अनेक अपयशे आली, लाखोंचे कर्ज झाले; तरीही जिद्द सोडली नाही म्हणूनच आज सोनाली नरुटे करत आहेत ५० कोटींची उलाढाल

अनेकदा यशाने हुलकावणी दिल्यावर विश्वास डळमळतो, पण प्रयत्नांची कास न सोडता काम करणार्‍याला एक दिवस यश नक्की मिळते. ही गोष्ट आहे व्यवसायाच्या वाटेवर अनेक वेळा ठेच लागून पडल्या, धडपडल्या आणि पुन्हा उठून यशाकडे वाटचाल करणार्‍या सोनाली बापू नरुटे यांची.

पुण्यातील इंदापूर जिल्ह्यातील सोनाली व बापू नरुटे हे दांपत्य. बापू हे पेशाने शिक्षक. तर सोनाली यांचे शिक्षण बारावीपर्यंत झालेले. सोनाली गृहिणी होत्या. त्यामुळे आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी अजूनही काही काम करणे आवश्यक होते. सोनाली व बापू यासाठी प्रयत्न करत होते.

व्यवसाय म्हटला की गुंतवणूक आली मग कर्ज काढून इंदापूर येथे सोनाली यांनी एका प्री-स्कुलची फ्रँचायजी घेतली. सोनाली यांचे व्यवहारज्ञान खूप चांगले होते. कोणतेही काम करायला त्या कधीच मागे हटत नाहीत. प्री-स्कुल फ्रँचायजीची सुरुवात झाली, पण हवा तसा जम बसत नव्हता.

सोनाली प्रयत्न करत होत्या छोटी-मोठी इतरही कामे या जोडीला त्या करत होत्या. मग चहाची फ्रँचायजी घेतली, स्वतःचे हॉटेल सुरू केले असे वेगवेगळे मार्ग त्यांनी चाचपून पाहिले. या प्रवासात चुका होत होत्या, पण तरीही प्रयत्न काही सोडले नाहीत.

या दरम्यान केशवराव बापू जगताप या देवमाणसाची भेट झाली. ‘सिद्धेश्वर ग्रामीण सहकारी पतसंस्थे’चे चेअरमन असलेल्या केशवराव जगताप यांना नरुटे दांपत्याची धडपड जेव्हा कळली तेव्हा केवळ सोनाली यांच्या कामावर विश्वास ठेऊन त्यांनी कर्ज दिले.

पूर्व ओळख नसतानाही या दांपत्यावर त्यांनी विश्वास दाखवला. प्री-स्कुलसोबत गावात इंटरनॅशनल स्कुल असावे अशी अनेकांनी त्यांच्याकडे इच्छा बोलून दाखवली होती. त्याचसाठी नरुटे दांपत्य प्रयत्न करत होते. मग पैशांची जुळवाजुळव झाल्यावर शाळा बांधकामाला सुरुवात झाली.

त्यातच कोरोना आला आणि सारे जग ठप्प झाले. सोनाली नरुटे यांची वेगवेगळ्या ठिकाणी केलेली गुंतवणुक डेड इन्वेस्टमेंट झाली. पालकांनीसुद्धा फी दिली नाही. कर्मचार्‍यांचे पगार थकले. सगळेच उध्वस्त झाले. गहाण ठेवलेल्या जमिनीवरही जप्ती आली. मार्ग दिसत नव्हता. समोर सगळा अंधार होता. एक क्षण मनात आत्महत्येचे विचारही येऊन गेले, पण मुलांसाठी जगायचे ठरवले.

या नाजूक काळात केशवराव जगताप यांचे शब्द खूप उर्जा देऊन गेले. त्यांनी सोनाली आणि त्यांचे पती बापू नरुटे यांना समजावले. जे गेले ते गेले, आता पुढे पाहा. असे प्रसंग, चढउतार आयुष्यात येत असतात. त्यांना मागे टाका आणि पुढे चला. पुन्हा नव्याने सुरुवात करा. त्यांच्या या आश्वासक शब्दांनी मनाला उभारी मिळाली आणि मग पुढे ‘मन:शांती चायबार’चा जन्म झाला.

Smart Udyojak Business Ecosystem Popup

कोरोना काळात लोक आरोग्याविषयी जागरूक झाले होते. याच काळात गुळाच्या चहाची मागणी आणि त्याच्याविषयी जागरूकता वाढली होती. मग या संधीला सोनालीताईंनी ओळखले व गुळाचा चहा यावर अभ्यास करून संपूर्ण तयारीनिशी त्या या व्यवसायात उतरल्या.

ऑगस्ट २०२२ साली ‘मन:शांती चायबार’ बाजारात उतरले. मग मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. सुरुवातीला अगदी शंभर, दोनशे रुपयांचा जेवढा हवा तेवढाच कच्चा माल आणायचा प्री-मिक्स तयार करायचे आणि ऑर्डरप्रमाणे पोहचवायचे असे काम चालू केले.

सोनालीताईंना सुरुवातीला त्यांचे पती यात मदत करत होते. मग एक एक करत लोक जोडले गेले. आज दहा लोकांची मार्केटिंगची टीम आहे. याचे बारामती येथे ऑफिस आहे तर वडाचीवाडी उंड्री पुणे येथे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. येथे ३५ लोक काम करतात.

याशिवाय नवी मुंबईतसुद्धा ऑफिस आहे. आता एवढी मोठी कंपनी सोनालीताई उत्तमरीत्या सांभाळता. मागील वर्षी २५ करोडचा टर्नओव्हर कंपनीने केला आणि चालू वर्षात ५० करोडचा टर्नओव्हर झाला आहे. याचमुळे आज केशवराव जगताप यांच्या विश्वासाला कोणताही तडा न जावू देता तितक्याच ताकदीने त्यांनी दिलेल्या कर्जाची परतफेड केली आहे.

‘मन:शांती चायबार’चे बाजारात गुळ आणि साखरेचे प्रत्येकी ४८ प्रकारचे प्री-मिक्स आहेत. इलायची गुळाच्या प्री-मिक्सला खूप चांगली मागणी आहे. याशिवाय बासुंदी चहा, लेमनग्रास, मसाला चहा, रोझ टी, कोल्ड कॉफी, लिंबूपाणी यांचेही प्री-मिक्स ते तयार करतात. हे प्री-मिक्स सर्व विविध चहाच्या आउटलेट, दुकानाला पाठवले जातात.

याचा फायदा म्हणजे चहाविक्रेत्याला कोणाची फ्रँचायजी घेण्याची गरज नाही. १ किलो, ५ किलो अगदी १० टनपर्यंत कितीही प्रमाणात माल लागला तरी तो ‘मन:शांती चायबार’ त्यांना उपलब्ध करून देते. संपूर्ण भारतभर माल वितरीत केला जातो. येत्या एप्रिलपासून दुबई, कतार, न्यूझीलंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि इजिप्त येथे माल निर्यात केला जाणार आहे.

व्यवसाय म्हटले की रोज नवे आव्हान समोर असते. त्यातही अन्नपदार्थ म्हटले की मुख्य विषय असतो गुणवत्ता. गुणवत्ता टिकवण्यात खूप मेहनत घेतली जाते. सतत कामगार काम सोडून जातात अशा वेळी त्यांना जोडून ठेवणे त्यांना नवनव्या इन्क्रीमेंट देणे, त्यांचे वाढदिवस साजरे करणे, त्यांच्या समस्या समजून घेणे यावर त्या जातीने लक्ष देतात.

या क्षेत्रात समस्या येते ती म्हणजे कच्चा माल मिळण्याची तसेच आजच्या जलद गती धावणार्‍या या जगात माल लगेच दुसर्‍या दिवशी ग्राहकाला हवा असतो त्यासाठी तशी सिस्टीम तयार केलीय. म्हणूनच आज जवळपास चार हजार स्थानिक ग्राहक जोडलेले आहेत.

या अशा आव्हानांना योग्य पद्धतीने हाताळल्याने हळूहळू कंपनी चांगल्या पद्धतीने वाढतेय. ‘मन:शांती चायबार’चे ठळक वैशिष्ट्य म्हणजे ग्राहकाला नेक्स्ट डे डिलिव्हरी दिली जाते. क्वालिटी, क्वांटिटी आणि सर्व्हिस हा या कंपनीचा मोटो आहे. यातूनच ‘मन:शांती’ हा ब्रँड तयार झाला आहे.

इतरांना कॉपी करून व्यवसाय सुरू करणारे अनेक असतात. त्यामुळे होते काय तर व्यवसायात बारकावे सुटतात. सोनालीताईंनी मात्र एक गोष्ट हेरली ती म्हणजे या प्री-मिक्स बनवणार्‍या क्षेत्रात खूप कमी कंपन्या आहेत आणि ज्या आहेत त्या खूप मोठ्या स्केलवर काम करतात.

त्यांच्याकडे अर्धा किलो ते एक किलो अशा प्रमाणाचे पॅकेट मिळत होते. त्यांचे दरही जास्त असायचे. ‘मन:शांती चायबार’ने १६० ग्रॅमचे पाकिट बाजारात आणले. यामागे आपल्या ग्राहकाचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. याशिवाय यात वेगवेगळ्या प्रकारच्या चवी आणल्या. याचमुळे मार्केटमध्ये हा ब्रँड खूप चांगल्या पद्धतीने उतरला.

येत्या वर्षभरात कंपनीचा शंभर करोडच्या टर्नओव्हर पूर्ण करायचा आहे तर आपली कंपनी पुढच्या पाच वर्षात दोन हजार करोड टर्नओव्हरची करण्याचा मानस सोनाली नरुटे यांचा आहे.

संपर्क : 7218920920

Author

  • pratibha shailesh rajput

    यांनी पदव्युत्तर पत्रकारितेत पदविका केली आहे. प्रिंट माध्यमांत काही काळ काम केल्यानंतर त्यांनी स्मार्ट उद्योजक हे मासिक सुरू केले.

    View all posts
books for life website Ad
Click here to visit: booksforlife.in
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart Udyojak Business Ecosystem Popup
आशिष पेटे : सौरऊर्जेने ग्रामीण महाराष्ट्रात घडवलेली हरितक्रांती व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?