तरुण उद्योजकांचं आर्थिक नियोजन कसं असावं?

आपल्यापैकी प्रत्येक जण जीवनात यशस्वी होऊ इच्छितो. आता प्रत्येक व्यक्तीसाठी यशाची व्याख्या वेगळी असते. कोट्यधीश होणे हे बहुतेकांचे स्वप्न असते. महाविद्यालयात असताना आपण असे बरेच लोक बघतो की, जे यशस्वी उद्योगपती, राजकारणी, खेळाडू, कलाकार असतात.

ते सर्व जण आज इथे तर उद्या तिथे असे जगभर हिंडत असतात. आपणही त्यांच्यापैकी एक व्हावे असे आपल्याला वाटत असते. औपचारिक शिक्षण पूर्ण झाल्यावर आपल्या आवडीच्या क्षेत्रात व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मिळते. आपण व्यवसाय सुरू करतो.

व्यवसायातील अडचणी समोर उभ्या ठाकतात. आपण भरपूर प्रयत्न करून व्यवसाय कौशल्य विकसित करतो, विक्रीचे मार्ग उभे करतो, भांडवलाची उभारणी करतो, कर्मचारी वर्गाची नेमणूक करतो. व्यवसायवृद्धीसाठी या सर्व गोष्टी आवश्यक आहेत; तथापि व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात, या सर्व गोष्टी आपण स्वतः करत असताना, आपण सोळा ते अठरा ताससुद्धा काम करतो आणि आपल्याला वैयक्तिक जीवन आहे हेही विसरतो.

व्यवसायाच्या आर्थिक बाबींकडे ज्या पद्धतीने लक्ष ठेवतो त्याप्रमाणे वैयक्तिक जीवनात आपण त्याची काळजी करीत नाही. वैयक्तिक जीवनाच्या आर्थिक बाबी महत्त्वाच्या आहेत याकडे आपले दुर्लक्ष होते. बर्‍याचदा आपली विचारधारणा अशी असते की, वैयक्तिक वित्तव्यवस्थेची काळजी घेणे महत्त्वाचे नाही आणि ती काळजी आपोआप घेतली जाईल.

आपण या लेखात वैयक्तिक वित्त व्यवस्थेकडे बघणार आहोत. व्यवसायाच्या आर्थिक बाबींशी तुलना केली की या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे आपले योग्य लक्ष जाईल. तरुण उद्योजकाने पुढील दहा मुद्द्यांचे पालन करणे आवश्यक आहे. त्यांचे आर्थिक जीवन शिस्तबद्ध होईल व त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली जाईल.

व्यवसायाचा पैसा आणि वैयक्तिक पैसा वेगळा ठेवणे

व्यवसाय सुरू करताना आपली वैयक्तिक मालमत्ता वापरणे हे काही वेळा आवश्यक बाब ठरते; परंतु व्यवसायाचा व वैयक्तिक पैसा वेगळा ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आयकर भरताना हे वेगळेपण आपली डोकेदुखी वाचवेल व तुमच्या व्यवसायास अधिक विश्वासार्हतादेखील देईल.

भविष्यात तुमची कंपनी मोठी होईल आणि त्यात शंभरहून अधिक कर्मचारी असतील. त्या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आपण वैयक्तिक कामासाठी कंपनीचे बँक खाते वापराल का? असे असेल तर सुरुवातीपासून चांगली सवय का नाही? तसेच बँक कर्ज घेताना आणि भविष्यात आपला व्यवसाय वाढवताना आपले कंपनीचे खाते आणि स्वत:चे खाते वेगळे असणे आवश्यक आहे.

‘आपत्कालीन निधी’ तयार करा

एक व्यावसायिक म्हणून आपल्याला कल्पना असते, की आपल्या व्यवसायाची विक्री आणि नफा महिना-दर महिना बदलत राहणार आहे. कधी नफा तर कधी तोटा होऊ शकतो.

इथे मासिक पगारासारखी ठरावीक रक्कम महिन्याच्या शेवटी येणार नसते. आपत्कालीन निधी वेगळा ठेवण्यासाठी एक स्वतंत्र खाते ठेवणे आवश्यक आहे.

ज्या वेळी गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत त्या वेळेस हा आपत्कालीन निधी अत्यंत उपयोगी पडतो. असाच वेगळा आपत्कालीन निधी कुटुंबासाठी अत्यंत जरुरी आहे. जर आपले व्यावसायिक उत्पन्न काही काळासाठी कोणत्याही कारणाने बंद झाले, तरी आपले वैयक्तिक जीवन आणि कुटुंब यांना कुठलाही त्रास होणार नाही. याला Provision for rainy day म्हणतात. ही रक्कम सहा ते बारा महिन्यांच्या खर्चाइतकी असणे महत्त्वाचे आहे.

प्रथम स्वतःला पैसे द्या

व्यवसायात अनेक खर्च असतात. उदा. कर्मचार्‍यांचा पगार, वीजपुरवठा, दूरध्वनी, पाणीपुरवठा, कच्चा माल इत्यादी. आपल्या वैयक्तिक आयुष्यातसुद्धा आपण तेच करतो. पैसे हातात आल्यावर घरभाडे, किराणा सामान, वीज, पाणी, औषधपाणी, शिक्षण, कपडालत्ता असे आवश्यक व सहली, मनोरंजन, दागिने असे इतर अनावश्यक खर्च करतो.

त्यानंतर उरलेली रक्कम आपण आपल्या पुढील आयुष्यासाठी बाजूला ठेवतो. खर्च आधी केल्यामुळे शिल्लक रक्कम बहुतेक वेळा खूपच कमी असते. जरा थांबा. स्वतःला एक सवय लावा. कमाविलेल्या रकमेपैकी काही टक्के आधी स्वत:साठी वेगळे काढा. उदा. १५ टक्के ही बचत करण्याची चांगली सवय आहे. हेच पैसे तुम्हाला भविष्यात उपयोगी पडणार आहेत. प्रथम १५ टक्के रक्कम बचत करा आणि नंतर उरलेले पैसे आनंदात खर्च करा.

खर्चावर नियंत्रण

खर्चावर नियंत्रण नसेल तर कोणताही व्यवसाय यशस्वी होऊ शकत नाही. आपल्या व्यावसायिक खर्चाची नोंदणी करा व त्याचे वर्गीकरण करा. प्रत्येक व्यवहाराची नोंद करा. जोपर्यंत आपण किती खर्च आणि कुठे करत आहोत याचा तपशील आपल्याकडे नसेल तोपर्यंत आपण त्यावर नियंत्रण मिळवू शकत नाही. आयकरासाठीसुद्धा हे आवश्यक आहे.

हाच नियम आपल्या वैयक्तिक आयुष्यात लागू पडतो. प्रत्येक छोटामोठा खर्च लिहून ठेवा. त्याचे वर्गीकरण करा. त्याचे अंदाजपत्रक तयार करा. अन्यथा एक दिवस असे लक्षात येईल की, आपले उत्पन्न वाढत आहे; पण आपला खर्च प्रमाणाबाहेर वाढत आहे. दरमहा तुमचे उत्पन्न आणि खर्च बदलत राहते, त्यामुळे कॅश फ्लोकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

मालमत्तेचे संरक्षण

व्यवसाय चालवण्यासाठी विविध गोष्टींचा वापर होतो. उदा. इमारत, यंत्र, सामग्री, वाहने, फर्निचर. या सर्व गोष्टी व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक आहेत. त्यामुळेच त्यांचे आग, पूर, चोरी, अपघात वगैरे गोष्टींपासून योग्य संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यांचा विमा काढणे जरुरीचे आहे.

असे माझ्याबाबतीत होणार नाही, असे म्हणून स्वस्थ बसणे म्हणजे संकटाला आमंत्रण दिल्यासारखेच आहे. तुमच्या कुटुंबासाठी तुम्ही सर्वात महत्त्वाची व्यक्ती आहात, कारण सर्व उत्पन्न तुमच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे स्वत:साठी विम्याचे पुरेसे कवच घ्या.

जर दुर्दैवाने तुम्ही नसाल तर तुमच्या सेवानिवृत्तीच्या दिवसापर्यंत मिळणारे कुटुंबाचे उत्पन्न थांबणार आहे आणि ते मिळत राहणे आवश्यक आहे. तसेच तुमचे घर, मोटार, इतर महाग फर्निचर, टी.व्ही., संगणक, दागिने यांचाही विमा उतरवणे योग्य ठरेल, कारण दुर्दैवाने पूर, आग अशी काही परिस्थिती आली तरी त्याचा तुमच्या कौटुंबिक जीवनावर परिणाम होणार नाही.

स्वयंचलित व्यवहार

व्यवसाय मोठा होत असताना आपल्या दैनंदिन व्यवहाराची संख्या वाढत असते. या सर्व व्यवहारांचा मागोवा ठेवणे हे काम कठीण होत जाते. अशा वेळी तुम्ही शक्य असेल तेवढ्या गोष्टी स्वयंचलित पद्धतीने केल्यास आपल्यावरील ताण कमी होतो. उदा. NEFT द्वारे पैसे देणे, तसेच बँक खात्यात पैसे थेट जमा करण्यास सांगणे, SMS द्वारे आठवण करून देणे.

असे केल्याने प्रत्येक छोटी कृती आपणच करण्याची आवश्यकता राहत नाही. विशेषतः जेव्हा आपण प्रोजेक्ट पूर्ण करण्यामध्ये व्यग्र असतो त्या वेळेस काही गोष्टींचे payment राहण्याची शक्यता असते व त्यामुळे दंड भरणे किंवा सेवेमध्ये खंड पडणे अशा गोष्टी घडू शकतात.

आपल्या वैयक्तिक आयुष्यातसुद्धा हे खरे आहे. वीज, आयुर्विमा, दूरध्वनी, इंटरनेट, मेडिक्‍लेम, अपघात विमा, घरभाडे, पाणी, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, कचरा संकलन इत्यादी गोष्टी आपण स्वयंचलित करू शकतो. याद्वारे आपला वेळ व त्रास वाचतो तसेच होऊ शकणार्‍या दंडापासून आपली सुटका होते.

प्रमाणाबाहेर कर्ज

व्यवसायाची सुरुवात करताना तुम्हाला कर्ज घेणे आवश्यक असते, कारण आपण स्वत: लागणारी सर्व रक्कम उभी करू शकत नाही. तसेच तुमचा मालकी हक्क कमी होऊ नये म्हणून तुम्ही कर्ज घेता; पण हे लक्षात ठेवा की, कर्जावरील व्याज व कर्ज परतफेडीचा हप्ता वेळेवर देता आला नाही तर व्यवसायावर टाच येऊ शकते. हीच गोष्ट आपल्या वैयक्तिक आयुष्यात लक्षात ठेवणे जरुरीचे आहे.

आपण गृहकर्ज, वाहनकर्ज, शिक्षणकर्ज, सणासुदीसाठी कर्ज, वैयक्तिक कर्ज अशा विविध कारणांसाठी कर्ज घेतो. या सर्वांचे परतफेडीचे हप्ते व त्यावरील व्याज या सर्वांचा ताण आपल्यावर येतो. एक महत्त्वाचा नियम तुम्ही लक्षात ठेवणे आवश्यक आहे, की परतफेडीचे हप्ते हे आपल्या उत्पन्नाच्या ३५ टक्क्यांपेक्षा जास्त असू नयेत.

सेवानिवृत्तीसाठी तरतूद

कर्मचारी असताना सेवानिवृत्तीचे वय कायद्यानुसार ठरलेले असते; परंतु तुम्ही स्वत: उद्योगपती असल्यामुळे तुम्हाला वयाचे बंधन नाही. कायद्यानुसार कर्मचारी वर्गासाठी काही प्रमाणात निवृत्ती योजना तुम्ही तयार केली असेल; पण मालक म्हणून तुम्ही निवृत्ती या गोष्टीचा विचार केला नसेल. निवृत्ती काळ हा जीवनतील सर्वात आनंदी आणि अतिशय महाग काळ आहे.

वय वर्षे ६० ते ८५ हा २५ वर्षांचा कालावधी हा निवृत्ती काळ समजता येईल. या काळात आपण काम करणे थांबवले असल्याने आपले अर्जित उत्पन्न शून्य, तर खर्च वाढत जात असतो. निवृत्तीसाठी गंगाजळी निर्माण करण्यासाठी शक्य तितक्या लवकर प्रारंभ करणे आवश्यक आहे. तसे केल्यामुळे वेळ ही मित्र बनून आपल्या बाजूने काम करते.

लवकर प्रारंभ, नियमितपणे योगदान, पुरेसे योगदान, योग्य ठिकाणी गुंतवणूक आणि निवृत्तीपर्यंत त्या पैशांना स्पर्श न करणे हे केल्याने भरपूर गंगाजळी तयार होईल. आपण काम करत असताना, व्यवसाय हा आपल्या जीवनाचा खूप मोठा भाग असतो. निवृत्तीनंतर तुम्ही आणि तुमचे कुटुंब हेच तुमचे जीवन असते. पुरेसा निधी तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे निवृत्त आयुष्य आनंदात घालवण्यात हातभार लावेल.

वैविध्य

आपला व्यवसाय हा सहसा उद्योगाच्या एका segment शी संदर्भित असतो. पूर्णपणे भिन्न विभागात पूरक व्यवसाय सुरू करून आपण रोखीची आवक/जावक योग्य तर्‍हेने ठेवू शकता. त्याचप्रमाणे काही कारणाने तुम्हाला एका व्यवसायातून बाहेर पडण्याची वेळ आली तर दुसरा व्यवसाय चालू असल्याने समस्या निर्माण होणार नाही. हीच गोष्ट आपल्या वैयक्तिक आयुष्यात असते. आपला निधी वेगवेगळ्या मार्गांनी गुंतवला तर पुरेसा कॅश फ्लो व निधी वृद्धी होईल.

योग्य आर्थिक सल्लागार

तुमच्याबरोबर चांगला वित्तीय सल्लागार आहे की नाही याची खात्री करा. वित्तीय सल्लागार तुमच्या वर्तमान परिस्थितीत तसेच तुमच्या व तुमच्या कुटुंबीयांना पुढे येणार्‍या काळासाठी तयार करतात. आपले पैसे योग्यरीत्या गुंतवणूक करण्यासाठी मार्गदर्शन करतील ज्याद्वारे तुम्ही व तुमचे कुटुंब जीवनाचा आनंद घेऊ शकाल.

वरील गोष्टींवरून असे लक्षात येईल की, चांगल्या सवयींमुळे चांगले परिणाम मिळतात. आपण तरुण असताना जर वैयक्तिक आयुष्यात चांगल्या सवयी लावल्या तर आपले कौटुंबिक जीवन तर सुखी होईलच; पण त्याचा परिणाम आपल्या व्यवसायावरसुद्धा पडेल आणि आपल्या व्यवसायाची आर्थिक बाजू तुम्ही समर्थपणे सांभाळाल.

– गणेश भिडे
९८६९३४०००५
(लेखक सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?