आपण सगळेच जण विशेषतः शहरी भागात राहणारे आणि त्यात मुंबईसारख्या शहरात राहणारे दैनंदिन तणावाने ग्रस्त असतो. सामाजिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक आघाड्यांवर आपल्याला बर्याचदा लढावे लागते. हे करत असताना नकारात्मक विचारांनी आपले मन ग्रासून जाते. मनात सतत नकारात्मक विचार येत राहतात.
आज एक जुना ग्राहक आपल्याला सोडून गेला, आपल्या भागीदाराशी आपले पटत नाही, घरातील वादविवाद या सर्व गोष्टींमध्ये आपण इतके गुंतून जातो की, मनात चुकूनही सकारात्मक विचार येत नाही. आपण खूप प्रयत्न करत असतो की, या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करावं; पण आपलं मन मात्र त्याच नकारात्मक गोष्टींमध्ये रमतं.
रामकृष्ण परमहंस यांच्याकडे एक माणूस आला. त्याला अध्यात्मात रस होता. बायको-मुलांना सोडून त्याला संन्यास घ्यायचा होता. म्हणून त्याने रामकृष्ण परमहंसांना सांगितले की, तुम्ही मला दीक्षा द्या. रामकृष्ण म्हणाले, त्याआधी तुला ध्यान करावे लागेल. त्या माणसाने त्यांची ही आज्ञा मान्य केली, पण जाताना रामकृष्ण परमहंस म्हणाले, काही झालं तरी ध्यान करताना उंटाचा विचार करू नकोस.
रामकृष्ण असे का म्हणाले हे त्या माणसाला कळलं नाही, पण रामकृष्णांचा स्वभाव थोडा विचित्र आहे, असे तो ऐकून होता. तो माणूस घरी गेला. दुसर्या दिवशी तो पुन्हा आला व रामकृष्णांना त्याने सांगितलं की, मी जेव्हा जेव्हा ध्यानाला बसतो तेव्हा तेव्हा माझ्या मनात उंटांचा विचार येतो.
या गोष्टीचे तात्पर्य इतकेच की, आपण कितीही प्रयत्न केला, की नकारात्मक विचार मनात येऊ द्यायचे नाहीत, तरी ते बळजबरीने मनात शिरकाव करतातच व आपल्या मनावर ताबा मिळवतात.
असे म्हणतात की, माणसावर संस्कार हे करावे लागतात, पण कुसंस्कार करावे लागत नाहीत. ते आपोआप होतात. माणसाचे मन असेच आहे; परंतु जर वेगळ्या प्रकारे आपण प्रयत्न केला तर मात्र आपण मनाला शिस्त लावू शकतो. शाळेत असताना एखादा अभ्यास आपल्याला नाही जमला तर शिक्षक ते काही वेळा लिहून काढायला सांगायचे.
मग तो विषय आपोआप आपल्या लक्षात यायचा. केवळ विचार करण्यापेक्षा एखादी गोष्ट लिहून काढली तर लक्षात ठेवणे सोपे जाते. म्हणून आपण नकारात्मक विचार थांबवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा सकारात्मक विचार अंगीकारणे कधीही उत्तमच आहे.
सकारात्मक विचार कसा अंगीकारावा? तर पूर्वीच्या लोकांना रोजनिशी लिहून ठेवण्याची सवय होती. ते लोक रोजनिशीत दिवसभरातील भल्याबुर्या आठवणी लिहून ठेवायचे. हे ते एखाद्या विशिष्ट उद्दिष्टाने करत होते असे नव्हे, पण त्यांना ती सवय लागली होती. आपणही तेच करायचे आहे, परंतु जरा वेगळ्या पद्धतीने.
सर्वप्रथम एक छानशी डायरी विकत घ्या. डायरीच्या पहिल्या पानावर सकारात्मक रोजनिशी असे लिहा. तुम्ही धार्मिक असाल तर त्यासोबत आपल्या इष्टदेवतेचे नाव लिहिले तरी चालणार आहे.
आता त्या डायरीचे काही भाग करा. म्हणजे पहिला भागातील काही पाने भूतकाळासाठी राखीव ठेवा, दुसर्या भागातील अधिक पाने वर्तमानासाठी राखीव ठेवा आणि तिसर्या भागातील काही पाने भविष्यासाठी राखून ठेवा. पहिल्या भागात, भूतकाळात घडलेल्या सकारात्मक बाबी लिहा.
दुसर्या भागात, वर्तमानातील रोजच्या आयुष्यातील सकारात्मक बाबी रात्री झोपण्यापूर्वी लिहा आणि तिसर्या भागात, तुमचे आयुष्य भविष्यात कसे असावे? तुम्हाला काय व्हायचे आहे? काय मिळवायचे आहे? या सर्व बाबी नमूद करून ठेवा, पण वर्तमानातील भाग मात्र रोज लिहिणे बंधनकारक आहे.
रोज रात्री झोपण्यापूर्वी हा सराव करून पाहा. केवळ चांगल्या गोष्टीच लिहून काढायच्या, अगदी लहान-सहान गोष्टीसुद्धा. म्हणजे तुम्हाला चांगले काम मिळाले यापासून ते अगदी तुम्ही बस स्टॉपवर उभे आहात आणि एखाद्या मित्राने तुम्हाला बाइकवरून लिफ्ट दिली, त्यामुळे तुमचे वीस रुपये वाचले. या गोष्टीसाठीसुद्धा आभार माना.
अशा छोट्या छोट्या सकारात्मक गोष्टी तुम्हाला सापडू लागल्या तर चार ते पाच महिन्यांनी तुमच्या लक्षात येईल की, तुमच्या आयुष्यात नकारात्मकतेपेक्षा सकारात्मकताच अधिक आहे. तुम्ही उगीच नकारात्मकतेशी गट्टी केली होती.
उलट तुमची गट्टी सकारात्मकतेशीच झाली पाहिजे. तुम्ही त्यासाठी अत्यंत योग्य आहात. हा सराव आजपासून नक्की करून पाहा आणि आपले आयुष्य सकारात्मकतेने फुलवा.
– जयेश मेस्त्री
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.