स्वत:च्या उद्योगाकडे अर्थव्यवस्था म्हणून पाहा

हा विषय बराच ठिकाणी बर्‍याच वेळेला चर्चिला गेलेला आहे. त्यामुळे विषय म्हणून यात फार काही नावीन्य नाही हे मी आधीच सांगू इच्छितो. मग मी हे का लिहितोय आणि तुम्ही हे का वाचावं? याच सोपं उत्तर म्हणजे या लेखमालेत संधी कशा शोधल्या गेल्या किंवा त्यातून उद्योग कसे निर्माण झाले याविषयी मांडणी केलेली असेल.

जेव्हा मी ‘उद्योग’ हा शब्द वापरतो तेव्हा अगदी महिन्याला काही हजार उलाढाल असलेल्या उद्योगांपासून काही शे-कोटी उलाढाल असलेल्या सगळ्या उद्योगांविषयी मी बोलतो आहे याची कृपया नोंद घावी. ही लेखमाला उद्योजकांची यशोगाथा सांगण्यापेक्षा आधी त्यात असलेल्या संधी शोधण्याविषयी आणि नंतर अर्थात त्याच्या आर्थिक गणिताविषयीसुद्धा भाष्य करणारी असेल. विषय आहे ‘उद्योजक आणि अर्थव्यवस्था’…

अर्थव्यवस्था आणि अर्थशास्त्र या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. अर्थशास्त्र हा थोडा किचकट विषय आहे. अर्थव्यवस्था हा विषय समजायला थोडा कठीण असला तरी लवकर समजू शकतो, कारण उद्योजक म्हणून आपण एक अर्थव्यवस्था चालवत असतो.

व्यावहारिक वापरातल्या भाषेत सांगायचं तर अर्थव्यवस्था म्हणजे इकॉनोमी आणि अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स. आपण इकोनॉमिक्सविषयी फारसं बोलणार नाही, अर्थात विषय आल्यास त्यावर थोडस भाष्य करूच. पण मुख्यत: आपण इकॉनोमी म्हणजे अर्थव्यवस्थेविषयी बोलणार आहोत.

पुणे जिल्ह्यातील देहू गावातून सुरू होणारी वारी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या तीर्थक्षेत्री संपन्न होते. पुणे-सासवड-जेजुरी-वाल्हे-लोणंद-फलटण-माळशिरस आणि पंढरपूर या मार्गाने ही वारी मार्गक्रमण करते. कोविड काळात दोन वर्षात निर्बंध असल्यामुळे वारी झालेली नाही. ज्येष्ठ वद्य सप्तमी ते आषाढ शुद्ध दशमी म्हणजे साधारण १७-१८ दिवसांच्या आसपास हा सर्व प्रवास अखंड सुरू असतो. काही लाख विठ्ठलभक्त हा पूर्ण प्रवास करतात.

इकडे विषय येतो अर्थव्यवस्थेचा अठरा दिवसात साधारणता लाख लोक जेव्हा एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जातात (आणि परत येतात) तेव्हा त्यांच्या अनेक गरजा या वाटेवर भागवल्या जातात. यासाठी बर्‍याच वेळेला सेवा दिली जाते; म्हणजे वारकर्‍यांकडून कोणताही आर्थिक मोबदला घेतला जात नाही.

पण पैसा खर्च होत नाही का? नक्कीच होतो. सेवेकरी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून वारकर्‍यांसाठी सकाळच्या पहिल्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत प्रत्येक व्यवस्था करत असतात आणि यामध्ये प्रचंड आर्थिक उलाढाल होत असते.

आषाढी आणि कार्तिकी या दोन होणार्‍या वारी या पंढरपूरच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. मागच्या दोन वर्षात एकंदरीत आर्थिक गणित कशी बिघडली आहेत हे आपण पाहतोच आहोत. पंढरपूरला वर्षभर भक्तांची रीघ चालू असते, पण आषाढी आणि कार्तिकी एकादशी या दोन्ही दिवसांच्या आसपास साधारण लाख लोकांच्या आसपास भाविक पंढरपुरात दाखल होतात.

आषाढी-कार्तिकी हा भक्तीसोहळाच. त्यामुळे परत घरी जाताना रिकाम्या हाताने कसं जायचं, जाताना प्रत्येक भक्त काही ना काहीतरी प्रसाद घेऊन जातो, आपल्या मुलांसाठी, घरच्यांसाठी, मित्र, नातेवाईक मंडळींसाठी पंढरपुरातून काहीतरी वस्तू किंवा इतर खाऊ घेऊन जातो.

अगदी विठ्ठल रखुमाईचे फोटो, त्यांच्या छोट्या मुर्त्या, त्याचे ध्वज, हळद, कुंकू, चंदन या आणि अशा कित्येक गोष्टींची विक्री सातत्याने होत असते आणि पर्यायाने ही अर्थव्यवस्थेला हातभार लावत असते. उद्योजकाकडून आपल्याला या संपूर्ण भक्तीसोहळ्याकडे दोन दृष्टीने बघायचे आहे. पहिली अर्थात तिथे होणारी आर्थिक उलाढाल आणि त्यात असलेल्या संधी.

अनेक ज्येष्ठ नागरिकांना वारी करायची इच्छा असते, परंतु फार काळ काही चालणे त्यांना शक्य नसते. अशा वेळेस एखादी गाडी घेऊन एखादा दिवस ते वारीसोबत प्रवास करतात आणि आपली भक्ती विठ्ठलचरणी रुजू करतात. असे अनेक मंडळी आहेत की जे वारीसोबत असे लहानमोठे प्रवास करत असतात.

इथे एक संधी निर्माण झालेली असते. फक्त भाड्याने गाडी देणे एवढाच विषय नाही तर त्यांना लागणार्‍या सर्व सोयी उपलब्ध करून देणे किंवा जर सामान्य किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी एक दिवसाची वारी अशी एखादी सेवा सुरू करता आली तर नवीन उद्योग सुरू होऊ शकतो. अशा अनेक संधी या संपूर्ण वारीत शोधता येऊ शकतात.

दुसरी दृष्टी अर्थात स्वत:च्या उद्योगाकडे अर्थव्यवस्था म्हणून पाहणे. आपण एका मोठ्या अर्थव्यवस्थेचे छोटे भाग आहोत आणि त्यातल्या काही तरी भागाची गरज आपण पूर्ण करत आहोत या दृष्टीने आपल्या वस्तू किंवा आपली सेवा नक्की कोणाला हवी आहे याचा एक वेगळा अभ्यास करता येऊ शकतो.

– सीए तेजस पाध्ये
(लेखक मुंबईस्थित सनदी लेखापाल आहेत)
संपर्क : 9820200964


Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?