उत्तम कर्मचारी शोधण्यासाठीही वापरू शकता सोशल मीडिया


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


आजकाल आपण पाहतो की स्टार्टअप्स मोठ्या संख्येने उभे राहत आहेत. त्यातील काहींच्या संकल्पना खूप उत्तम आहेत तर काहींचे संस्थापक आपल्या कौशल्यांचा वापर करून साध्यातल्या सध्या उद्योगातून मोठा नफा कमावण्याची क्षमता दाखवत आहेत. इतकी मोठी ताकद स्टार्टअप्समध्ये असतानाही त्यातले बरेच स्टार्टअप्स बंद का पडतात?

स्टार्टअप्सच्या यशाचे गणित हे त्यात काम करणाऱ्या लोकांच्या उत्पादकतेशी प्रत्यक्षरित्या संबंधित असते. जितके उत्पादक, कुशल आणि मोठा विचार करणारे लोक, तितका तो उद्योग मोठमोठा होत जातो, परंतु अडचण अशी असते की सुरुवातीच्या काळात कमी बजेटमुळे ना आपण मोठा पगार देऊन तज्ञांना कामावर ठेऊ शकतो, ना आपल्या उत्पादकतेशी तडजोड करू शकतो. मग अशा वेळी आपल्या ओळखीतल्या कुणालातरी कामावर ठेवले जाते किवा त्या कामासाठी योग्य नसलेल्या एखाद्या व्यक्तीची निवड केली जाते.

बऱ्याचदा आपल्याला हवे तसे कर्मचारी मिळत नाहीतच उलट आपल्यालाच त्या कामात जास्त लक्ष घालावे लागते आणि शेवटी वेळ फुकट जातो. हे सर्व जर टाळायचे असेल तर उत्तम कर्मचाऱ्यांची निवड करणे गरजेचे आहे. यासाठी आपण एखाद्या एजन्सीची मदत घेऊ शकतो, पण त्यात खर्चसुद्धा जास्त येतो. यासाठी दुसरा पर्याय म्हणजे सोशल मीडिया.

आजच्या आधुनिक युगात आपण आपली उत्पादने विकण्यासाठी, ग्राहकांशी उत्तम नाते निर्माण करण्यासाठी सोशल मीडिया वापरतो. त्याचप्रमाणे उत्तम कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठीसुद्धा सोशल मीडियाचा वापर आपण करू शकतो. उत्तम कर्मचाऱ्यांना सोशल मीडियाद्वारे आकर्षित करण्यासाठी आपण पुढील पर्याय वापरू शकतो :

१. लोकांना व्हर्च्युअली आपल्या ऑफिसमध्ये आणणे

कोणत्याही व्यक्तीला आपण जिथे नोकरीसाठी अर्ज करतो तेथील वातावरण जाणून घ्यायचे असते. तर मग आपणच जर सोशल मीडियामार्फत त्यांना हे पुरवले तर?

आपल्या ऑफिसमधील कर्मचाऱ्यांचे काम करतानाचे फोटोज सोशल मीडियावर अपलोड करणे, आपल्या ऑफिसमधील विशेष सेवांची माहिती पोस्ट करणे तसेच आपल्या संस्थापकांचे कर्मचाऱ्यांसोबत काम करतानाचे, विविध ट्रेनिंग्सचे, वगैरे फोटोज किंवा व्हिडीओज शेअर करणे अशा अनेकविध गोष्टींतून आपण लोकांना ग्राहक म्हणूनच नाहीत तर आपल्या उद्योगातील भविष्यातले कर्मचारी म्हणूनही आकर्षित करू शकतो.

२. विद्यमान कर्मचाऱ्यांमार्फत

कोणतीही व्यक्ती एखाद्या संस्थापकाकडून त्याच्या उद्योगाचे कौतुक ऐकण्यापेक्षा त्यातील कर्मचाऱ्यांच्या तोंडून निघालेल्या कौतुकावर जास्त विश्वास ठेवते. त्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे ऑफिसमधील अनुभव जास्तीत जास्त शेअर करण्यास उद्युक्त करा. यालाच ‘वर्ड ऑफ माऊथ’ प्रमोशनसुद्धा म्हणतात. कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्याशिवाय इतर लोकांमध्येसुद्धा यामुळे आपल्या उद्योगाबद्दल विश्वास निर्माण होईल.

३. आपल्या उद्योगातील वातावरण जगाला दाखवा

लोकांच्या मनात कायम भीती असते की बाहेरून जरी एखादे ऑफिस छान दिसत असले तरी त्याच्या आतील वातावरण कसे असेल. त्यामुळे आपण आपल्या ऑफिसमध्ये जर कोणते सण साजरे करत असाल किंवा इतर वेगळ्या कोणत्या स्पर्धांचे आयोजन करत असाल तर त्याची छायाचित्रे आपल्या सोशल मीडियावर जरूर शेअर करा. यामुळे लोकांना आपल्या उद्योगाबद्दल आपलेपणा वाटू लागेल.

४. विविध फॉर्म्सचा वापर

आपण जेव्हा एखाद्या पदासाठी योग्य व्यक्ती निवडत असाल तेव्हा त्या पदासंदर्भात एखादी प्रश्नावली तयार करा. गुगल फॉर्म हे डिजिटल प्रश्नावली तयार करण्याचे सर्वात सोपे मध्यम आहे. ही प्रश्नावली आपल्या सोशल मीडियावरून शेअर करा. लोकांना मजा म्हणून ती स्पर्धा देऊ द्या.

आम्हाला कर्मचारी हवे आहेत त्यासाठी ही स्पर्धा असे अजिबात सांगू नका. यामुळे लोक मुक्तपणे ही प्रश्नावली सोडवतील. यात लोकांचे फोन नंबर किंवा ई-मेल घ्यायला विसरू नका. स्पर्धा संपल्यावर त्याचे निकाल सोशल मीडियावर पोस्ट कराच, शिवाय ज्यांनी उत्तम अशी उत्तरं दिली असतील त्यांना फोन/ई-मेलद्वारे कामासाठी संपर्क करा.

५. हॅशटॅगचा वापर (#)

कोणत्याही सोशल मीडियावर हॅशटॅग हे इतर शब्दांपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोचतात. त्यामुळे आपण आपल्या वेगवेगळ्या पोस्ट्समध्ये त्याचा वापर करू शकता. जसे आपल्या आताच्या कर्मचाऱ्यांना #Life_at_Smart_Udyojak असे टॅग्स वापरायला सांगणे किंवा एखाद्या पदासाठी कर्मचारी नेमण्याची पोस्ट असल्यास #JobOpportunity असा हॅशटॅगसुद्धा आपण वापरू शकता.

आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून विविध गोष्टींसाठी विविध हॅशटॅग आपण तयार करू शकता, परंतु एक लक्षात ठेवा की हे टॅग्स आपण सतत वापरात ठेवा नाही तर ते इतरांच्या पोस्ट्सच्या मागे जाऊन त्यांचा काहीच फायदा होणार नाही.

६. पेड प्रमोशनचा वापर

आपण सध्या जी सोशल मीडिया टूल्स वापरत असाल ती मोफत असतील. जसे फेसबुक पेज तयार करून त्यावरून पोस्टिंग करणे, विविध विषयांवर ट्विट करणे वगैरे. याशिवाय सर्व सोशल मीडिया टूल्स पेड प्रमोशन अर्थात पैसे भरून केलेले प्रमोशन आपल्याला उपलब्ध करून देतात.

यांचा वापर करून आपण आपल्याला हव्या त्या लोकांपर्यंत आपली पोस्ट पोचवू शकता. उदा., आपल्याला जर आपल्या हॉटेलसाठी आचारी नेमायचा आहे, तर खाद्यपदार्थ बनवण्यात रस असलेल्या किंवा हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या लोकांना आपण टार्गेट (ध्येय) ठेऊन त्यानुसार प्रमोशन करू शकता.

याशिवाय आपली कल्पनाशक्ती लढवून आपण विविध पद्धतीने आपल्या उद्योगासाठी योग्य व्यक्तीची निवड करू शकता. परंतु यात एक लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे ते म्हणजे एखाद्या व्यक्तीला नोकरी देणे नक्की करण्या आधी त्याला प्रत्यक्षातसुद्धा भेटा कारण काही वेळा खरी व्यक्ती आणि सोशल मीडियावरील तीच व्यक्ती यांत अंतर असू शकते. त्यामुळे आपण प्रत्यक्ष अनुभव न घेता कुठलीही वचने देऊ नका.

– शैवाली बर्वे
shaivalibarve@gmail.com

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?