नात्यांची विण घट्ट करणारी… ‘अर्थपूर्ण’ दिवाळी!

arthpurna diwali

नन्या दिवाळीची यादी करत होता. यादी करता करता बाबांना बोलला, “बाबा एकदा यादी चेक करा हो.” तेवढ्यात आतून एक थरथरता आवाज आला, “अरे दिवाळीची यादी करतोयस तर ‘मोती’ साबण विसरू नको बर का!” दिवाळीमध्ये ‘मोती’ साबणाशिवाय दिवाळी पूर्णच होऊ शकत नाही.

तीन पिढ्यांचा हा संवाद चालू असतानाच मधून आजीचा आवाज आला, “दिवाळीची यादी तयार करायला घेतली आहे वाटतं?” आजोबांनी आजीला आठवण करून दिली, “आठवते ना आपल्या वेळेला ‘मोती’ साबण एवढा मोठा होता की हातात मावायचा नाही आणि किती स्वस्त होता साबण एवढा मोठा असायचा की पुढचे तीन महिने आम्हाला साबण विकत घ्यायची गरज पडायची नाही.”

नन्या आता खूश झाला, कारण त्याला माहीत होतं की आता आजीआजोबा त्यांच्या जुन्या दिवसांच्या आठवणी काढणार आणि त्याला त्या आठवणी खूप आवडायच्या.

मग काय म्हणता बघता बघता घरातले सगळे जण एकत्र आले आणि आजोबांनी त्यांची दिवाळीची आठवण सांगायला सुरुवात केली. आजोबांनी सांगितलं की त्या वेळची दिवाळी आणि आजची दिवाळी खूप फरक आहे. त्या वेळी आम्हाला पगार कमी होता, पण खर्चसुद्धा कमी होता. त्या वेळेला तुमच्यासारखं मॉलला गेलो आणि कपडे घेतले असं नव्हतं किंवा फक्त दिवाळीच्या वेळेलाच चिवडा, लाडू, फरसाण या गोष्टी केल्या जायच्या.

आजीने आजोबांना मध्येच थांबवून सांगितलं “आणि बरं का त्या वेळी पंधरा-वीस रुपयांमध्ये आम्ही पूर्ण दिवाळी साजरी करायचो. त्याच्यामध्ये तुझ्या बाबांना, आत्यांना फटाके, कपडे आणायचो. आजोबा त्यांना बाजारात घेऊन जायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या वेळेला तुमच्यासारखे कंदिल नव्हते. एक छान चांदणी असायची किंवा कोणी घरी बनवत असेल तर काड्यांनी बनवलेला आकाश कंदिल असायचा.”

आजोबा त्यांच्या आठवणीत रमून सांगत होते. “नरक चतुर्दशीचा दिवस म्हणजे खरी दिवाळी. या दिवशी म्हणजे अतिशय उत्साह असायचा. सकाळी लवकर उठायचं. तेव्हा आतासारखं प्रदूषण नव्हतं त्यामुळे बर्‍यापैकी वातावरण थंड असायचं. बंबामध्ये पाणी तापवलं जायचं. त्या पाण्याला एक वेगळाच वास असायचा. सकाळी रेडिओवर सनईने सुरुवात व्हायची. अंगणात सडा टाकला जायचा. रांगोळी काढली जायची. शेणाने सारवलं जायचं.

सकाळी उठून पहिला फटाका कोण लावणार याचं मुलांमध्ये मोठं आकर्षण असायचं. सकाळी सगळीकडे उटण्याचा घमघमाट. खरं ते उटणं तेल टाकून म्हणजे चिकट झालेलं, पण त्या दिवशी काही पर्याय नसायचा. सुवासिक तेल नसायचं, पण खोबरेल तेल आणि उटणं हे लावून झालं की अर्धी आंघोळ झाली की मग आजी ओवाळायची. आंघोळ झाली की फराळ व्हायचा.”

आजीने मध्येच अडवून एक गोष्ट सांगितली, “आमच्या वेळी तुमच्यासारखं नव्हतं की फराळ करता करताच घ्या खायला. तसं नव्हतं कारण नरक चतुर्थीला त्याचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा मग घरातली सर्व मंडळी व आजूबाजूच्यांची पंगत असायची खूप छान दिवस होते.”

नन्याच्या वडिलांनी तेवढ्यात आठवण करून दिली. “बाबा, तेव्हाची गोष्ट वेगळी होती. तेव्हाची महागाई आणि आताची महागाई खूप फरक पडला आहे.”

“खर आहे बाबा तुझं”, आजोबा एक हुंकार सोडत बोलले. “तू म्हणतोयस ते खरं आहे त्या वेळची महागाई आणि आताची महागाई खूप जमीन-अस्मानचा फरक आहे रे. आमच्या वेळी आम्हाला पगारच असायचा हजार रुपये. मला एक गोष्ट सांगायला आवडेल नन्या तुझ्या बापांना मी लहानपणीपासून पोस्टात घेऊन जायचो, बँकेत घेऊन जायचो, त्यांना मी बचतीची सवय लावली.

मीसुद्धा जमेल तेवढे पैसे बाजूला ठेवायचो. आज त्याच्यामुळे तुझ्या बाबांचं लग्न झालं, आपण एवढं मोठं घर घेऊ शकलो. आत्यांची लग्न झाली. या सगळ्यांसाठी बचत खूप आवश्यक आहे बाळा.” आजोबा आपल्या नातवाला सांगत होते.

हे सर्व सुरू असताना आई सगळ्यांसाठी मस्त चहा घेऊन आली. आईने विचारलं, “काय हो सासरेबुवा यांच्या शिक्षणाचा खर्च किती होता? आणि लग्नाचं खर्च किती होता? आणि एवढ्या कमी पगारामध्ये तुम्ही कसं नियोजन केलंत तेव्हा?”

आजोबा म्हणाले, “सुनबाई, तू पहिले बस आपण मस्त चहा पिऊ सगळेजण, मग मी तुम्हाला सांगतो या सर्व गोष्टी.”

“हे बघा मुलांनो तुम्ही पैसे किती कमवता यापेक्षा पैशांची बचत किती करता आणि ते कसे, कुठे गुंतवता हे जास्त महत्त्वाचं. म्हणजे आम्हाला पगार थोडा होता, पण आम्ही त्यातूनही काही जमेल ती रक्कम बाजूला काढायचो. मला अंदाज होता की माझ्या मुलाला म्हणजे तुझ्या नवर्‍याला दहावीसाठी किती खर्च लागेल? बारावीसाठी किती खर्च लागेल? त्या काळी तो इंजिनियर झाला त्यासाठी किती खर्च लागेल? या सगळ्याचं मी नियोजन केलं होतं आणि त्याप्रमाणे पैशांची इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली होती.”

“आता तुम्ही म्हणाल की लग्नाचा किती खर्च आला. तर मी एक अंदाज लावला की आमच्या लग्नाचा किती खर्च आला होता? आमचं लग्न म्हणजे तुमच्यासारखं डेस्टिनेशन वेडिंग, महागडे व्हिडिओ आणि फोटो असं काही नसायचं. घरातल्या घरात जेवणं व्हायची. कोणी तरी ओळखीचा मांडववाला असायचा.

त्यामुळे लग्नाचा खर्च, सोन्याचा, कपड्यालत्त्याचा काय तो खर्च असायचा.वीस वर्षांपूर्वी लग्नाला काय खर्च आला होता, याचा अंदाज बांधून आम्ही तुझ्या बाबांच्या लग्नाचा खर्च काढायचं ठरवलं. मग त्यासाठी आम्ही जी काही इन्व्हेस्टमेंट होती ती करत गेलो.”

आता नन्याचे बाबा पुढे आले आणि म्हणाले, “बाबा, तुम्ही त्या त्या वेळेला जी काही इन्व्हेस्टमेंट केली ती खरच खूप छान होती. त्याच्यामुळे त्या वेळी माझं शिक्षण झालं, आपलं घर झालं, मी चांगलं शिकलो. तुमच्याकडून मी जो वारसा घेतला, तोच मी पुढे चालू ठेवला आहे.

तुमच्या काळी बँकेचा किंवा पोस्टचा मुदत ठेवीचा व्याजदर दहा-बारा टक्के होता. आता तो चार-सहा टक्क्यांवर आलाय. महागाईसुद्धा खूप वाढली आहे म्हणून मी तुमच्या सर्वांसाठी एक नवीन माहिती देणार आहे. ती ऐकायला तुम्ही तयार आहात ना?”

सर्वजणांनी एका सुरात सांगितलं, “हो हो. आम्ही आहोत तयार.” बाबा म्हणाले, “चला मग मी तुम्हाला गुंतवणूक आणि आर्थिक साक्षरता म्हणजे काय याच्याबद्दल माहिती देतो. अतिशय साधी गोष्ट आहे. महागाईचा दर पाहायचा. जर का तो सात टक्के असेल आणि आपण जी गुंतवणूक करतोय त्यात मिळणारा परतावा हा सात टक्क्यांच्या आसपास असेल तर आपल्या गुंतवलेल्या पैशांची व्हॅल्यू कमी होणार. त्यामुळे आपल्याला असा गुंतवणूक पर्याय निवडणे आवश्यक आहे, जो सात टक्क्यांपेक्षा जास्त परतावा देईल.

दुसरी महत्त्वाची गोष्ट पूर्वीच्या काळी आपण घरात एकाच मडक्यात पाणी भरून ठेवायचो का? तर नाही, कारण ते मडकं जर फुटलं तर सगळं पाणी वाहून जाईल.म्हणून अनेक छोट्या छोट्या मडक्यांमध्ये पाणी ठेवायचो. आजच्या गुंतवणुकीच्या भाषेत आपण याला म्हणतो ‘असेट अलोकेश’. जे पैसे तुम्हाला एक-दोन वर्षांसाठी लागणार आहेत, त्यासाठी तुम्ही मुदत ठेव करा. पाच, दहा, पंधरा वर्षांसाठी लागणार त्यांच्यासाठी तुम्ही म्युच्युअल फंड प्रकार निवडू शकता.

म्युच्युअल फंड हे शेअर मार्केटशी संबंधित असतं, पण फरक एवढाच असतो की तुमचे पैसे एकाच कंपनीच्या शेअर्समध्ये लागत नाहीत तर अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये लागलेले असतात. विविध सेक्टरमध्ये लागलेले असतात. त्यामुळे थोडी रिस्क कमी होते. हे जरी मी सांगत असलो तरी म्युच्युअल फंडच्या मार्गदर्शकाकडूनच योग्य माहिती करून घ्या. मी सांगतोय म्हणून करू नका. गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा दीर्घ कालावधीसाठी चांगला पर्याय आहे.

दुसरी गोष्ट सांगतो तुमच्याकडे एक मेडिक्लेम असणे गरजेचे आहे. आपले बाजूचे काका दोन आठवड्यांपासून हॉस्पिटलमध्ये आहेत. जवळपास तीन ते चार लाख रुपये खर्च झाला. जर का त्यांच्याकडे मेडिक्लेम नसता तर त्यांना त्यांची सगळी बचत मोडावी लागली असती.

कदाचित त्यांना कर्ज घ्यावं लागलं असतं, पण मेडिक्लेम असल्यामुळे त्यांचा जो काही खर्च होता अगदी सगळे पैसे मिळाले नाहीत, पण ९० ते ९५ टक्के पैसे त्यांना मेडिक्लेम कंपनीमधून परत मिळाले. त्यामुळे मेडिक्लेम खूप महत्त्वाची गोष्ट आहे.

अजून एक गोष्ट ही खूप महत्त्वाची आहे बर का तो म्हणजे टर्म प्लॅन. टर्म प्लान किती असावा, हा थोडा वादाचा विषय तुम्हाला सोप्या भाषेत सांगतो. की माझं जे काही वार्षिक उत्पन्न आहे त्याच्या किमान बारा पट असायला पाहिजे. याचा अर्थ काय झाला.

आज जर का मला काय झालं तर तुझ्या आईला किमान मी जेवढे पैसे वर्षाला कमवत होतो त्याचे बारा वर्षांचे पैसे मिळाले पाहिजेत, जेणेकरून किमान बारा ते पंधरा वर्षं तुम्ही सुखात जगाल. त्यामुळे वार्षिक उत्पन्नाच्या किमान बारा ते पंधरा पट तुमचा विमा असणे गरजेचं आहे. तरच त्या कमावत्या व्यक्तीच्या पश्चात त्याचं कुटुंब सुखी राहू शकतं.”

तेवढ्यात आजोबा उठले चहाचा कप सूनबाईच्या हातात देत म्हणाले. सुनबाई अजून एक सांगतो, “आपण आयुष्यभर एवढे पैसे कमवतो, पण आपण गेल्यानंतर त्याचं काय, याची शंका मनात ठेवायची नसेल तर सगळ्यात उत्तम आहे मृत्युपत्र करणं. याला आपण विल म्हणतो.

आपल्याकडे मृत्युपत्र म्हटलं की असं वाटतं मरणार का पण तसं नाहीये. आपण आयुष्यभर जे काही पैसे कमवतो आपल्यानंतर आपल्या वारसांना ते योग्य मिळाले पाहिजे असं जर का तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला मृत्यूपत्र करणं खूप गरजेचं आहे. याची प्रोसेस अतिशय सोपी आहे. तुम्ही वकिलांकडे जा किंवा जे रजिस्टर ऑफिस असतात त्यांची काही ऑफिसेस असतात ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील.”

एवढ्यात सुनबाईंनी अजून एक प्रश्न विचारला, “बरं सासरे बुवा मला सांगा गोल्ड हा इन्वेस्टमेंटचा विषय आहे का? आजोबा म्हणाले, “बघ आपल्याकडे लग्नाच्या वेळी सोनं हे लागतच, पण असं कधी झालंय का की आपण सोनं इन्वेस्टमेंट म्हणून विकत घेतलं आणि सोन्याचे भाव वाढल्यावर विकलं? आजपर्यंत असं कधीच झालेलं नाही. लग्नासाठी सोनं घेणं चांगलीच गोष्ट आहे.त्याच्यामध्येसुद्धा आपल्याला पैसे मिळतात, वाढतात, पण गुंतवणूक म्हणून करताना विचार केला पाहिजे.”

आता गप्पा रंगात आल्या होत्या. काकांच्या मनातपण एक प्रश्न आला. काका बोलले, “बरं बाबा मला आता एक गोष्ट सांगा. गुंतवणूक म्हणून आपण एक नवीन घर घेऊया का?” आजोबा म्हणाले, “अजिबात नाही, कारण तुला राहायचं असेल तर तू घेऊ शकतोस, पण गुंतवणूक म्हणून घर घ्यायचं अस वाटत असेल की आपण भाड्याने देऊ त्यातून उत्पन्न मिळेल खूप चुकीचा आहे. कारण समज एक ५० लाखांचं घर आहे.

आपल्याकडे रोख २० लाख आहेत आणि ३० लाखाचं कर्ज काढलं. ३० लाखांच्या कर्जावर ३० लाख व्याज जातं आणि वीस लाख कॅश दिले तर आपल्याला ते घर कितीला पडेल जवळपास ८० लाखाला आणि त्याच्यावरती आपल्याला भाडं किती मिळणार ३०-३२ हजार. मेन्टन्स, लाईट बिल, प्रॉपर्टी टॅक्स हे खर्च वेगळे. म्हणजे आपण ८० लाखांची किंवा ५० लाखांच्या प्रॉपर्टीला ३ लाख ६० हजार जरी भाडं येत असेल तरीसुद्धा टक्क्यांत पकडलं तर नगण्य आहे. त्यामुळे राहायचं असेल तर घर घ्या.

बरं आता विषय निघालाच आहे म्हणून अजून एक गोष्ट सांगतो. तुमचं कोणतंही कर्ज चालू असेल तर त्याचे सहा महिन्यांचे हप्ते तुमच्या बँक खात्यात जमा असायला हवेत. महिन्याचा जो खर्च आहे, तेही सहा महिन्यांचे पैसे हे तुमच्या अकाउंटला कायम असले पाहिजेत. याच्या व्यतिरिक्त आणि अडचणीला रात्री जर का काही लागलं तर त्याच्यासाठीसुद्धा आपल्याकडे पैसे असणं गरजेचं आहे. याला ‘आपत्कालीन निधी’ म्हणतात.

हे सगळं सुरू असतानाच आतून खमंग वास येत होता. आजी आतमध्ये चकल्या तळत होती आणि त्या वासाने लक्षात आलं की दिवाळी जवळ आलेली आहे.

आजोबांकडून यादी फायनल करून मी आणि बाबा खरेदीसाठी बाहेर पडलो सगळ्यांसाठी फटाके, कपडे, मोती साबण घ्यायला… दिवाळीच्या निमित्ताने असाच ‘अर्थपूर्ण’ संवाद घराघरात होऊ दे आणि नात्यांची विण आर्थिक साक्षरतेसह आणखी घट्ट होऊ दे.

Author

1 thought on “नात्यांची विण घट्ट करणारी… ‘अर्थपूर्ण’ दिवाळी!”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

books for life website Ad
Click here to visit: booksforlife.in
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart Udyojak India Business Directory
आशिष पेटे : सौरऊर्जेने ग्रामीण महाराष्ट्रात घडवलेली हरितक्रांती व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?