आयुष्याचा मार्ग कितीही खडतर असला तरीही कष्टाने तो सुखकर करता येतो. निवडलेल्या मार्गावर कितीही काटे असले तरीही अविरत प्रवास चालू ठेवला तर कष्टाच्या घामाने जीवनाला फुलांचा सुगंध प्राप्त होतो. फ्लोरीस्ट केशव त्रिभुवन यांचा प्रवास असाच स्वत:सोबत इतर उद्योजक घडवणारा आहे.
केशव त्रिभुवन वय वर्ष चाळीस. औपचारिक शिक्षण दहावीपर्यंत झालंय. मोलमजुरी करणार्या कुटुंबात जन्मलेले केशव यांच्या आईचे केशवच्या लहानपणीच निधन झाले. १९७२ साली मराठवाड्यात दुष्काळ पडला आणि कुटुंबाने काम मिळेल तिथे स्थलांतर केले.
कामाच्या शोधात वडील जळगावला पोहचले. परिस्थिती हलाखीची होती त्यामुळे आठ वर्षाच्या केशवनेही एका फुलाच्या दुकानात काम सुरू केले. हार, वेण्या बनवणारे ते एक छोटे फुलांचे दुकान होते. इथूनच केशव त्रिभुवन यांचा फ्लोरीस्ट या क्षेत्रातील प्रवास सुरू झाला.
इथे त्यांनी काम शिकून घेतले. वडील आणि भाऊ यांनीच केशव यांचा सांभाळ केला. त्यांना आर्थिक हातभार लागावा यासाठी त्यांनी कामाला सुरुवात केली. कामात खूप कष्ट होते, पण त्यांनी याची कधीच तक्रार केली नाही म्हणूनच पुढे जाऊन ते स्वत:चा व्यवसाय सुरू करू शकले.
पुण्यात पिंपरीत ‘ओम फ्लॉवर डेकोरेटर’ या नावाने त्यांचे दुकान आहे. फुलाच्या दुकानात नोकरी करत असताना ते बुके बनवायलाही शिकले होते. त्यांनी वयाच्या अठराव्या वर्षी फक्त पाचशे रुपयांच्या भांडवलात स्वत:च्या व्यवसायाला सुरुवात केली.
सुरुवातीला बुके व्यवसायाला मागणी कमी होती त्यामुळे कमाई कमी होती, पण म्हणून व्यवसाय बंद केला नाही तर यावर मार्ग शोधला. दिवसभर काम करायचे आणि संध्याकाळनंतर स्वत:चे दुकान लावायचे. यात भरपूर कष्ट होते. मग जम बसायला दोन ते तीन वर्ष गेली. हळूहळू फुलांचा बुके घेण्याकडे ग्राहकाचा कल वाढू लागला.
आज ‘ओम फ्लॉवर डेकोरेटर’कडे वीस रुपयांपासून 2 हजार रुपये किमतीचे बुके उपलब्ध असतात. कोणाला कस्टमाइज करून हवा असेल तर तसाही बुके ते बनवून देतात. कॉलेजजवळ दुकान असल्याने तरुण मुलामुलींची पसंती खूप मिळते. मुलांच्या पसंतीने त्यांना हवा तसा बुके बनवून दिला जातो.
त्यांच्याकडे अनेक प्रकारची देशी फुले असतातच पण विदेशातील फुलेही उपलब्ध आहेत. बहुतांश फुले बंगळुरू, मुंबई तर काही अगदी थेट विदेशातून मागणीनुसार मागवता येतात.
फुले ही नाशवंत असतात. पूर्वी काही मोजक्या गोष्टींसाठी फुले वापरली जायची, पण आज त्यांची मागणी वाढलीय. कोणी आजारी असेल तर त्याला भेटायला जातानाही आता फुले नेली जातात. मागील दहा वर्षात फुलांच्या बुकेना ऑनलाईन, ऑफलाईन दोन्ही पद्धतीत मागणी वाढलीय.
बेडरूममध्ये आपल्या आवडीची फुले ठेवायलाही लोकांना आता आवडते. विविध डेकोरेशनच्या ऑर्डर ‘ओम डेकोरेट’ घेते. मंदिर सजावट, घर सजावट, लग्नाची गाडी, दुकान, ऑफिस, बारसे अशा अनेक इव्हेंटमध्ये सजावटीच्या ऑर्डरपासून ग्राहकाची मागणी असेल तर लाईटपासून जेवणापर्यंत ओम डेकोरेटर सेवा देते.
तुमचा व्यवसाय हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
'स्मार्ट उद्योजक' पोर्टलवर तुमच्या व्यवसायाबद्दल सविस्तर Sponsored Article प्रकाशित करा आणि नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचा.
🚀 अधिक माहितीरस्त्यालगत दुकान असले की कमीत कमी काही प्रकारचे बुके तरी डिस्प्लेला बनवून ठेवावे लागतात. यात लहान, मध्यम, मोठा असे बुके असतात. त्याच्या साइज आणि सजावटीनुसार किंमत ठरते. प्रत्येकाच्या व्यवसायाचे स्वत:चे वेगळेपण असते. ‘ओम डेकोरेटर’ची खासियत म्हणजे प्रामाणिकपणा आणि गुणवत्ता.
स्वत:ची अशी एक कामाची पद्धत आहे त्यामुळे दिलेले काम सांगितलेल्या वेळेत पूर्ण करून दिले जाते. यामुळेच त्यांचे वीस वर्षांपासून जोडलेले ग्राहक आहेत. हेच त्यांना इतरांपेक्षा वेगळे करते.
अगदी दुर्मिळ असे ट्युलिपची फुलेही कोणाला हवी असतील तर ‘ओम डेकोरेटर’ एका दिवसात उपलब्ध करून देते. या फुलांना ठराविक तापमानात जतन करून ठेवावे लागते त्यामुळेच ही फुले महाग असतात. पण त्यासाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध असल्याने ग्राहकाच्या मागणीनुसार ते उपलब्ध करून देतात. एखाद्या फ्लोरिस्टला फुले हवीत किंवा इतर त्यासाठी लागणारे साहित्य हवे तेही ते पुरवतात. संपूर्ण जगभर ते फुलं पाठवतात.
केशव यांच्या या प्रवासात अनेक चढउतार आले. कोरोनामध्ये तर संपूर्ण धंदा बंद पडला होता. पुन्हा नव्यावे सुरुवात करावी लागली. केशव म्हणतात व्यवसाय करायचा असेल तर दोन गोष्टी असतात एक तर भरपूर पैसा हवा किंवा अपार कष्टाची तयारी हवी. माझी तयारी होती कष्ट करण्याची. संकटे येतच असतात.
सुरुवातीला एका छोट्या जागेत मी व्यवसायाला सुरुवात केली जम बसत होता एवढ्यात अतिक्रमणाच्या विळख्यात जागा गेली. नव्या जागी पुन्हा सुरुवात केली. काही काळ तिथे काम केले मग पुन्हा बस्तान हलवावे लागले. आपल्या मालकीची जागा नसेल तर अशा परिस्थितीला सामोरे जावे लागते. पण आपल्याकडे हे नाही, ते नाही म्हणून हातपाय गाळून चालत नाहीत. कष्ट करत राहायचे मार्ग मिळत जातो.
मागील दहा वर्षांपासून त्यांच्यासोबत दहा जणांच्या हाताला रोजगार मिळाला आहे. फ्लॉवर क्लासेसच्या माध्यमातून 1 हजारपेक्षा अधिक लोकांना हा व्यवसाय सुरू करण्याचे आजपर्यंत त्यांनी प्रशिक्षण दिले आहे. यातून शंभर लोकांनी स्वत:चा फुलांचा व्यवसाय सुरू केला आहे. हे खूप मोठं यश आहे.
हे प्रशिक्षण वर्ग सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत. चार प्रकारचे फुले व डेकोरेशनचे प्रशिक्षण वर्ग ते घेतात. दोन दिवसांचा एक वर्ग असतो. पाच हजार रुपये फी आहे. यासाठी लागणारे मटेरियल तसेच जागा त्यांची असते. अत्यंत गरजवंत असेल, पैसे नसतील त्यांनाही ते प्रशिक्षण देतात हे त्यांचे वेगळेपण आहे.
ज्याच्याकडे शिकायला पैसे नाहीत त्याला ते प्रशिक्षणाचे दोन दिवस स्वत:च्या दुकानात किंवा आपल्या ओळखीच्या इतर दुकानात कामाला लावतात व त्याला हा व्यवसाय शिकवतात. फुलांचा व्यवसाय असा आहे की त्याला हात लावला नाही तर आपण काय करतोय हे कळत नाही, असे केशव यांचे मत आहे त्यामुळे ते ऑनलाईन क्लास घेत नाहीत.
या क्षेत्रात करण्यासारखे खूप आहे आणि रोजगारही भरपूर आहे, पण या क्षेत्रात कारागीर मिळत नाही ही खूप मोठी समस्या आहे. भविष्यात एक मोठी फ्लॉअर चैन उभारायचे त्यांचे ध्येय आहे यासाठी काम चालू आहे. आवश्यकता आहे मोठ्या भांडवलाची.
जेव्हा चैन सुरू होईल तेव्हा लोकांना मोफत शिकवण्याचा मानस आहे. यातून प्रशिक्षित झालेली व्यक्ती पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ व्यवसाय सुरू करतील. शून्यातून प्रवास सुरू झाला, पण अनुभवाचे शहाणपण एवढे मोठे आहे की केशव त्रिभुवन यांना डी.वाय. पाटील कॉलेजच्या बॉटनी विभागात व्याखनाला बोलावले जाते. हा सन्मान त्यांना अनुभवाच्या शाळेने दिलाय.
लहापणापासूनच अपार कष्ट केले. लहानपणी आईच्या मायेला पोरके झाले, पण वडील आणि मोठ्या भावाने सांभाळ केला. आज कुटुंबीयांची उत्तम साथ आहे. म्हणूनच केशव म्हणतात, पैसा आपण कमावतोच, पण त्याहीपेक्षा जास्त मोलाचे असे मानसन्मान, समाधान मला फुलांच्या व्यवसायाने मिळवून दिले. एखाद्या अशाच फुल विकणार्या गरजवंत, लहान मुलांकडून तुम्हीही फुले घेत जा आणि त्याला मदतीचा हात द्या. भविष्यात एखादा उद्योजक यातूनच तयार होईल.
संपर्क : 9822108069
तुमची यशोगाथा हजारो वाचकांपर्यंत पोहोचवा
तुमचा व्यवसाय वेगळा आहे. तुमचा प्रवास प्रेरणादायी आहे. आता ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची वेळ आली आहे.
'स्मार्ट उद्योजक' मासिकात तुमची उद्योजक कथा प्रकाशित करून मिळवा:
- ✅ ब्रँड व्हिजिबिलिटी
- ✅ व्यावसायिक प्रतिष्ठा
- ✅ ग्राहकांचा वाढता विश्वास
- ✅ सोशल मीडिया प्रमोशन
तुमची कथा पुढील अंकात प्रसिद्ध करण्यासाठी अर्ज करा.
🚀 येथे क्लिक करा

