प्रत्येक इंजिनीअरिंगचा विद्यार्थी होऊ शकतो उद्योजक


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


केंद्र व राज्य सरकारच्या खुल्या पद्धतीने इंजीनिअरिंग कॉलेजेसना परवानगी दिल्यामुळे भारतभर गरजेपेक्षा जास्त कॉलेजेस गेल्या दहा वर्षांत सुरू झाली; पण बर्‍याच संस्थांनी आपला शैक्षणिक दर्जा ठेवला नाही. केंद्र सरकारच्या अहवालानुसार फक्त सात टक्के इंजिनीअरच नोकरी मिळण्यास लायक आहेत, म्हणजे बाहेर पडणार्‍या 93 टक्के इंजिनीअरिंग विद्यार्थ्यांना नोकर्‍या मिळणार नाहीत.

काही दिवसांपूर्वी ‘आयआयटी’च्या दीक्षान्त समारंभात टाटा कन्सल्टन्सीचे सीईओ यांनी यंत्रशिक्षणाचा अभ्यासक्रमच कालबाह्य असल्याचे सांगितले. जसे तारीख संपलेल्या गोळ्या घेतल्याने रुग्ण दगावतो तसेच कालबाह्य अभ्यास करून विद्यार्थ्यांचे करीअर दगावत आहे.

एक इंजिनीअरिंग पदवी घेण्यासाठी वर्षाला एक ते दीड लाख खर्च येतो. चार वर्षांत पालकांचे पाच-सात लाख रुपये खर्च होतात. महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्याच्या ठिकाणी नोकरी मिळेल अशी इंडस्ट्री नाही, त्यामुळे मुले मुंबई, पुणे, बंगळुरू, हैदराबादला जातात. प्रत्येक वर्षी १ लाख ७५ हजार इंजिनीअरिंग झालेली मुले नोकरीच्या शोधात बाहेर पडतात.

कंपन्यांना अनुभवी माणसे पाहिजेत. कालबाह्य अभ्यासक्रम, इंडस्ट्रीचा व कॉलेजला थेट संबंध नसल्यामुळे इंडस्ट्रीला नेमके काय पाहिजे हे माहीतच नसते. इंडस्ट्री व शिक्षण पद्धतीत वीस वर्षांचे अंतर आहे. एका मुलाखतीत मी विचारले, तुमची पगाराची अपेक्षा काय? तो म्हणाला, ३ लाखांचे पॅकेज.

मी म्हणालो, तुला तर काहीही येत नाही, तुला ट्रेनिंग द्यायला कंपनीला ३ लाख खर्च येईल, तो कोण भरणार? आज कंपन्यांकडे इतके अनुभवी लोक येतात की, कोणालाही फ्रेशरला घेऊन ट्रेनिंग देण्यास वेळही नाही. त्यामुळे आज प्रत्येक कॉलेजमध्ये पहिल्या वर्षापासूनच व्यवसायाभिमुख, इंडस्ट्रीभिमुख काही लहानमोठे ट्रेनिंग, सेमिनार्स, वर्कशॉपचे वारंवार आयोजन करणे आवश्यक आहे. तरच मुलांना पदवीनंतर लगेचच काही तरी उद्योगात उतरता येईल.

पदवीनंतर तो स्वत:च्या हिमतीवर महिना किमान २० ते ३० हजार कमवू लागले तरच कॉलेजने खरे ज्ञान दिले असे म्हणावे लागेल. जगातील पहिल्या शंभर विद्यापीठांत भारतातले एकही विद्यापीठ नाही, यावरून तुम्हाला शिक्षणाचा दर्जा लक्षात येईल.

इंजिनीअरिंग, एमबीए, बीसीए इत्यादी पदवी झाल्यावर ‘नोकरी एके नोकरी’ हा एकच करीअर पर्याय लोकांच्या डोळ्यासमोर असतो; परंतु तंत्रज्ञान क्षेत्रात खूपच झपाट्याने बदल होत असून सिलिकॉन व्हॅली, आयआयटीसारख्या अग्रगण्य ठिकाणी पास आऊट मुलांचा कल आता नोकरी नव्हे, तर स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरू करण्याकडे आहे. आयआयटीसारख्या संस्थेत सेल स्थापन झाले आहेत.

लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी नाकारून मुले व्हेंचर कॅपिटलची मदत घेऊन स्वत:चा उद्योग उभा करत आहेत. एक नव्हे, दोन नव्हे, अशा हजारो कंपन्या प्रत्येक वर्षी स्थापन होत आहेत. स्वत:ची बुद्धी व आयुष्यभराची मेहनत दुसर्‍यासाठी वापरण्यापेक्षा ती स्वत:च्या व्यवसायात वापरा असे घरूनच मुलांना संस्कार मिळू लागलेत. यामुळेच गुगल, फेसबुक, व्हॉट्सअप आणि इतर असंख्य कंपन्या अमेरिकेत स्थापन होऊन यशस्वी होत आहेत.

ह्या सर्व कंपन्या इंजिनीयअरिंग विद्यार्थ्यांनी स्थापन केल्या आहेत. सर्वसाधारण एखादी कंपनी जेव्हा एखाद्या इंजिनीअरला ३० हजार रुपये पगार देते तेव्हा ती त्याच्याकडून किमान १ लाखाचे काम करून घेते या इंडस्ट्रीचा सरळ सरळ हिशोब असतो.

तेच काम तो इंजिनीयर स्वत:चा व्यवसाय किंवा कन्सल्टिंग प्रोफेशनल म्हणून काम करतो तेव्हा तो महिना १ ते १.५ लाखांची कमाई करतो. पाश्चिमात्य देशात जसे तंत्रज्ञान क्षेत्रात बहुसंख्य काम हे आऊटसोर्स केले जाते तसे तेथील छोट्या कंपन्यासुद्धा त्यांचे काम बाहेरील देशात आऊटसोर्स करू लागल्या आहेत.

त्यामुळे इंजिनीअरिंग, आयटी, आयटीईएस व इतर असंख्य क्षेत्रांत व्यवसायाच्या संधी निर्माण होत आहेत. भारतातसुद्धा पालकांचा दृष्टिकोन वेगाने बदलत आहे. पुणे-मुंबईत जाऊन १२-१५ हजारांवर काम करून काय होणार आहे. आयुष्यात त्यापेक्षा थोडीशी विचारपूर्वक जोखीम घेऊन व्यवसाय सुरू केलेला बरा.

गुजराती, मारवाडी, सिंधी, शेट्टी करू शकतात, मग आपण का नाही? असाही विचार होताना दिसतोय. भारतासह संपूर्ण जगभरातील कमी होत जाणार्‍या नोकरीच्या संधी यावर आम्ही गेली ३-४ महिने संशोधन करीत आहोत. एक विशेष बाब आमच्या लक्षात आली ती म्हणजे प्रत्येक इंडस्ट्री वेगाने वाढत आहे. उदा. टू-व्हीलर, फोर-व्हीलर वाढतायत; मग ऑटोमोबाइल इंजिनीयर्सचे जॉब का कमी होतायत.

कॉम्प्युटर, लॅपटॉप, वेबसाइट पोर्टल वाढतायत. मग कॉम्प्युटर इंजिनीअर्सचे जॉब का कमी होतायत? शाळा वाढतायत, मग शिक्षकांचे जॉब का कमी होतायत, आरोग्य सेवा वाढतायत, मग त्यात नोकर्‍या का नाहीत? ईकॉमर्स इंडस्ट्री इतकी वाढते, मग संबंधित इंजिनीअर्सना जॉब का मिळत नाहीत. या सगळ्यांचे उत्तर आमच्या लक्षात आले; ते म्हणजे सर्व कॉर्पोरेट क्षेत्राला कोणतेही ओव्हरहेड्स नको आहेत.

कायमस्वरूपी कर्मचारी, भल्या मोठ्या पगाराचे इंजिनीअर्स नको आहेत. त्याऐवजी ते प्रत्येक काम लहान कंपन्या, व्हेंडर, कन्सल्टंट यांच्याकडून करून घेणे पसंत करतात. त्यात त्यांचाही फायदा आहे. एक म्हणजे कोणतेही ट्रेनिंग द्यावे लागत नाही. आपणाला हवे तसे व ठरलेल्या वेळेत काम करून मिळते. कायमस्वरूपी कर्मचारी ठेवण्याची झंझट नाही.

उदाहरणच द्यायचे झाले तर, रिअल इस्टेट क्षेत्रात इतकी वेगवान प्रगती होत आहे, प्रत्येक शहर पाच वर्षांत दुप्पट होत आहे, पण सिव्हिल इंजिनीअर्सना नोकरी मिळत नाही, कारण डेव्हलपर्स सर्व कामांचे आऊटसोर्सिंग करू लागले आहेत.

उदा. प्रोजेक्ट स्टडीसाठी कन्सल्टंटना देतात, प्लॅन बनवण्यासाठी आर्किटेक्चरला देतात, कंट्रक्शनसाठी व्हेंडरला देतात, क्वालिटी कंट्रोलिंगसाठी थर्ड पार्टी कंपनी नेमतात. इंटीरीअरसाठी इंटीरिअर डिझायनरला काम देतात. अशा सर्व छोट्या कंपन्यांना काम मिळते.

जे लहान-मोठे उद्योजक आहेत त्यातील काही इंजिनीअर्सनी अनुभवाच्या जोरावर काम सुरू केले आहे. इंजिनीअर्सना १२-१५ हजार पगारावर ठेवले आहे. त्यामुळे या इंडस्ट्रीत खूप मोठी उद्योजकीय संधी आहे.

उदा. फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन, इबे इत्यादी कंपन्या भारतात सुमारे १० हजार इंजिनीअर्सना नोकरी देत असतील, तर त्याउलट सुमारे ५ ते ६ लाख इंजिनीअर्स व्हेंडर्सबरोबर काम करतात म्हणजे व्हेंडर हे स्वयंरोजगार करणारे किंवा छोटे उद्योजक आहेत जे सरासरी महिना लाख रुपये कमवतात. म्हणजेच आज इंडस्ट्रीत जॉबपेक्षा उद्योगालाच अधिक संधी निर्माण होत आहे.

अभ्यासक्रम आऊटडेटेड, गुणवत्ता सुमार, नोकर्‍यांची कमतरता असे निराशाजनककटू सत्य तुमच्यासमोर आहे, पण निराश होऊ नका. सिस्टम बदलण्यासाठीही प्रयत्न करू नका, नाही तर त्यातच तुमचे आयुष्य जाईल.

ज्या शिक्षणसंस्था काळानुरूप बदलणार नाहीत त्यांचा आपोआप नोकिया होईल. तुम्ही तुमचे बघा. तुम्ही कमालीचे स्वार्थी व्हा, वैयक्तिक यश मिळवणे हेच लक्ष्य ठेवा. कॉलेजमधून बाहेर पडल्या पडल्या महिना ५० हजार कसे कमवायचे याचे पूर्ण प्लॅनिंग व पूर्ण तयारी इंजिनीअरिंगच्या चार वर्षांत करा.

जगात काय चालले आहे याचे भान ठेवा. कान, डोळे, मेंदू सतत उघडे ठेवा. संधीबद्दल सतर्क राहा. आपल्या क्षेत्रात कोठे काय संधी आहे व आपण ती संधी चार वर्षांनंतर साधू शकतो व त्यासाठी काय तयारी करावी लागेल ह्याचा शांतपणे विचार सुरू करा.

केलेला विचार, वाचलेल्या गोष्टी, माहिती यांची नोंद एखाद्या डायरीमध्ये नोंद करत जा. इंजिनीअर झालो म्हणजे त्याच क्षेत्रात आयुष्यभर काम केले पाहिजे असे अजिबात नाही. तुमची आवड व भविष्यात कोणत्या क्षेत्राला स्कोप आहे हे अत्यंत महत्त्वाचे.

जवळजवळ ७०% विद्यार्थ्यांनी पालक म्हणतात म्हणून इंजिनीअरिंगला प्रवेश घेतलेला असतो. खरंच आपल्याला इंजिनीअर व्हायचे आहे का? हे त्यांना माहीतच नसते. बक्कळ पैसे खर्च करून चार वर्षे वेळ घालवून इंडस्ट्रीशी संबंध नसणारा अभ्यासक्रम शिकावा लागतो, त्याच्यापेक्षा दुर्दैव काय असावे. आता मात्र या क्षेत्रात स्पर्धा सुरू झाली आहे. अनेक संस्था प्रोफेशनल होऊ लागल्या आहेत.

अगदी कॉर्पोरेट क्षेत्राला लागणारा वेळ असे मॅनेजमेंट करू लागले आहेत, अशाच संस्था पुढे चालू राहतील, नाही तर बाकीच्यांना विद्यार्थी शोधत फिरावे लागेल. कारण शिक्षण संस्था हा उद्योग व विद्यार्थी हा ग्राहक आहे. जर १०% विद्यार्थ्यांना नोकरी व व्यवसायाचा मार्ग तुमच्याकडून मिळत नसेल याचा अर्थ तुमच्या उद्योगातून ९०% मालाचे खराब उत्पादन होते, मग असा उद्योग चालेल का?

आज जगामधील लोक झिरो डिफेक्ट संकल्पनेवर काम करत आहेत. ही सर्व सिस्टम सुधारणेपासून खूप लांब आहे, तुम्ही त्याचा विचार करू नका व नादालाही लागू नका, नाही तर तुमचे आयुष्य त्यात जाईल. तुमच्या आयुष्याचे प्लॅनिंग व काळजी तुम्हीच करा.

  • मला इंजिनीअरिंग कॉलेजच्या प्राचार्यांनी विचारले इनक्युबेशन सेंटरमुळे उद्योजक घडणार्‍याचा कसा फायदा होईल?
  • प्राचार्यांची शेतीही होती. म्हणालो, समजा तुम्हाला आंब्याचे झाड लावायचे आहे. खालीलपैकी तुम्ही कोणता पर्याय निवडाल?

पर्याय १) मी एक आंब्याची कोय देईन ती तुमच्या शेतात लावा (म्हणजे पदवी झाल्यानंतर विद्यार्थी त्यांचे ते बघतील).

पर्याय २) मी ती कोय माझ्या नर्सरीत एका मोठ्या बॅरेलमध्ये लावतो, त्याचे एक वर्षे संगोपन करतो व झाड ४-५ फूट वाढलेल्या चांगल्या सुदृढ झाडाला मी कलम करतो, मग तुम्ही ते तुमच्या शेतात लावा व पुढील सहा महिन्यांत किमान १०-२० आंबे लागतील व तुमच्या ऐपतीप्रमाणे खतपाणी घालत जा.

शेवटचा पर्याय म्हणजे इनक्युबेशन सेंटर होय, जेथे मुलांना कॉलेजमध्ये असल्यापासूनच उद्योगाविषयी मानसिकता तयार केली जाते, उद्योगात असणार्‍या धोक्याची भीती घालवली जाते. अनेक केस स्टडीज उदाहरणे, सेमिनार्स, वर्कशॉप, इंडस्ट्रियल एक्झिबीशन्स इत्यादी दाखवल्या जातात. विविध बिझनेस आयडियांवर विचार केला जातो, आपला स्वत:च पॅशन स्वत: ओळखण्यात मदत केली जाते. उद्योगात लागणार्‍या प्रॅक्टिकल गोष्टींची माहिती दिली जाते.

जसे आंब्याची कोय नर्सरीत वाढवली जाते तसाच एक उद्योग त्याच्या जन्मापासूनच कॉलेजमध्ये असतानाच उभा करतो. अगदी त्या उद्योगाचे नाव, त्याचे रजिस्ट्रेशन, डोमेन नेम, वेबसाइट, प्रोपरायटरशिप, प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची नोंदणी, कंपनीच्या नावे बँकेत अकाऊंट इत्यादी उघडले जाते.

कॉलेजमधून बाहेर पडल्यानंतर सर्व गोष्टी तयार असतात, बँका, इन्व्हेस्टर, व्हेंचर कॅपिटल, कंपन्या इत्यादींना सादर करण्यासाठी बिझनेस प्लॅनसुद्धा तयार असतो. कॉलेजमधून पासआऊट झाल्या झाल्या तो नोकरी मागत दारोदार फिरणारा इंजिनीअर नसून तो इतरांना नोकरी देणारा मालक बनतो.

इनक्युबेशन सेंटर म्हणजे गुरुकुल. सध्याची शिक्षण पद्धती म्हणजे १०-१२ हजार पगाराच्या नोकरीच्या शोधात फिरणारे पदवीधर. इनक्युबेशन सेंटर महाराष्ट्रातील प्रत्येक कॉलेजमध्ये तयार व्हावे, तेच आपल्या शिक्षण क्षेत्राला नवसंजीवनी ठरेल.

मला बरेच इंजिनीअर्स पदवीधर भेटायला येत असतात, त्यांनी बर्‍याच वेळा इंटरनेट इत्यादीमध्ये यशस्वी उद्योगाच्या कथा वाचलेल्या असतात. हजारो, लाखो, कोटी रुपयांचे आकडे पाहून त्यांना धास्ती बसलेली असते. आमच्याकडे कसेबसे रु. ५ लाखांचेही भांडवल नाही, मग आम्ही कसे काय उद्योगात यशस्वी होऊ, हा प्रश्न त्यांना नेहमी भेडसावत असतो.

एक वास्तव तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, ध्येय नेहमी उच्च असावे. जगातील अग्रगण्य यशस्वी उद्योजकांच्या कथा तुम्ही जरूर वाचा, त्यापासून एक प्रकारची प्रेरणा मिळत राहते; परंतु वास्तवतेचे भान विसरू नका. गुगल, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅपल, रिलायन्स, फ्लिपकार्ट इत्यादी कंपन्यांची सुरुवातसुद्धा काही हजाराच्या भांडवलात झाली आहे, तो २५-४० वर्षांपूर्वीचा काळ वेगळा होता. आज एक लॅपटॉप घ्यायचा झाला तरी २५ हजार लागतात.

टू व्हीलरला ७० हजार लागतात. साधा फ्लॅट-दुकान गाळ्याला १०-१५ हजार भाडे आहे. काळानुसार महागाई वाढली आहे. आज छोटेखानी व्यवसाय करायला ३ ते ५ लाख, मध्यम व्यवसाय करायला १० ते २० लाख, उच्च मध्यम व्यवसाय करायला ३० ते ५० लाख व उच्च व्यवसाय करण्यासाठी १ कोटीहून अधिक भांडवल लागते; पण सर्व भांडवल स्वत:कडे असले पाहिजे असे नाही ३० ते ४०% पर्यंत स्वत:चे भांडवल असेल तर आर्थिक संस्थांकडून आज भांडवल उभे करता येते. अगदी कॉम्प्युटर, लॅपटॉप, गाड्या ईएमआयवर मिळतात.

प्रत्येकानेच अंबानी, बिल गेट्स यांच्यासारखे बनले पाहिजे असे नाही. सर्वात प्रथम ध्येय म्हणजे प्रत्येक मराठी घरात एका उद्योगाची सुरुवात. उद्योग व्यापाराची संस्कृती प्रत्येक घरात निर्माण होणे हेच पदवीधर सुशिक्षित बेकारांच्या हाताला व बुद्धीला काम मिळणे. ‘रिकामे डोके हे सैतानाचे घर’ अशा वाईट वृत्तीपासून लांब राहावे. १०-१२ हजाराची नोकरी करण्यापेक्षा स्वत:ची बुद्धी, श्रम, स्वाभिमानाने उत्तम उत्पन्न कमावणे.

कोण किती मोठा उद्योजक बनेल हा ज्यांच्या त्यांच्या मेहनत, बुद्धी, संधी व नशिबाचा प्रश्न आहे. प्रत्येक ‘बी’ पेरल्यावर त्याचे मोठे झाड होते, पण ‘बी’ तरी पेरले पाहिजे. तेव्हा मित्रांनो, सुरुवात करा, महिना 50 हजार कमाईचे पहिले ध्येय ठेवा व टप्प्याटप्प्याने ते वाढवत जा. पहिल्याच दिवशी मी अंबानी बनणार म्हणाल तर तुम्हालाच काय तर जगात कुणालाही पटणार नाही.

आज इंजिनीअरिंग पदवीधारक हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा टॅलेंट आहे. ज्यांना दहावी, बारावीत चांगले गुण मिळालेत असे विद्यार्थी इंजिनीअरिंगला जातात. या टॅलेंटला हजारो उद्योग संधींची माहिती उपलब्ध करून दिल्यास व प्रोत्साहन दिल्यावर महाराष्ट्रात दुसरी सिलिकॉन व्हॅली तयार होईल.

चीनप्रमाणे महाराष्ट्रातील प्रत्येक घरात उद्योग उभा राहायला वेळ लागणार नाही. आज जगभरात ४-५ कोटी भारतीय विविध व्यवसायांनिमित्त जगभरात स्थायिक झाले आहेत. भारतातील नोकरदारांपेक्षा जास्त आहे. आज कॅनडा, यूके, युरोप, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, दुबई इत्यादी देशांमध्ये त्यांची स्थानिक लोकसंख्या त्यांच्या वाढणार्‍या अर्थव्यवस्थेच्या मानाने खूप कमी आहे.

इंडस्ट्री चालवण्यासाठी त्यांना विदेशातून स्किल्ड मॅनपॉवर मागवावी लागते आणि इंजिनीअरिंग पदवीधर ही सर्वात मोठी स्किल्ड मॅनपावर आज महाराष्ट्रात आहे. इंजिनीअरिंग, एमबीए, बीसीए व इतर पदवीधारकांनी किंवा शिकत असलेल्यांनी सुरुवातीपासूनच तीन टप्प्यांत तुमचे ध्येय ठरवा म्हणजे तुम्हाला आयुष्यात व उद्योगात यशस्वी होणे अधिक सोपे जाईल.

ध्येय क्र. १) कॉलेजमध्ये शिकत असताना तुम्ही अशा प्रकारचे ज्ञान, माहिती घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्ही बाहेर पडल्यानंतर त्या ज्ञानाचा उपयोग करून स्वत:च्या हिमतीवर काही व्यवसाय करू शकाल. विविध उद्योगांबद्दल माहिती व संधी शोधत राहा. सोशल मीडियाचा वापर करून तुमचे नेटवर्क वाढवत राहा म्हणजे तुम्ही पदवी पास होण्याअगोदरच मानसिक, बौद्धिकदृष्ट्या उद्योग करायला तयार असाल. ध्येय क्र.

ध्येय क्र. २) पदवी घेऊन बाहेर पडल्या पडल्या आयुष्यातला एकही दिवस वाया न घालवता कामाला लागा. खूप जास्त नाही, पण स्वत:ची बुद्धी, मेहनत, थोडेसे भांडवल व वेळ वापरून महिना किमान ५० हजार कमावता येतील असे काम करा. आज वडापाव विकणारा इतके पैसे कमवितो. पूर्ण नियोजन करून सुरुवात केल्यास महिना किमान ५० हजार कमाविणे एका इंजिनीअरिंग पदवीधारकांना सहज शक्य आहे.

ध्येय क्र. ३) एकदा उद्योगाला सुरुवात झाली म्हणजे तुम्हाला मार्ग सापडलाच. तुम्ही चालायला लागला. आता उद्योग मोठा करण्यासाठी म्हणजे वेगात धावण्यासाठी तयारी करा. उद्योगाचा विस्तार, शास्त्रशुद्ध व्यवस्थापन, व्हेंचर कॅपिटल, मोठे फायनान्स, एक्सपोर्ट, विदेशातील प्रोजेक्ट याला हात घाला. या तीन टप्प्यात तुम्ही वाटचाल केल्यास तुमचे इंजिनीअरिंग करत असतानाचे ज्ञान व वेळ सत्कारणी लागेल.

छोट्या प्रमाणात सुरुवात केल्यामुळे धोका कमीत कमी असेल. पहिल्या वर्षी फायदा होऊ लागल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल व समाज, कुटुंबीयांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन एक यशस्वी उद्योजक असा असेल.

तुमची समाजातील इमेज वेगळीच असेल. आज महाराष्ट्रात शेकडो इंजिनीअरिंग, बीसीए इत्यादी कॉलेजेस आहेत. हा एक खूप मोठा टॅलेंट पूल व महाराष्ट्रासमोर खूप मोठी संधी आहे. इंजिनीअर्स म्हणजे तंत्रज्ञानाची माहिती असणारा माणूस. आज जगात सर्वाधिक व्यवसाय इंटरनेट, तंत्रज्ञानाचा वापर करून होत आहे.

चीनच्या प्रत्येक खेड्यात घरात बनलेला माल आपल्या प्रत्येक भारतातील गावात व घरात आहे. पाश्चात्त्य देश, गुगल, व्हॉटसअप, मायक्रोसॉफ्ट, अ‍ॅमेझॉन, फेसबुक इत्यादीच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक घरात पोहोचले आहे. आज उद्योग करण्यासाठी जमीन, जागा, कारखाना लागतो ही संकल्पना कालबाह्य झाली आहे.

तुमच्याकडे असलेली आयडिया, आपल्याकडील असणारे इंजिनीअर्स, ही तंत्रज्ञान, मॅनपावर यासाठी पुरेशी आहे. त्याद्वारे महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, घरात उद्योग उभा राहू शकतो.

चीन १४० कोटी लोकसंख्येच्या हाताला काम देऊ शकते, कारण तेथे प्रत्येक घरात, गावात उद्योग आहे. नोकरी शोधण्यासाठी माणसांना शहरात, परराज्यात जावे लागत नाही. तीच स्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली पाहिजे आणि हा बदल इंजिनीअरिंग पदवीधारक करू शकतात.

प्रत्येक इंजिनीअरिंग विद्यार्थी व पदवीधर यांच्यात उद्योगाचा दृष्टिकोन राबविल्यास व त्यांनी उद्योग निर्माण करण्यास सुरुवात केल्यास ती एक महाराष्ट्रात क्रांती ठरेल. गावात इतरांना रोजगार उत्पन्न करून देईल.

– प्रा. प्रकाश भोसले

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?