अफाट संधीची गारमेंट इंडस्ट्री


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


रेडिमेड गारमेंट ही अतिशय मोठी इंडस्ट्री आहे. मराठी माणसाने यात प्रवेश केला पाहिजे. या इंडस्ट्रीत २०२१ साली भारत जगातला चौथ्या क्रमांकाचा उद्योग असेल. जगातील रेडिमेड गारमेंटच्या निर्मितीत १४ ते १८% वाटा भारताचा असेल. त्यातील २०% परकीय चलन मिळेल. तब्बल साडेचार कोटी लोकांना रोजगार मिळेल. विशेष म्हणजे हा व्यवसाय ८०% लहान व मध्यम व्यवसायात मोडतो.

अगदी १५ लाखांपासून मॅन्युफॅक्चरिंगमध्ये उतरता येईल. स्वस्त कामगार व प्रचंड लोकसंख्येचा फायदा घेता येईल. सध्या चीन या उद्योगात प्रथम क्रमांकावर आहे. मागास समजले जाणारे बांगलादेश, व्हिएतनाम, कंबोडियासारखे देश या उद्योगात आघाडी घेत आहेत. बांगलादेशचे ७५% एक्सपोर्ट एकट्या गारमेंट इंडस्ट्रीवर चालतो.

महाराष्ट्रातील अनेक जिल्हा व तालुक्याची ठिकाणे आहेत जेथे कोणतेही विशेष उद्योग नाहीत, लोकांना रोजगार नाही परंतु जागा मुबलक आहे.

उद्योग चालवू शकणारे व शिकलेले तरुण आहेत ते या उद्योगात उतरू शकतात. अगदी १२ ते १५ शिलाई मशीनच्या युनिट सेटअपपासून ते १५० ते २०० मशीनपर्यंतचा सेटअप चालवू शकतो.

गारमेंट मॅन्युफॅक्चरिंगची कामे तुम्हाला अनेक नामवंत ब्रँड कंपन्यांकडून मिळतात. परदेशातील अनेक आयात करणार्‍या कंपन्या करोडोच्या ऑर्डर तुम्हाला देतात. अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया, दुबई, सिंगापूर, आफ्रिका, मलेशिया इत्यादी देशांत विकले जाणारे सर्व रेडिमेड गारमेंट हे आशिया खंडातील देश, भारत, चीन, बांगलादेश, व्हिएतनाम इत्यादी ठिकाणी बनलेले असते.

तसेच स्थानिक भारतीय बाजारपेठेअंतर्गत ६० ते ७०% उद्योग चालतो. सध्या हा उद्योग मुंबई, सुरत, अहमदाबाद, लुधियाणा, दिल्ली अशा ठिकाणी केंद्रित आहे. ह्या ठिकाणाहून संपूर्ण भारतभर रेडिमेड कपडे वितरित होतात. ह्या ठिकाणी हजारोंच्या संख्येत लहान लहान गारमेंट मॅन्युफॅक्चरर्स असून तेथे लाखो लोक काम करतात.

अशा लहान लहान एका गारमेंट फॅक्टरीत १० ते २० लोक काम करतात व उद्योजकांना महिना ५० हजार ते १ लाख नफा होत आहे. हा महिलांनी करण्यासारखा उद्योग असून ह्या उद्योगात ७०% हून अधिक महिला कामगार असतात.

फॅशन डिझायनिंग कोर्सेस, टेलरिंग कोर्सेस झालेल्या अनेक महिला ह्या उद्योगात उतरू शकतात. पंतप्रधान मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत बँका १० लाखांपर्यंतचे कर्जही देत आहेत. आपल्याजवळील बँकांतून याची माहिती मिळवू शकता.

ऑनलाइन प्रिंटेड टी शर्ट दुकान

दोन वर्षांच्या मुलापासून ७० वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वच आज टी शर्ट वापरतात. स्त्री, पुरुष, मुली, लहान मुले सर्वांनाच टी शर्ट आवडतो. त्यामुळे टी शर्ट आणि त्यातही विविध प्रकारचे म्हणजेच रंगांचे, डिझाईन्सचे, विविध स्लोगन असलेल्या टी शर्ट्सना जास्त मागणी असते.

बाजारपेठेतील ही मागणी लक्षात घेतली, तर या उद्योगात खूप मोठी संधी दडलेली आहे.

कमी भांडवलात आणि कमी जोखमीचा हा उद्योग आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. बाजारात अनेक लोकप्रिय टी शर्ट्स ब्रॅण्ड आहेतच; पण आपण बाजारपेठेचा अभ्यास करून आणि आपला ग्राहक कोण असेल याचा विचार करून याचा बिझनेस प्लॅन तयार करू शकतो.

चांगला दर्जा, डिझाईन लोकांना हवे असते. कमी गुंतवणूक आणि चांगला उद्योग उभा करण्यासाठी तुम्ही ऑनलाइन प्रिंटेड टी शर्ट्सचं तुमचं दुकान सुरू करू शकता. यासाठी सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे तुमची स्वत:ची ईकॉमर्स वेबसाइट. यासाठी महत्त्वाचे आहे वेगळे आणि आकर्षक डिझाईन.

अनेक लोकांना स्वत:च्या स्वभावाला आणि मतांना लोकांसमोर मांडण्यासाठी टी शर्ट्स चांगले माध्यम वाटते, त्यामुळे ते त्या स्वरूपात टी शर्ट्स शोधत असतात. काही विशिष्ट संप्रदाय, समाज, लोकप्रिय व्यक्ती आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचे विचार अशा स्वरूपात आपण आपल्या या टी शर्ट्स प्रिंटिंगच्या उद्योगासाठी संकल्पनांवर काम करू शकतो.

गुंतवणूक म्हणून चांगल्या दर्जाची प्लेन टी शर्ट्स, प्रिंटिंग मशीनरी आवश्यक आहे. टी शर्ट प्रिंटिंग उद्योगासाठी तीन प्रकारच्या प्रिंटिंग बाजारात उपलब्ध आहेत. स्क्रीन प्रिंटिंग, हीट प्रेस आणि डिजिटल प्रिंटिंग. त्यांचे स्वत:चे फायदे-तोटे वेगवेगळे आहेत.

या उद्योगासाठी आवश्यक आहे चांगला डिझायनर. डिझायनरची निवड करताना काळजीपूर्वक करावी. सर्जनशील डिझायन्सची अत्यंत आवश्यकता असते. आपल्याला उद्योग ऑनलाइन असल्यामुळे लोकांच्या मानसिकतेचा विचार करता ग्राहकांना आपण विकत घेत असलेली वस्तू कशी असेल याची प्रतिकृती पाहण्यात जास्त उत्सुकता असते.

याचा विचार करून त्या स्वरूपाच्या काही डिझाइन्स आपल्या शॉपवर आपण लोकांसाठी दर्शनी भागात ठेवावयास हव्यात. योग्य प्रकारे सोशल मीडियाचा वापर करून आपल्या शॉपला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून ग्राहकांना आपण आपल्या दुकानावर येण्यास उद्युक्त करू शकतो. यातूनच उद्योगाची सुरुवात होईल.

लहान मुलांचे कपडे बनवणे

कमी भांडवलात सुरू करता येणारा हा उद्योग आहे. प्रत्येक पालकासाठी त्यांच्या मुलांना सुंदर सुंदर, हटके, डिझायनर कपडे घेण्याची हौस असते आणि ती नैसर्गिकही असते. त्यामुळे हा उद्योग खूप मोठ्या प्रमाणात संधी असलेला उद्योग आहे.

बाजारपेठही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे, त्याचसोबत कधीही शेवट नसलेला हा उद्योग आहे. लहान मुलांसाठी रेडिमेड कपडे घेण्याकडे मागील काही काळापासून पालकांचा कल जास्त वाढला आहे, त्यामुळे विविध प्रकारचे, अनेक कल्पना लढवून लहान मुलांच्या भावविश्वाशी संवाद साधणारे कपडे बनवले जातात.

या उद्योगाचा विचार करणार्‍यांना सर्वात आवश्यक गोष्ट म्हणजे कल्पकता. मुलांसाठी कपडे डिझाईन करताना त्यांच्या बदलत्या आवडीनिवडी, ट्रेंड यांचा अभ्यास करून नावीन्याने भरपूर काम देणे आवश्यक आहे.

उत्पादन म्हटलं की गुंतवणूक आलीच. सोबत कामगार, जागा, मशीनरी, परवाने, नोंदणी, डिझायनिंग, कपडा, शिवणकाम, पॅकेजिंग अशा विविध गोष्टींचीही आवश्यकता आहेच. त्यामुळे योग्य बिझनेस प्लॅन तयार करूनच या उद्योगात उतरावे. नीट अभ्यास करून या उद्योगात उतरल्यास एक यशस्वी उद्योग उभा राहू शकतो.

सध्याच्या काळात मार्केटिंगला खूप महत्त्व आहे. त्यामुळे विक्री कौशल्याचा योग्य पद्धतीने वापर करून उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळवून देणे आणि आपले पाय रोवणे यासाठी अनेकविध कल्पनांचा वापर करावा लागेल. यासाठी आजच्या काळातील विक्रीची माध्यमे म्हणजेच उदा. ऑनलाइन मार्केटिंग, सोशल मीडिया ऑनलाइन शॉप आदी विविध कल्पनांचा वापर करून उद्योग उभा करता येऊ शकतो.

बेडशीट आणि उशांचे अभ्रे तयार करणे

दैनंदिन आवश्यक गोष्टींमध्ये मोडणार्‍यांपैकी अंथरूण-पांघरूण, उशा या गोष्टी आहेत. सध्या आपल्याकडे घर, ऑफिस हे व्यवस्थित इंटिरिअर डिझायनिंग करून घेण्याकडे कल असतो. त्यामध्ये सर्व गोष्टी मॅचिंग करून निवडल्या जातात, त्यामुळे या क्षेत्रात कलेचा आणि विविध कल्पनांचा सुरेख मेळ साधून काम केले जाते. त्याचमुळे बेडशीट आणि उशांचे अभ्रे बनवण्याचा उद्योग हासुद्धा बाजारपेठेच्या दृष्टीने पाहिले तर मोठा उद्योग आहे.

श्रीमंत, मध्यमवर्गीय, गरीब अशा सर्व आर्थिक स्तरांतील व्यक्तींची ही गरज आहे. त्यामुळे सर्वच स्तरांतील लोक या उद्योगाचे ग्राहक आहेत. त्यासोबत आपल्याकडे वाढणारा हॉटेल आणि पर्यटन उद्योगही याचा ग्राहक आहे. एवढी मोठी बाजारपेठ आपल्याला खुणावते आहे.

आजच्या काळातील विक्रीची माध्यमे म्हणजेच उदा. ऑनलाइन मार्केटिंग, सोशल मीडिया ऑनलाइन शॉप आदी विविध कल्पनांचा वापर करून पारंपरिक विक्रीच्या माध्यमांसोबतच यांचाही योग्य तो वापर करून उद्योगाला मोठी बाजारपेठ मिळवून देता येईल.

साडी विक्री व्यवसाय

साडी हा प्रत्येक भारतीय स्त्रीचा आवडीचा पेहराव. भारतात साडी लग्न, सणसमारंभ, आयुष्यातील सर्वात मोठ्या महत्त्वाच्या दिवशी, फॅशन म्हणून अशा अनेक कारणांनी स्त्रिया साड्या वापरतात. प्रत्येक भारतीय स्त्रीचा जिव्हाळ्याचा हा विषय आहे, त्यामुळे अनेक प्रकारच्या विविध प्रांतांनुसार, नानाविध पोत, रंग आणि प्रकार उपलब्ध असलेल्या साड्यांसाठी फार मोठी बाजारपेठ भारतात आहे.

भारतासोबतच भारताबाहेरही साडीला आता मागणी आहे. त्यामुळे केवळ बाजारात उपलब्ध असणार्‍या विविध प्रकारच्या साड्या घरगुती स्वरूपात विक्री करण्याचा उद्योगही सुरू करता येऊ शकतो. घरगुती स्वरूपात सुरू करावयाचा असेल तर कमी भांडवलात हा उद्योग घरच्या घरी सुरू करता येऊ शकतो.

आपल्या आजूबाजूच्या, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याकडे तोंडी प्रसिद्धी करूनही उद्योगाला सुरुवात करता येते. साडी विक्रीचा उद्योग मोठ्या क्षेत्रात करायचा असेल तर थोडी गुंतवणूकही जास्त लागेल. जागा, मोक्याचे ठिकाण आणि त्या दृष्टीने आवश्यक यंत्रणा यासाठी उभी करावी लागेल.

साडी विक्रीसाठी विविध कल्पक कल्पना लावून तुम्ही तुमच्या मालाची विक्री वाढवू शकता. सध्याच्या काळात ऑनलाइन शॉप आणि ऑनलाइन विक्री हेही पर्याय उपलब्ध आहेत. त्याचाही थोडा अभ्यास करून आपण आपल्या उद्योगाच्या वाढीसाठी प्रयत्न करू शकतो.

ब्लाऊज हूक उद्योग

कापड उद्योगाचा हा एक पूरक उद्योग आहे. विशेषत: महिलांच्या, तरुण मुली, लहान मुलींच्या कपड्यांसाठी या हूकचा वापर केला जातो. ब्लाऊज, चुडीदार, टॉप, फ्रॉक्स अशा प्रकारच्या कपड्यांच्या प्रकारात हूक आवश्यक असतात.

कमी गुंतवणुकीचा हा उद्योग कोणीही सर्वसामान्य व्यक्ती घरच्या घरी सुरू करू शकतो. किरकोळ आणि घाऊक बाजारातून याला मागणी आहे. त्याचसोबत मोठमोठ्या गारमेंट कंपनी, टेलर, अल्टरेशनची सेवा देणार्‍यांकडूनही याची मागणी आहे.

यासाठी आवश्यक कच्चा माल म्हणजे वायर. आवश्यकतेनुसार वायर योग्य त्या गेजमध्ये लागतात. स्टेनलेस स्टील, कॉपरच्या वायर आवश्यक असतात. यासाठी लागणारी मशीनरीही छोट्या स्वरूपाची असते. त्यामुळे कमी जागेतही हा उद्योग चालू करता येतो. एका मिनिटाला ११०-१२० हूक ऑटोमॅटिक हूक मशीनमधून तयार होतात.

या मशीन विकत घेताना आपण त्या कशा हाताळायच्या याचे ट्रेनिंगही घेऊ शकतो. दुकानदाराकडून अशा प्रकारच्या ट्रेनिंगचा आग्रह धरावा.

– टीम स्मार्ट उद्योजक

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?