उद्योजकता; एक आव्हान

खरंतर उद्योजक व्हावं, आपला स्वत:चा स्वतंत्र उद्योग सुरू करावा असं प्रत्येकालाच वाटत असतं. पण सुरुवात कुठून करावी? उद्योग जगतात प्रवेश करण्यासाठी काय काय करायला हवं? कोण-कोणत्या गोष्टींची आवश्यकता असेल? आपल्याला जमेल का? भांडवल कसं उभं करायचं? आणि जर एवढ्या सर्व गोष्टी करूनही अपयश आलं तर? अशा अनेक शंका कुशंका प्रत्येकाच्या मनात असतात.

आज मराठी उद्योजक विशेषत: युवा पिढी या सर्व शंकांवर मात करून उद्योजकीय आव्हान पेलण्यासाठी पुढे सरसावतेय हा बदल स्वागतार्ह आहे. पहिल्या पिढीच्या उद्योजकाला नेहमीच अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं. अनुभव, पैसा, वेळ आणि विश्वास या महत्त्वाच्या तीन आघाड्यांवर त्याला सतत झगडावं लागतं. अत्यंत कठीण परिस्थितीतसुद्धा थंड डोक्याने, खचून न जाता निर्णय घेणं गरजेचं असतं.

आपल्या लक्ष्यापासून स्वत:ला ढळू देणं म्हणजे तोल जाणं असतं त्यामुळे तोल गेला की डोकं फुटणारच. ही तारेवरची कसरत त्याला सतत करावीच लागते. पण जो या सर्व काळात हिमालयासारखा टिकून राहतो तो यशस्वी उद्योजक म्हणून आपली वाटचाल हळूहळू ‘सुरू’ करत असतो. ही त्याची ‘सकारात्मक सुरुवात’ असते. उद्योजक म्हणून आपला स्वत:चा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने या गोष्टींचा नेहमी अभ्यास करावा.

आपल्याला जे क्षेत्र निवडायचं आहे, जो उद्योग सुरू करायचा आहे त्याची प्राथमिक माहिती घेऊन पूर्ण अभ्यास करून त्या क्षेत्रातील काही उद्योगांना भेट देऊन अथवा उद्योजकांचे मार्गदर्शन घेऊन आपल्या उद्योगाला सुरुवात करावी. ज्यामुळे उमेदीच्या काळात होणाऱ्या चुका ह्या काही अंशी तरी नक्कीच कमी होऊ शकतात. वेगवेगळ्या संकल्पना, कल्पना यांचा आपल्या व्यवसायात सतत वापर करून पाहावा.

कोणत्याही व्यवसायात जादूची कांडी फिरवल्याप्रमाणे यश मिळत नाही हे प्रत्येक नवउद्योजकाने लक्षात ठेवणं गरजेचे असते. आपल्याकडे म्हण आहे, ‘‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.’’ कोणताही उद्योग पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला अशी फार मोजकी उदाहरणं असतील. उद्योगांचा इतिहास पाहिला तर  आपल्याला ते जाणवते.

उद्योजकासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता असते असे प्रश्नही अनेकांना असतात. सगळ्यात महत्त्वाचा असतो आत्मविश्वास. मन आणि बुद्धी यांची सांगड घालायला ज्याला जमते तो माणूस उद्योजक म्हणून स्वत:चं अढळ स्थान निर्माण करतो. निरिक्षण क्षमता, अचूक आणि योग्य निर्णय क्षमता हे प्रत्येक उद्योजकाचं खरं भांडवल असतं. उद्योजकांने प्रयोगशील असणे खूप महत्त्वाचे असते.

प्रत्येक उद्योजकाकडे माणसं जोडण्याचं कसबही असावं लागतं. खरंतर तुम्ही म्हणाला, हे सर्व प्रत्येकाकडे असेलच असे नाही मग त्याने काय करावं? पण तुमचं म्हणणंही खरं आहे कारण प्रत्येकाकडे प्रत्येक गोष्ट असेलच असे नाही म्हणूनच आपल्याला काही गोष्टी शिकाव्या लागतील, त्यासाठी वेळ द्यावा लागेल आणि आपल्या चूका सुधारण्याची आणि इतरांचे ऐकण्याची सुद्धा सवय करावी लागेल.

ज्याला हे जमेल त्याच्यासोबत आपोआप माणसं जोडली जातील आणि माणसं जोडली गेली की आपलं स्वत:च नेटवर्क तयार होतं. प्रत्येक उद्योगाला त्याचं स्वत:चं नेटवर्क असणं फारच आवश्यक असतं आणि ते हळूहळूच तयार होऊ शकतं. उद्योग ही एक सांघिक कार्यपद्धती आहे. त्यामुळे स्वत:सोबत माणसं जोडतं गेलं की आपोआप उद्योग उभा राहत जातो. गरज असते एका अढळ आणि निश्चित सुरुवातीची.

– शैलेश राजपूत

Author

  • शैलेश राजपूत

    शैलेश राजपूत हे 'स्मार्ट उद्योजक' मासिकाचे संपादक आहेत. पत्रकारितेचं शिक्षण झाल्यावर त्यांनी २००७ साली पत्रकारिता क्षेत्रात काम करायला सुरुवात केली. २०१० साली त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला.

    व्यवसाय करताना त्यांना ज्या अडचणींना सामना करावा लागला त्याच अडचणी पहिल्या पिढीतील प्रत्येक मराठी उद्योजकाला येत असणार असा विचार करून यावर उपाय म्हणून त्यांनी २०१४ साली उद्योजक.ऑर्ग हे वेबपोर्टल सुरू केले व २०१५ साली स्मार्ट उद्योजक मासिक सुरू केले.

    संपर्क : ९७७३३०१२९२

    View all posts
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?