कसे असेल २०२३ चे डिजिटल मार्केटिंग?

आपण नेहमी ऐकतच असतो की व्यवसायवृद्धीसाठी डिजिटल मार्केटिंग करावी, वेगवेगळे सोशल मीडिया चॅनेल्स वापरून आपण आपल्या व्यवसायाची मार्केटिंग केली पाहिजे. थोडे अधिक पैसे देऊन व्यवसायासाठी लीड जनरेशन केले पाहिजे. खरेतर हे सर्व योग्यच आहे, पण हे सर्व सोशल मीडिया, सर्च इंजिन यांच्यामध्ये अनेक बदल होत असतात, हे आपणास माहीत आहे का?

यातले अनेक बदल हे दृश्य स्वरूपात असतात, तसेच काही बदल हे अदृश्य स्वरूपात असतात. दृश्य बदल म्हणजेच जे बदल वापरकर्त्याच्या डोळ्यांना दिसतात, जे बदल वापरकर्ता अनुभवू शकतो व ते वापरकर्त्याच्या अनुभवावर सरळ सरळ परिणाम करू शकतात असे बदल. अदृश्य बदल म्हणजे जे बदल डोळ्यांना दिसत नाहीत व सामान्य वापरकर्त्याला ते बदल समजण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागतो.

डिजिटल मार्केटिंगच्या भविष्याकडे वळण्याआधी आपण २०२२ चा काही आढावा घेऊ. २०२२ मध्ये डिजिटल जाहिरातींवर भारतामध्ये एकूण खर्च १ लाख ७ हजार ९८७ कोटी इतका अंदाजित होता. जो खर्च २०२१ मध्ये ८८ हजार ३३४ करोड इतका होता. ही आकडेवारी ‘ग्रुप एम’ या संस्थेने प्रकाशित केलेली आहे. २०२२ च्या एकूण प्रत्यक्ष खर्चाची आकडेवारी लेख लिहित असताना प्रकाशित झालेली नाही. पण एकूणच कोरोना महामारीमुळे भारतामध्ये डिजिटल मार्केटिंगचे प्रमाण वाढले, हाच निष्कर्ष सर्व संस्थांनी काढला आहे.

२०२२ हे वर्ष अनेक अर्थानी महत्त्वाचे ठरले आहे. या वर्षी घडलेल्या तीन मुख्य घटना अतिशय महत्त्वाच्या होत्या. पहिली घटना म्हणजे लॉकडाऊनचे निर्बंध भारतामध्ये सगळ्या भागातून हटवले गेले. ज्यामुळे भारतीय व्यवसाय व अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होऊन या वर्षी सणवारांच्या काळातील खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये २०२० व २०२१ च्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली.

दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे युक्रेन व रशिया यांचे युद्ध. याचा भारतीय व्यवसायांवर संपूर्णपणे नाही, पण काही प्रमाणात तरी परिणाम झाला आहे. विदेशात व्यवहार करणार्‍या अनेक भारतीय कंपन्यांना आणि व्यावसायिकांना या युद्धाची झळ बसली.

२०२२ मध्ये घडलेली तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही प्रमुख देशांमध्ये जागतिक मंदीची चाहूल लागली आहे. अर्थात ही जागतिक मंदी भारतावर किती परिणाम करेल हे २०२३ च सांगू शकेल. पण काही प्रमाणात या मंदीचा भारतावर नक्की परिणाम होईल. कारण भारत मुख्यत: पेट्रोलियम व क्रूड ऑईलसाठी इतर काही देशांवर अवलंबून आहे.

‘मेक इन इंडिया’ अनेक प्रमाणात यशस्वी होऊन आपल्या देशाचे काही बाबतीत व काही प्रमाणात इतर देशांवर अवलंबत्व कमी झालेले आहे. या तिन्ही घटना अजूनही २०२३ मध्ये भारतावर परिणाम करू शकतात. डिजिटल मार्केटिंग क्षेत्रामध्ये काही ट्रेंड्स २०२२ या वर्षी पाहायला मिळाले. त्यातील पहिला ट्रेण्ड म्हणजे इन्फ्ल्यून्सर मार्केटिंगचा वाढता दबदबा.

लॉकडाऊनच्या काळात किंवा त्यानंतर अनेक लोकांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक निषमध्ये (niche) वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करून किंवा लोकांची करमणूक करून आपापले फॉलोवर्स वाढवले. २०२२ या वर्षी अनेक मोठ्या ब्रॅण्ड्सने या इन्फ्ल्युंसर युजर्सना जाहिरात करण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच भारत सरकारनेदेखील या इन्फ्ल्युंसर युजर्सची दखल घ्यायला सुरुवात केली.

दुसरा महत्त्वाचा ट्रेण्ड म्हणजे व्हिडिओ मार्केटिंग. व्यावसायिकांना व्हिडिओ मार्केटिंगचे महत्त्व पटायला लागले आहे. तसेच डिजिटल मार्केटिंग ऑटोमेशन व ओम्निचॅनल मार्केटिंग यावर मोठ्या ब्रॅण्ड्सपासून लहान उद्योजकांपर्यंत सगळ्यांनीच लक्ष दिले आहे. याचा परिपाक म्हणजे वैयक्तिक ब्रॅण्ड तयार करण्यावर अनेक उद्योजकांनी भर दिला. ज्यामुळे डिजिटल मार्केटिंग हे पारंपारिक मार्केटिंगला पर्याय म्हणून ठळकपणे पुढे आलेले दिसून येते.

यातच डिजिटल मार्केटिंगचा एक भाग असलेल्या वेबसाईट क्षेत्रातही दोन महत्त्वाचे ट्रेंड्स पाहायला मिळाले. पहिला महत्त्वाचा ट्रेण्ड म्हणजे लॅण्डिंग पेजेसचा वापर लक्षणीय प्रमाणात वाढला. दुसरा महत्त्वाचा ट्रेण्ड म्हणजे प्रोग्रेसिव वेब पेजेस व प्रोग्रेसिव वेब अ‍ॅप्स यांचादेखील वापर वाढला आहे. सगळ्यांच्या माहितीसाठी, प्रोग्रेसिव वेब पेज म्हणजे वेबसाईटचे असे पेज, जे मोबाईल अ‍ॅप म्हणूनदेखील कार्य करू शकते. अशी अनेक पाने विशिष्ट कार्य करण्यासाठी एकत्र करून त्याला अ‍ॅप असे संबोधले जाते.

आता २०२३ मध्ये डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात काय बदल होऊ शकतात किंवा कोणते ट्रेण्ड्स प्रभावी ठरतील, हे आपण पुढच्या लेखामध्ये पाहणार आहोत. जेणेकरून २०२३ चे डिजिटल मार्केटिंग धोरण ठरवताना सर्वांना त्या माहितीचा उपयोग होऊ शकेल.

– गणेश नाईक
संपर्क : 8822757575
(लेखक गेली बरीच वर्षे डिजिटल मार्केटर म्हणून कार्यरत आहेत.)

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?