उद्योग संस्कार

आज भारतात आणि महाराष्ट्रात उद्योजकतेचे वारे वाहताना आपल्याला दिसतायत आणि उद्योजकतेच्या बाबतीत कधी नव्हे इतकं अनुकूल-पोषक वातावरण आज आपल्या आजूबाजूला पाहायला आणि आपल्याला अनुभवायला मिळतंय; परंतु जर का, आपल्याला उद्योजकतेची उपयुक्तता, त्याचे महत्त्व, माहिती, पाठिंबा, मदत, प्रोत्साहन या गोष्टी लहान वयातच जर (शक्यतो पालकांकडून) मिळाल्या असत्या, तर किमान ५००-१००० करोडची उलाढाल असलेला यशस्वी उद्योग उभा करायला काहीच हरकत नव्हती.

इथे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की, पालकांनी आपल्या मुलांना उद्योगकतेचे धडे अगदी लहान वयातच द्यायला सुरुवात करावी, त्यासाठी तो ‘ग्रॅज्युएट’ व्हायची वाट बघायची गरज नाही. असे सहज-सुंदर ‘उद्योग संस्कार’ एक सुजाण पालक म्हणून तुम्ही अगदी साध्या-साध्या गोष्टींतून करू शकता.

जेणेकरून या समाजाला, या महाराष्ट्राला आणि या भारताला जागतिक दर्जाचे यशस्वी उद्योजक पुढील काळात देता येतील. यासाठी मुलांचं (आणि पालकांचंही) शिक्षण, वय, जात, व्यवसाय या गोष्टी तशा प्राथमिक तत्त्वावर फारशा महत्त्वाच्या नाहीत. आज अगदी २१ वर्षांचा मुलगाही २००० करोड रुपये बाजारमूल्य असलेल्या कंपनीचा (ओयो रूम्स – रितेश अगरवाल) मालक बनू शकतो. (अशी अनेक उदाहरणे देता येतील.) असेच उद्याचे यशस्वी उद्योजक घडवण्याचा एक प्रयत्न आमचाही.

उद्याचे यशस्वी उद्योजक घडवू इच्छिणार्‍या पालकांसाठी खालील गोष्टी :

मुलांना पॉकेटमनी देऊ नका – कमवायला शिकवा

तुमची मुलं कितीही लाडाची असली तरीही त्यांना हव्या असणार्‍या सगळ्याच वस्तू अगदी सहज देऊ नका. अशाने त्यांना त्याची किंमत राहात नाही. अनेक पालकांना तर असं वाटत असतं, की मला माझ्या लहानपणी अमुक वस्तू मिळाली नाही, माझा अमुक हट्ट माझे आई-वडील (त्यांच्या त्या वेळेच्या आर्थिक परिस्थितीमुळे असेल कदाचित) पुरवू शकले नाहीत, या गोष्टी माझ्या मुलांबाबत घडू नये. माझं मूल त्याच्या इतर मित्रांच्या तुलनेत कुठे कमी पडू नये. वगैरे वगैरे, परंतु अशा भावनिक गोष्टीत अडकून मुलांना सहज मिळालेल्या गोष्टींची खरीच किती जाणीव राहाते, हे सांगणं तसं कठीणच.

मी स्वत: अनेक गरीब पालकांना त्यांच्या लहान मुलांना ५-१० रुपये खाऊ घेण्यासाठी अगदी सहज देताना बघितलंय. त्याबाबत विचारल्यावर त्याचं मला मिळालेलं उत्तर काही असं होतं, “आता ५-१० रुपयांत काय येत भाऊ?” इथे प्रश्न हा ५-१० रुपयांचा नक्कीच नसतो. ही मुलं ५-१० रुपयांत काय घेतात? तर नक्कीच चॉकलेट, गोळ्या, चिप्स किंवा तत्सम पदार्थच विकत घेतात, की जे पुढे कुठे-ना-कुठे त्यांना आरोग्यविषयक त्रास देतील. असो. आपला विषय आहे उद्योजकता.

असे सहज दिलेले पैसे त्यांची तशीच मानसिकता तयार करत असतात. एवढंच नव्हे, तर तुम्ही एक पालक म्हणून जे-जे आणि जसजसे व्यवहार तुमच्या मुलांबरोबर करत असता, जसे वागता त्यातूनच त्याचा जास्त प्रभाव मुलांवर पडत असतो. याचाच अर्थ असा की, उद्याचे यशस्वी उद्योजक घडविणारे खरे कुंभार तुम्ही स्वत: (पालक) आहात.

आता काही पालकांच्या मनात सहजच एखादा प्रश्न येईल की, मग आम्ही आमच्या मुलांसाठी काहीच आणि कधीच पैसे देऊ नये का? तर द्यावेत; परंतु ते मुलांना कमवायला शिकवावेत आणि हे शक्य आहे. कसे बघू.

मुलांना त्याच्या रिकाम्या वेळेत तुम्हाला तुमच्या कामात मदत करायला लावा व त्याबद्दल त्याला ठरावीक मोबदला द्या. कोणत्या कामाबद्दल किती मोबदला द्याल याची स्पष्ट कल्पना त्यांना अगोदरच द्या. एक गोष्ट मात्र पालकांनी इथे लक्षात ठेवावी, की उगाचच आपलं मूल आहे म्हणून त्यांना जास्त पैसे देऊ नये. कामाचे पैसे कसे ठरवाल? हे प्रत्येक वेळेसाठी असावेत. उदा.

 • घरातील साफसफाईसाठी मदत करणे २०/-
 • रुपये घरात पाणी भरायला मदत करणे – १०/-
 • रुपये दुकानावरून सामान आणून देणे – ५/-
 • रुपये घरातील कुत्र्याला आंघोळ घालणे – १०/-
 • रुपये मोटारसायकल धुणे – २०/-
 • रुपये वडिलांना त्यांच्या कामात मदत करणे – ५०/- रुपये इत्यादी, इत्यादी.

अशा अनेक गोष्टींमार्फत एक चांगले पालक म्हणून पैसे कमावण्याचे विविध मार्ग तुम्ही त्याला उपलब्ध करून देऊ शकता.

वरील पद्धतीचा असा फायदा होऊ शकतो :

 • पैसा कमवावा लागतो, याची कल्पना त्यांना मिळेल.
 • वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे पैसे असतात, त्यामुळे जास्त पैसे मिळणारी कामं केली तर जास्त पैसे मिळतात, याची समज फार लवकर विकसित होऊ लागते.
 • काही कालावधीनंतर ते स्वत: एखाद्या कामासाठी जास्त पैशांची मागणी करू शकतात. अशाने त्याच्यातील ‘निगोशिएशन स्किल’ चांगलं आणि योग्य वेळी विकसित व्हायला मदत होते.
 • त्यांच्यासाठी पैशाची किंमत वाढेल.
 • पैशाचा अपव्यय करण्याची मानसिकता वाढेल.
 • अनावश्यक खर्च टाळायला शिकतील.
 • पैशांच्या उपलब्धतेनुसार खर्च करायला हवा, याची पक्की समज येईल.
 • रिकाम्या वेळेत पैसे कसे कमवायचे? हे कळू लागेल
 • हट्टाचा नाही तर हक्काचा पैसा कसा कमवायचा, हे सूत्र अंगीकारलं जाईल.

वरील सगळ्या गोष्टी या उद्याचे यशस्वी उद्योजक घडवण्याच्या पायरीतल्या विटा आहेत. त्या तुम्ही जशा रचाल, जेवढ्या चांगल्या रचाल, तसा तुमचा पाल्य या प्रवासात कालच्यापेक्षा आज जर जास्त पुढे गेलेला असेल व एका चांगल्या उद्योजकतेच्या राष्ट्रनिर्मितीत तुमचाही वाटा असेल.

उद्याचे यशस्वी उद्योजक घडवू इच्छिणार्‍या पालकांसाठी खालील गोष्टी :

तुमच्या मुलाने कामातून कमावलेले पैसे कुठे तरी गुंतवा किंवा बँकेत जमा करा :

तुमच्या पाल्याने कामाच्या माध्यमातून कमावलेल्या पैशाचं काय करायला पाहिजे? असा प्रश्न जर मी तुम्हाला एक पालक म्हणून विचारला, तर तुमच्यापैकी अनेकांचे उत्तर कदाचित असं असेल की, ‘त्यांना लागतील तेव्हा खर्चाला द्यायला हवेत.’

परंतु मला असं वाटतं की, त्या पैशापैकी काही भाग त्यांच्या आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांना द्यावा व त्यातील मोठा हिस्सा हा, एखाद्या ठिकाणी छोट्या-छोट्या स्वरूपांतील का असेना, परंतु गुंतवणुकीसाठी वापरावा किंवा बँकेत त्याच्या नावावर एखादं खातं (अकाऊंट) उघडून त्यात ती रक्कम जमा करावी. गुंतवणूक करणे हा पहिला पर्याय असावा, असं मला वाटतं.

वरील कृतीचा असा फायदा होऊ शकतो :

 • कमावलेले पैसे फक्त खर्चासाठीच असतात, हा त्यांच्यातील गैरसमज दूर होण्यास मदत होईल.
 • मी कमावलेले पैसे माझ्याच बँक अकाऊंटमध्ये जमा आहेत आणि ते माझ्या मालकीचे आहेत, ही भावना त्यांची स्व-प्रतिमा (Self-Image) अधिक मजबूत करेल.
 • त्यांच्यातील आत्मविश्वास अनेक पटीने वाढवण्यास मदत होते.
 • वरील आत्मविश्वासामुळे, कोणत्याही कामात पुढाकार घ्यायची महत्त्वाची सवय विकसित होते.
 • त्यांचा पैसा खर्च करण्यापेक्षा जमा करण्यावरच जास्त भर राहतो. कमावलेला पैसा जरी कमी स्वरूपाचा असला, तरी त्यांच्यासाठी त्याचं ‘मूल्य’ बरंच जास्त असतं.
 • स्वत:च्या नावावर बँकेत जमा झालेली, बर्‍याच दिवसांची लहान-लहान स्वरूपाची एकत्रित रक्कम, ही बरीच मोठी झाल्याने बचतीची संकल्पना, महत्त्व, गरज अधिक चांगल्या प्रकारे त्याच्या मनावर बिंबवलं जातं. आणि हे प्रात्यक्षिक कोणत्याही पुस्तकापेक्षा, त्यांना कुणी दिलेल्या सल्ल्यापेक्षाही जास्त प्रभावी आणि परिणामकारकरीत्या काम करतं.
 • अशातूनच, आपण काही अंशी का होईना, परंतु गुंतवणूक करायला हवी आणि ती अगदी कमी रकमेतही केली जाऊ शकते, ही संकल्पना त्यांच्यात रुजते.
 • वरील संकल्पनेमुळे त्यांना त्याच्या पुढील उद्योजकीय आयुष्यातील उपयोगी असे ‘फायनान्शियल स्टेटमेंट – कॅश फ्लो, अ‍ॅसेटस’ या संदर्भातील अनेक गोष्टी ‘प्रॅक्टिकली’ शिकायला मिळतात.
 • गुंतवणुकीचं महत्त्व आणि फायदा फार कमी वयात स्पष्ट होतो.
 • त्या वयात इतरांपेक्षा वेगळा विचार, वेगळा आचार आणि प्रत्यक्ष अनुभव यामुळे त्यांची उद्योजकीय मानसिकता आणि दृष्टिकोन विकसित व्हायला मदत होते.
 • यातूनच त्यांच्यात स्वावलंबीपणाची बीजे घट्ट रोवली जाऊ शकतात.
 • पालकाच्या अशा कृतीमुळे, पाल्यात यशस्वी उद्योजकतेकरिता आवश्यक असणारी ‘लीडरशिप स्किल’ विकसित व्हायला मदत होते.

– विश्वास वाडे
(लेखक उद्योग प्रशिक्षक आहेत)
९८९२६१७००० / ९५९४३३०३३७

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?