‘उद्योजकता विकास’ ही काळाची गरज


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


एका विद्यार्थ्याचा फोन आला की, करीयर निवडण्यासाठी सल्ला हवा आहे. या वर्षी बारावी पूर्ण होणार आहे, बारावीनंतर काय करायचे हा निर्णय घ्यायचा आहे. त्याला कायद्याचा अभ्यास किंवा इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये पदविका करायची होती. (ह्या परिस्थितीमधून बरेच उद्योजक जातात, ज्यांना व्यवसाय चालू करायचा असतो.)

मी त्याला विचारले, पदविका घेतल्यावर व्यवसाय करायचा आहे की नोकरी? व्यवसाय करायचा या निर्णयावर तो ठाम होता. मी त्याला सांगितले, जर उद्योग करायचा असेल तर प्राथमिकता: या पर्यायांचा विचार नंतर येतो. प्रथम तुला ‘उद्योजकता’ म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल.

जर तुला उद्योजकता हा विषय कळला, तर नंतर यापैकी एक विषयाची निवड तुझ्या उद्योजकीय गुणवत्तेप्रमाणे करता येईल. त्यासाठी प्रथम उद्योगजगत काय आहे आणि उद्योगजगतामधील मूळ आव्हाने काय आहेत ते समजून घेऊया.

उद्योगजगतातील आव्हाने :

जगातील (भारतातील नव्हे) उद्योजकीय यश आणि अपयशाचे सर्वेक्षण जर आपण बघितले तर उद्योजकीय यशापेक्षा अपयशाचे प्रमाण जास्त दिसून येते. याची कारणमीमांसा तज्ज्ञ बरेच वेगवेगळ्या प्रकारे करतात. जर शांतपणे विचार केला, तर याचे मूळ कारण आहे की, प्रत्येक उद्योजक एक पदवी, डिप्लोमा, प्रमाणपत्र, एखादे व्यावसायिक कौशल्य शिकून उद्योग करायला उतरतो.

उद्योग करायची कारणे वेगवेगळी असू शकतात. उदा. उद्योजक बनण्याची आवड, भरपूर पैसा कमवायचा आहे, स्वातंत्र्य, परंपरागत उद्योग, एखाद्या कौशल्यात पारंगत असणे, शिक्षण नसल्यामुळे नाइलाजास्तव किंवा नोकरी गेल्यामुळे वगैरे.

वरील प्रमाणपत्र किंवा कौशल्याशिवाय उद्योग सुरू कसा करायचा, चालवायचा कसा, टिकवायचा कसा आणि उद्योगविस्तार कसा करायचा, याचे प्रशिक्षण कुठलीच शैक्षणिक संस्था सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योजकांना देत नाही.

प्रत्येक उद्योजक या संदर्भात माहिती घेण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी प्रयत्न करतो. उदा. पुस्तके, उद्योजकीय कार्यशाळा, चर्चासत्रे, उद्योजकीय सल्लागारांची मदत वगैरे; परंतु फारच कमी प्रमाणात उद्योजक उद्योगविस्तार करताना दिसतात आणि मोठ्या प्रमाणात उद्योजक एका चक्रव्यूहामध्ये अडकलेले असतात. याचाच अर्थ उद्योजकता विकास या संदर्भात फार कमी प्रमाणात मार्ग उपलब्ध आहेत. त्यामुळे उद्योजकीय विकास ही आता प्राथमिक गरज बनलेली आहे.

उद्योगाची निवड

उद्योगाची निवड कशी करायची आणि उद्योजकीय विकास म्हणजे काय हे आपण खेळाचे उदाहरण घेऊन बघू या. प्रत्येक खेळामध्ये शिकायचे आणि खेळायचे नियम ठरलेले असतात. एका खेळाचे नियम दुसर्‍या खेळाला लागू होत नाहीत.

उदा. फुटबॉलमध्ये चेंडू पायानेच मारावा लागतो, बास्केटबॉलमध्ये चेंडू हातानेच खेळावा लागतो वगैर. असे प्रत्येक खेळ शिकायचे आणि खेळायचे नियम तयार असतात. एखाद्या मुलाला जर क्रिकेटमध्ये करीअर करायचे असेल, तर त्याला क्रिकेटच्या करीअरची पूर्ण माहिती असते की, त्याला काय आवडते.

त्याप्रमाणे तो फलंदाज होणार, गोलंदाज होणार, यष्टिरक्षक होणार की अष्टपैलू होणार याचे प्राथमिक ठोकताळे त्याला माहीत असतात. त्याप्रमाणे कोणाकडून क्रिकेट शिकायचे, त्याचे पैसे किती लागणार, क्रिकेटचे किट कुठले लागणार, प्रथम कुठल्या स्पर्धेमध्य खेळायचे, खेळपट्टीचा अभ्यास, प्रतिस्पर्धी संघाचा अभ्यास, परदेशातील प्रेक्षक आणि हवामानाचा अभ्यास, याचे त्याला २४ x ७ सातत्याने मार्गदर्शन होत असते.

क्रिकेटमध्ये करीअर कुठपर्यंत जाऊ शकते आणि करीअरमध्ये किती पैसे मिळणार याची त्याला पूर्ण कल्पना असते. त्याच्या यशामध्ये त्याच्या सभोवताली व्यावसायिक तज्ज्ञ-सल्लागारांची टीम तयार असते. उदा. फलंदाजीचा कोच, क्षेत्ररक्षणाचा कोच, फिजिओथेरपीस्ट, आहारतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ वगैरे.

शिवाय त्याचे ब्रॅण्ड म्हणून प्रमोशन करणारे वेगळे व्यावसायिक सल्लागार उपलब्ध असतात. त्याच्या अपयशामध्ये त्याला सातत्याने वरिष्ठ क्रिकेटरचे मार्गदर्शन मिळत असते. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यावरसुद्धा उत्पन्नाचे भरपूर मार्ग त्याला उपलब्ध असतात.

वरील उदाहरणाचा संदर्भ उद्योगजगताशी कसा लावता येईल हे आपण एक तक्ता अभ्यासून करू या.

एखाद्या पाककला निपुण व्यक्तीला समजा हॉटेलचा व्यवसाय करायचा असेल तर नेमके त्याच्याबाबतीत काय घडते हे बघू या. हॉटेल व्यवसायाचे उदाहरण घऊन वरील तक्ता बनवला आहे. हा तक्ता कुठल्याही सूक्ष्म, लघू किंवा मध्यम उद्योजकासाठी इतर इंडस्ट्रीसाठीपण लागू पडतो.

उद्योजकता विकास म्हणजे नेमके काय?

यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, कुठलाही व्यवसाय हा कुठलीही (पाककलेची) पदविका, प्रमाणपत्र किंवा व्यावसायिक कौशल्य शिकून सुरू होत नसतो. ते निव्वळ व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणारे साधन आहे. हे साधन म्हणजे व्यवसाय नव्हे.

व्यवसाय सुरू करणे, व्यवसाय चालवणे, व्यवसाय टिकवणे, व्यवसाय विस्तारणे या संदर्भातील कौशल्ये आणि धोरणे पूर्णत: वेगळी असतात जी फार क्वचितच शिकवली जातात. व्यवसाय टिकवणे आणि व्यवसाय विस्तारासाठी खालील गोष्टी शिकणे अनिवार्य असते.

व्यवसायाचा विस्तार एकंदरीत सहा टप्प्यांमध्ये होतो. त्यातील प्रमुख घटक पुढीलप्रमाणे आहेत. १ प्रथमत: उद्योजकीय गुणवत्ता ओळखणे २. उद्योजकीय गुणवत्ता आणि व्यावसायिक पदविकेचा मेळ घालून व्यवसाय निवडणे ३. वस्तू, सेवा निर्माण करणे व त्याची व्यवहार्यता तपासणे ४. वस्तू, सेवेमध्ये नावीन्य आणणे ५. ग्राहकांची वर्गवारी ओळखणे

६. ग्राहकाची वस्तू, सेवा खरेदीची मानसिकता ओळखणे, ७. मार्केटिंगची साधने, धोरणे आणि कौशल्ये निवडणे ८. विक्रीची साधने, धोरणे आणि कौशल्ये निवडणे ९. कर्मचारी/भागीदाराची गुणवत्ता ओळखणे १०. कर्मचार्‍याला गुणवत्तेनुसार विकसित करणे ११. व्यवसायाची प्रणाली बनवणे, ज्यामुळे तुमचा व्यवसाय तुम्हाला नफा किंवा तोटा देतो याचे गणित कळेल १२. व्यवसायाचा ब्रॅण्ड करणे, १३. व्यवसाय विस्तारणे.

गुणवत्ता म्हणजे काय?

गुणवत्ता म्हणजे आपल्या पंचेंद्रियांपैकी एका इंद्रियाचा वापर करून, आपण ज्या साधनाची (फलंदाजी, गोलंदाजी) निवड केलेली आहे, त्याचा सातत्याने सराव करून त्यात प्रावीण्य मिळवणे. उदा. चित्रकार डोळे या इंद्रियांचा वापर करून चित्रकार म्हणून प्रावीण्य मिळवतो. संगीतकार, गायक श्रवणेंद्रियाचा वापर करून संगीत क्षेत्रात प्रावीण्य मिळवतात.

शेफ रसेंद्रियाचा वापर करून पाककला क्षेत्रात प्रावीण्य मिळवतात. वैद्य स्पर्शज्ञान कौशल्याचा वापर करून निदान करण्यात वैद्यकीय क्षेत्रात प्रावीण्य मिळवतात. तुमच्या लक्षात आलेच असेल की, तुमच्याकडे प्रथम पदविका, व्यावसायिक तंत्र येते, नंतर तुमच्या इंद्रियांचा वापर करून त्यात प्रावीण्य मिळवता येते.

उद्योजकीय गुणवत्ता म्हणजे काय?

वरील हॉटेलच्या उदाहरणामध्ये आपण कूक, शेफ व्हायचे, कुकरी शो करायचे, हॉटेल उघडायचे, फ्रँचायजी विकणे, ऑनलाइन अन्न विकायचे वगैरे असे विभाग बघितले. असे आठ विभाग असतात, ज्यात तुम्ही हॉटेल व्यवसाय करू शकता. तुमच्या विकसित झालेल्या इंद्रियांप्रमाणे तुम्ही आठपैकी एक विभाग निवडून त्यात प्रावीण्य मिळवू शकता.

वरील खेळाच्या उदाहरणामध्ये आपण बघितले, प्रत्येक खेळ शिकायचे आणि खेळायचे नियम वेगळे असतात, त्याचप्रमाणे एकाच हॉटेल इंडस्ट्रीमध्ये या आठ गुणवत्तेप्रमाणे उद्योग करायची धोरणे, साधने, कौशल्ये, लागणारे भागीदार, कर्मचारी वेगवेगळे असतात.

उद्योजकीय गुणवत्ता विकास आणि त्याचे फायदे

जर तुम्हाला तुमची उद्योजकीय गुणवत्ता कळली आणि त्याप्रमाणे व्यवसायाचे वरील टप्पे आत्मसात करता आले तर सध्याच्या कोरोना महामारीचा काळ, राजकीय निर्णयांमुळे व्यवसायावर होणारे बदल, माहिती आणि तंत्रज्ञानामुळे व्यवसायात होणारे बदल, जागतिक आर्थिक पेचप्रसंगामुळे व्यवसायात होणारे बदल या काळामध्ये तुम्हाला तुमचा व्यवसाय टिकत नाही.

या काळामध्ये तुमचा पैसा, यश, प्रसिद्धी तुमच्याकडून निघून जाईल; परंतु तुमची उद्योजकीय गुणवत्ता तुमच्याकडेच असेल. ज्यामुळे तुम्हाला परत गरुडभरारी घेता येईल.

– नितीन साळकर
९३२१८९७९४१

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?