खरे तर महिलांच्या हाती असणारे कसब-कौशल्य आणि काटकसरीचा गुण उद्योगविश्वात टिकून राहण्यासाठी अतिशय उत्तम व पुरक आहे. उपलब्ध परिस्थितीतच संधी शोधता येणं हा खर्या उद्योजकाचा गुण ठरतो.
पाहायला गेलं तर अगदी सकाळचा चहा-नाष्टा डोळ्यासमोर ठेवूनसुद्धा उद्योगाला सुरुवात करता येते. मोठ्या शहरांमध्ये केवळ माणसाच्या दोन वेळच्या भुकेवरच कितीतरी मोठं अर्थशास्त्र फिरताना दिसतं.
माझ्या महाविद्यालयीन दिवसात अशी एक महिला पाहिली, जिची पुणे शहरात इंचभरही जागा नसताना सकाळचे फक्त तीन ते चार तास काम करून ती प्रतीदिन जवळपास आठशे ते हजार रुपये कमवायची.
मीही तिच्याकडे नाष्टा करायला जायची. रोज भेटण्याने आम्ही बर्यापैकी परिचित झालो होतो. मग एक दिवस थोडी फुरसत काढून चहा घेता घेता मी तिच्या या धडपडडीविषयी विचारलं असता तिनं सांगायला सुरुवात केली….
'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) वार्षिक वर्गणी : ₹१२३ ➡️ SUBSCRIBE
(वर्षभर महिन्यातून एकदा डिजिटल मासिक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)'स्मार्ट उद्योजक' (डिजिटल आवृत्ती) आजीवन वर्गणी : फक्त ₹३२१ ➡️ SUBSCRIBE
(यापूर्वी प्रसिद्ध झालेले १००+ अंक ई-मेलवर येतील व दर महिन्यातून एकदा ताजा अंक तुमच्या व्हॉट्सअपवर येईल.)तिचा दिवस पहाटे चारलाच सुरू व्हायचा. शिरा, उप्पीट, पोहे, इडली अन चहा असा खंमग नाष्ट्याचा लवाजमा घेऊन ती बाजीराव रोडवरील एका शॉपिंग सेंटरसमोरील मोकळ्या जागेत अगदी तीन तासापुरतंच हॉटेल थाटायची. ते शॉपिंग सेंटर साधारणत: सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास सुरू व्हायचं, तोपर्यंत त्या मोकळ्या जागेत तिचा उद्योग छान चालायचा.
समोरच एक कोचिंग सेंटर होतं, ते साधारणत: सकाळी सहा ते दहापर्यंत सुरू असायचं. जवळपास सात-आठशे विद्यार्थ्यांची रोज ये-जा सुरू असायची. प्रत्येक एक ते दीड तासांनी क्लास संपला की सकाळच्या भुकेला शांत करायला सर्वजण इथे तुटुन पडायचे.
त्याच परीसरात अंत्यत पॉश हॉटेल असतानाही हिच्या या छोट्या गाडीवर तुंडुबा गर्दी असायची. याच कारण होतं तिच्या पदार्थाचा घरगुतीपणा, उत्तम चव, माफक दर आणि स्वच्छता. या अशा छोट्या, परंतु महत्त्वपुर्ण गोष्टींचा मिलाफ घडवून तिने मोठ्या उपहारगृहांना टक्कर दिली होती.
तिची अजून एक कल्पकता भावण्याजोगी होती ती म्हणजे ती हे सर्व पदार्थ घरीच बनवायची. साधारणपणे वीस वीस किलोंच्या डब्यात गरम असतानाच भरायची. एका मोठ्या पिशवीत डब्बे आणि एका पिशवीत प्लेट, चमचे आणि थर्मासमध्ये चहा असा चवदार संरजाम घेवून ती त्या जागेवर पोहचायची.
सोबत एक छोटा स्टोव्ह असायचा. त्यावर एका मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवायची. एखादा पदार्थ थंड झाला की तो डबा त्या पाण्यात ठेवायचा मग झाला पदार्थ गरम आणी या पद्धतीने गरम केल्याने मुळ ताजेपणा दरवळत राहायचा. अशा गरजेवर स्वतःच्या कल्पकतेने मात करून स्वतःला पैलु पाडणार्या महिला पाहिली की आपलं उच्च शिक्षणही खुजं वाटू लागतं.
सकाळी सातला सुरू केलेली तिची गाडी साडेदहापर्यंत रिकामी व्हायची. संपूर्ण कुटुंब अवघ्या तीन एक तासात काम संपवून उद्याच्या नियोजनासाठी सज्ज असायचं. उत्तम नियोजनामुळे तिचा उद्योग अंत्यत सुलभ आणि सुटसुटीत होता. पदार्थात कोणतीही भेसळ नसल्याने अंत्यत आरोग्यादायी व खात्रीचे ठिकाण असल्याचे ग्राहक सांगायचे.
संपूर्ण कुटुंबातील सदस्य तिला या कामी मदत करायचे. नंतर पूर्ण दिवस तिला उद्याच्या नियोजनासाठी आणि आरामासाठी मिळायचा. ती आपल्या उद्योगातुन खूप समाधानी असल्याचे सांगताना म्हणायची, सर्वजण साखर झोपेत असतात, तेव्हा आमचं कुटुंब त्यांच्या पोटाची सोय करत असतं आणि परोपकारी भावनेतून केलेल्या कामातून मिळणारी मिळकत खूप समाधान देते.
खरोखर अशी समर्पणाची भावना ठेवून काम करणारी महिला व्यवस्थापनशास्त्राचे अनमोल असे धडे देवून जाते. स्वतःचं जीवन निरुपयोगी आहे अस समजार्या ताई, मावशींनी अशा उद्योगींनीच्या मार्गाने गेल्यास आपली धुरकटलेली आयुष्याची वाट नितळ झाल्याशिवाय राहणार नाही.
– ललिता वाघमोडे
waghmode.lalita04@gmail.com
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.