प्रत्येक मध्यमवर्गीयाने आत्मसात केली पाहिजे ही ‘पैसे वाचवण्याची कला’

आपल्यापैकी प्रत्येकजण पैसे कमावण्यासाठी काम करतो. धडपडतो. प्रत्येकाला श्रीमंत व्हायचे आहे, मोठे व्हायचे आहे. सर्वांना स्वतःची व आपल्या कुटुंबाची स्वप्न पूर्ण करायची आहेत. आपल्यापैकी बऱ्याच जणांना असा अनुभव नक्कीच आला असेल की आपल्या कमाईतून आपल्या व कुटुंबाच्या दैनंदिन गरजा तर पूर्ण होतात, पण बरीचशी स्वप्न आपल्याला पूर्ण करता येत नाहीत.

याला आपली कमाई कमी असणे, नियमित बचत न करणे, अनावश्यक गोष्टींवर खर्च करणे, दररोज वाढणारी महागाई ई. बरेच घटक कारणीभूत असतात. पूर्वी म्हणजे साधारण ३० ते ३५ वर्षांपूर्वीचा काळ आपण जर अभ्यासला तर आपल्याला लक्षात येईल की काही मोजक्या वस्तू सोडल्या तर बहुसंख्य वस्तूंच्या किंमती या स्थिर असायच्या, महागाई वाढण्याचा वेग हा कमी होता.

लोकांचे उत्पन्न कमी होते तरीही त्यांच्या गरजा कमी असल्याने व स्वस्ताई असल्या कारणाने लोकांचे जीवन सुखी, समाधानी व आनंदी होते. आज महागाई तर दररोज वाढत आहे. वस्तूंचे व सेवांचे दर वाढते असल्यामुळे प्रत्येकाच्या उत्पन्नापैकी जास्तीत जास्त भाग हा दैनंदिन गरजा भागवण्यासाठीच खर्च होतो.

आज तरुणाईला आकर्षित करण्यासाठी विविध प्रलोभने उपलब्ध आहेत, त्यामुळे अतिआवश्यक गरजा आणि अनावश्यक गरजा यातील सीमारेषा अस्पष्ट आहे. बऱ्याच जणांना यातील फरकच कळत नाही, त्यामुळे अनावश्यक गरजांवर झालेला खर्च त्यांचे उत्पन्न व बचत दोन्ही खाऊन टाकतो आणि मग गरजेच्या वेळी उसने, उधारी व कर्ज याचे न संपणारे चक्र सुरू होते.

वेद व्यासांची एक अतिशय समर्पक उक्ती आहे,

“न जातु कामः कामानामुपभोगेन श्याम्यति | हविषा
कृष्णवर्त्मेव भूय एवभीवर्धते || “

अर्थ – विषयोपभोगाने विषयांची आसक्ती कधीही शांत होत नाही. अग्नीत आहुती दिल्याने तो जसा वाढतो, त्याप्रमाणे विषयोपभोगांची इच्छाही वाढतच राहते. गरज आणि हाव या दोहोंतील सीमारेषा अतिशय पुसट असते.

सुरुवातीला अनेक गोष्टी गरज म्हणून केल्या जातात, मग ती आपली हौस होते. हौसेला मोल नसते. मग ती इतक्या प्रमाणात होते की ती अतिहाव किंवा लोभ ठरते. हावरेपणा कधीही संपत नाही. म्हणूनच आपण इच्छा आणि हाव यातील फरक समजून घेऊन कुठे थांबायचे हे लक्षात घेतले पाहिजे.

यासाठी समाधानी वृत्ती असावी. अन्यथा उपभोग हा सतत वाढत राहणाऱ्या अग्नीसारखा आहे जो माणसाचे उत्पन्न आणि बचत दोन्ही गिळंकृत करतो.

Indian middle class doing savings

आज पैसा हाच जगाचा देव झालेला आहे. प्रत्येकजण पैशांच्या मागे धावतो आहे. कितीही पैसा कमावला तरीही तो कमीच पडतो, असा अनेकांचा अनुभव आणि समज बनत चालला आहे. कोरोनानंतर तर यात खूपच वाढ झालेली आहे. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.

अनेकांचे धंदे बंद झाले. बहुसंख्य लोकांचे उत्पन्नाचे मार्ग खुंटले किंवा बंद झाले. पण महागाई काही कमी झाली नाही, उलट ती दररोज वाढतच चालली आहे. युक्रेन आणि रशिया युद्धाने महागाईला फोडणीच मिळाली. या विचित्र परिस्थितीत सामान्य माणूस मात्र होरपळून निघत आहे.

मग याला उपाय काय? हे असेच चालत राहिले तर काय? आज नोकरीची शाश्वती राहिली नाही. टाटा, बिर्ला, अंबानी, ई. बड्या कंपन्या रिटेलिंगसकट सर्वच क्षेत्रात उतरल्या आहेत, त्यामुळे छोट्या व्यापाऱ्यांना धंदा करणे अवघड झाले आहे.

येणारा काळ तर अजून कठीण असेल, कारण रोबोटिक्स, आरटीफिशियल इंटेलीजंस आणि इंटरनेट ऑफ थिंग्ससारखे तंत्रज्ञान अनेक नोकऱ्या गिळंकृत करण्यासाठी तयारच आहेत. अशा परीस्थीतीत करायचे काय? आणि जगायचे कसे? असे भेडसावणारे प्रश्न सामान्य माणसापुढे आ वासून उभे आहेत.

आता याला पर्याय एकच – तो म्हणजे आता प्रत्येकाने सतत नवीन कौशल्ये शिकणे व आपल्या क्षमता वाढवणे आणि आपल्या कमाईचा प्रत्येक पैसा खर्च करताना विचारपूर्वक खर्च करणे व प्रत्येक पैश्यांचा हिशोब ठेवणे अत्यंत आवश्यक झालेले आहे.

अशा गोंधळलेल्या मनःस्थितीत प्रत्येकाने जर अनावश्यक खर्च टाळून कमाई, खर्च आणि बचत यांचा योग्य ताळमेळ घातला तरच भविष्यात गरजेसाठी, अचानकपणे येणाऱ्या खर्चांसाठी, काही स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि म्हातारपणासाठी काही पैसे शिल्लक राहुन जीवन सुखमय होईल.

आता प्रत्येकाच्या मनात असे आले असेल की हे सर्व आम्हाला माहिती आहे, हे लिहायला व वाचायला खूप छान आहे, पण बचतीचे काय? पैसे वाचवण्याचे उपाय काय?

यासाठी आपण दररोजच्या जीवनातील एक छोटेसे उदाहरण पाहु – आपण प्रत्येकजण टाटा नमक दररोजच्या जेवणात वापरतो. एक किलो टाटा नमकच्या पिशवीची MRP २८ रुपये आहे. काही ठिकाणी ही पिशवी २८ लाच विकली जाते.

काही ठिकाणी २७ रुपयांना तर काही ठिकाणी २५ ला विकली जाते. म्हणजे एक किलो टाटा नमक जर आपण २८ रुपयांना न घेता २५ ला विकत घेतले तर आपले तीन रुपये वाचतात. २८ रुपयांचा विचार केला तर ३ रुपयांची ही आपली बचत म्हणजेच आपण १०.७१ टक्के वाचवले.

आज एसबीआयसारख्या सरकारी बँकांचे मुदत ठेवींचे व्याजदर बघितले तर सामान्य माणसासाठी ते वार्षिक ७.१९ टक्के आहेत. म्हणजेच आपल्या बचतीचा दर हा बँकेच्या व्याजदरापेक्षा नक्कीच जास्त आहे आणि त्यासाठी आपल्याला कोणतीही गुंतवणूक करण्याची किंवा वर्ष-दोन वर्ष वाट बघण्याची गरजच नाही.

जे काही मिळणार आहे ते आज, आता आणि ताबडतोब स्वरूपाचे आणि स्वमालकीचे आहे. आपण दररोज, दर महिन्याला व दर वर्षाला जे काही खरेदी करतो त्या प्रत्येक वस्तू आणि सेवा यांत जर आपण अशाप्रकारे बचत करू शकलो तर आपला कितीतरी पैसा हा आपण दररोजच्या खरेदीत जाणीवपूर्वक वाचवू शकतो. तो किती आहे हे बघण्याची गरज नाही. तो १ रुपया असो की २ रुपये, पैसे वाचवणे मह्त्त्वाचे आहे.

“एक रुपया भी बहोत बड़ी चीज हैं बाबू |”. शेवटी म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे. हीच बचत जर आपण गुंतवणुकीत लावली की ती आपल्याला परत पैसे कमावून देते. म्हणून तर म्हणतात पैसाच पैशाला खेचतो. एक मात्र अत्यंत गरजेचे आहे. व्याज कमी मिळाले तरी चालेल, पण आपली गुंतवणूक ही सुरक्षित राहील अशाच ठिकाणी ठेवावी.

जास्त व्याजदराच्या प्रलोभनाला बळी पडू नये, नाहीतर तेलही गेले आणि तुपही गेले अशी अवस्था व्हायची. कारण जागोजागी फसवणूक करणारे पायलीचे शंभर जण भेटतील जे या बचतीवर डल्ला मारायला तयारच असतात.

बचतीचे अनेक सोपे मार्ग आहेत जसे की :

  • एक एक वस्तू स्वतंत्र किरकोळीत खरेदी न करणे.
  • ज्या वस्तू जिथे स्वस्त मिळतील तिथूनच त्या खरेदी करणे.
  • जर एखादी वस्तू जास्त प्रमाणात आणि नेहेमी लागत असेल तर ती घाऊक (होलसेल) दुकानातून खरेदी करणे.
  • प्रत्येक गावात आणि शहरात घाऊक मालाची स्वतंत्र दुकाने असतात, जे MRP पेक्षा कमी दरात वस्तू विकतात त्यांची माहिती घेऊन तिथूनच वस्तू खरेदी करणे.
  • कपडे, शुज, इलेक्ट्रिक / इलेक्ट्रॉनिक वस्तु, ई. वर्षातून एकदा किंवा दोनदाच पण ऑफ सीझनमध्ये खरेदी करणे. ऑफ सिझनला मागणी कमी असल्याने सूट जरा जास्त मिळते.
  • उठसुठ खरेदी न करणे. बाहेर फिरायला गेल्यावर खरेदीचा मोह टाळणे.
  • गरज आणि हाव यातील फरक समजून घेऊन अनावश्यक खरेदी टाळणे.
  • आपली कमाई बघून खर्च करणे, आपण वस्तू नेहमी वापरणार असू तरच ती खरेदी करणे.
  • आपल्या कमाईचा काही भाग दर महिन्याला स्वतःच्या आणि कुटुंबाच्या भविष्यासाठी बचत करणे.
  • उधारी आणि कर्जाच्या दूष्ट विळख्यापासून दूर राहणे.
  • प्रत्येक महिन्याचे बजेट ठरवून खर्च करणे, ई.

बचतीचे सर्वच सोपे मार्ग आहेत, पण सुरुवात करणे, पहिले पाऊल उचलणे गरजेचे आहे. मला खात्री आहे की आपण सर्वजण वरीलपैकी काही गोष्टींचा अवलंब नक्कीच करत असाल आणि काही गोष्टींचा अवलंब करणे गरजेचे आहे.

आपल्याला दररोज नवीन नवीन बचतीचे मार्ग शोधून पैसा वाचवण्याची ही कला शिकणे गरजेचे आहे ज्यामुळे ही बचतगंगा आपल्या घरी नेहमी खळाळत राहील व आपल्याला समृद्ध करेल.

चंद्रशेखर अढाव
मोबाईल – ९८२३०६५०७२
email – srigajanan5@gmail.com

Author

books for life website Ad
Click here to visit: booksforlife.in
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart Udyojak India Business Directory
आशिष पेटे : सौरऊर्जेने ग्रामीण महाराष्ट्रात घडवलेली हरितक्रांती व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?