जाणून घ्या आपल्या मनाची कार्ये


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


मित्रांनो, शरीर, मन व बुद्धीचा एकमेकांशी कसा संबंध आहे. आपल्या मनाने ठरवल्यावर, आपण सर्व गोष्टी करतो. आता आपण मनाची कार्ये कोणती, ती कशी केली जातात, ते पाहू या. आपण या विषयाची ओळख अत्यंत सोप्या पद्धतीने व समजेल अशा शब्दांत करून घेऊ.

येथे आपण तांत्रिक, शास्त्रीय वर्णन न करता, मनाच्या कार्यांच्या व्यावहारिक वापराविषयी चर्चा करू या. म्हणजे, आपल्याला नक्की काय व कसे करायचे आहे, ते कळण्यास मदत होईल.

मन हे २४ तास कार्यरत असते. काही वेळा तुम्ही त्याचा स्वेच्छेने वापर करता. आपण मागे वर्णन केल्याप्रमाणे तुम्ही मनाच्या मूडच्या आहारी जात नाही ना, हे पाहणे गरजेचे आहे. मनाची बरीच कार्ये ते स्वत:च करत असते. ती हितकारकही असतात; पण बर्‍याच वेळा आपण मनाला सूचना देऊन आपल्याला हवी ती कामे करून घेणे फायद्याचे ठरते.

आपली ओळख, अनुभव घेणे, मुख्य अवयवांची कार्ये, पचन, वागण्यातील समतोल, स्वप्ने इत्यादी कामे अव्याहत व आपोआप चालू आहेत. याशिवाय अनेक कार्ये मन करते व आपण त्यास ती करावयास लावू शकतो.

विचार हे मनाचे चलन आहे. चांगले, वाईट, खोल, उथळ, माहितीचे, पर्यायांचे, तर्कांचे, विश्‍लेषणाचे, सुखाचे, दु:खाचे, आनंदाचे, भूतकाळाचे, भविष्याचे, चिंतेचे, पैशांचे, आपले, दुसर्‍याचे, जगाचे, राजकीय, आध्यात्मिक, शरीराचे, जन्माचे, मृत्यूचे असे शेकडो प्रकारचे लाखो विचार आपण करीत असतो. दिवसाला आपण साधारण ५० हजार विचार आपण करतो. यातूनच मनाची कार्ये चालू असतात.

आपण कोणते विचार करतो, त्यावरून आपल्या आयुष्याची दशा व दिशा ठरत असते. त्यावरूनच आपले ज्ञान, यश, संपत्ती, प्रसिद्धी, प्रगती होते. म्हणून मनाची जाणीव होऊन किती वेळा आपण त्यावर ताबा ठेवून त्याच्याकडून आपल्या हिताचे काम करून घेतो, हे महत्त्वाचे ठरते.

माहिती मिळविणे व संकलन : आपल्या दैनंदिन जीवनात आपण प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे माहिती मिळवितो ती प्रथम मनच ग्रहण करते. जसे नाव, क्रिकेटचा सामना, नवीन शब्द, सिनेमा, जाहिरात, व्यवसायाची माहिती, वस्तूंचे भाव, बातम्या, अशी शेकडो प्रकारची माहिती मन ग्रहण करते आणि मेंदूत कुठे तरी ठेवून देते.

त्या माहितीबरोबर तिचे महत्त्व व तिच्याविषयीच्या भावनाही संग्रहित केल्या जातात. हा माहितीचा साठा कायम वाढतच जातो. पुढे आपल्या गरजेनुसार ही माहिती आपण परत आठवतो, वापरतो, सुधारतो व परत ठेवून देतो.

गणित : तुम्ही रिक्षाने गेलात व तुमचे १७ रुपये झाले. तुम्ही २० रुपये रिक्षावाल्याला दिल्यावर ३ रुपये परत घेता. हे सर्व तुम्ही मनाने व मनात करता. अशा तर्‍हेचे शेकडो हिशेब आपण मनाने करतो. काहींना ते जमतात, आवडतात, काहींना नाही. हा आवडीचा, गरजेचा व सवयीचा भाग आहे.

वैयक्तिक, व्यावसायिक प्रसंगात दिवसभरात शेकडो वेळा हे गणिताचे कार्य आपण सहज पार पाडतो. दोन चपात्या, बस नं. ११, दुसरा मजला, २० टक्के सूट, ५ वर १ फ्री, १४ टक्के सर्व्हिस टॅक्स, अशा अनेक प्रकाराने मनाचे हे कार्य चालू असते.

तर्क : आपल्या आयुष्यातील अनुभव, आपले शिक्षण व परिस्थितीनुसार असलेल्या समस्येचा विचार आपण निरनिराळे तर्क लावून करतो. यामध्ये आपण जर-तर विविध पर्याय असे विचार करतो. आपण जे छोटे-मोठे निर्णय घेतो, ते या तर्कशक्तीवर आधारितच असतात.

त्यांचा आपल्या आयुष्यावर फार मोठा परिणाम होतो. अगदी सिग्‍नल नसताना रस्ता ओलांडणे, कॉलेजात अमुक शाखेचे शिक्षण घेणे, आयुष्याचा जोडीदार निवडणे, व्यवसायातील निर्णय, गुंतवणुकीचे निर्णय अशा कित्येक ठिकाणी आपण मनाचे हे कार्य वापरात आणतो.

प्रत्येक ठिकाणी जोखीम ही असतेच, पण त्याचा अभ्यास करून निर्णय घेऊन पुढील अंमलबजावणी करावीच लागते. तर्काच्या वापराने कोणताही निर्णय न घेणार्‍यास, कोणतेही यश मिळत नाही.

एकाग्रता : हातात असलेले काम वा समस्या सुटेपर्यंत त्यांवर लक्ष देऊन काम करणे म्हणजे एकाग्रता. धरसोड वृत्ती असलेल्या माणसाला कोणतेही यश मिळत नाही. एखादी समस्या सोडवायला, एखादी कल्पना विकसित करायला किंवा योजना बनवायला मनाचा वापर करतो. आपले संपूर्ण मन त्याच एका विचाराने व्यापलेले असते.

आपले संत, शास्त्रज्ञ, स्वातंत्र्यसैनिक त्या त्या वेळी त्यांच्या ध्येयाने प्रेरित झाले, त्यांनी त्यांचे तन-मन एकाग्र केले आणि ध्येय साध्य केले. एकाग्रतेसाठी प्रयत्न करावे लागत नाहीत. प्रश्‍न हा आहे की, मग्‍न एकाग्र करण्यासाठी आपला प्रश्‍न, विषय, समस्या कोणती? आपलं ध्येय काय? एकदा ते निश्‍चित झालं, की मन आपोआप एकाग्र होतं, दुसरीकडे लक्ष जातच नाही. मन एकाग्र झाल्यावर कोणत्याही समस्येचे उत्तर मिळते.

कल्पनाशक्ती : आजपर्यंत लागलेले शोध, जसे की टी.व्ही., मोबाइल, औषधे, वाहने, इमारती ही सारी मनाच्या कल्पनाशक्तीचीच उदाहरणे आहेत. आपण ज्या गोष्टीची कल्पना करतो व ज्यावर विश्‍वास ठेवतो, ती गोष्ट आपण करू शकतो.

तुम्हाला जी गोष्ट हवी आहे, करायची आहे, त्याची तुम्ही कल्पना करू शकता, त्यावर विचार करू शकता, तेव्हाच त्याची योजना करू शकता, त्यावर अंमल करू शकता. ज्याच्या जोरावर सर्व यशस्वी लोकांनी करोडो रुपयांचे उद्योग उभे केले, ती कल्पनाशक्ती आपल्याला मोफत उपलब्ध आहे.

भावना : एखाद्या प्रसंगी मनात उत्पन्न होणार्‍या प्रवाहांना भावना म्हणतात. मनाच्या कार्यांपैकी सर्वात प्रभावी व परिणामकारक असे हे कार्य आहे. आनंद, दु:ख, राग, प्रेम, द्वेष, तिरस्कार, भीती, निराशा, वैराग्य, लोभ, कृतज्ञता, श्रद्धा, भक्ती अशा शेकडो तर्‍हेच्या भावना आपल्या मनात कायमच्या असतात. काही भावना सकारात्मक व काही नकारात्मक असतात. सकारात्मक भावना असताना आपण उत्साहाने जास्त काम करू शकतो. जीवनाकडे बघण्याचा विधायक दृष्टिकोन आपण सकारात्मक भावना ठेवून बाळगू शकतो.

मनात भावना निर्माण होणे नैसर्गिक असले तरी त्यांवर नियंत्रण मिळविणे आपल्या हातात आहे. असे नियंत्रण मिळविल्याने आपण जीवनात वाया जाणारी प्रचंड शक्ती वाचवू शकतो. नाही तर आपला बराच वेळ व मानसिक शक्ती नकारात्मक गोष्टींत खर्च होते व आपण आपल्या ध्येयापासून दूर जातो.

उदा. तुम्हाला जेव्हा राग येतो वा निराशा येते, त्यात २-३ तास किंवा दिवसही फुकट जातात. त्यामुळे परिस्थितीत काहीही फरक पडत नाही. उलट, या भावनेला थारा न देता, दुसर्‍या सकारात्मक भावनेला वाव दिला, तर वेळ व ऊर्जा (मानसिक शक्ती) सत्कारणी लावता येते.

आयोजन : तुम्हाला व्यवसाय करायचा असो, घर बांधायचे असो, की लग्‍न करायचे असो, तुम्हाला योजना बनवावी लागते. योजना बनविणे म्हणजे, जी गोष्ट तुम्ही करू इच्छिता ती घडलेली पाहणे, त्यासाठी लागणारी साधने, पद्धती व कृती यांची तपशीलवार यादी तयार करणे, त्यातील पायर्‍यांची आखणी, मांडणी करणे.

आयोजन करताना आपण शांत बसून, योजनेचा सांगोपांग विचार करून ती कागदावर उतरवितो. हे सर्व मनाचेच कार्य आहे, हे स्पष्टच दिसते ना? एखादी इमारत वा पूल बांधण्यापूर्वी त्याचा आराखडा वास्तुविशारद कागदावर काढतो, त्यासाठी सर्व आकडेमोडही तो करतो. याचाच अर्थ तो बांधत असलेला पूल तो आधी मनाने बनवितो व मनानेच बघतो, असा आहे. असाच मनाचा वापर आपण आपल्या इच्छापूर्तीसाठी करू शकतो.

स्मरणशक्ती : याचा अर्थ आपण सर्व माहिती आपल्या मनात साठवितो असा घेऊ नका. माहिती जेथे ठेवली आहे तिथून (मेंदू, बुद्धी वगैरे) ती खेचून स्मरणात आणण्याचे काम मन करते. यासाठी तुम्ही ती माहिती कोणत्या भावनेने जमविली आहे, किती वेळा वापरली आहे, हे सर्व महत्त्वाचे ठरते.

उदा. तुमचे आवडते गाणे, जे तुम्ही शेकडो वेळा ऐकले व गुणगुणले असेल ते तुम्हाला लगेच आठवेल; पण तुम्हाला न आवडणार्‍या विषयाची तुम्ही पाठ करून ठेवलेली माहितीही तुम्हाला कदाचित आठवणार नाही, असे होते ना? अशी ही स्मरणशक्ती, बुद्धीच्या बरोबरीने तुमच्या महत्त्वाच्या कामात वापरून तुम्ही यशस्वी व्हाल.

विश्‍लेषण : हे कार्य मनाकडून करून घ्यायचा आपल्याला मनस्वी कंटाळा! जीवनात व व्यवसायातील आव्हानांचा विचार व समस्यांना सोडवण्यासाठी विश्‍लेषण पद्धती आपण वापरतो. जशी लहानपणी आपण कोडी सोडवायचो, त्याचप्रमाणे पुढील आयुष्यात आपल्याला आव्हानांचा सामना करायचा असतो, त्यात मनाच्या इतर कार्यांचा वापरही आपण करतो.

जसे एकाग्रता, माहिती संकलन, कल्पनाशक्ती वगैरे. समस्यांचा समग्र विचार, पर्यायांचा तौलनिक विचार, जोखिमांची मोजणी, आवश्यक साधनांचा विचार, अशा विविध पायर्‍या विश्‍लेषण करताना वापराव्या लागतात.

आत्मविश्‍वास व धैर्य

आपण बर्‍याच वेळा काही ना काही करायचे ठरवतो, पण बर्‍याचदा काही गोष्टी आपण मधेच सोडून देतो. तेव्हा आपण आत्मविश्‍वास या मनाच्या कार्याला कामाला लावत नाही. एखादे अपयश वा एखादी चूक आपला आत्मविश्‍वास व धैर्य कमी करते.

आपण मनाची समजूत घालतो की, ते काम आपण करू शकत नाही, ते आपल्या नशिबात नाही किंवा ते काम करण्याचे कौशल्य आपल्यात नाही. वास्तविक आपण त्यातून माघार घेतो; पण त्या वेळी आपण असेही म्हणू शकतो की मी परत प्रयत्न करून बघतो.

मी आधीच्या चुकांचा विचार करून त्या दुरुस्त करतो किंवा त्या विषयातील तज्ज्ञाला विचारतो; पण आत्मविश्‍वासाअभावी आपण यातले काही न करता, स्वत:वर पराभवाचा शिक्का मारून मोकळे होतो किंवा परिस्थितीला तरी दोष देतो. हाती घेतलेली गोष्ट मी पूर्ण करीनच, असा विश्‍वास व धैर्य ठेवल्यास आपण कोणतीही गोष्ट करू शकतो.

वरील चर्चेवरून तुमच्या लक्षात आले असेल की, मन हे प्रवाही आहे, ते संवेदनशील आहे; पण आपण मनाहून वेगळे आहोत व आपला त्यावर अधिकार आहे.

जेवढे आपण मनाच्या आहारी जाऊ तेवढे आपल्या ध्येयापासून दूर जाऊ. आपल्या पूर्वजांनी म्हटल्याप्रमाणे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर असे षड्रिपू आपल्या मनाला दूषित करावयास तत्पर आहेत. तर प्रत्येक वेळी आपण हा प्रश्‍न विचारू शकतो की, मन आता अमुक कर वा करू नको, असे म्हणते आहे ते माझ्या व माझ्या ध्येयाच्या हिताचे आहे का? याचा निर्णय आपण घेऊन त्याप्रमाणे कार्य करावे वा वेळेचे नियोजन करावे.

आपल्या जीवनात घडणार्‍या घटनांची जबाबदारी आपणच घ्यायला हवी, कारण आपण मनाने घेतलेल्या निर्णयांचाच व कृतीचाच तो परिणाम आहे. म्हणून, आता नव्याने मनाच्या त्या आवश्यक कार्याचा योग्य वापर करून आपण वेगळे हितकारक परिणाम घडवून आणू शकतो.

‘मनाची कार्ये’ या लेखाचा उद्देश होता की, आपण आपल्या मनाच्या आत डोकावून पाहावे व याचा विचार करावा की, मन आपल्याला अमुक तर्‍हेने वागायला लावते, की आपण मनावर ताबा ठेवून आपल्याला पाहिजे ते घडवू शकतो. मानवाची प्रगती, इतिहास व भूतकाळातील महान यशस्वी व अयशस्वी व्यक्ती याचीच साक्ष देतात, की ज्यांनी मनाच्या कार्यांना सकारात्मक व विधायक कामांसाठी वापरले, ते यशस्वी, समृद्ध व ज्ञानी झाले.

– सतीश रानडे

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?