कथा उद्योजकांच्या

‘मराठीमाती डॉट कॉम’च्या हर्षद खंदारेची कथा

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


मराठी व माती या दोन शब्दांनी माझ्या मनात घर केलं होतं, कारण मराठी भाषेविषयी नेहमीच अभिमान असायचा आणि माती म्हणजे ज्या मातीत मी जन्मलो. आजही आठवतंय आठवडे बाजारात वडील ज्या काळ्या मातीवर बसायचे त्या मातीशी आपसूकच ऋणानुबंध जोडले गेले. त्यामुळेच ‘मराठीमाती’ हे नाव आपसूक सुचलं. मराठी भाषेच्या प्रेमात मी लहानपणापासूनच आहे.

मराठी भाषेचं सामर्थ्य, व्यापकता आणि विविधता, मराठी भाषेचं ‘अंतराळ’ तर्क-अनुमानच्या पलीकडे असल्याचा मला जसजसा बोध झाला, तसतसा या भाषेच्या कैफात मी अधिकच बुडालो. मराठी मन म्हणजे मराठी भाषेचं एक दालन असू शकतं. असा बोध होत असतानाच या भाषेच्या अंतरंगात शिरण्याची मला प्रेरणा मिळाली, ‘मराठीमाती डॉट कॉम’चा संस्थापक हर्षद खंदारे या संकेतस्थळाच्या निर्मितीची कहाणी सांगत होता.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

आज कुठलीही माहिती हवी असेल, अगदी पाककलेपासून ते सणावारांपर्यंत, ती अर्थातच गुगलवरून एका क्लिकमध्ये मिळते; पण ही माहिती देण्यासाठी गुगल आपल्याला जे वेगवेगळे पर्याय सुचवतो, त्यात बरेच पर्याय हे ‘मराठीमाती डॉट कॉम’चे असतात. आपल्याला आपल्या संस्कृतीविषयी असलेली माहिती आज जरी एका क्लिकवर मिळत असली, तरी ती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक तरुण अखंड धडपडतोय. त्यामुळेच सुमारे एका दशकापूर्वी मराठीमाती डॉट कॉमद्वारे वेबविश्वात मराठीचा झेंडा रोवणार्‍या हर्षदचं कार्यकर्तृत्व जाणून घेणं महत्त्वाचं वाटतं.

नव्या तंत्रज्ञानामुळे भारतीय भाषांनाही जागतिक व्यासपीठ निर्माण झालं आहे. ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाषा हा घटक अडथळा ठरू नये म्हणून गुगल, याहू, मायक्रोसॉफ्टसारख्या बड्या उद्योगांनी आता भारतीय भाषांवर लक्ष केंद्रित करून ग्राहकांना त्यांच्या भाषेत व्यक्त होण्याची संधी दिली. नेमकं हेच विकसित तंत्रज्ञान मराठी भाषा आणि साहित्याच्या प्रसार आणि प्रचारासाठी प्रोत्साहन देणं ठरलं आहे. विविध अॅप्स, युनिकोड सुविधा यामुळे आता एका क्लिकवर आपण आपल्या मातृभाषेतून व्यक्त होत आहोत.

रोज सकाळ-संध्याकाळ व्हॉटसअॅ पवर आपल्याला कधी चांगले सुविचार, तर कधी वपु आणि पुलंचे विनोद वाचायला मिळत आहेत. मात्र या तंत्रज्ञानाचा बोलबाला होण्यापूर्वी मराठी साहित्यासाठी लवचीक निकष लावून अनेकांना साहित्याचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा हर्षद खंदारेसारखा तरुण एखादाच सापडतो. मराठी भाषा, साहित्यसंस्कृती आणि महाराष्ट्र आपल्या मराठीमाती या संकेतस्थळाद्वारे जगभरात पोहोचवून हर्षद खंदारे या तरुणाने नक्कीच एक वेगळी वाट चोखांदळली आहे.

अनेक नामवंत कवी आणि लेखकांचं साहित्य कुठे ना कुठे प्रसिद्ध होत असतं आणि ते आपल्याला वाचायला मिळतं; पण साहित्याच्या क्षेत्रात असे अनेक जण असतात ज्यांना ही संधी मिळालेली नसते. ग्रामीण भागात तर प्रतिभा असूनही कित्येक वेळेला व्यासपीठ न मिळाल्याने अनेकांची प्रतिभा पेटार्‍यातच बंद राहते, तर काहींचे शब्द फक्त ओठांवर येऊन थांबतात. साहित्याच्या क्षेत्रात चाचपडणार्‍या अशा अनेकांना व्यक्त होण्याची संधी मराठीमाती उपलब्ध करून देत आहे.

हर्षद खंदारे

भले मग ह्या साहित्यातली भाषा साधारण असेल, व्याकरण कच्चं असेल किंवा कवितेला लयही नसेल; पण त्यामागचा विचार हा खरा निकष इथे वापरला जातो. त्यामुळे अनेक दर्जेदार साहित्याबरोबरच साधारण आणि ग्रामीण साहित्याचा ओघ या संकेतस्थळाकडे वाढत आहे. सामान्य माणूस आणि ग्रामीण भागातील लोकांनाही निर्मितीचा आनंद मिळावा आणि त्यांच्यातील प्रतिभा बहरून यावी हाच यामागचा उद्देश असल्याचं हर्षद म्हणतो.

मराठी माती डॉट कॉमकडे येणार्‍या सर्व साहित्याचं संपादन, त्याची वर्गवारी हर्षद स्वतः करतो. ग्रामीण भागातल्या प्रतिभेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हर्षदने नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यात २००५ साली कवी संमेलन भरवलं होतं.

या कवी संमेलनातून तुकाराम थाडेच्या रूपाने ग्रामीण प्रतिभा पुढे आली. अशा प्रतिभावान व्यक्तींना प्रोत्साहन देणं म्हणजे आपल्या माणसांसाठी काही तरी केल्याची भावना समाधान देणारी असते, असं हर्षद म्हणतो. हर्षद ग्रामीण भागात प्रचंड भटकंती करतो.


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.


त्याची काळ्या मातीशी नाळ जोडलेली आहे. दशकभरापूर्वी वेबविश्वात पाऊल टाकलेला हर्षद मूळचा नाशिक जिल्ह्यातल्या घोटी ह्या गावचा, जिथे आजही वीज, दळणवळण आणि इतर सोयीसुविधांची वानवा आहे. हर्षदला लहानपणापासूनच लेखन, चित्रकला, शिल्पकला, पर्यटन अशा विविध विषयांत रस होता. या विषयांमधलं ज्ञान मिळविण्यासाठी तो धडपड करायचा.

हर्षदचे वडील कलाकार, पण कौटुंबिक जबाबदार्‍यांमुळे त्यांना वडिलोपार्जित व्यवसाय करायला लागला. हर्षदच्या आसपास असणारा गोतावळाही साहित्य आणि कलेत रमणारा, पण ह्या कला आणि साहित्य घोटीच्या बाहेर पोहोचत नव्हत्या. तेव्हा ह्यासाठी काही तरी करायचं हे त्यानं बालवयातच ठरवलं. बी.कॉम, वेबसाइट डिझाइनिंग, पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयातून अप्लाइड आर्ट आणि नंतर जे.जे. महाविद्यालयात शिकत असताना आपल्या मनातील कल्पनांना मूर्तरूप देत हर्षदने २००० साली मराठीमातीडॉटकॉम हे संकेतस्थळ साकारलं.

मराठी भाषा, संस्कृती आणि महाराष्ट्रातल्या असंख्य विषयांवरील माहिती जगातल्या तमाम मराठी बांधव आणि इतर लोकांपर्यंत पोहोचावी असं त्याला मनापासून वाटत होतं आणि म्हणूनच त्याने इंटरनेट हे माध्यम निवडलं. या संकेतस्थळावर मराठी साहित्यव्यतिरिक्त महाराष्ट्रातील पाककृती, अनोखी पर्यटन स्थळं, ऐतिहासिक गडकिल्ले हे आणि इतर विभाग प्रचंड लोकप्रिय आहेत. तसेच आरोग्य, राशिभविष्य यांपासून ते ‘मातीतले कोहिनूर’ यासारखे पन्नासहूनही अधिक विभाग आहेत.

प्रचंड माहितीचा खजिना आणि दिवसेंदिवस वाढणारे युजर्स यामुळे मायक्रोसॉफ्ट, गुगल यांच्याकडूनही मराठी माती डॉट कॉमची दखल घेतली आहे. हा अनुभव सांगताना हर्षद म्हणतो, जेव्हा गुगलने प्रादेशिक भाषांच्या वेब पोर्टलचा सर्व्हे केला तेव्हा मराठी भाषेत सर्वाधिक युजर्स आणि लोकप्रिय असणारी वेबसाइट म्हणून मराठीमातीची दखल घेतली गेली.

गुगलने माझी माहिती देताना ‘marathimati.com is brain child of Harshad Khandare a young undergraduate from ghoti’ असा उल्लेख केला होता. त्या वेळी माझ्या गावाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेल्याचा आनंद अवर्णनीय होता. मराठीमाती डॉट कॉमवर स्त्रीवर्गाचं साहित्य जास्त येत असतं. तसंच युवा वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकही त्यांचं साहित्य सातत्याने पाठवत असतात.

याचा परिणाम म्हणजे हर्षदला येणारे हजारो ई-मेल, पोस्टाने येणारी हस्तलिखितं आणि पुस्तकं ह्याचा प्रचंड पसारा सध्या हर्षदच्या घरी आहे. जसा वेळ मिळेल तसं या सर्व साहित्याला आपल्या वेबसाइटच्या माध्यमातून प्रकाशित करून न्याय देण्याचा प्रयत्न हर्षद करत आहे. मध्यंतरी गुगल आणि मराठीमाती डॉट कॉमने महिला वर्गाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘helping women getting online’ हा उपक्रम हाती घेतला होता, ज्यात मराठीमातीवरील महिला वर्गाचं साहित्य गुगलवर प्रकाशित झालं.

यामुळे महिला वर्गाला मोठी संधी उपलब्ध झाली. मराठीमाती डॉट कॉमवर प्रकाशित होणार्‍या साहित्याच्या दर्जाबाबत टीका होत नाही का? या प्रश्नावर हर्षद म्हणतो, ९९% लोक टीका करतात, पण त्यांची टीकाच मला माझी वाट दाखवते. तंत्रज्ञान विकसित झालंय, अनेक नवनवीन मराठी वेबसाइट्स आणि ब्लॉग आहेत त्यामुळे या क्षेत्राची ओळख सर्वसाधारण माणसाला झाली आहे.

मात्र सुरुवातीच्या काळात हर्षद करत असलेलं काम अनेकांना समजतही नव्हतं. याबाबतचा किस्सा सांगताना तो म्हणतो, की लग्नाच्या वेळेस सगळ्या बाजू व्यवस्थित असूनही केवळ मी नेमकं काय करतो हे न कळल्याने मला स्थळ नाकारण्यात आलं होतं; पण इतरांच्या पायवाटेने मला जायचं नव्हतं, तर स्वतः गवत तुडवून स्वतःची पायवाट करायची होती जी मी मराठीमाती डॉट कॉमच्या रूपाने केली. यामुळे मराठीमाती डॉट कॉमपासून प्रेरणा घेत आज मराठी भाषेवरच्या अनेक वेबसाइट आल्या याचा मला आनंद होत आहे.

आगामी काळात वेबविश्वात मराठीचं भवितव्य काय असेल याबद्दल विचारल्यावर हर्षद म्हणतो, “सर्वच भारतीय भाषांना चांगले दिवस येणार आहेत. कारण सर्व बड्या कंपन्यांनी आपला मोर्चा प्रादेशिक भाषांकडे वळवला आहे आणि त्यातून मराठीवर सगळ्यांचं लक्ष केंद्रित आहे, कारण असा एकही देश नाही जिथे मराठी माणूस नाही. त्यामुळे आगामी काळात मराठीचं भविष्य निश्चितच उज्ज्वल आहे.

मराठीमातीवर प्रचंड असा माहितीचा खजिना उपलब्ध आहे आणि म्हणूनच महाराष्ट्र राज्याच्या पाठ्यपुस्तक विभागाने मराठीमाती डॉट कॉमची नोंद घेत विद्यार्थ्यांनाही वेबसाइटचा अभ्यासासाठी संदर्भ दिला आहे. विविध छंदांच्या वेडापायी नववीत नापास होणार्‍या हर्षदची त्याच इयत्तेतील पुस्तकात त्याने तयार केलेल्या वेबसाइटची दखल घेतली जाणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे; परंतु ह्यामागे आहे ती हर्षदने केलेली तब्बल एका दशकाची साधना.

ज्या काळात नुकतीच कुठे इंटरनेट संस्कृती भारतात रुजत होती, जनसामान्यांपर्यंत पोहोचत होती त्या काळात हर्षद मराठी वेबसाइट करण्याचा घाट घालत होता. अनेकांनी त्याला वेड्यातही काढलं, पण आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे त्याला पक्कं ठाऊक होतं.

ग्रामीण प्रतिभेला अधिकाधिक प्रोत्साहन देणं आणि ज्यांना ज्यांना आपल्यात सामावून घेणे शक्य आहे त्यांना घेणं, हे हर्षदचं भविष्यातलं उद्दिष्ट आहे. वेबविश्वात धडपड करत असलेला हर्षद साइटच्या कामानिमित्त आता पुण्यात असतो. पुण्यातल्या सांस्कृतिक आणि वैचारिक वातावरणामुळे आपल्या कामाला नवीन वेग आणि दिशा मिळाल्याचं तो म्हणतो.

– स्वप्नाली अभंग


‘स्मार्ट उद्योजक’ वेबपोर्टलवर तुमचीसुद्धा मुलाखत / कथा प्रसिद्ध करू इच्छित असाल, तर इथे क्लिक करा.Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!