गडचिरोली : उद्योगनिर्मितीस पोषक वातावरणाचे वरदान लाभलेला जिल्हा


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


गडचिरोली हे नाव ऐकल्यावर साधारणतः डोळ्यासमोर एक चित्र उभे राहते. ते असे असते- एक आदिवासी लोकांचा महाराष्ट्राच्या अगदी पूर्वेकडे असणारा आधीच्या मध्य प्रदेश व आता छत्तीसगढची सीमा लाभलेला एक जिल्हा. या जिल्ह्याची सीमा आधीच्या आंध्र प्रदेश व आताच्या तेलंगणा राज्याला लागून आहे.

नक्षलवादाशी संबंधित बातमी आली की, हा प्रकार गडचिरोलीमध्ये घडला असावा अशी एक धारणा असते किंवा एखादा सरकारी अधिकारी शिक्षा म्हणून गडचिरोलीत बदली करून पाठवतात. अशी ओळख असणाऱ्या जिल्ह्यातील उद्योगाविषयी लिहणे म्हणजे एक धाडसच आहे.

या जिल्ह्याविषयी आणखी थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊ; मग त्यानंतर या जिल्ह्यातील उद्योगाविषयी जाणून घेऊयात. या जिल्ह्यात चालणारे उद्योग कोणते? ते जर या जिल्ह्याबाहेर वाढवता आले तर प्रत्यक्ष कसा फायदा होऊ शकतो? याबद्दल सविस्तर विश्लेषण पाहू या. महाराष्ट्र राज्याचाच एक भाग असलेला गडचिरोली हा जिल्हा तसा महाराष्ट्राच्या राजधानीपासून साधारणतः आठशे ते हजार किमी अंतरावर आहे.

chaprala wild life century

गडचिरोली हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळानुसार चौथ्या क्रमांकाचा मोठा जिल्हा आहे. रस्ते, रेल्वेमार्ग (फक्त १८.५ किमी लांबीचा रेल्वेमार्ग), दळणवळणाच्या फारशा सोयी नसलेल्या या जिल्ह्यात फक्त दोन नगरपालिका आहेत. एकही महानगरपालिका नाही. एकूण बारा तालुके, तर ४६७ ग्रामपंचायतींत १ हजार ६७९ गावांचा समावेश होतो. जास्तीत जास्त आदिवासी (प्रामुख्याने माडीया गोंड) लोकसंख्या असणारा हा जिल्हा तसा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे.

रस्त्यांचा विकास फारसा नसल्याने उद्योगाला व कारखानदारीला पुरेसे पोषक वातावरण निर्माण झाले नाही. शिक्षणाच्या सोयीसुविधासुद्धा येथे तुरळकच.

आरोग्याच्या बाबतीतही फार उपाययोजना केलेल्या नाहीत. या जिल्ह्याचा तीन चतुर्थांश भाग हा जंगलाने व्यापलेला आहे. प्राणहिता (वर्धा व पैनगंगा नद्यांच्या मीलनानंतर प्राणहिता हे नाव आहे.) व इंद्रावती या नद्या गोदावरी नदीच्या उपनद्या आहेत. याशिवाय इतर काही लहान नद्या येथे आहेत.

गोदावरी नदी ही महाराष्ट्र, तेलंगणा राज्यांतून वाहत जाऊन परत गडचिरोलीमध्ये जाते. जास्त जंगले असल्यामुळे वन्यजीव व वनस्पतींचे प्रमाण जास्त आहे. काही टेकड्यासुद्धा आहेत. भामरागडचे प्रसिद्ध अभयारण्ये गडचिरोली जिल्ह्यात आहे. याशिवाय चपराळा अभयारण्य, प्राणहिता अभयारण्य व कोलामार्का वनसंवर्धन राखीव क्षेत्र हीसुद्धा अभयारण्य गडचिरोली जिल्ह्यात आहेत. याशिवाय मानवनिर्मित प्रकल्पामध्ये डॉ. अभय बंग व राणी बंग यांनी सुरू केलेले शोधग्राम गडचिरोलीपासून सोळा किमी अंतरावर आहे.

येथे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून तरुण निर्माण या कार्यक्षम कार्यक्रमात भाग घेऊन स्वतःचा शोध घेण्यासाठी येत असतात. तसेच बाबा आमटे यांचे सुपुत्र डॉ. प्रकाश आमटे व मंदाकिनी आमटे यांनी सुरू केलेला लोकबिरादरी प्रकल्प याच जिल्ह्यात आहे. हे ठिकाण भामरागडपासून अवघ्या सहा किमी अंतरावर आहे. अजीम नवाज राही यांची सामाजिक संस्थासुद्धा गडचिरोलीमध्येच आहे. महाराष्ट्रातील सर्वात भीषण अशा या अभावग्रस्त जिल्ह्यात सामाजिक कामे रुजली आहेत.

bamboo baug in Gadchiroli

वाढली आहेत याचीसुद्धा कारणे आहेत. येथील निसर्गरम्य वातावरण पोषक आहे. पावसाळ्यात मात्र नद्या उग्र रूप धारण करतात. आता या जिल्ह्यात जास्तीत जास्त प्रमाणात लोकजीवन हे शेतीवर आधारित आहे. त्यात भाताचे प्रमाण जास्त आहे. त्यावर आधारित भातसडीच्या गिरण्या हा उद्योग येथे चालतो. जंगलाचे प्रमाण जास्त असल्याने लाकूडकटाईचा व्यवसायसुद्धा मोठ्या प्रमाणात चालतो. कागदनिर्मिती उद्योग हासुद्धा येथील एक महत्त्वाचा उद्योग आहे.

रेशीमनिर्मिती व कोसानिर्मिती हे उद्योग काही प्रमाणात गडचिरोली जिल्ह्यात चालतात. काही दिवसांपूर्वी एक गोष्ट ऐकली होती. एका पादत्राणे बनवणाऱ्या कंपनीने आफ्रिकेच्या जंगलात दोन विक्रेते पाठवले. त्यांनी जाऊन तेथे पाहिले तर लोक बाहेरच्या जगाशी अनभिज्ञ होते. त्यांच्यापैकी कोणीही पादत्राणे घालत नव्हते.

नेहमीच्या जीवनातील अनुभवापेक्षा अगदी वेगळाच अनुभव त्यांना आला. त्यातील एकाने कंपनीला कळवले की, इथे थोडासुद्धा व्यवसाय करणे शक्य नाही, कारण या ठिकाणी कोणालाच पादत्राणे माहीत नाहीत व इथे पादत्राणे कोणीच वापरत नाही. याउलट दुसऱ्या विक्रेत्याने कंपनीला कळवले की, इथे व्यवसायाची फार मोठी संधी उपलब्ध आहे, कारण इथे कोणीच पादत्राणे वापरत नाही. त्यामुळे सगळेच्या सगळे आपले ग्राहक बनू शकतात.

परिस्थिती दोन्ही विक्रेत्यांपुढे सारखीच होती. मात्र त्यांच्या दृष्टिकोनामध्ये फरक होता. गडचिरोली जिल्हा शासनाने उद्योगरहित जिल्हा म्हणून घोषित केला आहे. याचा अर्थ असा की, येथे अजून उद्योगाची वाढ झालेली नाही. मोठ्या प्रमाणात उद्योगाची निर्मिती करण्यासाठी अत्यंत पोषक वातावरण येथे आहे. नवीन जग वसवण्याची क्षमता ठेवणाऱ्या उद्योजकांसाठी गडचिरोली जिल्हा हा वरदान ठरणारा जिल्हा आहे.

इथे नैसर्गिक साधनसंपत्ती व पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. लोकांना फार वस्तू व उत्पादने माहीत नाहीत. वस्तू उत्पादनासाठी व विक्रीसाठी यामुळे एक खुले मैदान आहे. बांबू मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने बांबूपासून बनणारी उत्पादने स्वस्तात निर्माण करून आंतरराष्ट्रीय बाजारात विकण्यासाठी पूर्ण वाव आहे. शिक्षणसंस्थाची वाढ होण्याच्या मार्गावर आहे. अलीकडेच शासनाने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांकरिता गोंडवाना विद्यापीठाची स्थापना केली आहे. शिक्षणाच्या सोयीसुविधांबरोबरच पर्यटनाचा व्यवसायसुद्धा या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वसण्यासारखा आहे.

पर्यटनाच्या जोडीने हॉटेल व इतर व्यवसाय अतिशय मोठ्या प्रमाणावर उभारले जाऊ शकतात. अकुशल कामासाठी मोठ्या प्रमाणात मजूर/कामगार उपलब्ध असणारी ही भूमी आहे. थोडेसे धाडस करू शकणारे व थोडी अधिक समजदारी असणारे उद्योजक या ठिकाणी चांगला जम बसवू शकतात. जे काही घडवण्याची आपली इच्छा आहे ते घडवण्याची खूप मोठी संधी भारतात गडचिरोली जिल्ह्यात जेवढी आहे तेवढी कुठेही नाही.

ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे. विषय शेवटी दृष्टिकोनाचा आहे. बांबूपासून टोपल्या, चटया अशा वेगवेगळ्या प्रकारच्या हजारांहून अधिक वस्तू येथील स्थानिक लोक बनवत आहेत. त्यांच्याकडून योग्य मोबदल्यात त्या वस्तू घेऊन योग्य पद्धतीने त्याचे पॅकेजिंग करून विक्री केल्यास अमर्याद फायदा होणार आहे. तेव्हा धाडसी व समजूतदार उद्योजकांनी ही संधी साधण्याची किमया करण्यासाठी तयार व्हावे.

– अमोल कदम
संपर्क : ९७६७००२९५८

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?