बिझनेस लिजेंड्स

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेला स्टार्टअप

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


ज्या काळात जातीयेतचे स्तोम माजले होते त्या काळात एखाद्या अस्पृश्य युवकाने आपला व्यवसाय करावा अशी संभावना नव्हती, त्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्या युवकाने स्टार्टअप सुरू करण्याचे धाडस दाखवले ते वर्ष १९१७ होते आणि त्या युवकाचे नाव होते डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर.

पुढील दशकात लोक त्यांना प्रेमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत. त्या युवकाच्या धाडसी प्रयत्नाला या वर्षी शंभर वर्षे पूर्ण होत आहे. या वर्षी त्यांची शतकोत्तर रौप्यजयंती सबंध देशभरात नव्हे तर जगात साजरी केली जात आहे. या वर्षी सरकारने ‘स्टॅण्डअप इंडिया’ मोहिमेअंतर्गत अडीच लाख उद्योजक मागासवर्गीय समाजातून उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

विशेष म्हणजे सदर मोहिमेचा लाभ घेण्यासाठी अनेक प्रक्रियांतून उभे करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ही मोहीम किती सफल होईल हे काळच ठरवील; परंतु एकंदरीत पाहता आतापर्यंतच्या मागासवर्गीय उद्योजकांना जातीयतेमुळे अनेक अडचणींतून सामोरे जावे लागले आहे.

त्यांच्या विविध अंगांपैकी उद्योजकता हासुद्धा एक अंग होता. ज्याप्रमाणे आज जे उद्योजक मागासवर्गीय समाजातून पुढे येत आहेत त्या अनुषंगाने या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त होते. या घटनेचे औचित्य साधून त्यांच्या उद्योजक अंगाकडे लक्ष वेधणे हे अगत्याचे ठरते.

विशेष म्हणजे या विषयाला कुणी हात घातला नाही आणि त्यासंबंधी त्यांच्या उद्योजकतेविषयी विशेषत्वाने लिहिलेले लिखाण उपलब्ध नसल्याने त्यांच्या उद्योजकताविषयीचा अंग झाकला गेला, परंतु त्यांच्या जीवनातील घटनाक्रम व लिखाणांवरून त्यांच्या या अंगाला न्याय देता येईल.

ज्या वेळी त्यांनी ‘स्टॉक मार्केट अँड शेअर्स’ नावाची कंपनी सुरू केली त्या वेळेस त्यांचे शिक्षण वित्तीय क्षेत्रातले होते. विशेष म्हणजे त्यांनी लिहिलेला ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या ग्रंथाची त्या काळचे नावाजलेले प्रोफेसर एडविन कॅनन यांनी विशेष स्तुती केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कसे उत्कृष्ट सल्लागार होते हे खालील घटनेवरून सिद्ध होते.

बाबासाहेब अडीअडचणीच्या वेळी त्यांचे पारसी परमस्नेही नवल भातेना यांना ते मदत मागीत असत. एकदा त्यांनी त्यांच्याकडून आगाऊ दोन हजार रुपये मागितले, कारण त्यांना कल्पना होती की, येणार्‍या काळात जर्मन चलनाचा भाव वाढील आणि त्याअनुषंगाने आपल्याला अधिक फायदा होईल आणि फायदा झाला.

दुसरी घटना अशी की, त्यांनी शाहू महाराजांना दोनशे पौंडची मागणी केली; परंतु या वेळी त्यांना निराशा झाली, कारण रुपयाचा भाव पौंडच्या तुलनेत पडला. सदर कंपनी जातीयतेमुळे बंद पडली. विशेष म्हणजे सल्ला घेणार्‍यांपैकी कुणीच अस्पृश्य नव्हता. कदाचित ही कंपनी त्या वेळी नावारूपाला आली असती.

सन १९२३ मध्ये जेव्हा त्यांनी वकिली सुरू केली तेव्हा त्यांना जातीयतेमुळे काम मिळत नसे. प्रपंच पुढे रेटता यावा म्हणून त्यांनी ‘बॉटली बॉय अकौंटन्सी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’मध्ये प्राध्यापकाची नोकरी केली. इथे ते अर्थशास्त्र आणि व्यापारविषयक कायदे शिकवत असत. त्यांचे शिक्षण हे वित्तीय तथा कायदे क्षेत्रातले असल्यामुळे त्यांना व्यवसायातील बारकावे माहीत होते.

त्यावरून त्यांच्या अंगी व्यावसायिक गुण होते आणि इतरांना उभे करण्याचे सामर्थ्यही त्यांच्या ठायी होते असे दिसून येते. कुठलाही व्यवसाय उभा करत असताना बाजारपेठ आणि व्यवसायातील कायद्यासंबंधीच्या घडामोडीविषयीची माहिती असणे हे यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक आहे.

त्यांनी जातीयता नष्ट करून सामाजिक तथा आर्थिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. ज्या समाजात व्यवसाय करणे हे त्या समाजाच्या संस्कृतीचा भाग असेल त्याच समाजात उद्योजक पैदा होतात. त्या तत्त्वाने सामाजिक समरसता निर्माण करण्यासाठी त्यांनी ‘बहिष्कृत हितकारणी सभा’ची सन १९२४ मध्ये स्थापना केली.

या सभेच्या इतर उद्देशांपैकी एक उद्देश उद्योगाला चालना देणारा आणि उद्योजक घडवण्यासाठी पूरक अशी वातावरणनिर्मिती करणारा होता. या संस्थेद्वारा शेतकी तथा औद्योगिक कौशल्य प्रशिक्षण शाळा चालवणे आणि सहकारी संस्था उभारणे हे होते. त्यांचा असा विश्‍वास होता की, जोपर्यंत इतर समाजातील पुढारलेले लोक पुढे येत नाही तोपर्यंत खालच्या वर्गाचे आर्थिक प्रश्‍न मार्गी लागणार नाहीत.

अशा लोकांना आवाहन करून त्यांना पुढे आणण्यासाठी आपला पण लावला, परंतु बंदिस्त जातिव्यवस्थेमुळे व्यावसायिकतेला वाव नव्हता आणि जातीसंबंधित व्यवसाय करण्यापलीकडे मार्ग नव्हता. एखाद्याने जर व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्याकडून कोण सामान विकत घेईल, हा एक मोठा प्रश्‍न होता. जातीय बंदिस्तीमुळे ही एक प्रकारची उद्योजकतेची आत्महत्याच होती. त्यात भर म्हणजे ब्रिटिश सरकारने अस्पृश्यांवर सेवेत घेण्याची घातलेली बंदी होय.

अशा या दुहेरी जाचातून अस्पृश्यांचा आर्थिक प्रश्‍न सुटणे कठीणच. यासाठी त्यांनी उच्च शिक्षणावर भर दिला आणि जातीयसंबंधी व्यवसाय सोडून नवीन व्यवसाय करण्याची त्यांनी फुंकर भरली. परिणामी काही लोक सरकारी नोकरीत दिसू लागले. त्यांनी ज्याप्रमाणे सरकारी नोकरीत पदोन्नोती ही क्रमप्राप्त होते, तशी पदोन्नोती खासगी क्षेत्रातसुद्धा असली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. बाबासाहेब उद्योजकतेवर किती भर देत होते याचा प्रत्यय त्यांच्या मार्गदर्शनपर भाषणातून दिसून येतो.

जरी ब्राह्मणांना त्यांच्या धर्मग्रंथाप्रमाणे व्यवसाय करण्याची मुभा नसली तरी ते अनेक व्यवसाय करीत असताना दिसतात. ते आज केमिकल उद्योगापासून ते कपडानिर्मितीपर्यंतचे व्यवसाय, दुकाने, हॉटेल, दुग्धभांडार असे अनेक व्यवसाय थाटताना दिसतात. उदाहरणार्थ, लोकमान्य टिळकांनी स्वत:ची जिनिंग प्रेस उभारली होती.

जातीयता ही उद्योग जडणघडणीतील मुख्य अडचण होती आणि मी इतरांपेक्षा श्रेष्ठ कसा यातच गुंतल्यामुळे खालच्या वर्गातून विशिष्ट जातीच आधुनिक व्यवसायात समोर येताना दिसतात. उदाहरणार्थ, महार हे मातंगबंधूंच्या तुलनेत अधिक जास्त सरस आहेत.

बाबासाहेबांचा उद्योजकतेप्रति कल किती मोठा होता, हे त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील उदाहरणावरून दिसून येते. त्यांचा मुलगा यशवंत व पुतण्या मुकुंद ह्यांनी उद्योगात उतरावे, अशी त्यांची इच्छा होती. मुलाने बँकेचा तथा किरकोळ व्यवहार शिकावा असे भाऊराव यांना ते पत्रात लिहितात. पुढे त्यांना एखादा उद्योग काढून द्यावा, अशी विनंती ते त्यांच्या परमस्नेही श्री. भाथेना यांना करतात.

दुसर्‍या एका प्रसंगी त्यांच्या जवळील सहकारी श्री. वराळे यांना त्यांचा तंबाखूचा व्यवसाय उभारणीसाठी ते तीस हजार रुपयांची मदत करतात, शिवाय कच्च्या मालाला ट्रेडर्स मिळावे म्हणून त्याच्या इतर सहकार्‍यांना पत्रव्यवहारसुद्धा करतात. पुढे श्री. वराळे यांची मिलिंद महाविद्यालयाच्या रजिस्टरपदी नियुक्ती केली गेली.

उद्योजकता वाढावी व त्यासाठी अनुकूल असे वातावरण निर्माण व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. अशी त्यांनी स्थापन केलेल्या. स्वतंत्र मजूर पक्षाच्या सन १९३६ च्या जाहीरनाम्यातून दिसून येते. या जाहीरनाम्यात शेतकरी आणि शेतमजूर हे केंद्रस्थानी होते. त्यांच्या मते अल्प भूधारकताचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेती हा कमी नफ्याचा व्यवसाय आहे.

त्यामुळे दारिद्र्यता कमी होण्याऐवजी ती अधिकच वाढत जाते. शेती ही कशी अधिक फायदेशीर करता येईल त्यासाठी त्यांनी सामूहिक शेतीवर जास्त भर दिला. त्यासाठी लागणारे मनुष्यबळ तयार करण्यासाठी शेतीप्रधान व्यावसायिक शाळा, भांडवलाचा प्रश्‍न सोडविण्यासाठी लँड मॉर्गेज बँका, सहकारी बँका उभ्या कराव्यात, अशा त्यांनी सूचना केल्या.

कच्च्या मालाला बाजारपेठ तसेच योग्य भाव मिळावा, त्यासाठी व्यापार संकुले उभी करावीत, असे त्यांचे मत होते. सर्वांगी आर्थिक विकासाच्या दृष्टीने मोठ्या उद्योगांच्या खासगीकरणाला त्यांचा तीव्र विरोध होता. मोठे उद्योग हे सरकारच्या आधिपत्याखाली असणे जास्त हितकारक आहे. सूक्ष्म व लघु उद्योगासाठी खासगी क्षेत्र खुले असले पाहिजे. त्यांनी दिलेली धोकावजा सूचना आजच्या वैश्विक आणि आर्थिक धोरणांमुळे झालेल्या परिस्थितीतून दिसून येते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या महान कर्तृत्वाने आपल्यासमोर अनेक अंगांनी आदर्श ठेवले आहेत. त्यात उद्योजकताही एक अंग होते. या वर्षी या महामानवाची शतकोत्तर रौप्य वर्ष जयंती साजरी होत असताना योगपरत्वे त्यांच्या उद्योजकतेच्या प्रवासालासुद्धा शतक पूर्ण होत आहे. अशा या दुहेरी पर्वावर त्यांच्या उद्योजकतेला आदर्श ठेवून आजच्या युवकांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे, ही काळाची गरज आहे.

– चक्रधर इंदूरकर


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!