जीवाभावाची माणसं जोडूनच श्रीमंत होता येते


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


मैत्रभाव जितका ह्रदयात असतो तितक्या प्रमाणात आपल्या जीवनात नकारात्मक भावना आणि विचार दूर ठेवणं शक्य होते. राग, द्वेष, मत्सर, निर्माण करत गेलो की, मनानं सोबत राहणारी माणसं भेटत नाहीत. माणसं जवळ आली, सोबत राहिली नाही, सहकार्य केली नाहीत तर श्रीमंत होता येतं नाहीत. व्यवहाराचा भाग म्हणून नाईलाजाने काही माणसं जवळ दिसतात. नाईलाजाने सोबत असलेली माणसं इलाजासाठी, आणीबाणीच्या प्रसंगी कामी येतीलच ,असे सांगता येत नाही.

कठीण परिस्थितीत सोबत राहणारी माणसं ही आपली जमेची बाजू असते. आपलेपणा ठेवून वागतात, सहकार्य करतात. विश्वास ठेवतात, प्रेम, प्रेरणा, प्रोत्साहन देतात, ती माणसं आपली असतात. आपल्या वागण्या-बोलण्यातून आपलेपणा व्यक्त होत राहिला तर माणसं जोडायला मदत होते.

माणसं आपल्या स्वार्थासाठीच जवळ करायची नसतात, त्यांच्याही भल्यासाठी आपण माणसं जोडली पाहिजे. त्यांनाही घडवण्यासाठी आपण योगदान देता आले पाहिजे. एखाद्या माणसाचं मोठेपण त्या माणसाने किती माणसं मोठी केली यावरून मोजली जातात.

आपुलकीची, जिव्हाळ्याची माणसं म्हणजे आपली भावनिक श्रीमंती वाढण्यास मदत करतात. आर्थिक श्रीमंती, भावनिक श्रीमंती वाढण्यास माणसं खूप मोठी मदत करतात. प्रेमळ माणसांकडून प्रेम, जिव्हाळा मिळतो. ही माणसं द्वेषीरूपी झळांचा त्रास होऊ देत नाहीत.

आपल्याला ऊन लागू नये म्हणून जी माणसं स्वतः उन्हात तापून आपल्याला सावली देतात, अशी सावली देणारी माणसं माऊली असतात. सावली देणाऱ्या आपल्या माऊलीमुळे मवाली लोकांशी लढताना बळ मिळते. आपलं कुणी तरी आहे, आपण कोणासाठी तरी आहोत अन् आपल्यासाठी कोणीतरी आहे, ही भावना माणसाला आनंदित करते. आनंदानं जगता येणं फार मोठं यश, फार मोठी उपलब्धी ठरते.

आपली काळजी घेणाऱ्या माणसाच्या मनात आपल्याविषयी आपुलकी, प्रेम, सेवाभाव, जिव्हाळा असतो. अशी माणसं पाहता क्षणीच आपलं मन भरून येते. ही माणसं आपली असतात. प्रेमाची नातं हेच खरं नातं असतं. दिव्यातलं प्रेम संपले की दिवा प्रकाश देऊ शकत नाही, तसं प्रेम संपलं ते नातं आनंद देऊ शकत नाही. मग कोरडेपणा कटूता अनुभवत जगावं लागते.

काही माणसं काही मिळेल म्हणून जवळ येतात काही मिळालं नाही की, भूमिका बदलतात. विरोधात जातात. नि:स्वार्थपणे सोबत असलेली माणसं आपल्याला समजून घेतात. काही चूकले तरी माफ करुन व्यवहार साफ ठेवतात. अशी माणसं आपले वैभव असते. मनानं साफ राहून जगण्यात मनस्वी आनंद नसतो.

द्वेष करणाऱ्या माणसांच्या सहवासात झाडाखालीही ऊन लागते अन् जिथं प्रेम आणि प्रेरणादायी प्रेमळ माणसं असतात तिथं उन्हही सावली, चांदणं वाटायला लागतं.

उपेक्षा, अपमान आणि दुःखालाही सहज घेण्याची आणि सहन करण्याची क्षमता ही प्रेमात आहे. प्रेमळ माणसं सोबत आहेत, मी प्रेम भावनेत आहे. ही भावना बळ देते. पदराआड लपवून माय लेकराला घास भरवते तसं जगाची दृष्ट लागू नये म्हणून जगाला कळू न देता प्रेम देणारी ही माणसं आपल्याला जपतात. ती आपल्याला अनेकदा कळत नाहीत.

वरवरच्या, नाटकीप्रेमाला भुलल्या माणसांना खरे प्रेम करणारी माणसं कळत नाहीत. कृत्रिम फुलांना खरी फुलं मानून जगणाऱ्या माणसांच्या डोळ्याचे पारणे फिटतील, पण प्रेमाच्या सुंगधाचा आनंद त्यांना मिळत नाही. कृत्रिम फुलांना रंग असतो, पण सुगंध नसतो. सुगंध मनाला प्रसन्न करत असतो.

जसं हाड फोडताना कुत्र्यांना त्याच्याच तोंडातून निघणारं रक्त हाडातलं रक्त आहे, असे वाटते तसं कृत्रिम रंगाला खरा रंग समजून जगणाऱ्या माणसाची फसवणूक होते. सोय व्हावी, गैरसोय होऊ नये, विनाकारण पंगा घेऊन दंगा आणि दगा बसू नये.

पोटात काही वेगळेच असलं तरी ओठावर प्रेम राहिलं याची काही माणसं जाणीवपूर्वक काळजी घेतात, अशी माणसं त्यांच्या स्वत:च्या जीवनातील अडचणीं आणि अडथळ्यांना दूर ठेवण्यात बऱ्याच प्रमाणात यशस्वी होतात. ही माणसं खरं बोलत नाही बरं बोलतात.

पुढच्या नुकसान होत असेल, तो चुकीच्या दिशेने जात असेल तरी ही माणसं मार्गदर्शन करणार नाहीत. हो ला हो करीत राहतात. मार्गदर्शन करल्याने अहंकारी व्यक्तीचि अहंकार (इगो) दुखावला जाण्याची दाट शक्यता असते. इगो दुखवला की, ही माणसं इंगळी आणि इंगळ (अग्नी) होतात. मग गरळ ओकत राहतात.

खरे तर प्रेम हे सत्य बोलून सत्यानाशापासून वाचवत असते. आई, विस्तवाकडे जाणााऱ्या, जवळ गेलेल्या बाळाला झटकन बाजूला काढते, हे करताना हात दुखावेल, कोणी नाव ठेवले, याची ती तमा बाळगत नाही. प्रेम आपलं हित बघत नाही पुढच्याच हित पाहते, त्यामुळे व्यवहारी माणसाच्या नजरेत प्रेम आंधळं ठरते. अंहकार न दुखवता प्रेम व्यक्त करण्याची कला साध्य करता आली पाहिजे. मार्ग दाखवतानाही पुढच्या मान राखता आला पाहिजे.

एकदा चार जण चारचाकी गाडीत प्रवास करत होते. जायचे त्या गावाला ती गाडी जात नव्हती. नेली जातच नव्हती तर ती कशी जाईल? गाडीचा चालक हा गाडीचा मालक होता. त्या मालकाला कितीही नुकसान झाले तरी चालेल पण बरं बोलणारी माणसं आवडतच नव्हती. खरं बोललेलं त्याला खपतच नव्हते. खरं बोलण्याची सवय असलेला असलेला एक जण म्हणाला, “हा रस्ता नाही, आपण भलत्याच रस्ताने जात आहोत.”

बरं बोललं तरच आपलं बरं होणार आहे ही भावना बाळगून जगणारे तेव्हा म्हणाले, ‘मालक चुकतच नाहीत. शक्यच नाही. हे ऐकून मालकाला अधिक आनंद झाला. मालकांनी पुन्हा गती वाढवली. चुकीच्या दिशेने जाणारी गती लवकर अधोगतीला नेते. याची जाणीव त्यांना नव्हती. खोट्याच्या प्रेमात पडलेली माणसं खऱ्या प्रेमाला बाजूला करतात, याची जाणीव ठेवून समन्वयवादी शांत बसला होता पण त्यालाही सहन होत नव्हते.

हळूच लघवीचे निमित्त करून तो उतरलो. सर, यापुढे हे अमुकअमूक गाव आहे, असे मला त्या झाडाखाली बसलेल्या माणसांने सांगितले आहे. आपल्याला ह्या गावावरून जावं लागते का? आता मात्र मालकाच्या लक्षात आले, पण मालकाला चूक मान्य करायची सवयच नव्हती. नुकसान झाले तरी चालेल, अशी त्यांची धारणा होती.

“मला ते सगळं माहीत आहे, आपल्या इथं ऐकाला भेटून जायाचं असल्याने इकडे आलो”, असे मालक म्हणाला.

पुढचं गाव येताच सोबतच्याना संग न नेता जाऊन तो मालक गावात जाऊन आला. मालक येताच, खरं बोलणारा म्हणाला, कोणाला भेटलात मालक. मालक खोटंच म्हणाला, “शिंदेला भेटलो, या गावचा मोठा माणूस.”

“मालक हे गाव माझं आजोळ आहे. मी लहानपणापासून येतो. या गावात शिंदे कुणीच नाही. सगळे ठक्कर आहेत.”

तेव्हा तो मालकच म्हणाला, “मी ठक्करलाच प्रेमानं शिंदे म्हणतो. आता आपण हा विषय थांबू या, नाही तर गाडीत बसू देणार नाही”, असं मालक रागाने म्हणाला.

अहंकार नेहमी प्रेमाचा, सत्याचा पराभव करत असते, त्यामुळे ते एकटे आणि पश्चातापात जगते. ज्याचा पराभव होतो त्यांच्या सोबत स्वार्थी माणसं नसतात. असल्याचे नाटक करतात. नाटकी माणसं प्रेम देऊ शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येकांनी शोध घेतला पाहिजे.

खरंच मनापासून प्रेम करणारी माणसं किती आहेत?
रात्रीबेरात्री, संकटात धावून येणारी माणसं किती आहेत?
पंचप्राण हे माझे घे जीवदान तू त्याला दे
असा त्याग करणारी माणसं किती आहेत?

जगाचा कायमचा निरोप घेताना माझी सावली गेली, आधार गेला. सच्चा मित्र, पाठीराखा, मार्गदर्शक गेला म्हणून उणीव भासून आसू ढाळणारे किती आहेत. जी आहेत ती कुठे आहेत? याचा शोध घेण्यासाठी थोडा वेळ देता आला, काही चुकले असेल, आता काही चुकत असेल तर चुक दुरुस्त करून चार प्रेमाची माणसं जोपासता आणि जपता येतील तर बरं होईल!

– डॉ. हनुमंत भोपाळे
9767704604

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?