FD नोकरीसमान; तर म्युच्युअल फंड उद्योगासम

आपण सर्व जण बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच एफडीमध्ये नियमित गुंतवणूक करत असतो. बँकेच्या एफडीमधून मिळणारा निश्चित कालावधीसाठी निश्चित परतावा आपल्याला आश्वस्त करतो आणि त्यामुळे आपली ओढ बँकेच्या एफडीकडे अधिक असते, परंतु बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक करीत असताना आपल्याला दोन गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.

पहिली गोष्ट, १९८९ मध्ये बँकांचे व्याजदर साधारण १६ टक्के होते, दहा वर्षांनंतर १९९९ मध्ये व्याजदर १३ टक्क्यांवर आले. पुढील दहा वर्षांनी २००९ मध्ये १० टक्क्यांवर आले आणि गेल्या दहा वर्षात २०१९ ला व्याजदर ७ टक्के झाले.

सध्याचे सरकारी बँकांचे व्याजदर पहिले तर ५.१ टक्के ते ५.५ टक्के आहेत. एप्रिल २०२० मध्ये पोस्टाच्या योजनेचे व्याजदरही एक ते १.४० टक्क्यांनी खाली घसरले. तसेच सर्वसामान्यांच्या पसंतीच्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच पीपीएफचे व्याजदरही सरकारने कमी केलेत.

हे सर्व व्याजदर महागाई दराइतके किंवा किंचित जास्त आहेत. त्यामुळे दीर्घकालीन एफडीच्या मुदतीनंतर मिळणारा परतावा हा महागाई खाऊन टाकते. म्हणजेच दीर्घकालीन एफडीमध्ये गुंतवणूक करताना आपण आपल्या मुद्दलाचे फक्त संरक्षण करतो, त्यात महागाईवर मात करणारी वाढ होत नाही.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर एखादी सहकारी बँक खूपच जास्त व्याजदर देऊ करीत असेल, तर आपण गुंतवणूक करताना काळजी घेतली पाहिजे. बँकेच्या व्यवस्थापन किती सक्षम आहे, बँकेचा एकूण व्यवहार किती मोठा आहे, तसेच एनपीए रेशो किती खाली आहे, याचा अभ्यास करून गुंतवणूक केली पाहिजे. एक-दोन टक्के व्याज जास्तीचे मिळते म्हणून धोका पत्करणे योग्य नाही. बँक एफडीतील फक्त ५ लाख रुपयांच विमा छत्र असते.

आजचा आपला देश हा विकसनशील देश आहे, पूर्ण जगाचा इतिहास पहिला तर असे लक्षात येते की जसजशी आर्थिक प्रगती होत जाते, तसे व्याजाचे दर कमी होत जातात. आपला देश साधारण पुढच्या ७-८ वर्षात विकसित देशांच्या पंक्तीत जाईल. येणाऱ्या ७-८ वर्षात आपल्या देशातही व्याजदर हे खालीच जातील. अशावेळी आपण फक्त बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक करीत राहिलो तर आपली संपत्ती वाढणार नाही.

व्याजदरापेक्षा जास्त परतावा मिळवण्यासाठी साहजिकच आपल्याला थोडी जोखीम घेणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत ही जोखीम घेण्याची क्षमता वेगवेगळी असू शकते, कारण प्रत्येकाचा उत्पन्न, खर्च, जबाबदाऱ्या, स्वप्ने तसेच समस्या वेगवेगळ्या असतात. आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार जर आपण गुंतवणुकीची वर्गवारी केली, तर निश्चितच चांगला परतावा मिळू शकेल.

यासाठी आपली काही गुंतवणूक ही म्युच्युअल फंडाच्या निरनिराळ्या योजनांमध्ये करावी. बँकेची एफडी व म्युच्युअल फंड यांची तुलना आपण नोकरी व व्यवसाय याच्याशी करू शकतो. नोकरीमध्ये व  एफडीमध्ये नियमित उत्पन्न आहे, पण त्याला मर्यादा आहेत.

व्यवसाय व म्युच्युअल फंड निश्चित उत्पन्न देत नसले, तरी जास्त उत्पन्नाची शक्यता यात आहे. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणं म्हणजे तज्ज्ञ फंड मॅनेजर्सनी अभ्यासपूर्ण निवडलेल्या कंपन्यांच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक करणे. त्यामुळे निश्चितच जास्त परताव्याची शक्यता म्युच्युअल फंडमध्ये जास्त आहे.

जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार म्युच्युअल फंडच्या निरनिराळ्या कॅटेगरी ची वर्गवारी (Asset Allocation) आपण पाहू.

३ वर्षांपर्यंतची गुंतवणूक

यासाठी आपण बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक करावी. अल्पकाळात लागणारे पैसे आपण तात्काळ वापरू शकतो. तसेच तीन वर्षापर्यंतच्या अल्प काळातील गुंतवणूक इक्विटी संबंधित म्युच्युअल फंडात गुंतवल्यास बाजारातील अल्पकालीन अस्थिरतेचा प्रभाव आपल्या गुंतवणुकीवर राहू शकतो. एफडीबरोबरच म्युच्युअल फंडाच्या डेट (कर्जरोखे /Debt) फंडही आपण विचार करू शकतो.

म्युच्युअल फंडाचा ‘बँकिंग अँड पी एस यु डेट फंड’ अत्यंत कमी जोखिमेचा चांगला पर्याय ठरू शकतो. डेट फंड जर कमीतकमी ३ वर्ष धरून ठेवले तर ते जास्त करप्रभावी होतात व कर कमी लागतो. जे थोडी जोखीम घेऊ शकतात, त्यांनी म्युच्युअल फंडच्या ‘डेट हायब्रीड फंड’ किंवा ‘इक्विटी सेविंग फंड’ कॅटेगरीच्या योजनांची निवड करण्यास चांगले. यात शेयर बाजारातील इक्विटी समभागांमध्ये जास्तीत जास्त ३०-३५% गुंतवणूक होते व बाकीची गुंतवणूक स्थिर कर्जरोख्यांमध्ये होते.

३ ते ५ वर्षांपर्यंतची गुंतवणूक

यासाठी आपण म्युच्युअल फंडाची ‘बॅलन्सड ऍडव्हान्टेज कॅटेगरी’ किंवा ‘ऍसेट अलॉकेटर फंड कॅटेगरी’चा विचार करू शकतो. हे असे फंड असतात, जिथे फंड मॅनेजर हे स्थिर उत्पन्न देणाऱ्या कर्जरोख्यांमध्ये तसेच जास्त उत्पन्नाची शक्यता असलेल्या इक्विटी समभागांमध्ये गुंतवणूक करतात. या कॅटेगरीमध्ये कर्जरोखे आणि इक्विटी समभागांचे प्रमाण असते, ते तज्ज्ञ फंड मॅनेजर ठरवतात.

या फंडातील डेट-इक्विटी प्रमाण हे साधारण ३०-८० टक्के लवचिक असते. आणखी सोप्या भाषेत सांगायचे तर, तज्ज्ञ फंड मॅनेजर्स आपल्या अभ्यासाप्रमाणे जेव्हा शेयर बाजार गुंतवणुकीस पोषक नसतो, तेव्हा इक्विटी ३० टक्क्यांपर्यंत खाली आणतात व डेट ७०-८० टक्क्यांपर्यंत वाढवतात. जेव्हा शेयर बाजार गुंतवणुकीस पोषक असतो, तेव्हा इक्विटी ८० टक्क्यांपर्यंत वाढवतात व डेटचा भाग खाली आणतात.

आपल्या गुंतवणुकीचा पूर्ण कालावधीचा विचार केला तर आपली साधारणतः ४० ते ५० टक्के गुंतवणूक ही शेयर बाजारातील इक्विटी समभागांमध्ये होते. मागील १० वर्षाचा इतिहास पहिला तर या कॅटेगरीने बँक एफडीपेक्षा साधारण चार ते पाच टक्के परतावा हा जास्त दिला आहे. मात्र अल्पकाळामध्ये हे फंड चंचल राहू शकतात, आपली तीन वर्षांपुढील गुंतवणुकीसाठी या फंडांची निवड करण्यास चांगले.

५ ते ७ वर्षांपर्यंतची गुंतवणूक

यासाठी आपण म्युच्युअल फंडाच्या ‘इक्विटी हायब्रीड फंड कॅटेगरी’चा विचार करू शकतो. हे असे फंड असतात, जिथे किमान ६५ ते ८० टक्के गुंतवणूक ही इक्विटी समभागांमध्ये करतात. ३५ टक्क्यांपर्यंत कर्जरोख्यांमध्ये गुंतवणूक असल्याने गुंतवणुकीस काही प्रमाणात स्थिरता येते. इक्विटी समभाग म्हणजे लार्ज कॅप, मिड कॅप आणि स्मॉल कॅप या सर्व प्रकारच्या समभागांमध्ये योजनेची गुंतवणूक असते.

आपल्या गुंतवणुकीचा पूर्ण कालावधीचा विचार केला, तर आपली किमान ६५ टक्के गुंतवणूक ही शेयर बाजारातील इक्विटी समभागांमध्ये होते. मागील दहा वर्षांचा इतिहास पहिला, तर या कॅटेगरीने बँक एफडीपेक्षा साधारण पाच ते सहा टक्के परतावा जास्त दिला आहे. मात्र अल्पकाळामध्ये हे फंड चंचल राहू शकतात, चांगला परतावा मिळण्यासाठी किमान पाच वर्षांपुढील गुंतवणूक कालावधी असावा.

७ वर्ष किंवा त्याहून जास्त कालावधीची गुंतवणूक

आपण ज्या विश्वासाने बँकेच्या एफडीमध्ये गुंतवणूक करतो, त्याच विश्वासाने बँकेच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक केली तर. म्युच्युअल फंडाचे ‘बँकिंग अँड फिनान्शिअल सेक्टर फंड’ हे आपल्याला बँकांच्या व्यवसायात गुंतवणुकीची संधी देतात. हे पूर्णपणे इक्विटी समभाग संबंधित योजना असतात. यात किमान ८० टक्के गुंतवणूक ही फिनान्शिअल सेक्टरमधील बँक आणि इतर कंपन्यांच्या समभागामध्ये असते.

अल्पकाळात या प्रकारच्या फंडामंध्ये जास्त चढउतार पाहिला मिळतात, मात्र दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते. गेल्या काही महिन्यात रिजर्व बँक आणि सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे बँकांचे बुडीत कर्जाचे प्रमाण कमी होण्यास मदत झालेली आहे. त्याचा चांगला प्रभाव येणाऱ्या काळात या सेक्टरवर दिसून येईल.

दीर्घकाळासाठी बँकेच्या एफडीपेक्षा बँकांच्या व्यवसायामध्ये गुंतवणूक केव्हाही चांगली. सेक्टर फंडमध्ये जास्त जोखीम वाटत असेल, तर म्युच्युअल फंडच्या लार्ज कॅप किंवा मल्टी कॅप फंड कॅटेगरीमध्ये गुंतवणूक करावी.

वर माहिती दिलेल्या वेगवेगळ्या कॅटेगरीतील फंडाचे आपल्या जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार योग्य संयोजन केल्यास आपण महागाईवर मात करणारा परतावा मिळवू शकतो.

आपल्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी आपल्याला जेव्हा आपली गुणवणूक उपयोगात आणायची असेल, तेव्हा वर दिलेल्या क्रमवारीनुसार आपले पैसे काढावेत म्हणजे आपल्या पूर्ण गुंतवणुकीवर बाजारातील चढउताराचा विपरित परिणाम होणार नाही. योग्य फंडांचे संयोजन करण्याकरता आपल्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.

– निलेश तावडे
(लेखक हे वीस वर्ष म्युच्युअल फंडमध्ये कार्यरत होते व सध्या ते आर्थिक सल्लागार आहेत.)
संपर्क : ९३२४५४३८३२
ई-मेल : nilesh0630@gmail.com

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?