विमा कशासाठी? – विमा प्रतिनिधीसाठी, कुटुंबाच्या सुरक्षेसाठी की कंपन्यांच्या फायद्यासाठी?

आपल्या आर्थिक नियोजनातील सगळ्यात महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग म्हणजे ’विमा’. या विम्याविषयी एक ग्राहक म्हणून, गुंतवणूकदार म्हणून प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे. ही माहिती आपल्याला ज्या स्त्रोतापासून मिळते त्यांची विश्वासार्हताही आपल्याला माहीत असली पाहिजे.

टीव्ही, वर्तमानपत्र, सोशल मीडियावरून विम्याची दणकून प्रसिद्धी होते. यामध्ये विम्याविषयी जागृती कमी तर विक्री करण्याची वृती अधिक असल्याचे दिसून येते. टीव्ही किंवा युट्यूबवर कंटेन्ट बघत असताना जाहिरात लागते. ज्यात एक विधवा महिला आणि विमा प्रतिनीधी दिसतोय.

आपल्या पतीच्या निधनानंतर त्याने केलेल्या विम्यातील गुंतवणूकीमुळे त्यांच्या मुलाच्या भविष्याची सोय झाली. अशा रितीने विम्याचे महत्त्व पटवून दिले जाते. ही जाहिरात वारंवार दाखवून इन्शुरन्स म्हणजेच विमा घेणे कसे गरजेचे आहे हे आपल्यावर बिंबवले जाते.

सध्याच्या काळात केवळ पतीच्या उत्पन्नावर घर अवलंबून आहे असे चित्र फार कमी ठिकाणी बघायला मिळते. आज कित्येक घरात पती आणि पत्नी दोघेही कमावते असतात. दोघांच्या आर्थिक बाजू भक्कम असतात आणि परस्परावलंबी असतात. त्यामुळे कोणा एकाच्या उत्पन्नाच्या सुरक्षेसाठी ‘विमा’ ही संकल्पनाच चुकीची ठरते.

प्रत्येक कमावत्या व्यक्तीचे आर्थिक नियोजन हे करावे, हेच योग्य ठरते. मुळातच विम्याचे अनेक प्रकार आहेत. आपल्या आर्थिक नियोजनाच्या प्रक्रियेमध्ये आपल्या अ‍ॅसेट्स अर्थात मालमत्ता, गुंतवणूक या गोष्टींना संरक्षित करण्याचे अतिशय महत्त्वाचे काम विमा करत असतो, हे समजून घेतले पाहिजे.

मग या प्रत्येक अ‍ॅसेट्सच्या सुरक्षेसाठी त्या त्या प्रकारचा विमा आहे. ही माहिती तुमच्यापर्यंत येत नाही त्यामुळे तुम्ही विम्याने पूर्णपणे सुरक्षित आहात असे होत नाही. ही माहिती तुम्हाला एक चांगला फायनान्शियल अ‍ॅडव्हायझर देऊ शकतो. जो इन्शुरन्स घेताना योग्य ती माहिती देईल.

a person taking financial advise from plannerतुम्हाला, तुमच्या कुटुंबाला तसेच तुमच्या अ‍ॅसेट्सला पूर्णपणे सुरक्षित करेल. विमा प्रतिनीधी म्हणून काम करताना या व्यवसायाकडे पूर्णवेळ अर्थार्जनाचे साधन म्हणून बघणारे खूपच कमी असतात. जे प्रोफेशनली काम करतात, त्यांच्याकडे विमा विषयाचा गाढा अभ्यास असतो तसेच विमा प्रकार समजून विक्रीपासून ते विक्रीनंतर सेवेपर्यंत विशेषत: क्लेम्सचे वेळी सेवा पुरवण्याचा अनुभव असतो.

याचीच दुसरी बाजू म्हणजे व्यक्तीनिहाय आर्थिक नियोजन केले जाते. ज्यामध्ये त्या त्या ग्राहकाच्या उत्पन्न, त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटूंबातील व्यक्तींची संख्या, त्यांच्या आर्थिक गरजा, भविष्यातील त्यांच्या आर्थिक जबाबदार्‍या आणि साकार करायची स्वप्ने या सगळ्याचा अभ्यास करून विमा प्रकार, त्यासाठीचे कव्हरेज आणि गुंतवायची रक्कम आपल्याला सुचवतात. म्हणूनच आपले आर्थिक निर्णय या क्षेत्रात अनुभवी असलेल्या आर्थिक सल्लागार व्यक्तीकडूनच करून घ्यावे.

विमा क्षेत्रात बरेच जण हे एजंट (मध्यस्थी) या भूमिकेतून कामाला सुरुवात करतात. यानंतर ते विमा सल्लागार (कन्सल्टंट) होतात. किमान दहा वर्षे सातत्याने आर्थिक नियोजनाच्या व्यवसायात काम केलेले व्यावसायिक हे आर्थिक सल्लागार (फायनान्शियल कन्सल्टन्ट) किंवा आर्थिक नियोजनकार (फायनान्शियल अ‍ॅडव्हायझर) म्हणून ओळखले जातात.

आपल्याकडे येणारा व्यक्ती आपल्याशी केलेल्या चर्चेतून पुरेशी माहिती घेत आहे ना, आपल्या उत्पन्नाशी निगडीत सगळे गणित अचूक मांडून आपल्या आर्थिक गरजांची पूर्तता करणारा व्यक्ती हा एक सुयोग्य फायनान्शियल अ‍ॅडव्हायझर असू शकतो.

आपण ज्या व्यक्तीशी आपल्या आर्थिक नियोजनाबद्दल बोलत आहोत, ज्याच्याकडून विमा घेत आहोत किंवा पैसे गुंतवत आहोत ती व्यक्ती तितकीच विश्वासार्ह असायला हवी. आपल्या सगळ्या सेवांसाठी पूरक यंत्रणा त्यांच्याकडे असायला हवी आणि मार्केटमध्ये विविध कंपन्यांच्या बाबतीत काय घडते आहे याविषयी अपडेटेड असायला हवी.

आपण जसे पैसे कमवायला लागतो तसे आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतो. तसेच आपल्या मिळकतीमधून येणारे पैसे कुठे खर्च करावे, कसे वाचवावे, कसे वाढवावे, कुठे गुंतवावे, इ. विषयक निर्णय घेऊ लागतो. अशावेळी अगदी दुचाकी घेण्यापासून, घर घेणे, चारचाकी घेणे, परदेशात फिरायला जाणे, सोने-चांदी घेणे अशी अनेक आर्थिक मिळकतीवर आधारित स्वप्ने पाहू लागतो.

ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी पैसे कमवणे-वाचवणे-गुंतवणे-वाढवणे-सुरक्षित ठेवणे असे सूत्र अवलंबले पाहिजे. आपल्याकडे अनेक कंपन्या, अनेक विमा प्रतिनिधी आणि अनेक विमा प्रकार वेगवेगळ्या माध्यमातून येत असतात. आपली सुरक्षा, आपले संरक्षण, आपली मालमत्ता (अ‍ॅसेट्स) आणि या सगळ्यांना सुरक्षित करणार्‍या विम्याचा हप्ता आपणच भरणार तर विमा कोणता काढावा याचा निर्णयही आपलाच असला पाहिजे ना.

आपले पैसे वाचवण्याचे, वाढवण्याचे, सुरक्षितरित्या वाढवण्याचे अनेक पर्याय आपल्यासाठी उपलब्ध आहेत. आपले आर्थिक उद्दिष्ट काय आहे, आपल्याला आर्थिक वृद्धी किती अपेक्षित आहे, किती वर्षे आपण गुंतवणूक करू शकतो, परतावा कधीपासून अपेक्षित आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे यासाठी जोखीम पत्करायची आपली तयारी किती आहे या सगळ्याचा विचार करून मग आपले फायनान्शियल प्लॅनिंग केले पाहिजे.

यासाठी या सगळ्याच विषयांची पुरेशी माहिती आपल्या असली तर आपली फसवणूक होत नाही. थोडक्यात काय तर, कमी वेळात मोठ्या परताव्याचे आमीष दाखवून आपण फसवले जाणार नाही यासाठी सजग असले पाहिजे.

बाजारात अनेक कंपन्या आहेत ज्या आपल्या विमा प्रकार ऑफर करतात. वेगवेगळ्या कंपनींची वेगवेगळ्या वेळी सुरुवात झाली असल्याकारणाने त्याविषयी लोकांना विमा प्रतिनीधींना, ग्राहकांना आलेले अनुभव वेगवेगळे असू शकतात.

बर्‍याच वेळा ग्राहकांकडून झालेली चूक, विमा प्रतिनीधीचे अपुरे ज्ञान यामुळे मिससेलिंग होते. कारण विमा कंपन्यांवर IRDA चे नियंत्रण असते. त्यामुळे कंपन्या क्लेम नाकारताना त्यासाठी अनेक पॅरामीटर असतात, चूकून नाकारलेला क्लेम ओळखून त्यावर कायदेशीररित्या फाईट करता येऊ शकते. यासाठी आपला विमामित्र तेवढा हुशार असायला हवा. तसे न झाल्याने, आपण घेत असलेला विमा हा कशासाठी किंवा कुणाच्या फायद्यासाठी हा प्रश्न पडतो अशी चुकीची धारणा होते.

आपल्या इन्कम अर्थात मिळकतीसोबत आपली सुरक्षा की गुंतवणूकीतून मिळणारी वाढ यापैकी कोणत्या गोष्टीला महत्त्व दिले पाहिजे? आर्थिक नियोजन करताना प्राधान्यक्रम काय असला पाहिजे? म्हणजेच आर्थिक नियोजन कसे करावे? या प्रश्नाचे उत्तर आपण पुढच्या भागात घेणार आहोत.

Author

books for life website Ad
Click here to visit: booksforlife.in
WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
Smart Udyojak India Business Directory
आशिष पेटे : सौरऊर्जेने ग्रामीण महाराष्ट्रात घडवलेली हरितक्रांती व्यवसाय वाढवण्यासाठी बिझनेस व्हिसिटिंग कार्डचं महत्त्व उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?