गृहिणीत उद्योजक बनण्याचे सर्वाधिक गुण


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


गृहिणी; महिलांनो जागे व्हा. कुटुंब संस्थेच्या जातीचा व धर्माच्या नावाखाली मुळीच जीवन जगू नका. स्वत:च कर्तृत्व दाखवा. आज महिलांना करण्यासारख्या अनेक व्यवसाय संधी उपलब्ध आहेत. अंगावर काही तोळे दागिने घालून शोभेची वस्तू होण्यापेक्षा, स्वत:च्या हिमतीवर कमवणारी उद्योगिनी व्हा.

गृहिणींनी स्वत:चा वेळ, बुद्धीचा वापर करावा, उद्योग व्यवसायात उतरावे व फक्त गृहिणी न राहता गृहलक्ष्मी बनावे.

मला एक उच्चशिक्षित गृहिणी भेटावयास आल्या होत्या. त्यांचे वडील शेतकरी आहेत, मुलगी हुशार असल्याने तिला मोठ्या कष्टाने कॉम्प्युटर इंजिनीअरिंग शिकवलं, पण एकट्या मुलीला मुंबई, बेंगलोरसारख्या सिटीमध्ये नोकरीस पाठवायचे कसे म्हणून नात्यातील एका शिक्षकाशी विवाह करून दिला.

लग्नानंतर लवकरच मूल झालं. ते मोठं होताच तोपर्यंत दुसरं झालं. मुलं मोठी करणे व शाळेत जाईपर्यंत त्यांना कोणतीच नोकरी करता आली नाही. इयत्ता १०वीत ८८% गुण, १२वीत ७८% गुण, बीई ७२% गुण, पण उपयोग काहीही नाही.

आता लहान मुलगा ५ वर्षांचा होता तेव्हा त्यांनी ठरवलं की, आता नोकरी करायची त्यांनी मुलाखतीला जायला सुरू केले. खूप गॅप पडल्यामुळे व अनुभव नसल्यामुळे नोकरी मिळण्यास अडचणी येत होत्या. त्यांच्या सासू व मैत्रिणी म्हणतात, तू एवढी शिकलेली आहेस, मग काही का करत नाहीस.

सर्वसाधारण कोणी भेटले की विचारतात, तुम्ही वर्किंग वुमन आहात की हाऊसवाइफ. सर्वांचा असा समज असतो की, हाऊसवाइफ काहीच करत नाहीत, एक यशस्वी उद्योजकाला जे जे काही करावं लागतं ते सर्व एक हाऊसवाइफ करते. तेव्हा माझ्या मते, एका गृहिणीमध्ये यशस्वी उद्योजक बनण्याचे सर्व गुण असतात.

ती सर्वांसाठी स्वयंपाक करते म्हणजे ती चांगली शेफ आहे. ती चांगला हॉटेल व्यवसाय करू शकते किंवा एका कंपनीचे कॅन्टीन कसे चालते हे तिला माहीत असते. ती मुलांचा अभ्यास घेते म्हणजे ती खासगी शिकवणीही घेऊ शकते म्हणजे ती शिक्षिकाही आहे, ती सासू-सासर्‍यांची, मुलांची, नवर्‍याची काळजी घेते म्हणजे ती केअरटेकरही आहे.

ती चांगला हॉस्पिटॅलिटीचा व्यवसाय करू शकते. ती घराचं व मुलाचं राखण करते म्हणजे ती सिक्युरिटी गार्डही आहे. ती काटकसर करून कमी दरात भाज्या सर्व गोष्टी घेते म्हणजे ती चांगली परचेस मॅनेजरही आहे, ती आले-गेलेले पाहुणे, मित्रमंडळी यांचा पाहुणचार करते म्हणजे ती चांगली रिसेपश्‍निस्ट आहे.

सासूबाईंनी सांगितलं की पाहुण्याच्या लग्नात घराण्याची प्रतिनिधी म्हणून नटून जाते म्हणजे ती चांगली मॉडेलही आहे. आपला नवरा, सासू यांचे ती बाहेर कौतुक करते म्हणजे ती खूप चांगली सेल्समन आहे. नवरा ताणतणावात असेल तर त्याचं सांत्वन करते म्हणजे ती एक चांगली सायकॉलॉजिस्टही आहे. गृहिणीं संपूर्ण घराची स्वच्छता व नीटनेटकेपणाही ठेवते. ती चांगली हाऊसकीपर आहे.

नवरा अडचणीत आला तर स्वत:चे दागदागिने गहाण टाकून पैसे उभा करते. ती ट्रबलशूटर आहे. समाजात तुमच्या कुटुंबाबद्दल बोलत असते. तिच्यामुळेच समाजात ओळख असते. ती चांगली पब्लिक रिलेशन ऑफिसर आहे. ती संसाराचा हिशेब खूप तंतोतंत ठेवते. ती चांगली फायनान्स कर्मचारी आहे. शेजार्‍याच्या, पाहुण्यांच्या बर्‍या-वाईट प्रसंगांत जाऊन येते म्हणजे ती कॉर्पोरेट सोशल रिसपॉन्सिबिलिटी सांभाळते.

आता मला सांगा, असे कोणते काम राहते, की गृहिणी पार पाडत नाही, जे एक उद्योजक किंवा कॉर्पोरेट कंपनी चालवण्यासाठी लागते आणि समाजाचा असा दृष्टिकोन असतो की, गृहिणी काय करत नाही. गृहिणीने धाडसाने पुढे यावे, उद्योगात यशस्वी व्हावे.

उद्याच्या वीणा पाटील (वीणा वर्ल्ड), इंद्रा नुई (पेप्सी) तुम्हीही होऊ शकता. जे लोक गृहिणींना तुम्ही काय काम करत नाही म्हणतात त्यांना तुमच्या कामासंबंधीची लिस्ट दाखवा. मागे एका सर्जनने आश्चर्यकारक घटना सांगितली, जेव्हा कुटुंबात कोणाची किडनी ट्रान्स्फर करायची वेळ येते तेव्हा रिप्लेसमेंट किडनी डोनर हे गृहिणी असतात म्हणजे आपल्या शरीराचा अवयवसुद्धा वेळ पडल्यास कुटुंबाला मदतीसाठी देते.

मुलांची किंवा नवर्‍याची किडनी खराब झाली तर महिला आपली किडनी देतात. हे असे ९५% गृहिणीच्यांत आहे, पण गृहिणीची किडनी खराब झाली तर ५% सुद्धा डोनर मिळत नाहीत. तेव्हा गृहिणी महिलांनो, जागे व्हा. कुटुंबसंस्थेच्या जातीच्या व धर्माच्या नावाखाली मुळीच जीवन जगू नका. स्वत:चं कर्तृत्व दाखवा.

आज महिलांना करण्यासारख्या अनेक व्यवसाय संधी उपलब्ध आहेत. अंगावर काही तोळे दागिने घालून शोभेची वस्तू होण्यापेक्षा, स्वत:च्या हिमतीवर कमावणारी उद्योगिनी व्हा.

आज जगभर उद्योग, नोकरी, प्रशासन, कॉर्पोरेट, संशोधन अशा प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर चालल्या आहेत. ममता बॅनर्जी, इंदिरा गांधी, चंदा कोचर, इंद्रा नुई, वीणा पाटील, कल्पना चावला, विद्या बालन, प्रियंका चोपडा अशा अनेक महिलांनी आपापल्या क्षेत्रांत आपले कर्तृत्व गाजवले आहे. तुम्ही अनेक उद्योग व व्यवसायांची माहिती घेण्यास सुरुवात करा.

आपल्याकडे शिक्षण, ज्ञान, मेहनत करण्याची तयारी व आपण कितपत भांडवल गुंतवू शकतो याचा अंदाज घेऊन कोणकोणते व्यवसायाचे ऑप्शन्स आहेत याची यादी बनवा. त्यातील प्राधान्यक्रमाने काही व्यवसायांची निवड करा. पैकी शेवटी निवडलेल्या व्यवसायाचा सखोल अभ्यास करा.

सुरुवात कशी करायची, रोजचे कामकाज, मार्केटिंग कसे करायचे याचे सखोल ज्ञान घ्या. तुम्हाला स्किल्ड व अनस्किल्ड असे दोन्ही प्रकारचे व्यवसाय करता येतील. स्किल्डमध्ये कॉम्प्युटर, इंजिनीअरिंग, वैद्यकीय इत्यादी पद्धतीचे व्यवसाय ज्यात तुम्हाला त्या त्या क्षेत्राचे चांगले शिक्षण व अनुभव आवश्यक आहे.

दुसरे क्षेत्र अनस्किल्ड ज्यात फारशी शिक्षणाची गरज नसते. त्यात खाद्यपदार्थ, सेवा, शिक्षण, लोणची, पापड, दुकान इत्यादीचा समावेश होतो. काही महिला एकत्र येऊन २० ते ५० जणी मिळून चांगला व मोठा व्यवसाय करू शकतात. आज प्रत्येक गृहिणी रोज १२ ते १६ तास काम करते. तेवढेच काम तिने स्वत:च्या व्यवसायात केले तर तिला किमान दरमहा ५० हजार रुपये फायदा होऊ शकतो.

स्किल्ड क्षेत्रात कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग, डेटा अ‍ॅनॅलिसिस, ई-कॉमर्स, पोर्टल मॅनेजमेंट, कंटेंट रायटिंग, सोशल मीडिया मार्केटिंग, एसईओ, इंटरनेट मार्केटिंग, इंटरनेट रीसर्च, ब्लॉगर, ऑनलाइन कन्सल्टंट, ऑनलाइन पब्लिक रिलेशन सपोर्ट, ग्राफिक डिझायनिंग, वेब डिझायनिंग, फोटो एडिटर इत्यादी शेकडो प्रकारचे व्यवसाय आहेत.

अनस्किल्डमध्ये खाद्यपदार्थ बनवणे व विकणे, शिवणकाम, वस्तूचे पॅकेजिंग, एम्ब्रॉयडरी, टीशर्ट प्रिंटिंग, कस्टमाइडसाठी डिझाईनिंग, आर्ट व पेंटिंग, इमिटेशन ज्वेलरी, क्रेडिटेशन, ब्युटी पार्लर, योगा क्लासेस, वस्तूची खरेदी-विक्री, मसाला उद्योग इत्यादी शेकडो प्रकारच्या व्यवसाय संधी आज उपलब्ध आहेत.

छोटे उद्योग पुढे मोठे होतात. संधी तर हजाराने उपलब्ध आहेत. गरज आहे ती चाकोरीबद्ध जीवनपद्धती व मागास विचारसरणी झटकून धाडसाने कामाला लागणे व कर्तृत्व करून दाखवण्याची धमक असावी. आज नवर्‍याची खासगी नोकरी म्हणजे अळवावरचं पाणी, कधी गळून पडेल सांगता येत नाही. अपघात, आजार इत्यादी खूप मोठी अनिश्चितता माणसाच्या जीवनात आहे. काही बरेवाईट झाले तर कुटुंब रस्त्यावर येईल तेव्हा दुय्यम चांगले उत्पादन असणे केव्हाही चांगले.

तुम्ही अडचणीत आल्यावर तुमचा सख्खा भाऊ व बहिणीसुद्धा धावून येणार नाहीत, कारण आज ज्याचे त्याचे जीवन जगण्याचे वांधे झाले आहेत. तेव्हा गृहिणींनी स्वत:चा वेळ, थोडेसे भांडवल, बुद्धीचा वापर करावा व उद्योग व्यवसायात उतरावे व फक्त गृहिणी न राहता गृहलक्ष्मी बनावे. नोकरदाराची बायको नव्हे, तर नोकर्‍या देणारी बनावे. मुलींना हुंडा देऊन दुसर्‍याचे गुलाम करण्यापेक्षा तिला थोडे भांडवल देऊन उद्योग उभारण्यास मदत करा.

– प्रा. प्रकाश भोसले

Author

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?