सूर्य उगवला की जग उजळून निघते, हाच सूर्य तुमच्या घराच्या छतावरून विजेची क्रांती घडवू शकतो. सौरऊर्जा ही भविष्यातील ताकद आहे, असे मानणारे अमरावतीच्या ‘रूप राम एनर्जीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी’चे संस्थापक आशिष पेटे (माळी) म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रात हरितऊर्जेचा प्रकाश पोहोचवणारे तरुण उद्योजक.
‘रूप राम एनर्जीज प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांनी गेल्या आठ वर्षांत हजारो कुटुंबांचे वीजबिलमुक्त जीवन घडवले आहे. ‘लोकमत वैभव-२०२५’ पुरस्काराने सन्मानित झालेल्या या उद्योजकाची गोष्ट म्हणजे सामान्य माणसाची असामान्य यशोगाथा आहे.
आशिष यांचा जन्म १८ जून १९८८ रोजी अमरावती जिल्ह्यात एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. व्यावसायिक पार्श्वभूमी नसलेल्या या कुटुंबात शिक्षण हेच भविष्य उजळवण्याचे साधन होते. सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथून त्यांनी बी-टेक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. शिक्षणाच्या तिसर्या वर्षी, कामत हॉटेल्सची जगभरातील साखळी उभारणार्या डॉ. विठ्ठल कामत यांच्या ‘इडली, ऑर्किड आणि मी’ या पुस्तकाने त्यांच्या मनात उद्योजकतेची ठिणगी पेटवली.
छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रेरणेने आशिष यांच्या विचारांना नेहमीच दिशा दिली. ‘प्रयास’सारख्या संस्थेच्या संपर्कात येऊन समाजातील प्रथितयश व्यक्तींच्या आदर्शाने त्यांच्या मनात समाजासाठी देण्याची भावना रुजली. शिक्षणानंतर काही काळ त्यांनी लेक्चररशिप केली, पुढे काही काळ सोलर कंपनीमध्ये काम करून अनुभव मिळवला.
२०१६ साली जेव्हा भारतात सौरऊर्जेविषयी फारशी जागरूकता नव्हती, तेव्हा आशिष यांनी ही संधी हेरली. सरकारच्या धोरणांमुळे सबसिडी आणि गुंतवणुकीच्या वाढत्या संधींमुळे सौर क्षेत्रात क्रांती घडत होती. त्यांनी ‘ग्रीन एनर्जी सोल्युशन्स’ नावाने कंपनी सुरू केली. पुढे ‘रूप राम एनर्जीज प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने अजून एका कंपनीची स्थापना केली. आज त्यांच्या दोन सोलर कंपन्या आहेत.
ते अमरावती जिल्ह्यात ‘महिंद्रा सोलाराईझ’चे अधिकृत चॅनेल पार्टनर म्हणून काम करतात. सुरुवातीला सौरऊर्जा म्हणजे काय, हे लोकांना समजावून सांगणे हेच मोठे आव्हान होते. सोलर महाग आहे, पावसाळ्यात काम करत नाही किंवा गुंतवणूक परत मिळणार नाही, असे अनेक गैरसमज दूर करत, प्रात्यक्षिके दाखवत त्यांनी लोकांपर्यंत सौरऊर्जेचा संदेश पोहोचवला. लोकांना पटवून द्यावं लागत होतं की ही एक वन-टाइम इन्व्हेस्टमेंट आहे, ज्याचे परतावे चार वर्षांत मिळतात.

सुरुवातीला सौर डीसी लाइट्स आणि वॉटर हिटर विकण्यापासून सुरू झालेला हा प्रवास, आता ऑन-ग्रिड आणि ऑफ-ग्रिड सौरप्रकल्प, सौरपंपिंग सिस्टम, पॅनेल, इन्व्हर्टर यांच्या विक्री आणि सेवेपर्यंत पोहोचला आहे. ‘पीएम सूर्यघर योजने’अंतर्गत त्यांनी शेकडो ग्राहकांना बँक फायनान्स आणि सरकारी सबसिडी मिळवून दिली आहे. आजवर पाचशे लोकांना सरकारी अनुदान मिळवून दिले आहे व दीड हजारहून अधिक प्रकल्प पूर्ण केले आहेत.
सरकारी अनुदान हे काही ठिकाणी तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत असते. जे पॅनेल आणि इन्व्हर्टरच्या संयोजनावर अवलंबून असते. जसे एका किलोवॅटसाठी अंदाजे ८० हजार रुपये खर्च येतो आणि सरकार ३० टक्के अनुदान देते. ३ किलोवॅट प्लॅनसाठी जेथे विजेचा वापर पंधराशे ते दोन हजार युनिट असतो, तिथे सरकारचे ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते.
या व्यवसायाने केवळ आर्थिक यशच नाही, तर सामाजिक परिवर्तनही घडवले. स्थानिक युवकांना प्रशिक्षण आणि रोजगार देऊन ग्रामीण भागात नव्या संधी त्यांनी निर्माण केल्या. सध्या पंधरा जणांची टीम आणि दहा कॉन्ट्रॅक्टर मजूर कंपनीसोबत काम करतात. अमरावती जिल्ह्यासह वाशीम, बुलढाणा, अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यात व्यवसाय पसरला आहे.
‘रूप राम एनर्जीज’चे वैशिष्ट्य म्हणजे विक्रीनंतरची सेवा. सौर उत्पादनाची वॉरंटी २५ वर्षांची असते, त्यामुळे ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण करणे महत्त्वाचे असते. त्यांच्या सेवेमुळेच कंपनीची उलाढाल आता करोडोंमध्ये पोहोचली आहे.
सध्या अमरावतीत ऑफिस आणि गोदाम आहे. अमरावतीच्या सर्व तालुक्यांमध्ये आपली सेवा पोहोचण्यासोबत भविष्यात पुणे आणि नागपूरमध्ये ऑफिस उभारण्याचा त्यांचा मानस आहे. वाडवडिलांचे नाव नावारूपाला आणणे आणि कंपनीसोबत सर्वांचा विकास घडवणे हे त्यांचे ध्येय आहे.
सौरऊर्जा म्हणजे फक्त तंत्रज्ञान नाही तर ती उज्ज्वल भविष्यासाठीची दिशा आहे, असे आशिष यांना वाटते. त्यांच्या ‘रूप राम एनर्जीज’ने ही दिशा हजारो घरांपर्यंत पोहोचवली आहे. या संपूर्ण प्रवासात कुटुंबाचे पाठबळ खूप महत्त्वाचे आहे. आज मागील तीन वर्ष भाऊ अक्षय त्यांच्यासोबत काम करतोय. शिवाय पत्नी, सासरे, मेहुणे यांचेही सहाय्य आहे.
एका अहवालानुसार ‘पीएम सूर्यघर योजने’अंतर्गत १ कोटी घरांना सौरघर करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. यातील वीस लाख घरे महाराष्ट्राच्या वाट्याला येतात जूनपर्यंत आपण ४ लाख घरांपर्यंत पोहोचलो आहोत तरीही १६ लाख संधी शिल्लक आहेत त्यामुळे इथे खूप मोठा वाव आहे.
‘रूप राम’ हे नाव आशिष यांचे आजोबा रुपराव सावरकर आणि श्रीराम पेटे यांच्या स्मृतीतून साकारले आहे. आपल्या एका आजोबांकडून त्यांनी व्यवसायासाठी लागणारा प्रामाणिकपणा, ध्येयवाद आणि दूरदृष्टीचा वारसा घेतला, तर दुसर्या आजोबांकडून समाजहित, सेवाभाव आणि माणुसकीची शिकवण म्हणूनच ‘रुप’ म्हणजे कार्यातील गुणवत्ता आणि ‘राम’ म्हणजे मूल्यांचा पाया.
संपर्क – 9657051116


