‘उद्योग ज्योतिषा’ची मुलतत्त्वे


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


‘उद्योग ज्योतिष’ हे अतिशय वेगळे शास्त्र असल्यामुळे त्याबद्दल समाजापेक्षा गैरसमज जास्त आहेत. बर्‍याच लोकांना ‘उद्योग ज्योतिष’ म्हणजे ज्योतिषाचा उद्योगामध्ये वापर एवढा मर्यादित अर्थ वाटतो आणि ते या शास्त्राचा त्यांच्या उद्योगासाठी वापर करायला कचरतात. या लेखामध्ये आपण उद्योग ज्योतिषाची सर्वांगीण ओळख करून घेऊ या आणि त्याची मूलतत्त्वे जाणून घेऊया.

असेच गैरसमज बायोटेक्नॉलॉजी या विषयाबद्दलदेखील आहेत. याचे भाषांतर जीवशास्त्राचे किंवा जीवशास्त्रातील तंत्रज्ञान असे केले पाहिजे. व्यवहारात याचे भाषांतर जीवशास्त्रात तंत्रज्ञानाचा उपयोग असे केले जाते, जे अर्धवटच नाही तर चूकदेखील आहे. अशा चुकीच्या भाषांतरामुळे मूळ विषयाबद्दल गैरसमज निर्माण होतात आणि लोक त्यापासून दुरावतात.

उद्योग म्हणजे क्रियाशील असण्याची स्थिती किंवा क्रियन्वितता. अशा क्रिया ज्यामुळे समाजात मूल्यवर्धन होऊ शकते. ज्योतिष म्हणजे विशेष ज्ञान. तेव्हा उद्योग ज्योतिष म्हणजे विशेष ज्ञानाने उद्योगाचे संवर्धिकरण. उद्योग कोणता करावा, कसा करावा, कशाप्रकारे करावा याबद्दलचे मार्गदर्शन प्राचीन विद्येच्या माध्यमातून.

उद्योगाचे दोन पैलू अंतर्गत आणि बाह्य. अंतर्गत म्हणजे उत्पादन, उत्पादन प्रक्रिया, कार्यक्षमता, वेग आणि बाह्य म्हणजे विपणन, वितरण, किंमत, प्रभावीपणा, जाहिरात.

उद्योजकाचे दोन पैलू अंतर्गत आणि बाह्य. अंतर्गत म्हणजे स्वभाव, गुण, कर्तृत्व, कौशल्य, संस्कृती आणि बाह्य म्हणजे मालमत्ता, कौटुंबिक व्यवसाय, सामाजिक परिस्थिती, शिक्षण.

या पैलूंचा वेळेबरोबर मेळ घालणे म्हणजे उत्कृष्ट उद्योगाची मुहूर्तमेढ रचणे. हा मेळ घालण्याचे कार्य करणारे शास्त्र म्हणजे उद्योग ज्योतिष.

या मालिकेमध्ये आपण उद्योग ज्योतिषाच्या मूलतत्त्वांचा उहापोह, उपयोजन आणि उपयोग पाहू या.

१. भौतिक प्रकटीकरण :

Physical Manifestation प्रकृतीचा प्रत्येक पैलू कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रकट होत असतो. उदाहरणार्थ हिरवे शेत म्हणजे चांगले पीक, स्नायुबद्ध शरीर म्हणजे उत्तम प्रकृती, चेहर्‍यावर तेज म्हणजे विद्वान माणूस. हिरवे शेत हे चांगल्या पिकाचे भौतिक लक्षण आहे. स्नायुबद्ध शरीर हे चांगल्या प्रकृतीचे भौतिक लक्षण आहे किंवा चेहर्‍यावरचे तेज हे विद्वत्तेचे प्रतीक आहे. प्रतिकावरून आपण प्रकृतीपर्यंत पोहचू शकतो.

येथे मला एक ‘रिडर्स डायजेस्ट’मध्ये आलेली विनोदी गोष्ट आठवते. इंग्लंडमध्ये एका माणसाने वृत्तपत्रामध्ये एक जाहिरात वाचली. माळी हवा. मुलाखतीसाठी येताना आपले कामाचे कपडे बरोबर आणावेत. ती जाहिरात वाचून हा माणूस आपले कामाचे कपडे घेऊन मुलाखतीसाठी गेला.

त्याने आपला अ‍ॅप्रॉन, शर्ट आणि विजार बरोबर नेली होती. मुलाखतकर्ती एक वृद्ध स्त्री होती आणि तिला आपल्या बंगल्यातल्या बागेसाठी माळी हवा होता. तिने त्याची विजार नीट पाहिली आणि लगेच चांगल्या पगारावर नोकरी देऊ केली.

या माणसाला उत्सुकता होती, फक्त कपडे पाहून कशी नोकरी दिली. तेव्हा त्याने त्या स्त्रीस हा प्रश्न विचारला. तिने सांगितले मला फक्त हे पाहायचे होते की तुमची विजार गुढघ्यावर झिजली आहे की ढुंगणावर! यावरून कळते की तो माळी कामावर असताना कशाप्रकारे काम करतो किंवा नुसताच आराम करत असतो.

येथे ती विजार म्हणजे त्याच्या कष्टकरी स्वभावाचे भौतिक प्रकटीकरण आहे. तुम्ही जे जे करता, ते ते तुमच्या अंतर्गत पैलूंचे भौतिक प्रकटिकरण असते. त्यापर्यंत पोहचायला जे विशेष ज्ञान आपल्याला मदत करते ते म्हणजे ‘उद्योग ज्योतिष’.

२ . शक्ती संशोधन

  • कुत्र्याला माणूस चावला ही बातमी होते, परंतु माणसाला कुत्रा चावला ही बातमी होत नाही.
  • खेडेगावातून येऊन, झोपडपट्टीत राहून रस्त्यावरच्या दिव्याखाली अभ्यास करून त्याने दहावीची परीक्षा पास केली, ही बातमी होते.
  • पाय नसताना त्याने धावण्याची शर्यत जिंकली. (ऑस्कर पिस्टोरिस) बातमी होते.
  • अगदी छोट्या सैन्याने मोठ्या सैन्याचा पराभा केला, बातमी होते.
  • डेविडने गोलियाथला हरवले, बातमी होते.
  • जनतेला नेहमीच उंदीरदोगचे आकर्षण वाटत असते.

हिंदी सिनेमातदेखील कसे दाखवले जाते? खलनायकाकडे सगळे काही असते. पैसे, अडका, नोकरचाकर, गाड्या, अधिकार आणि नायकाकडे काही म्हणजे काहीच नसते. असे असतानादेखील नायक शेवटी खलनायकाचा फडशा पाडतो.

आपल्या या मनोवृत्तीचे आपल्या जीवनात काय परिणाम होतात? यामुळे आपल्या नकळत खालील समज आपल्या मनात दृढ होतात.

१. आपण काही तरी भव्य दिव्य किंवा आपल्या सामर्थ्याबाहेरची गोष्ट केली तरच आपण नावाचे.
२. दुसऱ्या कोणी केली म्हणजे आपल्याला पण ती जमायलाच पाहिजे.
३. त्यासाठी ती तशी आपण केलीच पाहिजे.

यामुळे आपण आपल्या आवाक्याबाहेरची, मग तो आवाका बुद्धीचा असेल, पैशाचा असेल किंवा वेळेचा असेल, याचा विचार न करता पळत्या मृगजळाच्या मागे लागतो आणि अत्यंत विफलतेचे, संघर्षाचे आयुष्य ओढवून घेतो. त्यात संघर्षाला पर्याय नाही, ‘नो पेन नो गेन’ असे म्हणत घाण्याचा बैलासारखे झिजतो. याबाबत उद्योग ज्योतिषाचा किंवा प्राचीन विद्येचा दृष्टीकोन पाहू या.

पांडवांचीच गोष्ट घ्या ना. क्षत्रिय असल्यामुळे देशाचे संरक्षण करणे ही त्यांची जबाबदारी होती, धर्म होता. त्यासाठी शस्त्रविद्या शिकणे क्रमप्राप्त होते. शस्त्रांची निवड मात्र त्यांनी आपल्या शक्तीस्थानांस अनुकूल अशीच केली. भीमाने त्याच्या अफाट ताकदीला अनुसरून गदायुद्धाचे विशेष प्रशिक्षण घेतले.

अर्जुन आजानुबाहू म्हणजे ज्याचे बाहू उभा असताना गुढघ्यापर्यंत पोहचतात असा आणि सव्यसाची म्हणजे दोन्ही हात सारख्याच सहजतेने वापरू शकतो असा होता. हे धनुर्विद्येस अनुकूल होते त्यामुळे त्याने धनुष्यबाणाची निवड केली.

युधिष्ठिराची प्रवृत्ती सरळ व थेट विचार करण्याची होती त्यामुळे त्याने आपल्या विचारसरणीशी रुचणारे असे शास्त्र पेलले – भाला. आता राहिले ते नकुल आणि सहदेव. यांची खासियत होती त्यांचे लवचिक शरीर, त्यामुळे त्यांनी निवड केली ती तलवारीची. इतर शस्त्रे ते शिकले निश्चित, परंतु आपली कारकीर्द त्यांनी आपल्या शक्तिस्थानाच्या सभोवतीच बांधली.

या तत्त्वाचा वापर आपण आजच्या युगात कसा करून घेऊ शकतो बघा. आपली कारकीर्द, शिक्षण घडवण्यासाठी आपली शक्तिस्थानांचे संशोधन करणे महत्त्वाचे आहे. ही शक्तिस्थाने प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी अशा क्रमाने असतात. यापैकी प्रायमरी शक्तिस्थाने अशी

१. कुटुंब
२. क्रिया
३. जागा
४. छंद
५. क्षमता
६. समाज
७. संस्कृती
८. प्रकृती
९. मित्रपरिवार, संपर्क

यातील प्रत्येक शक्तीस्थान पुढे सेकंडरी आणि टर्शरी अशा प्रकारे विभागले जाते.

आपण आपल्या शक्तिस्थानास अनुकूल असे शिक्षण घेतले किंवा करिअर निवडले तर आपल्याला यश सहजी मिळू शकण्याची शक्यता वाढते. यामुळे तुम्ही एक वेळ ‘बातमी’ नाही होऊ शकणार, परंतु जीवनात तुम्हाला यश, समाधान आणि संतोष यांची प्राप्ती नक्कीच होईल.

– आनंद घुर्ये
संपर्क : 9820489416
(लेखक प्राचीन विद्येचे अभ्यासक आहेत.)

Author

  • आनंद घुर्ये

    आनंद घुर्ये हे लौकिकदृष्ट्या अभियंता व एमबीए असून अनेक मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये त्यांनी वरिष्ठ पातळीवर नोकरी केली आहे. थायलंड येथे नोकरीनिमित्ताने असताना अनेकांनी त्यांना भारतीय प्राचीन संस्कृतीबद्दल प्रश्न विचारले. यातून प्रेरणा घेऊन त्यांनी प्राचीन भारतीय ज्ञानाचा अभ्यास सुरू केला. तसेच ते ज्योतिषी म्हणूनही कार्यरत आहेत. उद्योग ज्योतिष हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?