पूर्वी व्यवसाय करणे ही काही समाजांची मक्तेदारी असायची. मराठी माणूस त्यात मागे असायचा. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. मराठी तरुण हिरिरीने व्यवसायात उतरत आहेत. तसेच सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाच्या काळात व्यवसाय करण्याच्या पद्धतीतही अनेक बदल घडलेले आहेत.
पूर्वी व्यवसाय सुरू करणे जितके जिकिरीचे होते तेवढे आता राहिलेले नाही. सरकारची, बँकांची वित्तपुरवठा धोरणे उद्योगस्नेही बनली आहेत. मार्केटिंग किंवा विक्रीसाठी इंटरनेटचे खूप मोठे माध्यम उपलब्ध झाले आहे. इंटरनेटमुळे व्यवसायाचे सर्वच तंत्र बदलले आहे.
या बदलत्या तंत्रज्ञानाची कास धरून सर्वांनीच व्यवसायाच्या माध्यमातून आपली प्रगती साधून घ्यावी.”, हे विचार आहेत भांडुपच्या संगणक विक्री व सेवा पुरवणार्या ‘ए बी एंटरप्रायझेस’चे संचालक धीरज बोरीकर यांचे. त्यांच्या या विचारांमागे त्यांचे आयटी क्षेत्रातील ज्ञान, एकूण जीवनानुभव आणि सामाजिक कार्याची पार्श्वभूमी उभी आहे.
एके काळी एका देशव्यापी संघटनेचे निष्ठावान पूर्णवेळ कार्यकर्ता आणि नंतर शून्यातून सुरुवात करून यशस्वी व्यवसाय उभारणारा एक उद्योजक अशी आयुष्याची दोन टोके धीरज बोरीकर यांनी एकाच आयुष्यात बघितलेली आहेत.
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१४३ ➡️ SUBSCRIBE
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : ₹१,०२५ ➡️ SUBSCRIBE
क्षेत्रे विभिन्न असली तरी दोन्ही बाबतीत निष्ठा, तडफ व समर्पणभावना हेच त्यांचे बलस्थान होते. त्याच्याच आधारे दोन्ही आघाड्यांवर त्यांनी भरीव कार्य केले.
साधे गिरणी कामगार असूनही विवाहानंतर पत्नीला शिकवण्याचा मनाचा मोठेपणा दाखवणारे वडील दिनकर व त्या संधीचे सोने करून ठाणे जिल्हा परिषदेत उपशिक्षणाधिकारी बनलेल्या मातोश्री हेमलता यांच्या पोटी १४ जानेवारी १९७४ रोजी धीरज यांचा जन्म झाला. त्यांच्यावर लहानपणापासून लोकमान्य टिळकांचा प्रभाव होता.
टिळकांप्रमाणेच आपणही देशासाठी काही तरी केले पाहिजे ही जाणीव बालवयापासून त्यांच्यात होती. मॅट्रिकनंतर धीरज बोरीकर यांनी बी. ई. इलेक्ट्रॉनिक्स आणि डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट केले. कॉलेजजीवनात त्यांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या विद्यार्थी संघटनेशी संबंध आला. मनात रुजलेल्या देशसेवेच्या जाणिवेला विद्यार्थी परिषदेत चांगलेच खतपाणी मिळाले. तिची वाढ आणि विस्तार व्हायला अभाविपचे विस्तीर्ण आभाळ गवसले.
उज्ज्वल करीअर हाक घालत असताना त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी संघटनेच्या कामासाठी स्वत:ला वाहून घेतले. ते अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ता बनले. सहा वर्षे अभाविपचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले.
अभाविपमध्ये त्यांनी सहसंघटनमंत्री, मुंबई महानगरमंत्री, जनसंपर्कप्रमुख अशी विविध पदे भूषवली. अन्याय्य गोष्टींविरुद्ध आंदोलने केली. प्रसंगी जेलवारीही केली. पुढे विद्यार्थी परिघाबाहेरच्या उर्वरित ९९ टक्के समाजात आपली क्षमता सिद्ध करण्याचे आव्हान स्वीकारून, सर्व पाश तोडून ते बाहेर पडले.
‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.
सुरुवातीचा काही काळ त्यांनी नोकरी केली. त्या काळात कॉम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअरचे कोर्सेस करून आपले ज्ञान अद्ययावत केले. दरम्यानच्या काळात तंत्रज्ञानात घडलेले बदल जाणून घेतले. नंतर कॉम्प्युटर्स व लॅपटॉपची विक्री करणार्या कंपनीत मार्केटिंगचे काम केले.
कंपनीचे कर्मचारी म्हणून त्यांनी आपल्या कंपनीसाठी एमएसईबीच्या आठशे कॉम्प्युटर्सची एएमसी सांभाळण्याची मोठी ऑर्डर मिळवली. ती निभावणे त्यांच्या कंपनीला शक्य नव्हते. तेव्हा कंपनीनेच त्यांना सबकॉन्ट्रॅक्ट घेण्याचा सल्ला दिला. तोच त्यांच्या व्यावसायिक कारकीर्दीचा श्रीगणेशा ठरला.
ही एएमसी सांभाळणे हे एक आव्हान होते. धीरज बोरीकर यांनी ते स्वीकारले. ए बी एंटरप्रायझेस ही संगणकांची खरेदी-विक्री व सेवा पुरवणारी कंपनी स्थापन केली आणि सामाजिक कार्यकर्ता म्हणून जी तडफ दाखवली होती तीच व्यावसायिक म्हणून उद्योग क्षेत्रात दाखवली. सुरुवातीचा काळ त्यांच्यासाठी संघर्षाचा होता. त्यात त्यांनी अपार मेहनत घेतली. व्यावसायिक संबंध वाढवले. स्मार्टवर्क करून विक्री, संबंध वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले.
आधी ते फक्त कॉम्प्युटरविषयक देखभाल सेवा पुरवायचे. नंतर वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे आयटीचे एचओडी संदीप केळकर यांनी त्यांना कॉम्प्युटर्स पुरवण्याची पहिली ऑर्डर दिली. त्यातून त्यांचा कॉम्प्युटर्स विक्रीचा आयाम सुरू झाला. पुढे कीर्ती कॉलेजचे अध्यक्ष रवींद्र पवार, जयहिंद कॉलेजचे आयटी हेड विल्सन राव अशी चांगली माणसे भेटत गेली. या हितचिंतकांमुळे शैक्षणिक संस्थांना कॉम्युटर्स पुरवण्याचे व त्यांची देखभाल करण्याचे मोठे क्षेत्र त्यांच्यासाठी खुले झाले.
आज धीरज बोरीकर मुंबईतील नामवंत शैक्षणिक संस्थांना कंम्युटर्स, लॅपटॉप पुरवतात. त्यांची एएमसी सांभाळतात. तसेच सैगल सीट्रेड शिपिंग कंपनी, थेसिस फार्मा अशा कॉर्पोरेट क्लायंट्सनाही सेवा पुरवतात. वेलिंगकर इन्स्टिट्यूट, कीर्ती कॉलेज, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे या संस्थांशी ते प्रदीर्घ काळापासून निगडित आहेत.
आरसीएफ, अलिबाग तसेच कोकणातल्या पाच शाळांमधील साधारणत: २ हजार विद्यार्थ्यांना ते संगणक प्रशिक्षण देतात. शिक्षणसंस्था हेच आपले खरे कार्यक्षेत्र मानून त्यावरच त्यांनी लक्ष केंद्रित केलेले आहे. त्यांची कंपनी ए. बी. एंटरप्रायझेस ही कॉम्प्युटरशी संबंधित कोणत्याही आणि प्रत्येक गोष्टीबाबत सेवा पुरवते. ग्राहकांचे समाधान हा ते व्यवसायाचा पाया मानतात.
ग्राहकांची कोणत्याही प्रकारे फसवणूक करणे त्यांना मान्य नाही. तार आल्यानंतर चोवीस तासांत सर्व्हिस इंजिनीअर तिथे पोहोचला पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष असतो. ते डेल, आयबीएम, लेनोव्हो, एचपी इत्यादी नामवंत कंपन्यांचे अधिकृत सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत.
ग्राहकांनी अधिकृत सॉफ्टवेअर्स वापरावीत असा ते आग्रह धरतात. आज ते ११ हजार कॉम्प्युटर्सची एएमसी सांभाळतात. ही संख्या त्यांना भविष्यात ७० हजार करायचे व शंभर लोकांना रोजगार पुरवण्याचे त्यांचे ध्येय आहे. आज त्यांच्या कंपनीची उलाढाल काही कोटींमध्ये आहे. भविष्यात आयटी क्षेत्रातील दहा सर्वोत्तम कंपन्यांमध्ये आपल्या कंपनीचा समावेश व्हावा, हे त्यांचे ध्येय आहे. आपला मुलगा ध्रृव याच्या नावे ध्रृव इन्फोटेक या नावाने अजून एक कंपनी त्यांनी स्थापन केली आहे.
धीरज बोरीकर हे एक सामाजिक व्यक्तिमत्त्व आहे. ते अनामिकपणे अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करतात.अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी दत्तक घेतले आहे. सॅटर्डे क्लब, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, मराठी व्यापारी मित्रमंडळ या व्यावसायिक व रोटरी फाऊंडेशनसारख्या सामाजिक संघटनांत सक्रिय आहेत. कॉलेज विद्यार्थ्यांत उद्योजकता रुजावी म्हणून ते विशेष प्रयत्न करतात.
विद्यार्थी परिषदेशी संबंधित विद्यार्थी निधी या उपक्रमाचे ते विश्वस्त आहेत. त्यांच्या भगिनी अश्विनी कराडे यांच्या ‘उमंग चाइल्ड’ या संस्थेच्या कामात ते अग्रेसर असतात. भविष्यात शिक्षण व आरोग्य या क्षेत्रांत काम करणारी संस्था उभारण्याचा त्यांचा मानस आहे.
धीरज बोरीकर यांच्या एकूण वाटचालीत त्यांच्या पत्नी रुपाली यांचा मोलाचा वाटा आहे. त्या एमएस्सी बीएड असून कीर्ती कॉलेजात प्रोफेसर व अभाविपच्या ईशान्य मुंबईच्या अध्यक्षा आहेत. त्यांना ध्रृव नावाचा मुलगा असून त्याला त्यांनी जाणीवपूर्वक मराठी माध्यमाच्या शाळेत घातले आहे.
‘केल्याने देशाटन पंडित मैत्री, सभेत संचार मनुजा चातुर्य येतसे फार’ यावर त्यांचा विश्वास आहे. तसेच ‘दैन्य दुख: असे सभोवती, मनात सलते हे शल्य। ते जाणावा, यत्न करावा यातच जीवनसाफल्य॥’ या वचनावर त्यांची श्रद्धा आहे.
मराठी तरुणांना ते सल्ला देतात की, खेडेवजा शहरांत व्यवसायाच्या जास्त संधी आहेत. उद्योगांना मदत करण्यासाठी आता अनेक मदतीचे हात, तज्ज्ञसेवा व संस्था उपलब्ध आहेत. तरुणांनी या बदलत्या सामाजिक परिस्थितीचा लाभ करून घ्यावा व आपली प्रगती साधावी.
संपर्क : धीरज बोरीकर
9870278475
‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.