स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct
साडी हा प्रत्येक भारतीय स्त्रीचा जिव्हाळ्याचा विषय. तिच्या मनाचा हा एक हळवा कोपरा असतो. स्त्री कितीही मॉडर्न कपडे डेली वेअरसाठी वापरत असली तरी सणसमारंभात आवर्जून साडी नेसण्याकडे तिचा कल असतो. कपाटात कितीही प्रकारच्या साड्या असल्या तरी प्रत्येक नवी साडी तिला खुणावते. भारतात विविध प्रकारच्या, रंग, पोत, डिझाइन असलेल्या विविध प्रांतांतल्या साड्या अशा असतात, की प्रत्येक साडी आपल्या कपाटात असावी असे तिला नेहमीच वाटते.
अशीच एक महाराष्ट्राचा मानबिंदू म्हणता येईल अशी साडी म्हणजे महाराष्ट्रीय पैठणी. या पैठणीचा थाट इतका भारी आहे की प्रत्येकाला ती भुरळ पाडते.
फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!
अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak
पदरावरती जरतारीचा नाचरा मोर, वेलबुट्टीवाले जरीकाठ, आकर्षक रंगसंगती आणि तलम मुलायम कापड अशा पैठणीची ओढ प्रत्येक स्त्रीला असते. एकदा तरी ही पैठणी नेसण्याची तिची हौस असतेच. अशाच चारशेहून अधिक मैत्रिणींची पैठणीची हौस भागवणारी आपली एक मैत्रीण आहे दीपा चेऊलकर.
दीपाचे जरा हटके प्रकारचे साडी स्टुडिओ आहेत. कांदिवली आणि पार्ले अशा दोन ठिकाणी दीपाचे ‘साजिरी सारीज्’ या नावाने दोन स्टुडिओ आहेत. या स्टुडिओमध्ये सामान्यत: विविध प्रांतांतल्या विविध पोत असलेल्या आणि भारतात प्रसिद्ध असलेल्या काही निवडक प्रकारच्या साड्या, ड्रेस मटेरिअल मिळतात; परंतु दीपाकडे मिळणाऱ्या पैठणी ही त्यांच्या व्यवसायाची खासियत आहे.
अगदी कमी कालावधीत यशस्वीरीत्या उद्योग उभारणारी ही स्त्री आज सर्व आघाड्यांवर यशस्वीरित्या काम करतेय. तिचा प्रवासही तेवढाच चित्ताकर्षक आहे.
बालपणापासूनच आजोबांकडून उद्योगाचे बाळकडू मिळालेल्या दीपाने तिच्या ‘साजिरी सारीज्’ची सुरुवात खरंतर उशीरा केली. २०१२ साली दीपाने उद्योगात पदार्पण केले. मेहनती, अभ्यासू दीपाला स्वत:चे काही तरी निर्माण करण्याची सततची आस होती. आपल्या या पिढीकडून पुढील पिढीकडे पैशांच्या श्रीमंतीशिवाय आपल्यातील रूढी परंपरा आणि उद्योजकीय गुणांचा वारसा पुढे द्यायचा होता.
घरच्या आघाड्यांवर काम करता करता अनेक वर्षे निघून गेली. घरसंसारच्या जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या पार पाडल्या. मुलगा मोठा झाला आणि दीपाला हळूहळू तिची आवड जपण्यासाठी वेळ मिळू लागला. त्यातूनच दीपाने उद्योग करण्याचा विचार पक्का केला. उद्योग काय सुरू करावा याविषयी अनेक गोष्टींचा अभ्यासही केला.
इव्हेंट मॅनेजमेंट ही त्यांची आवड होती. काही काळ त्यांनी नोकरी केली होती. तेव्हा त्या इव्हेंट मॅनेजमेंटचे काम करत; परंतु आता घरच्या जबाबदार्यांरमुळे या उद्योगात जाणे त्यांना शक्य नव्हते. त्यांनी इतर विषयांचा अभ्यास सुरू केला.
एक वेगळे आणि तेवढेच सकस प्रॉडक्टचा शोध चालू होता. त्यातूनच पैठणीचा इतिहास, त्याची बाजारपेठ, विणकरांशी बोलणी, विविध व्हिडिओज यातून पैठणी हेच आपले प्रॉडक्ट हे नक्की झाले. त्यांना पैठणी साडीचा उद्योग याविषयी रुची निर्माण झाली.
दीपाचे असे मत आहे की, प्रत्येक मुलीची सुरुवातच मुळात साडीतून होते. जन्मापासूनच आईच्या, आजीच्या साड्यांपासून बनवलेल्या धुपट्यांमधून मुली मोठ्या होतात. मुलगी उभी राहू लागली की, प्रत्येक आई आपल्या ओढणीची साडी करून प्रथम मुलीला नेसवते. नकळतपणे आपल्यावर हे संस्कार होत असतात, त्यामुळे साडीला मरण नाही. ती नेहमीच आपला भाग राहणार त्यामुळे निर्णय पक्का झाला.
आता सुरुवात कशी करायची, हा प्रश्नल होता. सुरुवातीला घरातूनच हा उद्योग सुरू केला, परंतु घर आणि उद्योग घरातून करताना अनेक प्रकारच्या अडचणी येत होत्या. दोन्ही गोष्टी विस्कळीत होत होत्या. काही काळ तर दीपा विविध ऑफिसेसमध्ये बॅगेतून पैठणी घेऊन फिरायच्या.
ऑफिस दर ऑफिस फिरून महिलांचा कल समजून घ्यायच्या. त्यांच्यापर्यंत आपलं प्रॉडक्ट पोहोचवण्यासाठी धडपडायच्या. विविध ठिकाणी प्रदर्शन भरवायच्या. त्यामुळे उद्योग चालू होता, पण घडी बसत नव्हती.
उद्योग करायचा तर स्वतंत्र आस्थापनेतून केला पाहिजे, ही मानसिकता होती. त्यामुळे घरातून उद्योगाला बाहेर काढायचे ठरले. कांदिवलीतच घराच्या शेजारी एक छोटे बुटिक होते. ते एका सिंधी बाईचे होते. मुळातच लाघवी स्वभावाच्या दीपाला या बाईने तिच्या दुकानात एक छोटे शोकेस दिले आणि तिथूनच एका पैठणीच्या जोरावर त्यांचा उद्योग सुरू झाला.
यातून आत्मविश्वास दुणावला. मग त्या सिंधीबाईने दीपावरील विश्वासाच्या जोरावर तिचे दुकान दीपाला भाड्याने दिले. मग दीपाने मागे वळून पाहिलेच नाही. हळूहळू आपल्या उद्योगात नावीन्यपूर्ण कल्पना वापरत ग्राहक, बाजारपेठ, ग्राहकांची मानसिकता, आपल्या मालाची क्वीलिटी अशा गोष्टींच्या प्रत्यक्ष अनुभवातून अभ्यास सुरू केला.
सुरुवातीला अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागायचे. हळूहळू त्यावर मात केली. उद्योगाचा जम बसत असतानाच एकदा दुकानात चोरी झाली आणि दीड ते दोन लाखांचा माल चोरीला गेला. हा खूप मोठा फटका सुरुवातीच्या काळात ‘साजिरी सारीज्’ला बसला; परंतु त्यातूनही दीपाने पुन्हा उभारी घेतली आणि नव्या जोमाने कामाला सुरुवात केली.
दीपा म्हणते, “कांदिवलीच्या ‘साजिरी सारीज्’च्या स्टुडिओच्या उभारणीच्या वेळी खऱ्या अर्थाने मी उद्योग करायला शिकले. ग्राहकांची मानसिकता, त्यांचा कल समजून घेतला. ग्राहकांना काय हवंय ते समजून त्यात जास्तीत जास्त चांगले काही तरी देण्याचा प्रयत्न सुरू केला.
दीपाच्या या प्रवासाला मग नवे आयाम मिळू लागले. हळूहळू ग्राहक संख्या वाढू लागली. ग्राहकांकडून विविध प्रकारच्या मालाची मागणी वाढू लागली. उद्योग जोमाने वाढू लागला आणि बघता बघता ‘साजिरी सारीज’ हा ब्रँड तयार झाला.”
दीपाने कांदिवलीनंतर मराठीबहुल लोकसंख्या जास्त असलेल्या पार्ल्याकडे आपला मोर्चा वळवला. महिलांकडून मागणी वाढू लागली, त्यामुळे मग ‘साजिरी सारीज्’ स्टुडिओ पार्ल्यातून सुरू करण्याचे त्यांनी ठरवले आणि पार्ल्यातही स्टुडिओ सुरू झाला. आज कांदिवली आणि पार्ले अशा दोन्ही ठिकाणी चांगला जम बसला आहे. दोन्हीकडे लक्ष देताना अनेक प्रकारच्या अडचणी येतात; परंतु त्यातही एक मजा आहे, असे दीपा म्हणते.
दीपाकडे कांजिवरम्, चंदेरी, आर्ट सिल्क, इरकल, बनारसी, मनीपुरम अशा मोजक्या परंतु ब्रँडेड साड्या उपलब्ध असतात. पैठणी हा दीपाच्या उद्योगाचा केंद्रबिंदू आहे. पैठणीमध्येसुद्धा अनेक प्रकारच्या पैठणी ‘साजिरी सारीज्’मध्ये उपलब्ध आहे. हँडलूम पैठणी, कडीयाल पैठणी, बालपल्लू बुट्टा पैठणी, ब्रॉकेड पैठणी, डिझायनर पैठणी एक ना अनेक प्रकार.
अगदी सात हजारांपासून एक लाखापर्यंत किमतीच्या या पैठणी ‘साजिरी सारीज्’ स्टुडिओत उपलब्ध आहेत. भविष्यात इतरही भारतभरात विविध ठिकाणी बनणारी प्रत्येक साडी एकाच छताखाली म्हणजे ‘साजिरी’त उपलब्ध असेल असे भव्य साडी स्टुडिओ स्थापन करणे हे दीपाचे ध्येय आहे.
‘पैठणी म्हणजे साजिरी आणि ‘साजिरी’ म्हणजे पैठणी’
हे समीकरण प्रत्येक स्त्रीच्या मनावर कोरले गेले पाहिजे, असा त्यांचा ध्यास आहे. यासाठी दीपा सतत प्रयत्नरत असते. लवकरच साजिरी पैठणी डिझाइन बाजारात उपलब्ध करून देण्यासाठी त्या कार्यरत आहेत. त्यासाठी विविध प्रकारच्या डिझाइन्सवर त्यांचे काम चालू आहे.
खरेतर हळूहळू विणकरांच्या उद्योगात घसरण येत असताना अशा प्रकारे यात नावीण्यपूर्ण वाढ करून त्यांना त्यांचा रोजगार टिकवून ठेवण्यासाठी एक प्रकारे त्यांची मदत होतेय.
महिलांसाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजनही ‘साजिरी सारीज्’तर्फे केले जाते. साडी ड्रेपिंग, ब्युटी वर्कशॉप्स, हळदीकुंकू असे अनेक कार्यक्रम आतापर्यंत केले आहेत. त्याशिवाय प्रत्येक ग्राहकाला सेवा देताना त्यांचा वैयक्तिक कल, त्यांची आवडनिवड, रंगरूप यानुसार हक्काने आणि प्रेमाने त्यांना काय चांगले शोभून दिसेल त्यानुसार आपलेपणाने सल्लापही देतात. हेच त्यांच्या यशस्वी उद्योगाचे गमक आहे असे म्हणावे लागेल.
प्रत्येक स्त्रीला असा आपलेपणा आवडतो आणि भावतो. याचा अनुभव तुम्हीही घेऊ शकता. दीपाने आधुनिक काळाची पावले ओळखून www.sajiree.com ही वेबसाइटही ग्राहकांसाठी सुरू केली आहे. याशिवाय सोशल मीडियावरही त्यांचा फेसबुकच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा कल आहे.
आजोबांकडून बाळकडू घेऊन उद्योगाची कास धरून त्या आज वाटचाल करतायत. घर आणि उद्योग यांचा योग्य मेळ त्या साधतायंत. त्यासाठी वेळेचे योग्य नियोजन तिला खूप उपयोगी पडते असे तिला वाटते. प्रचंड मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर हा प्रवास दीपाला भविष्यात नक्कीच यशाच्या वाटेवर घेऊन जातोय.
– प्रतिभा राजपूत
दीपा चेऊलकर : ९८६७०८८८७७
Free Newsletter on WhatsApp & Telegram
'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.