भावनेच्या भरात व्यवसाय नको; तर व्यावसायिक भावना वाढवा


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


आज महाराष्ट्रात सर्वत्र उद्योजकतेचे वारे वाहत आहेत. उद्योग सुरू व्हावेत यासाठी बरेच प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. याचा चांगला परिणाम दिसत आहे व अनेक तरुण-तरुणी तसेच निवृत्त आज व्यवसायाची वाट चोखंदळत आहेत.

‘नोकरी धरणे’ व ‘धंद्यात पडणे’ अशा विचारांना शब्दश: घेणारा मराठी माणूस आज ‘धंद्यात उभा’ राहतो आहे. नोकरीचा सरधोपट मार्ग न स्वीकारता तरुण पिढी व्यवसायाच्या दिशेने वळत आहे.

मात्र नाण्याची दुसरी बाजूसुद्धा लक्षात घेणेसुद्धा गरजेचे आहे. आज अनेक उद्योजक असेसुद्धा भेटतात ज्यांनी व्यवसाय सुरू तर केला, पण त्यांचा व्यवसाय नीट चालत नाही, बंद होण्याच्या मार्गावर आहे किंवा तोट्यात आहे. अशा व्यक्ती इतक्या तीव्रतेने निराशेच्या गर्तेत जात आहेत की, एक तर व्यसनाधीन होत आहेत किंवा आत्महत्येच्या विचारांत आहेत.

त्यांची नैराश्याची अवस्था बघून, त्यांच्या अवतीभोवती असलेली माणसे अथवा त्यांची पुढची पिढी व्यवसायाबद्दल अढी निर्माण करून घेते. व्यवसायात अपयश येण्याची विविध कारणे असू शकतात. पण त्यातील प्रमुख बाब असू शकते ती म्हणजे व्यवसाय करणार्‍याने, व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बाजारपेठेचा अथवा मागणी-पुरवठा अथवा व्यवसायाशी निगडित अनेक बाबींचा अभ्यास केलेला नाही.

आजूबाजूच्या व्यक्तींनी अथवा मिळालेल्या प्रेरणादायी भाषणांनी प्रेरित होऊन या व्यक्ती भावनेच्या भरात व्यवसाय सुरू करतात. पारखी सुतार ‘दोनदा मोजा व एकदा कापा’ तसेच हुशार सिव्हिल इंजिनीअर ‘अगोदर जमिनीचा योग्य सर्व्हे करून, तसेच योग्य पाया खणून, मग बांधकाम’ करायला घेतो.

भावनेच्या भरात, काळजी न घेता, व्यवसायाला सुरुवात केली तर नंतर काळजी करावी लागते. अनेक जण, ज्यांच्या कुटुंबात, अगोदर कुणीही व्यवसाय केलेला नसतो, त्यांच्याकडे व्यवसायाची पार्श्वभूमी नसते. वारसाहक्काने येणारे सल्ले व माहिती नसते. त्यामुळे प्रथम पिढीच्या उद्योजकांनी केवळ भावनेच्या भरात उद्योग सुरू करू नये, तर व्यावसायिकता अंगी बाणवत, पूर्ण तयारीनिशी नसेल, पण योग्य तयारीनिशी उद्योगाच्या मैदानात उतरावे.

‘व्यवसाय संधी’ व ‘व्यावसायिकता’ या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

संधी असेल तर व्यवसाय सुरू करता येईल; पण व्यावसायिकता नसेल तर मात्र व्यवसाय तग धरू शकत नाही. ज्ञान, दृष्टिकोन व कौशल्य या त्रिसूत्रीचा वापर करत व्यवसाय बांधत न्यावा लागतो.

आपण ज्या प्रॉडक्ट अथवा सेवेचा व्यापार करणार, त्यासंबंधी माहिती तसेच त्याचे बाजारपेठेतील स्थान, मागणी व पुरवठा, प्रतिस्पर्धी इत्यादी बाबींचे सखोल ज्ञान तसेच वास्तविक दृष्टिकोन यांच्या जोडीने मनुष्यबळ हाताळणी कौशल्य, ताणतणाव नियोजन कौशल्य, वेळेचे नियोजन कौशल्य, अशा अनेक कौशल्यांचे अनुकरण आवश्यक असते.

प्रथम पिढीचा उद्योजक कित्येकदा स्वत:च्या पद्धतीने उद्योग करतात; पण उद्योगात भरारी घेण्यासाठी उद्योग हा ठरावीक उद्योग प्रणालीने करावा लागतो. अन्यथा तो उद्योग आहे त्याच ठिकाणी फिरत राहतो किंवा उलाढालीनुसार पुढे जातो; पण नफ्यामध्ये मार खातो.

उद्योग प्रणालीसाठी तुमच्या व्यवसायाचा ‘बिजनेस प्लॅन’ तयार असावा लागतो. याची सुरुवात, तुमच्या उद्योगाची दिशा ठरवण्याने होते. तुमच्या उद्योगाचा उद्देश, येणार्‍या काळातील प्रवास, तुमची उद्योग तत्त्वे, तुमच्या उद्योगाची आचारसंहिता याने होते.

यांच्या बरोबरीने तुमच्या व्यवसायातील मनुष्यबळाची संरचना तसेच त्यातील प्रत्येक व्यक्तीच्या कामाचे स्वरूप व त्यांचे अधिकार-जबाबदार्‍या स्पष्ट असाव्या लागतात. या मनुष्यबळावर तुमचे योग्य नियंत्रण हवे, अन्यथा व्यवस्थापन वा कर्मचार्‍यांमध्ये न्यूनगंड किंवा गर्व निर्माण होऊ शकतो.

या मनुष्यबळाचे योग्य मूल्यमापन करून त्यांना योग्य बढती वा पगारवाढ करवून दिली तर त्यांच्यामध्ये प्रोत्साहन कायम राहते. यामुळे उद्योगवाढीला चालना मिळत जाते. यादरम्यान मार्केटिंगचे गणित मांडावे लागते. प्रॉडक्ट-प्राइस-प्रमोशन-फिजिकल डिस्ट्रिब्युशन या चार P चीसुद्धा तजवीज करावी लागते. त्याला मॅन-मशीन-मनी या तीन M ची जोड द्यावी लागते.

उद्योग किती वाढवायचा तसेच पैसा किती कमवायचा हेसुद्धा स्वतःचे गणित असावे. अन्यथा जगाला दाखवण्याच्या नादात तुम्ही स्वतःचे आयुष्य जगणे विसरुन जाता. उद्योग जगण्यासाठी आहे; जगणे उद्योगासाठी नाही. पैसा व प्रसिद्धी कमावण्यासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यातील कोणकोणत्या आनंदाचा त्याग करायला तयार आहात, हे अगोदरच ठरवा. ही किंमत तुम्ही स्वतः ठरवा, इतरांच्या सांगण्यावरून ठरवाल तर स्वतःचे आयुष्य कसे जगाल?

– बिपीन मयेकर
९८१९००१२१५
(लेखक व्यवसाय प्रशिक्षक आहेत.)

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?