पेनड्राईव्ह विसरल्यामुळे जन्माला आले ‘ड्रॉपबॉक्स’

तुम्हाला तो काळ आठवतो का, जेव्हा तुम्हाला तुमचा पेन ड्राइव्ह प्रत्येक ठिकाणी न्यावा लागे? बर्‍याच जणांनी तर त्याला आपली कीचेनसुद्धा बनवली असेल. तर आता या कथेतून भेटा अशा दोन लोकांना ज्यांनी एकमेकांना फारसे ओळखतही नसताना ‘ड्रॉपबॉक्स’ हा जगातील सर्वात मोठा क्‍लाऊड शोधला. त्या दोन व्यक्ती म्हणजेच ड्रियू हुस्टॉन आणि आरश फेरडोवसी.

ड्रॉपबॉक्स, ही अशी एक तांत्रिकी उत्पादने बनवणारी कंपनी आहे जी सर्वसामान्य लोक तसेच उद्योजक यांना त्यांनी साठवलेली माहिती कुठूनही हाताळण्यास मदत करते. जगाच्या पाठीवरील ५० कोटी लोक आज ड्रॉपबॉक्स वापरून कोणत्याही उपकरणावरून त्यांनी साठवलेली माहिती हाताळू शकत आहेत. ड्रॉपबॉक्सवरील २ लाख उद्योग हे उद्योजकतेचा कायापालट करण्यात मदत करत आहेत.

ड्रॉपबॉक्सचा उद‍्गाता ड्रियू हुस्टॉन याचा जन्म १९८३ साली अ‍ॅक्टन येथे झाला. शाळा पूर्ण करून जेव्हा तो इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये कॉम्प्युटर सायन्स शिकत होता तेव्हा त्याला त्याची भेट आरश फेरडोवसी याच्याशी झाली जो पुढे जाऊन ड्रॉपबॉक्सचा सहसंस्थापक झाला. ड्रॉपबॉक्सवर काम चालू करण्याआधी त्याने अनेक स्टार्टअप्ससाठी काम केले, ज्यात बीट-९, अ‍ॅकोलाड आणि हबस्पॉटचा समावेश होतो.

ड्रॉपबॉक्सचा जन्म

एम.आय.टी.मध्ये असताना ड्रियू हुस्टॉन जेव्हा त्याची यू.एस.बी. फ्लॅश ड्राइव्ह म्हणजे पेन ड्राइव्ह विसरायचा, तेव्हा त्याला खूप कंटाळवाणे वाटायचे. तसेच, त्या वेळी बग्ज, मोठ्या फाइल, इंटरनेट लॅटन्सी अशा अनेक त्रासांमुळे सर्व जण कंटाळलेले होते. माहिती साठवण्यासाठी पेन ड्राइव्हसारखे पर्याय उपलब्ध होतेच, परंतु जर तुमच्याकडे तुमचा पेन ड्राइव्ह नसेल तर माहिती साठवण्यावर प्रचंड बाधा येई. तसेच फक्त कॉम्प्युटरवरूनच ही माहिती हाताळता येत असे.

ह्या सर्वाला कंटाळून ड्रियू हुस्टॉन याने स्वत:ची माहिती साठवण्यासाठी वेगवेगळ्या प्रयोगांनी काम सुरू केले. काम करता करता त्याला असे लक्षात आले की, तंत्रज्ञानात होणारी प्रगती तसंच कामाचं बदलणारं स्वरूप यामुळे इतर लोकांनासुद्धा अशा एका ठिकाणाची गरज आहे जिथे त्यांना त्यांची माहिती साठवता येईल आणि त्याचबरोबर कोणत्याही उपकरणावरून त्यांना ती हाताळता येईल. हे काम करता करता त्याला आरश फेरडोवसी याने साथ दिली.

ड्रियू आणि आरश एकमेकांना भेटण्याआधी

ड्रियू आणि आरश हे दोघेही एम.आय.टी.चे विद्यार्थी होते. एकमेकांना भेटण्याआधी दोघेही उद्योजक आपापल्या उद्योगांत मग्‍न होते. ड्रियू हा एम.आय.टी.च्या उद्योजकांच्या क्‍लबमध्ये होता आणि आरश त्याची पुस्तकांची देवघेव करणारी एक वेबसाइट चालवत होता.

एम.आय.टी.मधील लोकांनी वेबसाइटवर जे त्यांचे मत मांडले आहे त्यानुसार ड्रियू साधारणत: उद्योजकता, व्यवस्थापन, विपणन (मॅनेजमेंट) अशा विषयांमध्ये जास्त रसिक होता. आरश मात्र इंजिनीयरिंगमध्येच गुंतलेला असे.

तो सर्व प्रश्‍नांची उत्तरे मोजण्यायोग्य करण्यात गुंतलेला असे. शेवटी फेसबुकमधील इंटर्नशिपसाठी त्यांनी अर्ज केला. आरश म्हणतो, “ज्या अर्थी फेसबुक इतक्या जलद गतीने वाढत आहे त्या अर्थी ते नक्कीच नवनवीन कल्पनांना वाव देत असणार, ज्यामुळे ते माफक प्रगतीपर्यंत पोहोचतात. यामुळेच मी त्यांच्याकडे आकर्षित झालो.”

अ‍ॅडम स्मिथ, ड्रियू याचा चांगला मित्र जेव्हा २००६ मध्ये सॅन फ्रॅनसिस्कोमध्ये ड्रियूला भेटला, तेव्हा खर्‍या अर्थानी ड्रियूला प्रेरणा मिळाली. ‘फोर्ब्स’मधील मुलाखतीत ड्रियू म्हणतो, “जर तो हे करू शकतो, तर मला माहीत आहे मीसुद्धा करू शकतो.”

पुढे तो म्हणतो, “मला माझे स्वप्न सत्यात उतरवायचे होते, पण मी फक्त हॉट पॉकेट्स खाण्यातच अडकलो होतो.” पुढे ड्रियू आणखी जोमाने काम करू लागला आणि त्याला त्याचे उद्योजक होण्याचे स्वप्न दिसू लागले. त्यानंतर तीन महिन्यांतच एका बस प्रवासात असताना ड्रियू ड्रॉपबॉक्सपर्यंत येऊन पोहोचला.

त्या प्रवासात काम करण्याचे त्याचे उद्दिष्ट होते, पण तो त्याची यू.एस.बी. ड्राइव्ह विसरल्याने त्याला काम करता येत नव्हते. त्या कंटाळवाणेपणातच काही कोड्समध्ये फिरता फिरता एका कोडद्वारे त्याला ड्रॉपबॉक्स तयार करता आले. पाऊल ग्राहम सोबतला ही कल्पना सांगितल्यावर त्यांनी सुचवले की, तू यासाठी कुणा तरी सहसंस्थापकाची निवड कर. प्रत्येक उद्योजकाला सहसंस्थापक नेमण्यासाठी जसा एखाद्या विश्‍वासू माणसाचा शोध असतो तसाच ड्रियू यांनी शोध सुरू केला.

सहसंस्थापक हा एक अत्यंत प्रामाणिक, विश्‍वासू आणि नि:स्वार्थी असायला हवा हे ड्रियूला कळत होते. शेवटी २००७ मध्ये एम.आय.टी.मध्ये ड्रियू आणि आरश यांची भेट झाली. पाच तासांच्या संभाषणानंतर आरशने ड्रॉपबॉक्सचा सहसंस्थापक होणे स्वीकारले. त्यापुढे आरशने शेवटचे सहा महिनेच उरले असताना कॉलेज सोडले आणि ही जोडी जोमाने कामाला लागली.

ड्रॉपबॉक्सची सुरुवात

ड्रियू हुस्टॉन

त्यापुढे सलग तीन महिने या दोघांनी अक्षरश: मान मोडून काम केले. काळ, वेळ यांची पर्वा न करता एका अडगळीच्या जागेत त्या दोघांनी मन लावून काम केले. तीन महिन्यांतच प्रॉडक्ट बनवून झाले, पण जो प्रश्‍न प्रत्येक उद्योजकासमोर असतो, तोच प्रश्‍न या दोघांपुढेही होता. पैसे आणणार कुठून? त्या दोघांनी त्यांची कल्पना कशी उत्तम आहे, भविष्यात ती कशी वाढत जाईल हे बर्‍याच वैयक्तिक गुंतवणूकदारांना सांगितले.

यातून त्यांना वैयक्तिक गुंतवणुकीतून थोडे फार पैसे तर मिळालेच, पण आपोआप त्यांचे मार्केटिंगसुद्धा झाले. त्याशिवाय त्या दोघांनी त्यांचा उद्योग सप्टेंबर २००७ मध्ये सॅन फ्रॅनसिस्कोमध्ये नेला. तिथे Sequoia कॅपिटल, अ‍ॅसेल पार्टनर्स, वाय कॉम्बिनेटर अशाकडून व्हेंचर कॅपिटल मिळवले.

ड्रॉपबॉक्स २००८ मध्ये प्रत्यक्षात लोकांपर्यंत पोहोचले. टेक क्रंच ५० या वार्षिक तांत्रिकीय चर्चासत्रात ड्रॉपबॉक्स प्रकाशात आले; परंतु ट्रेडमार्क मिळवण्यासाठी ड्रॉपबॉक्सला प्रॉक्झी, आय.एन.सी. आणि इव्हन फ्लो (ड्रॉपबॉक्सची पालक कंपनी) यांच्याशी वाद घालावे लागले.

शेवटी ‘गेटड्रॉपबॉक्स.कॉम’ हे डोमेन ड्रॉपबॉक्सला घेता आले. अखेर ऑक्टोबर २००९ मध्ये ड्रॉपबॉक्सला त्यांना हवे ते ‘ड्रॉपबॉक्स.कॉम’ हे डोमेन मिळाले. यापुढे ड्रॉपबॉक्स त्याचा आवाका वाढवू लागले. प्रत्यक्ष उत्पादन नसल्याने ड्रॉपबॉक्स आपोआप जगभरात पसरू लागले आणि हजारो लोक ड्रॉपबॉक्सचा फायदा घेऊ लागले. ड्रियू आणि आरश यांनी लोकांना ज्याची गरज आहे असे उत्पादन बनवल्यामुळे लोकांमध्ये ड्रॉपबॉक्स प्रसिद्ध होऊ लागले.

मे २००१ मध्ये ड्रॉपबॉक्सने दोन जपानी कंपन्यांशी करार केला. या दोन कंपन्या म्हणजे सॉफ्टबॅब आणि सोनी एरिक्सन. या करारानुसार या दोन कंपन्या जे नवीन मोबाइल बाजारात आणतील, त्यात पहिल्यापासूनच ड्रॉपबॉक्स लोड केलेले असेल.

ड्रॉपबॉक्सचा विस्तार

२०११ मध्ये ड्रॉपबॉक्सने ५ कोटी ग्राहकांचा पल्ला गाठला. OPSWAT नुसार २०११ मध्ये संपूर्ण जगातील माहितीचा साठा करणार्‍या व्यक्तींपैकी १४.१४ % लोक हे ड्रॉपबॉक्सचे ग्राहक होते. कोणताही उद्योजक तेव्हाच यशस्वी होऊ शकतो जेव्हा तो या काळानुरूप स्वत:च्या उद्योगात बदल घडवून नवनवीन गोष्टींचे प्रयोग करतो, हे ड्रियू आणि आरश यांनी ओळखले.

एप्रिल २०१२ मध्ये ग्राहकांची गरज आपली संधी मानून ड्रॉपबॉक्समध्ये काही नवीन फीचर्स आणली, ज्यांद्वारे ड्रॉपबॉक्स वापरणारे लोक त्यांच्या मोबाइलच्या कॅमेर्‍यामधून काढलेले फोटो सरळ ड्रॉपबॉक्समध्ये साठवू शकत होतो. तसेच कॅमेरा, टॅबलेट, एस.डी. कार्ड इत्यादींवरचे फोटोजसुद्धा परस्पर ड्रॉपबॉक्सवर साठवणे शक्य झाले.

हे सर्व साठवण्यासाठी ३ जी.बी.पर्यंतचे स्टोरेज ड्रॉपबॉक्सनी प्रत्येकाला उपलब्ध करून दिले. त्या वेळी ड्रॉपबॉक्सचे स्पर्धक प्रामुख्याने गुगल ड्राइव्ह आणि मायक्रोसॉफ्ट वन ड्राइव्ह हे होते; परंतु ड्रॉपबॉक्सच्या तीन जी.बी.च्या जागेमुळे ते स्पर्धकांमध्ये सरस ठरले. तरीसुद्धा ड्रॉपबॉक्सने आपल्यात नवनवीन बदल घडवणे थांबवले नाही.

२६ सप्टेंबर २०१२ रोजी ड्रॉपबॉक्स आणि फेसबुक एकत्र आले. यामुळे फेसबुक ग्रुपवरील लोकांना जर कोणती पोस्ट करायची असेल तर ड्रॉपबॉक्समध्ये असलेली माहिती, फोटो, व्हिडीआ, इ. सर्व परस्पर फेसबुकवर अपलोड करता येऊ लागले. या फीचरमुळे फेसबुकवरील अनेक लोक ड्रॉपबॉक्सचे ग्राहक झाले.

यापुढेसुद्धा ड्रॉपबॉक्स नवनवीन कल्पना राबवत होता. १९ डिसेंबर २०१२ रोजी ड्रॉपबॉक्सने स्नॅपजॉयलासुद्धा आपल्यात सामावून घेतले. आता ड्रॉपबॉक्स जगातील ०.२९% इंटरनेट ट्रॅफिक हाताळत होता. १५ मार्च २०१३ रोजी ड्रॉपबॉक्स आय.ओ.एस. मेलबॉक्समध्येसुद्धा उपलब्ध झाले. १३ नोव्हेंबर २०१३ रोजी ड्रॉपबॉक्स बिझनेस हे फीचरसुद्धा ड्रॉपबॉक्समध्ये समाविष्ट झाले.

त्यापुढे विविध फीचर्स ड्रॉपबॉक्समध्ये आणून ड्रॉपबॉक्स प्रगती करू लागले, ज्याने पुढे जाऊन मायक्रोसॉफ्टशीसुद्धा हात मिळवला, परंतु कधीच स्वत:ची कल्पना इतरांना विकून नाही टाकली. शेवटी ३० ऑगस्ट २०१६ रोजी ड्रॉपबॉक्सला विंडोज एक्स.पी.ची साथ मिळाली.

आता, ड्रॉपबॉक्सवर मुख्यत: तीन प्रकारची अकाऊंट उपलब्ध आहेत. मोफत अकाऊंट (ज्यात 2 जी.बी.पर्यंत माहितीचा साठा करू शकतो.), प्रो अकाऊंट (जास्त पैसे भरून जास्त जी.बी.ची माहिती साठवू शकतो.) आणि बिझनेस अकाऊंट ज्यातून दिवसाला माहिती जास्त वेळा हाताळता येते.

आज जगभरातील ५० कोटी लोक ड्रॉपबॉक्स वापरत आहेत. स्वत:च्या अडचणीवर मात करण्यासाठी काढलेली कल्पना, दोन अनोळखी लोकांचे प्रामाणिक प्रयत्न आणि गुंतवणूकदारांचा आर्थिक हातभार यामुळे आजही ड्रॉपबॉक्सचा विस्तार वाढत चालला आहे. “तुमच्या सर्व माहितीचा साठा एकाच ठिकाणी असणे, जो तुम्ही कुठेही असाल तरी तुम्हाला वापरता येईल.” हे ड्रॉपबॉक्सचे ध्येय आज पूर्ण होऊ लागले आहे.

जे आपण बनवतो ते तसेच्या तसे लोकांना न विकता लोकांना खरी कशाची गरज आहे, हे लक्षात घेऊन लोकांसाठी ते उत्पादन बनवल्याने आज ‘ड्रॉपबॉक्स’ हा छोटासा स्टार्टअप एका मोठ्या प्रस्थापित कंपनीत रूपांतरित झाला आहे.

– शैवाली बर्वे

Author

  • शैवाली बर्वे

    शैवाली बर्वे हिने Bachalor of Management Studies पूर्ण केले असून सध्या ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अमृतसर येथून Master of Business Administration (MBA) करत आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?