‘ओंकार आर्ट’चे गणेश क्षीरसागर यांचा कलात्मक प्रवास

मुंबईत चाळीमध्ये जन्माला येऊन कारकून, कपडा मिल किंवा कुठल्याशा दुकानात काम न करता, कला क्षेत्राची स्वप्ने मनात धरून समोर असणाऱ्या परिस्थितीशी लढून, पुढील पाऊल टाकत कलाकार गणेश क्षीरसागर यांचा प्रवास कला सहाय्यक ते कला शिक्षक आणि पुढे ‘ओंकार आर्ट’ या आर्ट स्टुडिओचे मालक असा झाला.

गणेश क्षीरसागर यांचा जन्म मुंबईतील चाळीत गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे केशकर्तनाचे दुकान होते. गणेश याना धरून पाच भावंड. कमी शिकलेली असली तरी त्यांची आई मुलांच्या शिक्षणाबाबत आग्रही होती. गणेश यांचा लहानपणीपासूनच चित्रकलेकडे कल होता.

शाळेतले कला शिक्षक सोनावणे सर त्यांना नेहमी प्रोस्थाहन देत असे. चिल्ड्रेन्स कॉम्प्लेक्स, वांद्रे या संस्थेमध्ये गेल्यावर त्यांना आपलं भविष्य स्पष्ट दिसू लागलं. तेथील कला विभागाचे प्रमुख पोलाजी सर यांच्या सानिध्यात काम करताना आपण कला क्षेत्रात करीअर करायचं, हा विचार पक्का झाला.

चिल्ड्रेन्स कॉम्प्लेक्समध्ये काही काळ त्यांनी कला सहाय्यक म्हणून काढला. कलेचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी रहेजा स्कूल ऑफ आर्ट, वांद्रे येथे प्रवेश केला. कलेचे शिक्षण घेत असताना घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे इतरही अनेक काम करावी लागली. तरीही चिकाटीने काम करत त्यांनी आर्ट टीचर डिप्लोमा पूर्ण केला व त्यानंतर फाईन आर्टच्या शेवटच्या वर्षी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.

गणेश क्षीरसागर यांना व्यक्तिचित्रणे फार आवडायची. १९८० च्या दशकात बरेच लोक आपल्या आईवडिलांचे किंवा देवदेवतांचे ऑइल पेंटिंग करून घ्यायचे. गणेश यामध्ये पारंगत होते आणि त्यामुळे त्यांना अशी काम मिळत गेली.

याच काळात त्यांचे लग्न झाले व या कामातून मिळणारे पैसे संसार चालवण्यासाठी अपुरे पडू लागले. म्हणून त्यांनी शाळेमध्ये कला शिक्षकाची नोकरी स्वीकारली. नोकरीमुळे थोड्या प्रमाणात आर्थिक स्थिरता आली आणि आपल्या कलेवर लक्ष देता आले.

चित्रकलेबरोबरच गणेश याना शिल्पकलेतही रस होता. चाळीमधील गणपती बनवण्याच्या कार्यशाळा असत. लहानपणी ते तासन तास तिथे बसून त्या कारागिरीचे निरीक्षण करत आणि मातीमध्ये लहान लहान प्राणी पक्षी बनवत आणि त्यांच्या घरी येणाऱ्या गणपतीपुढे गणेश यांचे वडील त्यांनी बनवलेले प्राणी पक्षी आनंदाने मांडत. पुढे कालांतराने गणेश हे त्यांच्या घरातील गणपती स्वतः मातीने बनवू लागले.

त्यांचा गणपतीच्या मूर्तीचे शेजारीपाजारी तसेच मित्रपरिवाराने फार कौतुक केले आणि पुढील वर्षी तू आमच्या घरचा गणपती बनव, असे सांगून टाकले. गणेश यांनी हे आव्हान स्वीकारले आणि शाळेतील नोकरी करून जून-जुलै महिन्यात गणपती बनवण्यास चालू केले. त्या वर्षी केलेल्या गणपतींचे लोकांनी फार कौतुक केले आणि दरवर्षी त्यांच्याकडे गणपतीच्या अनेक ऑर्डर येऊ लागल्या.

गणपतीची काम करताना त्यांना शिल्पकलेविषयी एक आत्मविश्वास निर्माण झाला होता आणि याचदरम्यान त्यांना एक काम आले जे “प्रार्थनालय” या ख्रिश्चन संस्थेशी निगडित होते. यामध्ये त्यांना जीसस आणि मेरी यांचे शिल्प करायचे होते, गणेश यांच्याकडे यापूर्वी गणपती बनवण्याचा अनुभव होता.

त्याची ठेवणं आणि हावभाव जीसस आणि मेरी यांच्या हावभाव पूर्णपणे वेगळे होते, तरीही गणेश यांनी हे आवाहन स्वीकारले आणि ते शिल्प पूर्ण केले. ते शिल्प संस्थेच्या लोकांना फार आवडले आणि हा त्यांच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉंईंट ठरला.

त्यानंतर प्रश्न होता जागेचा, चाळीमध्ये या कामासाठी पुरेशी जागा न्हवती म्हणून त्यांनी उत्तर मुंबईत स्थलांतर केले. त्यावेळे उत्तर मुंबई नुकतीच कुठे विकसित होत होती अनेक अडचणी होत्या, पण गणेश यांनी या सर्व गोष्टींवर मात करत आपले काम चालूच ठेवले.

यानंतर त्यांना ख्रिश्चन संस्थेशी निगडित कामं मिळू लागली.गणेश यांनी माध्यमाच्या बाबतीत काही प्रयोगही केले, त्यावेळी प्लास्टर आणि सिमेंटच्या मुर्त्या बनत असत, त्यामुळे त्या फार जड असत.

गणेश यांनी फायबर ग्लास या माध्यमात मुर्त्या बनवण्यास सुरुवात केली. त्यामुळे मुर्त्या या वजनाने हलक्या आणि अधिक सुबक होऊ लागल्या. मुर्त्यांची सुबक रचना आणि रंगसंगती यात गणेश यांनी फार दर्जात्मक काम केले. त्यावेळी असा दर्जा फार कमी कलाकारांकडे होता.

स्वतंत्र व्यावसायिक म्हणून प्रवासाला सुरुवात

गणेश क्षीरसागर हे नाव मूर्तिकाम म्हणून प्रसिद्ध होऊ लागलं. मुबंई, महाराष्ट्र आणि संपूर्ण भारतभर त्यांनी केलेल्या मूर्ती पोहोचू लागल्या, या कामासाठी त्यांनी भाड्याने एक गाळा घेतला आणि ‘ओंकार आर्ट’ या आपल्या आर्ट स्टुडिओची स्थापना केली. या काळात त्यांना मिळणारी काम वाढू लागली.

शाळेतील नोकरी आणि ही व्यावसायिक काम ही तारेवरची कसरत गणेश करत होते, पण आता वेळ आली होती की त्यांनी शाळा सोडण्याचा निर्णय घेतला. मित्रपरिवाराने त्यांच्या या निर्णयावर पुन्हा विचार करावा असा सल्ला दिला, पण गणेश यांनी निर्णय घेतला होता.

नोकरी सोडून त्यांना पूर्णपणे या व्यवसायात उतरणे, हा फार धाडसी निर्णय होता आणि तो यशस्वी ठरला. पुढे त्यांनी स्वतःची जागा घेतली आणि हे काम चालू ठेवले. गणेश यांचे दर्जेदार काम आणि त्यावरील प्रभुत्व यामुळे हिंदू, जैन अशा अनेक लोकांकडून त्यांना कामे मिळू लागली.

‘ओंकार आर्ट’ला आता पंचवीस वर्षं झाली आहेत. या पंचवीस वर्षांत गणेश क्षीरसागर यांनी अनेक चडउतार पाहिले. तरीही कामातली सुबकता आणि दर्जा कमी होऊ दिला नाही. आजपर्यंत ख्रिश्चन संस्थेशी निगडित साठ चर्च, महत्त्वाच्या व्यक्तींची व्यक्ती शिल्प, हिंदू देवदेवतांच्या मूर्ती, इंटेरियर डेकोरेटिंगशी निगडित बरीच कामे ‘ओंकार आर्ट’च्या पोर्टफोलिओमध्ये मोडतात.

गणेश क्षीरसागर
९९२०१८१५०६ , ९८२०४९८९७३

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?