Advertisement
उद्योजकता

‘दासबोध’ एक व्यावसायिक मार्गदर्शक

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹५०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


हे शीर्षक वाचून आश्चर्य वाटलं ना? काही दिवसांपूर्वी माझीही हीच अवस्था होती. झालं असं, मी उत्तम व्यवस्थापन या विषयी माहिती शोधत होते. त्या वेळी व्यवस्थापन आणि दासबोध यासंबंधी काही माहिती वाचनात आली. लहानपणापासून धार्मिक वातावरणात वाढल्यामुळे या ग्रंथाची आणि माझी जुनी ओळख!

माझी आजी लीलाताई कुलकर्णी नेहमी दासबोधाचे पारायण करत असे. त्या वेळी आई आम्हाला तिथं सक्तीने बसून ऐकायला लावे. त्या वेळी बरेचसे काही कळत नसे, पण प्रत्येक श्‍लोकानंतर म्हटल्या जाणार्‍या ‘श्रीराम’ या शब्दाची लय आम्हास खूप आवडे. पुढे काही संदर्भ तपासताना मला याचे महत्त्व पटले.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा.

या वर्गणीसोबत काय काय लाभ मिळतील हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा : https://rzp.io/l/37lxSO3N9p

व्यवस्थापनाशी संबंधित शिव खेरा, स्टीफन कोव्हे यांची काही पुस्तके मी वाचली होती त्या वेळी असं लक्षात आलं की, यातील बर्‍याचशा गोष्टी दासबोधात सांगितल्या आहेत, पण दासबोध हा केवळ एक धार्मिक ग्रंथ इतकाच मर्यादित विचार आपण करतो.

खरं तर ग्रंथराज ‘दासबोध’ हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही तर शारीरिक, मानसिक आणि वैचारिक समृद्धीसाठीचा मार्गदर्शक आहे. इथं मी दासबोध एक व्यवसाय मार्गदर्शक कसा ठरू शकतो याविषयी माझं मत मांडणार आहे. कोणत्याही प्रकारच्या व्यवस्थापनाची सुरुवात स्वतःपासून होते आणि हीच यशस्वी व्यवसायाची गुरुकिल्ली ठरते.

1. सामाजिक मूल्ये – दासबोधामध्ये सांगितलेले सोपे तत्त्व! रामदास म्हणतात –

एके ठाई बैसोन राहिला,
तरीपण व्यापची बुडाला
सावधपणे ज्याला त्याला भेटी द्यावी

यशस्वी उद्योजक व्हायचे असेल तर एका ठिकाणी बसून चालणार नाही! लोकांच्या गरजांचा अंदाज घेण्यासाठी सभोवतालचा अभ्यास हवा. बोलणे, चालणे हवे. समाजाभिमुख दृष्टिकोन हवा. हेच तत्त्व टॉम पीटर यांनी ‘मॅनेजमेंट बाय वॉकिंग अराऊंड’ या पुस्तकात सांगितले आहे. वैयक्तिक भेटीगाठी, सुसंवाद यातून व्यवसायाची खरी गरज समजते.

2. आत्मपरीक्षण – वैयक्तिक भेटीगाठीमधून, समाजात वावरताना आपणास खूप ग्राहक भेटतात. त्या प्रत्येकाकडून मिळालेली प्रतिक्रिया स्वीकारणे हे गरजेचे आहे. स्वतःच्या प्रगतीसाठी सतत आत्मपरीक्षण हवे, असे दासबोध सांगतो. मूर्ख आणि पढतमूर्ख कोण हे ओळखणे आत्मपरीक्षणासाठी उपयुक्त ठरते. सततच्या आत्मप्रगतीसाठी, आपल्या अहंमवर नियंत्रण ठेवण्यासाठी याचा कसा वापर करावा हे दासबोध सांगतो.

3. स्वीकार – आत्मपरीक्षण केल्यावर स्वतःला स्वीकारणे गरजेचे आहे तरच आपण ग्राहकांचा विश्वास संपादन करू. बर्‍याच वेळा ग्राहकांची तक्रारच ऐकून घेतली जात नाही. अशाने तो दुरावतो. काळाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी ग्राहकांच्या मागण्यांचा, सूचनांचा स्वीकार केलाच पाहिजे!

4. सुधारणा – स्वतःला, आपल्या चुकांना, आपल्या ग्राहकांना एकदा स्वीकारले, की सुधारण्याचा अर्थात आपल्या प्रगतीचा मार्ग आपण खुला करतो. असे करत असताना आपल्या मनास बहुमूल्य मार्गदर्शनासाठी रामदासांचे साहित्य मदत करते. दासबोधाचे वाचन करत असताना सकारात्मक दृष्टिकोनाच्या प्रचीतीचा अनुभव खूप जणांना येतो.

5. आरोग्य – रामदासांचे साहित्य शारीरिक आणि मानसिक आरोग्य संतुलित ठेवते. त्यांच्या मते दुर्बल व्यक्ती कोणत्याही प्रकारचा सकारात्मक बदल घडवून आणू शकत नाही. म्हणूनच ‘शरीर माध्यमम् खलु धर्म साधनम’् असे म्हटले आहे.

विवेकी क्रिया आपुली पालटावी
अति आदरे शुद्ध क्रिया धरावी
जनी बोलण्यासारिखे चाल बापा

मला वाटतं यातील शेवटची ओळ ग्राहकांच्या समाधानावर केंद्रित आहे. त्यासाठी दर्जा, उत्तम सेवा यासाठी तडजोड नको. आपल्या व्यवसायाची जाहिरात करताना आपण ग्राहकांना बरीच आश्वासने देतो. ग्राहक वर्ग सांभाळून ठेवायचा असेल, वाढवायचा असेल, तर ही सर्व आश्वासने पाळावी लागतील. म्हणूनच समर्थ म्हणतात,

जनी बोलण्यासारिखे चाल बापा

आपण आपल्या प्राचीन ग्रंथसंपदेला धर्म, जात आणि कर्मठपणा यात बांधून टाकले आहे. त्यामुळे त्याचा आपल्यासाठी, आपल्या प्रगतीसाठी वापर करता येईल का? या शक्यतेचा साधा स्वीकारही आपण करत नाही, मग उपयोग तर लांबच.

पाश्चात्त्य विद्यापीठांनी आपल्या ग्रंथांचे महत्त्व जाणून त्यांचा व्यवस्थापन अभ्यासक्रमांसाठी उपयोग केला आहे, करत आहेत. आपण हे कधी ओळखणार? ‘नवे ते हवे’ अशी धारणा असली तरी ‘जुने ते सोने’ हे केवळ तपासून पहायला काय हरकत आहे? यशस्वी उद्योजक अशा सगळ्या शक्यता पडताळून पहातो. खरं आहे ना?

– साधना हुल्याळकर

स्मार्ट उद्योजक® मासिकात तुमची कथा किंवा तुमची मुलाखत प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर येथे क्लिक करा. : https://bit.ly/3bPrfMd


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!