‘या’ कारणांसाठी होऊ नका उद्योजक!


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


मला उद्योजक व्हायचं आहे, असं बरेच तरुण म्हणतात; पण “तुला उद्योजक का व्हायचं आहे?”, असा प्रश्न विचारला की त्यांच्याकडून ऐकायला मिळणारी कारणं खूप भीतीदायक असतात. भीती या गोष्टीची की या कारणांमुळे जर कोणी उद्योजक होत असेल, तर असा उद्योग किती काळ चालणार आहे आणि ‘हा’ इसम किती काळ उद्योजक राहणार आहे.

तरुणांशी होणाऱ्या संवादात हमखास ऐकायला मिळणारी ही अशी काही कारणं की ज्यासाठी कधीच उद्योजक होण्याचा विचार करू नये, असं माझं मत आहे. मला कोणाच्या हाताखाली नोकरी करायची नाहीय. हे सर्वाधिक ऐकायला मिळणारं कारण. तुम्ही एखाद्या आस्थापनात नोकरी स्विकारता, तेव्हा तिथे एखादं-दुसरी व्यक्ती ही बॉस म्हणून तुमच्या डोक्यावर बसलेली असते.

तुम्ही सतत काम करत राहावं, आस्थापनाला हव्या असलेल्या दर्जाचं काम करावं, वेळेवर यावं, वेळेहून अधिक थांबून काम करावं अशा सगळ्या अपेक्षा या बॉस नामक वरिष्ठांना तुमच्याकडून असतात आणि त्या पूर्ण करण्यात तुम्ही कुठेही कसूर करताना त्यांना दिसून आलात, तर ते तुमच्या डोक्यावर बसतात.

बॉसच्या असा त्रास असल्यामुळे अनेकांना बॉस डोक्यावर नको असतो, म्हणून त्यांना स्वतःचा व्यवसाय करून उद्योजक व्हायचं असतं. असा विचार करताना आपल्या हे लक्षात येत नाही ही हा बॉस नावाची व्यक्ती किंवा तुमची कंपनी ही किती प्रकारच्या गोष्टींचा सामना करत असते.

वेळच्या वेळी कर्मचाऱ्यांचे पगार काढणं, vendors ची payments काढणं, सर्व बिल वेळच्यावेळी भरण, सर्व प्रकारचे खर्च भागवण्यासाठी आवश्यक तेवढी विक्री दर महिन्याला करून लोकांकडून त्याची वसुली करणं, इत्यादी. तुम्ही जेव्हा स्वतःचा व्यवसाय सुरू करता, तेव्हा तुम्हाला एकट्याला या सर्व गोष्टी कराव्या लागतात.

इथे तुम्ही एका जरी गोष्टीत कमी पडलात, तर ती ती व्यक्ती तुमच्या डोक्यावर बसणार असते. ग्राहक हा तर सांभाळण्यासाठी सर्वात कठीण घटक असतो. त्याला उत्तम दर्जाचा माल किंवा सेवा, कमीतकमी किमतीत आणि कमीतकमी वेळेत द्यायची असते.

यात तुम्ही कुठे जरी कमी पडलात तर हा ग्राहक तुम्हाला सोडून जाण्याची भीती असते. म्हणजे तुमचा प्रत्येक ग्राहक हा एकप्रकारे तुमचा ‘बॉस’च असतो. शिवाय बँक, सर्व प्रकारच्या सेवा पुरवणारे, तुमचे vendors, सरकारी अधिकारी, गुंतवणूकदार असे विविध प्रकारचे ‘बॉस’ तुम्हाला व्यवसायात डोक्यावर बसलेले दिसणार आहेत. त्यामुळे बॉसच्या त्रासाला कंटाळून उद्योजक होत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा इथे तुमचे अगणित बॉस होणार आहेत.

मला स्वतःला ‘बॉस’ व्हायचं आहे, म्हणून मी उद्योजक होणार आहे. तुम्ही जिथे कुठे नोकरी केली असेल, तिथला अनुभव तुम्हाला असेलच की कशाप्रकारे तुम्ही बॉसला शेंड्या लावल्या होत्या, कशाप्रकारे तुम्ही कामं टाळली होतात वगैरे. हे किंवा असेच अनुभव आता तुम्हाला तुमच्या कर्मचाऱ्यांकडून मिळाले तर नवल वाटायला नको.

एखाद्या कर्मचाऱ्याला मेहनतीने सर्व काम शिकवावं आणि ५००-१००० च्या पगारवाढीसाठी तो तुम्हाला सोडून जाऊ शकतो. तेव्हा त्याचं सगळं काम नवीन माणूस मिळेपर्यंत तुम्हालाच करावं लागू शकतं. मग कसले तुम्ही ‘बॉस’?

झटपट पैसा कमवायचा आहे, म्हणून मी उद्योजक होतोय. हिरे मिळवण्यासाठी कोळशाच्या खाणीत रक्ताचं पाणी करावं लागतं. उद्योजकतेतही तसंच आहे. इथे पैसा आहे, पण तो मिळवणं वाटतं तितकं सहजसाध्य नाहीय. कष्ट, चिकाटी, प्रामाणिकपणा, नम्रता अशा अनेक गोष्टींची घुट्टी केली की पैशाचे फळ मिळते. यासाठी आपण पत्करलेल्या मार्गावर श्रद्धा आणि त्यातून मिळणाऱ्या फळासाठी सबुरी असणं अत्यंत आवश्यक आहे.

‘उद्योजकता’ हा एक प्रवास आहे, ते लक्ष नाही. ते व्रत आहे, साध्य नाही. हे लक्षात घेऊन त्या तयारीने व्यवसायात उतराल, तर या प्रवासाचा आनंद घेऊ शकाल.

शैलेश राजपूत

Author

  • शैलेश राजपूत

    शैलेश राजपूत हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण झाल्यावर त्यांनी २००७ साली पत्रकारिता क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

    व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार असा विचार करून यावर उपाय म्हणून त्यांनी २०१४ साली उद्योजक.ऑर्ग हे वेबपोर्टल सुरू केले व २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?