विराट कोहली हा उद्योजकसुद्धा आहे; त्याचे हे अंग तुम्हाला माहीत आहे का?

विराट कोहलीला तुम्ही मैदानात चौकार, षटकार मारताना पाहिले आहे. त्याची ऊर्जा आणि खेळण्याची पद्धत अत्यंत वेगळी आणि नावीन्यपूर्ण आहे. आहार आणि फिटनेसच्या बाबतीत तो अतिशय काटेकोर आणि शिस्तबद्ध आहे. संतुलित आयुष्य जगणारा आणि क्रिकेटचं मैदान गाजवणारा विराट कोहली हा एक उत्तम उद्योजकसुद्धा आहे.

अतिशय तरुण वयात त्याने उद्योजकीय विश्वात पाऊल ठेवलं. आपण पाहिले असेल की, अनेक सेलेब्रिटी करोडोंमध्ये खेळायचे आणि एकाएकी त्यांची परिस्थिती हलाखीची होते. ती कशामुळे होते? तर त्यांनी गुंतवणूक केलेली नसते. भविष्याची तरतूद केलेली नसते.

तुमचं आजचं उत्पन्न प्रचंड असेल तर तुम्ही त्यातला काही भाग चांगल्या ठिकाणी गुंतवला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यावसायिक गुंतवणूकसुद्धा करणे गरजेचे आहे. हेच विराट कोहलीने केले आहे. त्याचं म्हणणं आहे की, आपण आयुष्यभर क्रिकेट खेळू शकत नाही. त्यामुळे रिटायरमेंटनंतरची तरतूद आत्ताच करून ठेवली पाहिजे. याच उद्देशाने त्याने उद्योजकीय क्षेत्रात पदार्पण केले.

विराट कोहलीची ब्रँड व्हॅल्यू प्रचंड आहे. २०१७ मध्ये त्याची ब्रँड व्हॅल्यू ६१६ कोटी होती. महत्त्वाचे म्हणजे गेली २५ वर्षे उच्चतम ब्रँड व्हॅल्यू असणार्‍या शाहरूख खानला त्याने मागे टाकलं. या सर्व गोष्टी शक्य झाल्या, कारण त्याने प्रत्येक काम स्मार्ट्ली केलं.

तो एक स्मार्ट क्रिकेटर आहेच, पण त्याचबरोबर एक स्मार्ट उद्योजकही आहे. त्याच्याकडे विविधतेने गुंतवणूक करण्याची कला आहे. एक स्मार्ट गुंतवणूकदार होणं ही एका स्मार्ट उद्योजकाची उजवी बाजू आहे.

विराट कोहली २०१४ मध्ये इंडिया सुपर लीग क्लब गोव्याचा सह-मालक झाला. क्रिकेटनंतर फुटबॉल हा त्याचा अत्यंत आवडता खेळ आहे. भारतात फुटबॉलला अच्छे दिन यावे अशी त्याची इच्छा आहे. वयाच्या २६व्या वर्षी त्याने केलेली पहिली व्यावसायिक गुंतवणूक होती. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही.

वैयक्तिक आयुष्यात आणि क्रिकेट जीवनात तो जितका शिस्तबद्ध आहे, तितका तो व्यवसायाबद्दलही शिस्तबद्ध आहे. २६व्या वर्षी एक तरुण भविष्याचा विचार करतो, हीच केवढी तरी मोठी बाब आहे. त्यानंतर विराट कोहलीने फॅशन जगतात पाऊल ठेवले. नोव्हेंबर २०१४ मध्ये त्याने WROGN नावाचा ब्रँड बाजारात आणला. WROGN हा क्लोथिंग आणि अ‍ॅक्सेसरी ब्रँड आहे.

WROGN ने ‘मिंत्रा’ आणि ‘शॉपर्सस्टॉप’सह टायअप केला आहे. पाहता पाहता WROGN ने तरुणांवर भुरळ घातली आणि एक अग्रगण्य ब्रँड झाला. या वर्षात शंभर देशांमध्ये त्याला हा ब्रँड लाँच करायचा आहे आणि त्याची क्षमता व कष्ट पाहता तो सातासमुद्रापारसुद्धा WROGN ब्रँडला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल.

कोहलीचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, तो स्वतःच एक ब्रँड आहे आणि त्याने त्याचे मूल्य ओळखलेदेखील आहे. कस्तुरी आपल्या जवळच आहे, हे आपण ओळखले तर पाहिजे. नाही तर आपण उगाच मृगजळामागे धावत बसू.

विराटकडे काय आहे, तो कोण आहे याची जाणीव त्याला झालेली आहे. स्पोर्ट्स कॉन्वो या सोशल मीडिया नेटवर्किंगचा तो शेअरहोल्डर आणि ब्रँड अ‍ॅम्बॅसेडर झाला. मुख्य म्हणजे ही सोशल नेटवर्किंग साइट लंडनस्थित आहे.

२०१४ मध्ये त्याने स्मार्ट गुंतवणूक केली. २०१५ मध्येही त्याने गुंतवणुकीची शृंखला सुरू ठेवली. विराट आहार आणि फिटनेसबद्दल खूप गंभीर आहे आणि आपल्याप्रमाणे इतरांनीही हे नियम पाळावे असे जर त्याला वाटले तर यात काही वावगे नाही.

त्याने Chisel नावाची स्वतःची जिम शृंखला सुरू केली. या व्यवसायात त्याने ९० कोटी रुपये गुंतवले आहेत. ही जिम शृंखला Chisel Fitness, CSE आणि कोहलीच्या संयुक्त मालकीची आहे. पुढे कोहलीने दुबईस्थित यूएई रॉयल्स (टेनिस) या टीममध्ये गुंतवणूक केली.

या टीमचे नेतृत्व रॉजर फेडरर करतो. त्याचबरोबर बेंगलुरु योद्धास (व्रेसलिंग) मध्येही त्याने गुंतवणूक केली आहे. एक स्पोर्ट्समन असूनही त्याने विविध क्षेत्रांत केलेली गुंतवणूक म्हणजे गुंतवणुकीविषयीच्या त्याच्या अभ्यासाची ग्वाहीच देते. पुढे त्याने Stepathlon Lifestyle सह भागीदारी करून Stepathlon Kids मध्ये गुंतवणूक केली.

फॅशन, फिटनेस, लाइफस्टाइल, सोशल मीडिया अशा विविध क्षेत्रांत क्रिकेटजीवनात असतानाच त्याने प्रवेश केला आहे. त्याशिवाय अनेक जाहिरातींमध्ये तो झळकत असतो. त्यातून त्याला प्रचंड मानधन मिळत आहे, परंतु त्याचा कल हा उद्योगाकडे अधिक दिसून येतो.

या सर्व उद्योगांमधूनही त्याला उत्कृष्ट परतावा मिळत आहे, यापुढेही मिळणार आहे. कदाचित भविष्यात तो अजून बर्‍याच ठिकाणी गुंतवणूक करेल. स्वत:वर विशेषत: भार न घेता गुंतवणूक करून त्यातून उत्पन्न निर्माण करणारा विराट हा एक स्मार्ट उद्योजक आहे.

आपली सध्या मिळकत जर उत्तम असेल तर आपणही विराटप्रमाणे इतर पर्यायांमध्ये गुंतवणूक करून आपले भविष्य सुरक्षित आणि उज्ज्वल करायला हवे. विराट कोहली हा केवळ तरुण क्रिकेटर्ससाठी नव्हे तर नवोद्योजकांसाठी एक आदर्श आहे.

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?