक म्हणजे फक्त एक ऑर्डर, एक बिल किंवा एक व्यवहार नाही, तो आपल्या व्यवसायाचा श्वास आहे.
आज अनेक उद्योजक “विक्री कशी वाढेल?” याचा विचार करतात, पण “ग्राहक माझ्याशी का जोडलेला राहील?” हा प्रश्न विचारणारे कमी आहेत. वास्तविक पाहता, व्यवसायाची खरी वाढ ही नवीन ग्राहकांपेक्षा विद्यमान ग्राहकांशी असलेल्या नात्यावर अधिक अवलंबून असते.
ग्राहकाशी केवळ कामापुरतं काम ठेवणं ही सवय आपल्या व्यावसायिक संस्कृतीचा भाग बनली आहे. व्यवहार पूर्ण झाला की संवाद संपतो, पण इथेच व्यवसाय मागे पडतो. कारण ग्राहकाला उत्पादनापेक्षा आधी माणुसकीची, आपुलकीची आणि विश्वासाची गरज असते.
आज डिजिटल युगात ग्राहकांशी संपर्क ठेवणं पूर्वीपेक्षा अधिक सोपं झालं आहे. फोन, व्हॉट्सॲप, ई-मेल, मेसेज अशी माध्यमं अनेक आहेत. तरीही आपण महिन्यातून एकदा तरी आपल्या जुन्या ग्राहकाला विचारपूस करतो का? त्याच्या वाढदिवशी, सणावाराला किंवा एखाद्या छोट्या निमित्ताने शुभेच्छा देतो का?
जर उत्तर नकारार्थी असेल, तर आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.

CRM software चा ग्राहक टिकवण्यासाठी उपयोग
CRM सॉफ्टवेअरच्या मदतीने उद्योजक आपल्या प्रत्येक ग्राहकाची संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी सुरक्षित ठेवू शकतात. ग्राहकाचं नाव, संपर्क क्रमांक, ई-मेल, खरेदीचा इतिहास, तक्रारी, आवडी-निवडी आणि संवादाची नोंद इत्यादी सर्व माहिती CRM मध्ये व्यवस्थित संग्रहित होते. त्यामुळे प्रत्येक ग्राहक वैयक्तिक पातळीवर ओळखता येतो, जे ग्राहक टिकवण्यासाठी फार महत्त्वाचं असतं.
CRM मुळे ग्राहकांशी नियमित आणि नियोजित संपर्क ठेवणं सोपं होतं. वाढदिवस, वर्धापन दिन, फॉलोअप कॉल, ऑफर्स किंवा सर्व्हिस रिमाइंडर यासाठी CRM स्वयंचलित नोटिफिकेशन देतं. यामुळे ग्राहकाला सतत ही भावना मिळते की व्यवसाय त्याला लक्षात ठेवतो आणि त्याची काळजी घेतो.
ग्राहकांच्या तक्रारी किंवा प्रश्न यांचं वेळेत निराकरण करणं हे ग्राहक समाधानाचं मुख्य सूत्र आहे. CRM सॉफ्टवेअरमुळे प्रत्येक तक्रारीचा ट्रॅक ठेवता येतो, जबाबदारी ठरवता येते आणि प्रतिसाद देण्याचा वेळ कमी होतो. परिणामी ग्राहकांचा विश्वास वाढतो.
याशिवाय CRM च्या विश्लेषणात्मक अहवालांमुळे (Reports & Analytics) कोणते ग्राहक नियमित आहेत, कोण निसटत आहेत आणि कोणत्या ऑफर्स प्रभावी ठरत आहेत, हे स्पष्टपणे समजतं. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतात.
थोडक्यात सांगायचं तर, CRM सॉफ्टवेअर हे केवळ डेटा व्यवस्थापनाचं साधन नसून ग्राहकांशी दीर्घकालीन नातं निर्माण करून त्यांना टिकवण्याचं प्रभावी व्यावसायिक शस्त्र आहे.
ग्राहक मिळवण्यासाठी आपण जाहिरातींवर मोठा खर्च करतो, पण एकदा ग्राहक मिळाल्यानंतर त्याचा डेटा, त्याची नोंद, त्याच्याशी नातं टिकवणं या गोष्टींकडे मात्र दुर्लक्ष होतं. हा विरोधाभासच आपल्या व्यवसायवृद्धीच्या आड येतो.
📘 ‘स्मार्ट उद्योजक’ मासिकाचे वर्गणीदार व्हा
उद्योजकता, व्यवसाय मार्गदर्शन आणि लोकोपयोगी माहिती — थेट घरपोच मिळवा.
६ महिने : ₹४०० । १ वर्ष : ₹८०० । ३ वर्षे : ₹२,०००
👉 आजच वर्गणीदार व्हा!
आपले विद्यमान ग्राहक हेच आपल्या व्यवसायाचे खरे आधारस्तंभ असतात. तेच आपल्याला सातत्याने व्यवसाय देतात आणि समाधान मिळालं तर तेच आपली जाहिरातही करतात. तरीसुद्धा ग्राहक संबंध व्यवस्थापनाबाबत आपल्याकडे म्हणावी तितकी जागरूकता नाही, ही वस्तुस्थिती आहे.
खरं तर प्रत्येक उद्योजकाने स्वतःला काही मूलभूत प्रश्न विचारायला हवेत, माझ्याकडे माझ्या ग्राहकांची अद्ययावत यादी आहे का? कायमस्वरूपी ग्राहक किती आहेत? मी शेवटचं केव्हा एखाद्या जुन्या ग्राहकाला फोन केला होता?
या प्रश्नांची उत्तरं जर समाधानकारक नसतील, तर आजच कामाला लागण्याची गरज आहे.
ग्राहकांशी संवाद सुरू करणं फार मोठं काम नाही. एक साधा फोन, एक आपुलकीचा मेसेज, एक छोटा ई-मेल हे पुरेसं असतं. ग्राहकाला एवढंच कळलं पाहिजे की “मी या व्यवसायासाठी महत्त्वाचा आहे.” ही भावना निर्माण झाली, तर ग्राहक दीर्घकाळ तुमच्याशी जोडलेला राहतो.
कायमस्वरूपी ग्राहकांसाठी खास सवलती, छोट्या भेटवस्तू, एखादा कार्यक्रम, सेमिनार किंवा साधं ‘धन्यवाद’ म्हणणं या छोट्या गोष्टी ग्राहकांच्या मनात मोठी जागा निर्माण करतात. ग्राहकाचं मन जिंकलं की विक्री आपोआप वाढते.
आपण जे काही चांगलं काम करतो, ते ग्राहकामुळेच शक्य होतं. हे मनापासून स्वीकारलं आणि ग्राहकाचं योग्य पद्धतीने कौतुक केलं, तर तो समाधानी राहतो. हळूहळू हे नातं केवळ व्यावसायिक न राहता विश्वासाचं, आपुलकीचं आणि ऋणानुबंधाचं होत जातं.
ग्राहकाला केवळ ग्राहक म्हणून न पाहता, त्याला आपल्या व्यवसायाचा भाग समजा. त्याला सेवा द्या, माहिती द्या, प्रसंगी त्याचा सल्ला घ्या. असं केल्याने तुम्ही त्याच्या अधिक जवळ जाता आणि कधी कधी तर त्याच्या कुटुंबाचा एक विश्वासू घटक बनता.
प्रत्येक ग्राहकाकडे पाहताना हा एक विचार कायम ठेवा की, हा ग्राहक माझ्यासोबत दीर्घकाळ राहणार आहे. ही दृष्टी ठेवली, तर व्यवसाय केवळ टिकणार नाही, तर नक्कीच भरभराटीला येईल.


