शिक्षकांच्या विचारांना राज्यस्तरीय व्यासपीठ देणारे मधुकर घायदार

madhukar ghaydar

नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव (ता. चांदवड) येथे जन्मलेले मधुकर रंगनाथ घायदार हे शिक्षण क्षेत्रातील प्रयोगशील शिक्षक आणि शिक्षकांच्या विचारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे उद्योजक म्हणून ओळखले जातात. २८ जून १९७१ रोजी जन्मलेल्या मधुकर घायदार यांनी धुळे येथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.

पुढे शिक्षक म्हणून कार्य करत असताना त्यांनी शिक्षण क्षेत्रातील अनेक गरजा आणि समस्या जवळून अनुभवल्या. शिक्षक म्हणून काम करताना त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की शिक्षक कोणत्याही विषयांवर उत्कृष्ट लिखाण करू शकतात, नावीन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबवतात; परंतु त्यांच्या विचारांना आणि अनुभवांना राज्यस्तरावर पोहोचवणारे व्यासपीठ उपलब्ध नव्हते.

अनेकदा दैनिक वृत्तपत्रे असे लेख प्रसिद्ध करत नाहीत. तसेच एखाद्या जिल्ह्यातील वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले लेख इतर जिल्ह्यांतील शिक्षकांना वाचता येत नाहीत, कारण ती वृत्तपत्रे जिल्ह्यापुरतीच मर्यादित असतात. ही उणीव दूर करण्यासाठी शिक्षकांसाठी एक राज्यस्तरीय व्यासपीठ निर्माण करण्याचा त्यांनी निश्चय केला.

यातूनच २० एप्रिल २०२० रोजी “साप्ताहिक शिक्षक ध्येय”चा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला. या साप्ताहिकाचा शुभारंभ ऑनलाईन पद्धतीने दैनिक सकाळ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने यांच्या शुभ हस्ते झाला. या उपक्रमामागील मुख्य उद्देश असा होता की, शिक्षकांनी लिहिलेले लेख आणि त्यांनी राबवलेले नावीन्यपूर्ण उपक्रम राज्यातील सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचावेत.

त्यामुळे इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या शाळांमध्येही असे प्रयोग राबवले जातील. परिणामी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधता येईल. विशेष म्हणजे या साप्ताहिकाची सुरुवात लॉकडाउनच्या काळात झाली.

सर्व व्यवहार बंद, घराबाहेर पडण्यावर निर्बंध अशी परिस्थिती असतानाही मधुकर घायदार यांनी हार न मानता दर सोमवारी डिजिटल स्वरूपात साप्ताहिक प्रकाशित करण्यास सुरुवात केली आणि हा उपक्रम आजपर्यंत अविरत सुरू आहे. २० एप्रिल २०२५ रोजी शिक्षक ध्येय साप्ताहिकाने पाच वर्षे पूर्ण करून सहाव्या वर्षात पदार्पण केले.

आज साप्ताहिक शिक्षक ध्येय राज्यस्तरावर प्रसिद्ध होत आहे. व्हॉट्सॲपचे १५३ ग्रुप, फेसबुक पेज आणि ग्रुप, इंस्टाग्राम, टेलिग्राम तसेच शिक्षक ध्येय कुटुंब ॲप या सर्व माध्यमांद्वारे हे साप्ताहिक प्रकाशित होते. आज या साप्ताहिकाचे १ लाखांहून अधिक शिक्षक, पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. डिजिटल स्वरूपामुळे हे साप्ताहिक मोबाईल, संगणक, लॅपटॉप किंवा स्मार्ट टीव्हीवर कुठेही आणि कधीही सहज वाचता येते. विशेष म्हणजे हे साप्ताहिक मोफत वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

शिक्षक ध्येयच्या माध्यमातून केवळ लेखनच नव्हे, तर विविध उपक्रमही राबवले जातात. दरवर्षी ८ मार्च रोजी राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार, ५ सप्टेंबर रोजी कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार आणि १४ नोव्हेंबर रोजी बालचित्रकार पुरस्कार स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येते.

तसेच लोकप्रिय क्लास प्लस ॲपच्या माध्यमातून २० एप्रिल २०२० पासून आजपर्यंतचे २६० पेक्षा अधिक अंक एकाच ठिकाणी वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पहिल्या अंकापासून आजपर्यंतचे सर्व अंक एकत्र उपलब्ध करून देणारे कदाचित भारतातील हे एकमेव साप्ताहिक असावे.

दर सोमवारी शिक्षक आपल्या विद्यार्थी ग्रुपमध्ये हा अंक शेअर करतात, त्यामुळे वाचनाचा प्रसार अधिक व्यापक होत आहे. शिक्षक ध्येय कुटुंब ॲपवर सध्या ३८,००० पेक्षा अधिक सदस्य जोडलेले आहेत.

ऑनलाईन स्वरूपामुळे शिक्षक ध्येय केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाही. कर्नाटक, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, दिल्ली, पंजाब, छत्तीसगड, अंदमान-निकोबार, तामिळनाडू, बिहार आणि हरियाणा अशा अनेक राज्यांमध्येही हे साप्ताहिक वाचले जात आहे.

या उपक्रमाच्या यशामागे राज्यातील शंभरपेक्षा अधिक शिक्षक आणि शिक्षिका सातत्याने प्रयत्नशील आहेत. तसेच त्यांच्या कुटुंबातील अर्धांगिनी राजश्री, मुलगी साक्षी आणि मुलगा सार्थक यांनीही मोलाचे सहकार्य दिले आहे.

भविष्यात “शिक्षक ध्येय”चे प्रिंट मासिक सुरू करून ते संपूर्ण राज्यात वितरित करण्याचा त्यांचा मानस आहे, जेणेकरून अधिकाधिक शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांपर्यंत ज्ञान, प्रेरणा आणि नवोपक्रम पोहोचतील.

शिक्षकांच्या विचारांना राज्यस्तरीय व्यासपीठ देण्याचा ध्यास आणि शिक्षण क्षेत्रासाठी केलेले योगदान, हाच मधुकर घायदार यांच्या उद्योजकीय प्रवासाचा खरा सार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

books for life website Ad
Click here to visit: booksforlife.in
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart Udyojak India Business Directory
आशिष पेटे : सौरऊर्जेने ग्रामीण महाराष्ट्रात घडवलेली हरितक्रांती व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?