गुणवत्तावाढीसाठी ‘ही’ जपानी तंत्रे वापरणे गरजेचे

‘मेक इन इंडिया’ या मोहिमेअंतर्गत अनेक नवीन कारखाने भारतात उभारून त्यायोगे अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी नवीन अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून वस्तूंची निर्मिती केली जाईल. त्यासाठी लागणारे कुशल कामगार तयार करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवले जात आहेत. हे कारखाने यशस्वीपणे चालवायचे असतील तर पुढील सूत्र जोपासणे महत्त्वाचे आहे.

ग्राहकाला उत्तम गुणवत्ता असलेल्या वस्तू किंवा सेवा वाजवी किमतीत जेव्हा त्याला गरज असेल तेव्हा, गरजेइतक्या संख्येत पुरवल्या पाहिजेत. हे सूत्र यशस्वीपणे वापरून ग्राहकाला समाधानी ठेवायचे असेल तर खालील तीन गोष्टी करणे गरजेचे आहे.

  • पाच ‘एस’ कार्यप्रणाली
  • (मुदा) अपव्यय टाळणे – माणसे व साधनसामग्रीचा
  • प्रमाणीकरण

वर उल्लेख केलेली तीन ‘जपानी’ व्यवस्थापन तंत्रे आहेत. वरील तंत्रे समजून घेण्यापूर्वी काही जपानी संकल्पनांचा आढावा घेणे गरजेचे आहे.

भारत आणि जपान हे आशिया खंडातील दोन प्रमुख देश. दुसर्‍या महायुद्धामध्ये दोन अणुबाँब पडल्याने जपान बेचिराख झाला, तर १९४७ मध्ये भारत देश स्वतंत्र झाला. ब्रिटिशांनी शिक्षण व्यवस्था, कायदे व वाहतुकीचे मार्ग निर्माण करून ठेवले होते, तर अनेक कारखानेसुद्धा चालू झाले होते.

त्याउलट जपानमध्ये सर्वच उद्ध्वस्त झाले होते. परंतु जपानने पुढील चाळीस वर्षांत आर्थिक महासत्ता बनण्यापर्यंत मजल मारली ती जपानी उद्योजकांच्या उद्योजकवृत्ती आणि जपानी कामगारांच्या दर्जेदार उत्पादन कौशल्यामुळे. १९५० मध्ये डॉ. डेमिंग या अमेरिकन संख्याशास्त्रज्ञाने ‘काईझेन’ तत्त्वप्रणाली जगाला शिकवली.

‘कायझेन’ म्हणजे काय?

हा जपानी शब्द आहे. याचा सरळ सोपा अर्थ म्हणजे चांगल्यासाठी केलेला बदल. इंग्रजीमध्ये सांगायचे झाले तर Change for the Better. कामाच्या जागी, सार्वजनिक ठिकाणी सातत्याने सुधारणा करणे म्हणजे Continuous Improvement.

सद्य:स्थितीचा आहे तसा स्वीकार न करता त्यात काही सुधारणा करता येईल का याचा विचार करणे म्हणजेच ‘कायझेन’. असे करण्यासाठी खूप गुंतवणूक (खर्च) करावा लागत नाही. आपल्या दैनंदिन कामात छोट्या छोट्या सुधारणा करून फार मोठा परिणाम कालांतराने घडवता येतो. आपले काम फार खर्च न करता सोपे करू शकतो.

कायझेन’विषयी अधिक वाचा : https://udyojak.org/kaizen-process/

पाच ‘एस’ कार्यप्रणाली (Five S)

१९७० च्या दशकात जपानने औद्योगिक क्षेत्रात जोरदार मुसंडी मारली ती पाच ‘एस’सारख्या कार्यप्रणालीचा वापर करूनच. इंग्रजीतील ‘एस’ अक्षरापासून सुरुवात होणारी पाच तंत्रे खालीलप्रमाणे आहेत.

  • Sort (वर्गीकरण)
  • Systematic Arrangement (सुव्यवस्था)
  • Shine (सफाई आणि स्वच्छता)
  • Standardise (प्रमाणीकरण)
  • Self discipline (स्वयंशिस्त)

वरील तंत्रांचा उपयोग फक्त कारखान्यात नाही तर आपल्या घरामध्ये, ऑफिसमध्ये सहजपणे करता येतो.

१. Sort (वर्गीकरण) : अनावश्यक वस्तू काढून टाका. आपल्या कामाच्या ठिकाणी ज्या गोष्टींची गरज नाही अशा वस्तू आहेत का याचा शोध घ्या. ऑफिसमधील टेबल, खुर्च्या, उपकरणे, दस्तऐवज सर्व तपासून पाहा.

गरज नसलेल्या गोष्टी वेगळ्या काढा व त्या काढून टाका. सतत वापरात येणार्‍या वस्तू वेगळ्या काढा. सतत वापरात नसलेल्या, परंतु आवश्यक वस्तू वेगळ्या ठेवा. खराब झालेल्या वस्तू, तुटलेली अवजारे, जुनेपुराणे झालेले कागद, फाइल्स, जुने फर्निचर अशा अनावश्यक गोष्टी काढून टाका.

वर्गीकरणाचे फायदे

  • अव्यवस्था दूर होऊन कामाच्या ठिकाणी सुनियोजितता येते.
  • कामासाठी जास्त जागा उपलब्ध होते.
  • अनावश्यक गोष्टींचा संचय होणार नाही.

२. Systematic Arrangement (सुव्यवस्था) : प्रत्येक वस्तूसाठी विशिष्ट जागा निश्‍चित करा आणि प्रत्येक वस्तू आपल्या विशिष्ट जागी ठेवा. उपलब्ध साधनसामग्रीची व्यवस्थित मांडणी करणे, ज्यायोगे हवी असलेली वस्तू पटकन मिळेल. प्रत्येक वस्तूला नावाचे लेबल लावा किंवा ओळखण्यासाठी मार्किंग करा. वस्तू ठेवण्यासाठी ठरावीक रॅक किंवा स्टँडचा वापर करा. किती वस्तूंचा साठा करावयाचा आहे त्याचे कोष्टक तयार करून सुरक्षितपणे स्टँडमध्ये लावून ठेवा.

वर्गीकरणाचे फायदे

  • पाहिजे ती वस्तू शोधण्यामध्ये वेळ न जाता ती ताबडतोब उपलब्ध होईल.
  • वस्तूंचा साठा सुरक्षितपणे झाल्याने त्यांची गुणवत्ता कायम रहाण्यास मदत होईल.
  • वस्तू पडून किंवा घसरून पडण्याची शक्यता कमी होईल.
  • वस्तू काढण्यासाठी अनावश्यक हालचाली कराव्या लागणार नाहीत.

घरातील सुव्यवस्था

आपल्या घरातील सुव्यवस्था सर्वसाधारणपणे स्वयंपाकघरात पाहायला मिळते. स्वयंपाकासाठी लागणार्‍या गोष्टींची मांडणी अतिशय सुव्यवस्थितपणे केलेली असते.

३. Shine (सफाई आणि स्वच्छता): आपली कामाची जागा, सभोवतालचा परिसर नेहमी स्वच्छ, धूळविरहित असला पाहिजे. त्यामुळे मन प्रसन्‍न राहून कामावर चांगला परिणाम होतो. कामाच्या ठिकाणी असलेल्या वस्तू, यंत्रे व उपकरणे यांना गंज न चढता ती चांगल्या अवस्थेत राहतात.

त्यांचा वापर जास्त कालावधीसाठी करता येतो. वेळच्या वेळी केलेल्या सफाईने वस्तूंचे आयुष्य वाढते. आपले टेबल, कामाची जागा, काम सुरू करताना आणि काम संपवताना पुन्हा साफ करण्याची सवय ठेवा.

स्वच्छतेचे फायदे

  • कामाची जागा आदर्श बनते व त्यामुळे आपले व्यक्तित्वसुद्धा नीटनेटके व प्रसन्‍न बनते.
  • साफसफाई करताना यंत्रामधील दोष लक्षात येतात व त्यावर कारवाई करता येते.

४. Standardise (प्रमाणीकरण) : एखाद्या क्रियेचे प्रमाणीकरण नसेल तर त्याचे नीट मोजमाप करता येणार नाही. मोजमाप नाही तर त्या क्रियेला सर्वांसारख्या पद्धतीने कसे करावे हे योग्य रीतीने समजून घेता येणार नाही. जर ती क्रिया सर्वांना समजली नाही तर त्या क्रियेवर नियंत्रण ठेवता येणार नाही व त्यामध्ये सुधारणा करता येणार नाही.

  • महत्त्वाच्या सर्व क्रियांचे प्रमाणीकरण करून घ्या.
  • वरील तीन एसच्या बाबतीत उच्च दर्जाचे प्रमाणीकरण करा.
  • कार्यस्थळी प्रत्येक गोष्ट नीटनेटकी, सुव्यवस्थित व सूत्रबद्ध हवी.
  • प्रत्येक गोष्ट तिच्या निर्देशित स्थळी असावयास हवी.

५. Self discipline (स्वयंशिस्त) : प्रत्येक कर्मचार्‍याने न सांगता, स्वत:हून वरील चार एसचे योग्य रीतीने व सातत्याने पालन केले पाहिजे. तसेच सतत निरीक्षण व तपासणी करणे, त्यासाठी शिस्तबद्ध आचरण व सातत्याने प्रशिक्षण यांचा मिलाफ साधत रहाणे. प्रत्येक कर्मचार्‍याला दिले जाणारे प्रशिक्षण हे नेमक्या ध्येयांवर आधारित असावे व प्रशिक्षणाचा पडताळा दर महिन्याला घेतला जावा.

फायदे

  • चांगल्या सवयींचा विकास होतो.
  • पाच ‘एस’साठी सांघिक भावना निर्माण होते.
  • पाच ‘एस’साठी स्वमूल्यांकन करण्याची सवय होते.
  • पाच ‘एस’ची तंत्रे उपयोगात आणण्यासाठी इतर कर्मचार्‍यांना प्रोत्साहित करण्याची सवय लागते.

मुदा : अपव्यय टाळणे

‘मुदा’ म्हणजे अशी क्रिया किंवा वस्तू ज्याच्यामुळे कोणतेही मूल्य वाढत नाही. मुदा म्हणजे ज्याच्यातून ग्राहकाचा काहीही फायदा होत नाही. ‘मुदा’ दोन प्रकारचे असतात.

  • अशा क्रिया किंवा वस्तू ज्यांच्यामुळे उत्पादन वा सेवेचे महत्त्व वा फायदा वाढत नाही, परंतु किंमत वाढते.
  • अशा अनावश्यक कृती ज्या वगळल्या तरी फरक पडत नाही.

एकंदरीत सात प्रकारचे ‘मुदा’ असतात.

  • गरजेपेक्षा जास्त उत्पादन करणे.
  • हालचाल (यंत्र व माणसांची)
  • वस्तू व माणसे यांच्यासाठी केलेली वाहतूक व्यवस्था
  • दोष किंवा उणीव (उत्पादित वस्तूंमधील)
  • न वापरलेली गुणवत्ता
  • वस्तूसाठा (Inventory)
  • अतिरिक्त प्रक्रिया

१) गरजेपेक्षा जास्त उत्पादन : मागणीपेक्षा जास्त उत्पादन जेव्हा कारखान्यामध्ये केले जाते तो अपव्ययाचा सर्वात मोठा प्रकार ठरतो. गरजेपेक्षा जास्त उत्पादन झाल्यामुळे वस्तुसाठा वाढतो, यंत्रांची हालचाल जास्त होते, वाहतूक व्यवस्थेवर अतिरिक्त ताण येतो व उत्पादित वस्तूमध्ये जर दोष असतील तर ते झाकले जायची शक्यता असते. साठवून ठेवलेल्या वस्तूंसाठी जास्त जागा व्यापली जाते.

२) हालचाल (यंत्र व माणसांची) : यंत्रावर काम करताना कामगाराला किती हालचाल करावी लागते व त्यामुळे त्याचा किती वेळ वाया जातो हे पाहणे गरजेचे आहे. कच्चा माल घेण्यासाठी करण्यात येणारी हालचाल तसेच त्याला लागणारा वेळ व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लागणारा वेळ ह्या दोन्ही गोष्टींचे निरीक्षण करणे गरजेचे आहे.

हा वेळेचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे. संपूर्ण उत्पादन प्रक्रियेमध्ये एका मशीनवरून दुसर्‍या मशीनवर पाठवण्यामध्ये किती अनावश्यक हालचाली होतात ते नोंद करून त्यावर उपाय केले पाहिजे.

३) वस्तू व माणसे यांच्यासाठी केलेली वाहतूक व्यवस्था : कारखान्यामध्ये वस्तू व साधने यांची वाहतूक विविध प्रकारे केली जाते. त्या वाहतूक व्यवस्थेचे निरीक्षण केले असता किती अनावश्यक हालचाली होतात याची नोंद करता येते. त्याचबरोबर माणसांची वाहतूक व्यवस्था कशी आहे त्यावर अनावश्यक खर्च होतो का ते पाहणे गरजेचे आहे. हा अपव्यय टाळण्यासाठी पाच ‘एस’ कार्यप्रणालीचा वापर करता येईल.

४) दोष किंवा उणीव (उत्पादित वस्तूंमधील) : कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनानंतर जर काही दोष किंवा उणीव राहिली तर वेळ, श्रम व पैसे यांचा प्रचंड अपव्यय होतो. उत्पादन किंवा सेवा पुरवताना विविध टप्प्यांवर गुणवत्ता तपासली जाते. त्या तपासणीमध्ये जर दोष आढळला तर त्या वस्तू उत्पादन प्रक्रियेतून बाजूला काढल्या जातात.

त्या दुरुस्त करण्यामध्ये अतिरिक्त वेळ व पैसा खर्च होतो. हा अपव्यय टाळण्यासाठी प्रमाणीकरण केलेल्या क्रिया वापरणे गरजेचे असते. ज्या कंपन्या सेवा पुरवतात त्यांना तर पुरवठ्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर गुणवत्ता नियंत्रण करावे लागते. दोष किंवा उणीवमुक्त सेवा कशी पुरवता येईल यासाठी प्रमाणित प्रक्रिया तयार करून ती सर्वांना दिसेल अशा तर्‍हेने भिंतीवर किंवा टेबलावर लावावी लागते.

५) न वापरलेली गुणवत्ता : कारखान्यात काम करणारे कामगार व कर्मचारी यांची विविध कौशल्ये व त्यांचे ज्ञान याचा योग्य वापर झाला नाही तर तो सर्वात मोठा अपव्यय ठरतो. यासाठी विविध कंपन्यांमध्ये विविध चर्चासत्रे व कौशल्य विकास कार्यक्रम राबवले जातात, योग्य प्रशिक्षण दिले जाते. कामगारांचे ज्ञान व सर्जनशीलतेचा विकास होऊन त्याचा उपयोग कंपनीसाठी होतो. त्यासाठी ‘क्वालिटी सर्कल’ व पाच ‘एस’ कार्यप्रणालीचा वापर प्रभावीपणे करता येतो.

६) वस्तुसाठा (Inventory) : वस्तुसाठा हा तीन प्रकारचा असतो. कच्चा माल, अर्धवट प्रक्रिया केलेला माल व तयार झालेला पक्का माल. योग्य प्रकारे नियोजन न केल्यास वस्तुसाठाच सर्वात मोठा अपव्ययाचा प्रकार ठरू शकतो. गरजेपेक्षा जास्त कच्चा माल खरेदी केला तर त्यासाठी जास्त जागा लागते. त्याचे पक्क्या मालात रूपांतर होईपर्यंत त्यामध्ये पैसे गुंतवलेले असतात.

माल साठवण्यासाठी सदोष पद्धत वापरली तरी नुकसान होण्याची शक्यता असते. तयार झालेल्या वस्तूंसाठी जर बाजारपेठ (मागणी) नसेल तर त्यामध्ये पैसे अडकून पडतात व कंपनी चालवण्यासाठी लागणारे खेळते भांडवल उभे करण्यासाठी अडचणी येऊ शकतात.

हा अपव्यय टाळण्यासाठी ‘वस्तुसाठा’ नियंत्रण करण्यासाठी विविध तंत्रांचा वापर करणे तसेच उत्पादनाच्या लहान बॅचेस घेणे असे उपाय करावे लागतात.

७) अतिरिक्‍त प्रक्रिया : अशा प्रक्रिया की, ज्यामुळे ग्राहकाचा काहीही फायदा होत नाही, तर त्यामुळे मोठा अपव्यय होतो. उत्पादन केलेल्या वस्तूंमध्ये दोष आढळल्यास ते दूर करण्यासाठी पुन्हा प्रक्रिया (Rework) करावी लागते. तसेच तयार झालेल्या वस्तू गोदामामध्ये हलवण्यासाठी वाहतूक व्यवस्था यांचा अतिरिक्त प्रक्रियांमध्ये अंतर्भाव होतो. काही वेळा गुणवत्ता नियंत्रण करण्यासाठी अतिरिक्‍त मनुष्यबळ व वेळ खर्च होतो.

अतिरिक्त प्रक्रियांमुळे होणारा अपव्यय टाळण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धतीचा वापर व पाच ‘एस’ कार्यप्रणालीचा वापर योग्य पद्धतीने करावा.

प्रमाणीकरण

प्रत्यक्ष काम करताना अनेक क्रिया केल्या जातात. हे काम पूर्ण करण्यासाठी एक सोपी, शास्त्रोक्त व बिनधोक अशी पद्धत तयार करणे म्हणजेच प्रमाणीकरण. हे प्रमाणीकरण कसे करायचे ते पाहू या

  • कारखाना असो वा कार्यालय, एखादे काम पूर्ण करण्यासाठी कामगारांचा अनुभव, त्यांचे त्याविषयीचे ज्ञान वापरून कार्यपद्धती तयार करण्यात येते.
  • ती कार्यपद्धती लिखित स्वरूपात कामाच्या ठिकाणी सर्वांना दिसेल अशा स्वरूपात लावण्यात येते.
  • त्यामुळे नवीन कामगाराला किंवा कर्मचार्‍याला कार्यपद्धती सहजपणे समजते.
  • केलेल्या कामाचे मूल्यमापन करणे सहज शक्य होते.
  • कारण आणि परिणाम यांचा परस्परसंबंध जोडता येतो.
  • कार्यपद्धतीमध्ये सुधारणा घडवण्यासाठी प्रमाणित पद्धतीचा वापर करता येतो.
  • त्यामुळे उद्दिष्ट ठरवता येते व त्याची पूर्तता कशी करायची त्याची आखणी करता येते.
  • प्रशिक्षणासाठी उपयोग करता येतो.
  • त्याचा परीक्षण व चिकित्सेसाठी वापर करता येतो.
  • कामाच्या ठिकाणी होणार्‍या चुका टाळण्यासाठी व तफावत कमी करण्यासाठी उपयोग होतो.

उत्तम गुणवत्ता राखण्यासाठी प्रमाणीकरण करणे हे अत्यंत गरजेचे आहे. प्रमाणित पद्धत वापरून तयार केलेली वस्तू अथवा त्यानुसार पुरवलेली सेवा ही नेहमीच उत्तम दर्जाची असते.

एस-डी-सी-ए चक्र

  • एस : स्टँडर्डप्रमाणे प्रमाणित करा.
  • डी : डू म्हणजे अंमलबजावणी करा.
  • सी : चेक तपासणी करा.
  • ए : अ‍ॅक्ट म्हणजे त्यानुसार पुढील कारवाई करा.

या चक्राचा वापर केल्यामुळे गुणवत्तेची व उत्पादकतेची पातळी घसरत नाही. यापुढे जाऊन प्रमाणित कार्यपद्धतीला आव्हान दिले तर सुधारणा करण्यास वाव असतो. त्याचा उपयोग गुणवत्ता सुधारण्यास व उत्पादकता वाढवण्यास होतो.

पी-डी-सी-ए चक्र

  • पी : प्लॅन, कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याची योजना तयार करणे.
  • डी : डू, त्याची अंमलबजावणी करणे.
  • सी : चेक, नवीन कार्यपद्धतीची तपासणी करणे.
  • ए : अ‍ॅक्ट, त्यानुसार पुढील कार्यवाही करणे.

ज्या ज्या वेळेस सदोष वस्तूंची निर्मिती होते आणि ग्राहक असमाधानी होतो, त्या वेळेस मूळ कारणाचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करावी. त्यानुसार कार्यपद्धतीमध्ये बदल करावा. पुन्हा एस-डी-सी-ए चक्राचा वापर करावा.

– संजय चितळे
srchitale1959@gmail.com
९८१९१९१४७९
(लेखक उत्पादकता सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.)

Author

तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ भरून 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद व्हा आणि अनेक लाभ मिळवा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?