फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जपानमध्ये एक प्रसिद्ध कवी राहात होता. आपल्या कवितांमुळे तो जपानच्या तरुणांपर्यंत पोहोचला होता. बराच पैसाही त्याने कमावला. त्याचं वय फार झालेलं नव्हतं. तरुण होता. अनेक मुलींचे प्रस्तावही त्याच्याकडे येत होते; पण तो खूश नव्हता. इतक्या तरुण वयात प्रसिद्धी मिळाली, पैसा मिळाला; पण एक गोष्ट त्याच्या मनात सलत होती.
जपानमध्येच एक संतकवी राहत होते. तेसुद्धा खूप प्रसिद्ध होते. अर्थात ते संन्यासी असल्यामुळे या तरुण कवीइतका पैसा त्यांच्याकडे नव्हता. या तरुण कवीला नेहमी असे वाटायचे आपल्यापेक्षा संतकवी अधिक प्रसिद्ध आहेत.
त्याला नेहमी प्रश्न पडायचा, मी विविध विषयांना हात घालून कविता करतो. माझी कविता तरुण पिढीला भावते. मग या संतकवीच्या कवितेत असे काय आहे ज्यामुळे ते इतके प्रसिद्ध आहेत. आबालवृद्ध त्यांच्या काव्याच्या प्रेमात आहेत. अशी कोणती मधुरता आहे त्यांच्या कवितेत, जी माझ्या कवितेत नाही?
या कल्पनेने तो रोज बेचैन असायचा. त्याला जगातला मोठा साहित्यिक व्हायचे होते, पण आपल्यापेक्षा कुणी मोठं आहे, ही कल्पना त्याला सहन होत नव्हती.
एकदा त्याने ठरवले. या संतकवीच्या आश्रमात जायचे आणि त्यांनाच विचारायचे. तरुण कवी येणार म्हणून संतकवी त्याचे स्वागत करायला आश्रमाच्या बाहेर स्वतःच उभे होते. त्यांनी त्याचा हात धरून आपल्या आश्रमात आणले.
तरुण कवीने आल्या आल्या प्रश्न केला, असे काय आहे तुमच्या कवितेत, जे माझ्या कवितेत नाही? माझ्या कवितांपेक्षा तुमच्या कविता अधिक प्रसिद्ध आहेत. संतकवी शांतपणे म्हणाले, अरे तू स्वतःची तुलना माझ्याशी का करतोय? मी तर फकीर माणूस आहे. तुझ्याकडे सगळे काही आहे. ऐश्वर्य आहे, तारुण्य आहे आणि दिसायलाही तू सुंदर आहेस. मग तुला हा प्रश्न का पडतो?
तरुण कवी म्हणाला, माझ्याकडे सगळे आहे, जे तुमच्याकडे नाही; पण तरीही तुम्ही अधिक प्रसिद्ध आहात. मग तुमच्याकडे असे काय आहे, जे माझ्याकडे नाही?
तरुणाची अस्वस्थता संतकवीला जाणवली. संतकवी म्हणाले, आधी आपण भोजन करू. मग चांदण्यांत जरा भटकायला जाऊ तेव्हा बोलू निवांत. तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईन मी. दोघांनी एकत्रच भोजन केले. ठरल्याप्रमाणे दोघेही चांदण्यात हिंडायला निघाले.
संतकवी बोलत होते, किती छान आहे ना निसर्ग. तो ईश्वर म्हणजे महान चित्रकार आहे. तो एक महान कवी आहे. त्याने निर्माण केलेली रचना किती सुंदर आहे. जर हा निसर्ग नसता तर आयुष्य भकास झाले असते. वर चांदण्या आहेत. जणू त्या आपल्याला पाहत आहेत आणि हा गोलाकार चंद्र, चांदण्यांचा राजा, काय ऐट आहे त्याची…
संतकवी बोलतच होते; पण तरुण कवीला हे ऐकण्यात मुळीच रस नव्हता. त्याला फक्त त्याच्या प्रश्नाचे उत्तर हवे होते. संतकवीचे बोलणे सहन न झाल्याने तरुण म्हणाला, तुम्ही मला माझ्या प्रश्नाचे उत्तर का देत नाही? नसेल द्यायचे तर तसे सांगा. मी निघून जाईन इथून.
संतकवीला तरुणाची दया आली. समोर एक तलाव होता. तलावात चंद्राचे आणि चांदण्यांचे प्रतिबिंब स्पष्ट दिसत होते. जणू अवकाश तलावात उतरलेय असेच भासत होते. पाण्याची जरासुद्धा हालचाल होत नव्हती.
संतकवीने तरुणाला तलावापाशी आणले व म्हणाले, पाहिलेस किती सुंदर प्रतिबिंब आहे. जणू या तलावाने आकाशाची चादर ओढली आहे. हे चंद्राचे प्रतिबिंब पाहा. किती सुरेख आहे ना?
तरुण कवी लक्ष देऊन ऐकत होता व तलावात पाहत होता. त्यालाही ते प्रतिबिंब भावले होते. पाण्यात चंद्र तर अगदी सुंदर दिसत होता. तरुणाचे लक्ष हटेना. एवढ्यात संतकवीने एक छोटासा दगड घेतला आणि चंद्राच्या प्रतिबिंबावर मारला. पाण्याची हालचाल झाली. चंद्राचे सुंदर प्रतिबिंब कुरूप झाले. त्या तरुणाने थोडेसे रागातच संतकवीकडे पाहिले.
संतकवी अगदी शांतपणे म्हणाले, तुझ्या कविता या पाण्यातल्या प्रतिबिंबासारख्या आहेत. एक छोटासा दगड मारला तरी त्याचे क्षणात काय झाले तू पाहिलेस आणि माझ्या कविता त्या आभाळातल्या चंद्राप्रमाणे आहेत. तिथपर्यंत कोणताच दगड पोहोचू शकत नाही.
तरुण कवी अगदी स्तब्ध होऊन पाहत राहिला. संत कवी बोलतच होते. तू ज्या कविता लिहितोयस त्या चांगल्याच आहेत. तारुण्यात बहरलेल्या आहेत; पण त्यांचा माणसाच्या जीवनात उपयोग काय? तुझ्या कवितेमुळे आत्महत्या करणार्या व्यक्तीला त्याच्या आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त करण्याची प्रेरणा मिळते का?
जीवन जगण्याची कला तुझ्या कविता शिकवतात का? ज्या ईश्वराने ही सुंदर सृष्टी बनवली. त्या ईश्वराला तुझ्या कविता अभिवादन करतात का? तू उत्तम कलाकार आहेस म्हणून तुला गर्व झाला आहे. त्या तरुण कवीने संतकवीचे पाय धरले.
संतकवीने त्याला उभे केले आणि म्हटले मी तर फकीर माणूस आहे; पण तू नाहीस. पैसा, संपत्ती, ऐषआराम या सगळ्या भौतिक गोष्टी तू मिळवल्या पाहिजेत. हा तुझा हक्क आहे. तू खूप यशस्वी हो. मोठ्ठा हो; पण तुझ्यासोबत अनेकांना मोठा कर.
तुझ्या कवितेतून प्रेरणा घेऊन लोकनायक घडू देत. स्वतःचेही कल्याण कर आणि दुसर्याचंही कल्याण कर. जर असे करशील तर हजारो, लाखो वर्षे तुझ्या कविता जीवंत राहतील. नाही तर कागदावर रेखाटलेले काही शब्दच राहतील. कागदांचा चुराडा होईल. शब्दही नाहीसे होतील तरुणाच्या डोळ्यांत अश्रू तरंगू लागले; पण त्याला त्याच्या जीवनाचे रहस्य गवसले होते.
त्या तरुणाने संन्यास नाही घेतला. तसा उगाच कुणी तरी तो घेऊच नये. तरुण कवीने लोकांच्या कल्याणासाठी कविता लिहायला सुरुवात केली. त्याला खूप प्रसिद्धी मिळत गेली, संपत्तीही मिळाली. त्याने अनेक लोकांना रोजगार प्राप्त करून दिला. अनेकांची आयुष्ये बनवली.
तात्पर्य : यश ही काही फक्त तुमची एकट्याची मक्तेदारी नाही. गर्व करून दुसर्यांना पाण्यात बघण्यापेक्षा सर्वांना सोबत घेऊन चला. स्वतःसोबत इतरांचेही आयुष्य घडवा आणि तुम्ही कोणतेही काम करत असाल, पण तुमचा मूळ हेतू हा लोककल्याणाचा असला पाहिजे.
माझे आणि आपले यातील फरक तुम्हाला कळला पाहिजे. मीपेक्षा आपणची ताकद अधिक असते. तुम्ही जर इतरांचा विचार करू लागलात तर तुम्हाला भस्म्या रोग होणार नाही आणि जीवन सुरळीत होईल, तुमचे आणि इतरांचेही.
– जयेश मेस्त्री
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.