एखाद्याच्या हृदयापर्यंत पोहोचायचे असेल तर तो रस्ता पोटातून जातो, असं म्हणतात. एखाद्याच्या हातची चव आवडली की त्याच्याशी न तुटणारे नाते निर्माण होते. बर्याचदा असं म्हटलं जातं की, जिभेचे चोचले भागवण्यासाठी खाऊ नये, तर निरोगी व चांगलं आयुष्य जगण्यासाठी खावं; पण ते अन्न चविष्ट असायलाच हवे. भारतासारख्या विविधता असणार्या देशात तर अन्नाला प्रचंड महत्त्व आहे.
आपण केवळ महाराष्ट्राचंच उदाहरण घेतलं तर प्रत्येक प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ पाहायला मिळतात. इतकी विविधता आपल्याकडे आहे. खाण्याच्या बाबतीत भारतीय माणूस खवय्याच म्हणायला हवा.
अनेक लोक कामानिमित्त बाहेर राहतात, किती तरी दिवस घरापासून दूर असतात तेव्हा घरच्यांची ओढ तर सतावत असते; पण त्याचबरोबर घरच्या जेवणाची आठवणसुद्धा येत असते, कारण सतत हॉटेलातलं जेवण खाऊन माणासाला कंटाळा येतो आणि बाहेरच्या जेवणाला घरच्या जेवणाची चव असते तरी कुठे? लोकांची हीच अडचण दूर करण्याचा ध्यास नगरचे हेमंत लोहगावकर यांनी घेतला आहे.
हेमंत लोहगावकर ज्या वेळी नोकरी करत होते तेव्हा त्यांना कामाच्या निमित्ताने महिन्यातील वीस ते बावीस दिवस बाहेर राहावं लागायचं. कामानिमित्त भारतभर प्रवास व्हायचा, त्यामुळे सतत बाहेरचं जेवण जेवायला लागायचं. सतत बाहेरच्या खाण्यामुळे त्यांना त्यांच्या व्यवसायाची कल्पना सुचली.
आपल्यासारखे अनेक लोक कामाच्या निमित्ताने घरापासून दूर राहतात. आपल्याप्रमाणे त्यांनाही घराच्या जेवणाची आठवण येत असणार. अशा लोकांची अडचण दूर करण्यासाठी जन्म झाला माय ‘टिफिन’चा.
कोणताही व्यवसाय सुरू करताना गरज असते सर्व्हेक्षणाची. म्हणजे व्यवसायातील अडचणी, लोकांना काय आवडतं, कशा प्रकारे आवडतं, कच्चा माल कुठे मिळेल? अशा सर्व गोष्टींचा अंदाज घेण्यात आला आणि ‘माय टिफिन’ची सुरुवात झाली. वीस वर्षांच्या नोकरीमध्ये भारतभ्रमण करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, की महाराष्ट्राचे पदार्थ सगळीकडेच मिळत नाही.
भारतात इतर ठिकाणी काय तर महाराष्ट्रातील हॉटेल्समध्येही मराठी पदार्थांचा दुष्काळ असतो. पंजाबी, साऊथ इंडियन पदार्थांचा अक्षरश: मारा असतो. तुम्ही हॉटेलात एखादी मिसळ जरी खाल्ली तरी त्यात मराठी चव आढळत नाही. उलट साऊथ इंडियन सांभार मिसळीच्या नावाने खपवला जातो.
थालीपीठ, बिरडं, मोदक, पुरणपोळी, अळूचं फदफदं हे पदार्थ सहसा हॉटेलात मिळत नाहीत. लोकांची ही गरज हेमंत लोहगावकर यांनी भागवली. नोकरीमध्ये असतानाच हा विचार सुरू झाला होता. जवळजवळ तीन वर्षे ते या व्यवसायाच्या सर्व्हेसाठी फिरले.
मुंबई, जळगाव, कानपूर, बंगळुरू, दिल्ली अशा शहरांमध्ये जाऊन तेथील परिस्थितीचा अनुमान लावला. वेगवेगळ्या खानावळी, हॉटेल्समध्ये जाऊन माहितीतल्या लोकांना ते भेटले. 332 मेसना भेट दिली व तिथे कोणत्या प्रकारचं जेवण बनतं याविषयी माहिती घेतली.
त्याचबरोबर बाहेर काम करणार्या सुमारे 5 हजारहून अधिक व्यक्तींशी त्यांच्या आवडीनिवडीबद्दल चर्चा केली. लोकांना नेमकं काय खायला आवडतं. आपला व्यवसाय हा सकारात्मकतेच्या आणि चांगुलपणाच्या पायावर उभा असावा असे त्यांना वाटत होते म्हणून या सर्व गोष्टी जाणून घेणे आवश्यक होते.
जे करायचं ते चांगलंच करायचं असा ध्यास त्यांनी घेतला होता. त्यांना उत्तमाची आराधना करायची होती. जे जे उत्तम उदात्त उन्नत ते ते सर्व आत्मसात करायचं आणि मगच प्रत्यक्षात व्यवसायाला सुरुवात करायची.
घाईगडबडीत केलेलं कोणतंही काम फसतं. उत्तम व्यवसायासाठी हवा असतो उत्तम अभ्यासाचा पाया. प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहणं, या व्यवसायातील नवीन संधी, आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यवसायात करता येण्याजोगा वापर…
या सर्व गोष्टी हेमंत लोहगावकर यांनी केल्या. नोकरवर्ग संस्कृती अस्तित्वात आल्यापासून खानावळ चालवणं किंवा डबा देणं हे तसं सामान्य होऊन गेलं होतं. यात नावीन्य आणायला हवं असं त्यांना वाटलं. या विचारातूनच गरजू महिला, कष्टकरी वर्गाला त्यांनी एकत्र आणलं.
त्यांनी व्यवसायाला जेव्हा सुरुवात केली त्यावेळी ग्राहकाला चांगलं देण्याबाबत उदासीनता दिसून आली. ते भाजी खरेदी करायला गेले असताना दुय्यम दर्जाची भाजी व माल खरेदी करण्याबाबत आग्रह केला जायचा. कोण बघायला येतंय भाजी किती ताजी आहे वगैरे अशी उत्तरे त्यांना देण्यात आली. याविषयी त्यांना खूपच वाईट वाटलं. कोणताही व्यवसाय ग्राहकाशिवाय कधीच चालू शकत नाही.
ग्राहकामुळे तर आपला व्यवसाय वाढतो, आपलं घर चालतं. मग त्याच्याविषयी इतकी अनास्था का? गुणवत्तेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करायची नाही, असं त्यांनी आधीपासूनच ठरवलं होतं. दोन पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण ग्राहक संतुष्ट झाला पाहिजे आणि तो निरोगी राहिला पाहिजे.
आपल्याकडे अन्नाला फार महत्त्व दिलं गेलं आहे. अन्न हे पूर्णब्रह्म असं आपण म्हणतो, कारण अन्न केवळ चवीसाठी खाल्लं जात नाही, तर निरोगीपणे जीवन जगण्यासाठीसुद्धा खाल्लं जातं. म्हणूनच निकृष्ट दर्जाचा माल त्यांनी कधीच विकत घेतला नाही.
गुणवत्ता आणि स्वच्छतेबद्दल ते इतके आग्रही आणि पारदर्शक आहेत, की त्यांनी जेवण बनवल्या जाणार्या किचनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत, जेणेकरून ग्राहक कधीही स्वच्छतेबद्दलची खात्री करून घेऊ शकतात. ‘माय टिफिन’चं किचन म्हणजे अगदी टापटीप असतं.
किचनमधील वस्तू ही जागच्या जागी ठेवलेली असते. प्रत्येक डब्यावर, वस्तूवर नावाचं लेबल लावलेलं असतं. कर्मचार्यांना काही सूचना द्यायच्या असल्यास त्या फळ्यावर लिहून ठेवल्या जातात. स्वच्छ व सुंदर किचन हा त्यांचा पायंडाच आहे.
ग्राहकांना चवीबरोबर त्यांचे स्वच्छ किचनसुद्धा आकृष्ट करते. यामुळेच ‘माय टिफिन’ला बेस्ट हायजिन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. तसेच या सेवेला आयएसओ मानांकनसुद्धा मिळाले आहे. आयएसओ मानांकन मिळणारी ही महाराष्ट्रातील प्रथम आणि एकमेव टिफिन सेवा आहे. उत्कृष्ट चव आणि उत्तम गुणवत्ता यामुळेच ‘माय टिफिन’ची झपाट्याने वाढ होत गेली.
पन्नास डब्यांपासून या व्यवसायाची सुरुवात झाली आता हा व्यवसाय रोजच्या दीडशे डब्यांपर्यंत पोहोचला आहे. 50 ते 52 ग्राहकांपासून आता सत्तर हजार ग्राहकसंख्या झाली आहे. हेमंत लोहगावकर सांगतात की, ‘आम्ही गुणवत्तेच्या बाबतीत कधीच तडजोड करत नाही.
कोणताही नवीन ग्राहक आला, की आम्ही त्याला दोन-तीन दिवस चव घ्यायला सांगतो आणि मग जेवण आवडलं तर ऑर्डर सुरू होते. आमच्याकडे नोकरदार, अधिकारी व विद्यार्थी ग्राहकांची संख्या जास्त आहे.
या व्यवसायात बर्याचदा ग्राहक बदलत असतात; पण गेली पाच वर्षे आम्ही ग्राहक टिकवून ठेवले आहेत. एखाद्या अधिकार्याची जरी बदली झाली तरी त्याच्या टेबलावर येणार्या दुसर्या अधिकार्याला तो ‘माय टिफिन’बद्दल सांगून ठेवतो, की जेवण यांच्याकडूनच मागवायचं.
यापेक्षा दुसरं समाधान ते कोणतं आहे.’ संतुष्ट ग्राहक हेच कोणत्याही व्यवसायाचे गमक असते. त्यात जेवणाचा व्यवसाय म्हणजे ग्राहकाचं पोट आणि मन दोन्ही भरणं अत्यंत गरजेचं आहे. या कसोटीत ते खरे उतरले आहेत.
‘माय टिफिन’चे हेमंत लोहगावकर हे मूळचे अहमदनगरचे. बालपण, शिक्षण सबंध जीवन त्याचं अहमदनगरचंच. अहमदनगरशी त्यांचं एक घट्ट नातं निर्माण झालेलं आहे. त्यांचं बालपण अगदी सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात गेलं.
आई-वडील दोघेही कामाला जात असल्यामुळे आजीचा जास्ता लळा त्यांना लाभला. वडील सतत कामानिमित्त बाहेर असायचे, आई कामाला जायची. यामुळे शाळेत असतानाच त्यांना स्वयंपाकाची आवड निर्माण झाली.
स्वत: करून खायची सवय लागली. लहानपणी आईला जेवणात व सणासुदीच्या दिवसांत पदार्थ बनवण्यात मदत करता करता ते उत्तम स्वयंपाक करायला शिकले. अनेक पुरुषांना साधा चहासुद्धा बनवता येत नाही; पण हेमंत सगळा साग्रसंगीत स्वयंपाक अगदी सहज करतात. एखाद्या गृहिणीला लाजवेल अशा पद्धतीने ते अगदी पुरणपोळीचा स्वयंपाक करतात.
स्वयंपाकाच्या आवडीमुळे त्यांना हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं; पण त्या काळी या क्षेत्रात फारशी मागणी नव्हती. म्हणून वडिलांनी सांगितल्यामुळे ही इच्छा पूर्ण झाली नाही; पण वीस वर्षे इमानेइतबारे नोकरी केल्यानंतर ती इच्छा त्यांनी पूर्ण केली आहे. हॉटेल मॅनेजमेंट तर करता आले नाही; पण जेवणाचा व्यवसाय मात्र करून दाखवला.
‘माय टिफिन’चे केवळ मराठीच नव्हे तर बिहारी, उत्तर भारतीय असे सर्व प्रांतांंतले ग्राहक आहेत. ते सर्व अमराठी लोक चवीने मराठी जेवण जेवतात. कधी कधी त्यांच्या मागणीनुसार त्यांचे आवडते पदार्थही केले जातात. दर बुधवारी एखादा विशेष पदार्थ असतो.
मसालेभात, आमटी, थालीपीठ, बिरडं असले पदार्थ घरापासून दूर राहून खायला मिळतात. हे सर्व स्वप्नवत वाटत असलं तरी हेमंतरावांनी हे सत्यात उतरवलं आहे. तसेच सणासुदीच्या दिवसालाही विशेष पदार्थ डब्यातून दिले जातात.
दिवाळीला लाडू, करंज्या, चकल्या, गणेशोत्सवात मोदक, होळीला पुरणपोळी असे पदार्थ विशेष करून बनवण्यात येतात. म्हणजे ग्राहकाला आपण घरापासून दूर राहतोय याची खंत वाटत नाही. त्यांचं जेवण हे सात्त्विक आणि शुद्ध शाकाहारी असतं.
ते ग्राहकाच्या तब्येतीची आणि चवीची इतकी काळजी घेतात की पोळी बनवण्यासाठी ते रेडीमेड पीठ वापरत नाहीत. गहू आणून दळायला दिले जातात आणि त्या पिठापासून पोळ्या बनवल्या जातात. सर्व भाज्या ताज्या असतात.
पोळीसुद्धा घडीची बनवण्यात येते. आता त्यांच्याकडे चौदा कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांच्यात विभागणी केली आहे. भाज्या वगैरे आणण्यासाठी वेगळे लोक, स्वयंपाक करण्यासाठी वेगळे आणि डबे पोहोचवण्यासाठी वेगळे लोक आहेत.
व्यवसाय शारीरिक कष्टाचा आहे, त्यामुळे सुरुवातीला कर्मचारी मिळवण्यासाठी त्यांना विशेष प्रयत्न करावे लागले; पण आता या कष्टाचं चीज झालं आहे. येथील सर्व कर्मचार्यांना ड्रेसकोड देण्यात आलेला आहे. या व्यवसायाला कॉर्पोरेटचे स्वरूप देण्यात आले आहे.
लोहगावकर यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवातसुद्धा दणक्यात केली होती. ‘माय टिफिन’ची सुरुवात करताना त्यांनी प्रेेस कॉन्फरन्स बोलावली आणि वृत्तपत्रांद्वारे त्यांच्या व्यवसायाला प्रसिद्धी देण्यात आली. हे पहिल्यांदाच घडत होतं, म्हणजे एका टिफिन सर्व्हिसेस व्यवसायाची प्रेस कॉन्फरन्स घेण्याचा पहिला मान हेमंत लोहगावकर यांनाच जातो.
त्यांच्या या व्यवसायात त्यांच्या कुटुंबाची त्यांना उत्तम साथ मिळाली. कुटुंबातील कुणी प्रत्यक्ष व्यवसायात नसलं तरी वेळप्रसंगी कुटुंबाचे सहकार्य लाभले आहे. अगदी भांडी घासण्यापासून ते डबे पोहोचवण्यापर्यंत सर्व कामात कुटुंबीयांनी मदत केली आहे.
नगरच्या लोकांना हेमंत यांनी डब्याची सवय लावली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हेमंत यांना अहमदनगरमध्ये केंद्र सुरू करायची आहेत. तरुणांना या व्यवसायात आणण्यासाठी ते पुणे, नाशिक, औरंगाबाद, सातारा येथे फ्रँचायजी सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे.
या व्यवसायात मरण नाही, कारण जोपर्यंत जग आहे, तोपर्यंत पोट आहे आणि जोपर्यंत पोट आहे तोपर्यंत हा व्यवसाय आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणूनच फ्रँचायजीच्या माध्यमातून त्यांना नोकरी देणारे व्यावसायिक घडवायचे आहेत.
मराठी उद्योजकता वाढावी यासाठी ते तरुणांना भांडवल उपलब्ध करून देणे, ते व्यवसायात यशस्वी कसे होता येईल अशा सर्व प्रकारे सहकार्य करणार आहेत. तसेच भविष्यात एक रेस्तराँसुद्धा सुरू करायचे आहे. अशा भविष्यातील अनेक योजना ते आखत आहेत.
या योजना ते पूर्ण करणार आहेत. त्याचबरोबर त्यांनी सामाजिक बांधिलकीही जपली आहे. वृद्ध नागरिकांसाठी त्यांनी ‘आधार आपुलकीचा‘ ही सेवा सुरू केली आहे. या सेवेचे उद्घाटन मुंबईत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
व्यवसायात चिकाटी, सेवाभाव, कष्ट करण्याची तयारी आणि नेतृत्वगुणाचे अंग असावे लागते. मराठी माणसाकडे या सर्व गोष्टी आहेत. त्यामुळे मराठी माणसाने व्यवसाय, उद्योगात नवीन संधी शोधाव्यात.
एका ज्येष्ठ उद्योजकाकडून कौतुक होणं म्हणजे आपण केलेल्या कार्याचे फळ होय. कोणत्याही व्यवसायात प्रामाणिकपणा, चिकाटी व कष्ट घेण्याची वृत्ती असायलाच हवी. ज्यांना कुणालाही व्यवसायात यायचे आहे त्यांनी हेमंत लोहगावकर यांचा आदर्श समोर ठेवायला हवा.
संपर्क : हेमंत लोहगावकर
9881370813
तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमचीही 'उद्योजक प्रोफाइल' तयार करायची असेल तर 9833312769 वर "उद्योजक प्रोफाइल" असा मेसेज whatsapp करा.