उद्योजकतेचा अनुभव घेण्यासाठी तीन मैत्रिणींनी एकत्र येत सुरू केली ‘पॉकेट कॅफे’ची फ्रँचायजी

ranjana korke anita kondhalkar parinita kondhalkar pockket cafe story

खरे तर कमी कशाचीही नव्हती, पण स्वत:चे, स्वत:साठी काही तरी करावे, या विचाराने पुणे येथील तीन महिलांनी मिळून ‘पॉकेट कॅफे’ची फ्रँचायजी घेतली. या क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसताना यशस्वीपणे आज त्या हे कॅफे चालवतात आणि अजून तीन ठिकाणीसुद्धा काम त्यांनी सुरू केले आहे. हा संपूर्ण प्रवास आपल्याला टीम मेंबर रंजना कोरके यांनी सांगितला.

रंजना संजयकुमार कोरके या बीएस्सी एलएलबी आहेत. मागील सहा महिन्यापासून नोटरी म्हणून काम करतात. तर अनिता नितीन कोंढाळकर व परिणीता समीर कोंढाळकर या बी.कॉम आहेत. दोघी कौटुंबिक व्यवसायात अकाऊंट सांभाळत होत्या. तिघी मैत्रिणी आहेत व एकाच सोसायटीत मागील अठरा वर्षे एकत्रित राहतात.

तिघींना स्वत:चे काही वेगळे करू असे वाटत होते. त्यामुळे मग त्यांनी शोध सुरू केला की आपण काय करू शकतो. याच दरम्यान ‘पॉकेट कॅफे’ची संधी आली. ही संकल्पना तिघींनाही आवडली आणि अशाप्रकारे ‘पॉकेट कॅफे’ची फ्रँचायजी त्यांनी सुरू केली.

कॅफे म्हटले की लगेच डोळ्यापुढे विविध प्रकार येतात. जगभरात हे खूप लोकप्रिय आहे. आता भारतातही ही संकल्पना खूप चांगल्या पद्धतीने रुळली आहे. कॅफे म्हणजे एक असे ठिकाण जिथे लोक निवांत बसून गप्पा मारतात, काम करतात किंवा आरामात चांगला वेळ घालवतात.

सोबत वेगवेगळ्या प्रकारच्या कॉफी, खाणं, पेय उपलब्ध असतात. पण अशा ठिकाणी जाणे प्रत्येकालाच परवडते असे नाही. यातूनच सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडेल म्हणजेच पॉकेटफ्रेंडली असे ‘पॉकेट कॅफे’ सुरू झाले. ‘पॉकेट कॅफे’चा आनंद लहान मुले, स्त्रिया, तरुण, वयोवृद्ध सगळेच घेतात.

इथेल मुख्य आकर्षण आहे पॉकेट पिझ्झा. बाजारातील तयार बेस न वापरता तिथल्या तिथे पिठापासून तो तयार केला जातो. त्यामुळे अत्यंत रुचकर असा पिझ्झा ‘पॉकेट कॅफे’त मिळतो. याशिवाय इथला कावा. खरतर कावा म्हणजे एकाप्रकारे कोल्ड कॉफी आहे, पण इथे त्याला हे वेगळे नाव दिले आहे. हा कावाही त्यांची खासियत आहे.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आनंद हा ‘पॉकेट कॅफे’साठी महत्त्वाचा आहे. त्यामुळेच लहानातलं लहान मूल जेव्हा त्याचा वाढदिवस इथे साजरा करून आनंदी होते त्याचे समाधान अवर्णनीय आहे. इथे वेगवेगळे खेळ घेतले जातात. त्यांना अजिबात टोकले जात नाही. वयोवृद्धांचे गेट-टुगेदर, किटी पार्टी, ऑफिस मीटिंग, तरुणांचे मीटिंग पॉईंट असे अनेक इवेंट्स इथे होतात. याचा आनंद प्रत्येकजण घेतो ही समाधानाची बाब वाटते.

Smart Udyojak Business Ecosystem Popup

आज वीस जणांची टीम येथे काम करते. अनेक वेळा वेगवेगळ्या समस्या येत असतात, पण आता त्या हाताळता येऊ लागल्यात अभिमानाची गोष्ट ही की याचा कोणताही पूर्वानुभव नसतानाही खूप उत्तमरित्या रंजना, अनिता आणि परिणीता हे कॅफे चालवतायत.

रंजना सांगतात, मटेरियल सगळे कंपनीकडून येते, पण कधी काही समस्या येतात तर कधी स्टाफचा प्रॉब्लेम असतो. काही अनुभव तर असेही आलेत की कामावर आलेला एखादा स्टाफ म्हणतो की मी काम सोडून चाललोय आणि तो निघून जातो. अशा परिस्थितीत कॅफेचे सगळेच काम आमच्यावर येते.

त्या वेळी आता काय करायचे? असा प्रश्‍न पडतो. पण सुदैवाने आम्हाला कॅफेमधील सगळी काम येत असल्यामुळे आम्ही तिघी तिथे उभ्या राहिलो आणि सगळे काम संभाळले. अशा वेळी खचून न जाता खंबीरपणे प्रश्नाला भिडले पाहिजे.

फास्ट फूड म्हणजे जंक फूड याला छेद देत त्यातही सकस, पौष्टिक खाद्य देण्याचा इथे प्रयत्न असतो. हेल्थ कॉन्सिअस लोकांना डोळ्यासमोर ठेऊन अनेक पदार्थ इथे तयार केलेत. जसे ‘पणिनी’ म्हणून एक ब्रेडचे सँडविच आहे त्यामध्ये मिलेट ब्रेड येतो तोसुद्धा हेल्थ कॉन्सियस लोकांसाठी खूप चांगला आहे.

सिझल सॅलड आहे. सँडविचमध्येसुद्धा वैविध्य आहे जसे स्पिनच कॉर्न सँडविच, चीज सँडविच याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे बर्गर, सँडविचसुद्धा आहेत. म्हणूनच पिंपळे सौदागरमध्येच आता जवळपास पन्नास कॅफे आहेत, पण अव्वल आमचा कॅफे आहे, असे रंजना सांगतात.

माऊथ पब्लिसिटीच नवनवे ग्राहक इथे जोडून देते. इथे येणारा प्रत्येक ग्राहक इथल्या स्वच्छता, नीटनेटकेपणा, सर्व्हिस याने प्रभावित होतोच आणि इतरांनाही ते सांगतो. ओपन किचन असल्याने सर्व लोकांच्या समोर बनवले जाते. या सगळ्याचा चांगला प्रतिसाद मिळतो. ‘पॉकेट कॅफे’ सर्व डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर रजिस्टर आहे; जसे झोमॅटो, स्विगी आणि सोशल मीडिया, पब्लिक इव्हेंट यातून लोकांसमोर ‘पॉकेट कॅफे’ पोहचत असते.

पिंपळे सौदागर येथील ‘पॉकेट कॅफे’ने तीन वर्षात ही यशस्वी वाटचाल पूर्ण केलीय. मुख्य म्हणजे प्रत्येक वर्षी एक नवीन शाखा सुरू करू शकल्याचे समाधान या तिघींना आहे. मुळात अँडव्हान्स ऑर्थो संचेती हॉस्पिटल व सूर्या मदर केअर येथे आपली शाखा सुरू करता आली याचा त्यांना आनंद आहे.

इथे रुग्णसेवा करता येते आणि रुग्णांना हवे तसे म्हणजे त्यांना जर ऑइल-फ्री हवे असेल तर ऑइल-फ्री खाद्य बनवून दिले जाते. यापुढे भविष्यात इतर कुठेही हॉस्पिटलमध्ये संधी मिळाली तर तिथेही शाखा सुरू करण्याचा यांचा प्रयत्न आहे.

या प्रवासात कुटुंबाची खंबीर साथ त्यांना लाभलीय. विशेष म्हणजे रंजना यांचे पती संजय, अनिता यांचे पती नितीन आणि परिणीता यांचे पती समीर यांची खूप साथ लाभली. कोणतीही पार्श्वभूमी नसताना तिघींनी शून्यातून नवे विश्व निर्माण केले आहे.

संपर्क : 9881131414

Author

  • pratibha shailesh rajput

    यांनी पदव्युत्तर पत्रकारितेत पदविका केली आहे. प्रिंट माध्यमांत काही काळ काम केल्यानंतर त्यांनी स्मार्ट उद्योजक हे मासिक सुरू केले.

    View all posts

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

books for life website Ad
Click here to visit: booksforlife.in
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart Udyojak Business Ecosystem Popup
आशिष पेटे : सौरऊर्जेने ग्रामीण महाराष्ट्रात घडवलेली हरितक्रांती व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?