करोडपती होण्यासाठी करा या १३ गोष्टी


₹७५० मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मागवा आणि त्यावर ₹२०० किंमतीचे 'एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी' हे पुस्तक मोफत मिळवा. आजच ऑर्डर करा https://bit.ly/2YzFRct


श्रीमंत होणे आणि करोडपती बनणे ही तशी अनेकांना न रुचणारी गोष्ट आहे. त्यातच मी जर म्हणालो की वयाच्या ३५व्या वर्षी तुम्ही करोडपती होऊ शकता तर अनेकांना हा कल्पनाविलास वाटेल. यात न रुचण्यासारखे किंवा वाईट असे काहीच नाही.

वयाच्या एकविसाव्या वर्षी मी कॉलेजमधून बाहेर पडलो. त्या वेळी माझ्याजवळ पार्ट टाइम काम करून मिळवलेले काही पैसे होते. ते पैसे मी आंबे-फणसाच्या व्यवसायात लावून आणखी पैसे मिळवले. जागेच्या व्यवहारात, सिझनल धंद्यात आणि पार्ट टाइम मार्केटिंगचे काम यातून पैसे कमवत गेलो, त्या व्यवसायातून मिळालेले पैसे मुंबई व कोकणामध्ये स्वस्त जागा विकत घेण्यासाठी गुंतवले आणि वयाच्या पस्तीशीत करोडपती झालो.

खाली मी १३ अशा गोष्टी सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही पस्तीसाव्या वर्षी नक्कीच करोडपती बनू शकता.

१. गरीब राहण्यात काहीही अर्थ नाही : मीसुद्धा गरीबच होतो आणि ते जीवन खूप निराशाजनक असतं. अपमानास्पद वागणूक मिळणार असतं, त्यामुळे आपण गरीब आहोत ठीक आहे असे विचार मनात असतील, तर लगेच काढून टाका. बिल गेट्स म्हणतात, तुम्ही गरीब म्हणून जन्मलात, तर तो तुमचा दोष नाही; पण गरीब म्हणून मराल, तर मात्र तुमचाच दोष आहे.

माझे वडील माझ्या वयाच्या तिसऱ्या वर्षी वारले. मी दूध पोहचवणे, पेपर लाइन टाकणे, शिकवणी घेणे, गाड्या धुणे अशी कामे करून पैसे मिळवले ज्या ज्या गाड्या धुतल्या, त्या त्या गाड्या घेतल्या. श्रीमंत व्हायचंय हे मनाशी पक्के ठरवा.

२. नुसता दिखावा नको काम दिसू द्या : माझ्या विविध व्यवसायातून आणि गुंतवणुकीतून जेव्हा मला निश्चित पैसे मिळू लागले, तेव्हा मी मोठी गाडी घेतली. पूर्वी मी मारुतीची साधी गाडीच चालवत होतो. तुमची ओळख तुमच्या नितीमुल्यांवरून, कामावरून व्हायला हवी, तुमच्याकडे असलेल्या भौतिक गोष्टींवरून नाही.

३. गुंतवण्यासाठी बचत करा : पैशांची बचत करा, पण फक्त गुंतवण्यासाठी. वाचवलेले पैसे एखाद्या सुरक्षित आणि अशा ठिकाणी गुंतवा जिथून सहजासहजी काढता येणार नाहीत. या पैशांचा वापर कधीही करू नका. अगदी निकडीच्या प्रसंगीसुद्धा. यामुळे वर सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडील पैसा वाढत जाईल.

४. तुम्हाला पैसे मिळवून न देणारे कर्ज काढू नका : एक नियम बनवा, आपल्याकडे येणारा पैसा वाढवण्यासाठीच कर्ज काढायचे. नाहीतर काहीही उपयोग नाही. मी दुकान गाळा व कारसाठी कर्ज घेतले, कारण मला खात्री होती की त्यामुळे माझी मिळकत वाढेल. श्रीमंत लोक घेतलेल्या कर्जाचा वापर गुंतवणूक आणि कॅशफ्लो वाढवण्यासाठी करतात. गरीब लोक कर्जाचा वापर वस्तू विकत घेण्यासाठी आणि श्रीमंतांना अजून श्रीमंत करण्यासाठी करतात. बॅकेतून कमी व्याजाने कर्ज घेऊन योग्य नियोजन करून संपत्ती वाढवता येते.

५. पैशांवर प्रेम करायला शिका : आर्थिक स्वातंत्र्य कुणाला नको असते. आपल्याकडे भरपूर पैसे असावेत अशी सगळ्या लोकांची इच्छा असते, पण पूर्ण त्यांचीच होतात, जे तिला प्राधान्य देतात. श्रीमंत होण्यासाठी आणि श्रीमंती टिकण्यासाठी पैशाला अग्रक्रम द्या. तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केले, तर तो तुमच्याकडे दुर्लक्ष करेल किंवा तुम्हाला सोडून त्याच्याकडे जाईल, जो त्याचे महत्त्व जाणतो.

६. पैसा कधीही झोपत नाही : पैशाला घड्याळ कळत नाही, वेळापत्रक, सुट्ट्या यांचा विचार तो करत नाही आणि तुम्हीसुद्धा नाही केला पाहिजे. पैसा त्यांच्यावर प्रेम करतो, ज्यांची मेहनतीची तयारी असते. जेव्हा मी २० ते ३० वर्षांचा होतो, मी १८ तास काम करायचो विमा विकायचो, प्लॉट विकायचो. नेहमी इतरांपेक्षा जास्त मेहनत घ्या. पैसा झोपत नाही,तुम्हीही जास्त झोपू नका.

७. पैसे वाढवायला शिका : आजच्या आर्थिक जगात जिथे पैसा ही गरजेची गोष्ट बनली आहे, धनसंचय करणे आणि तो वाढवणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्याकडे येणारा पैसा सातत्याने वाढत राहायला हवा.

सुरुवातीला माझी मिळकत महिना ३ हजार रुपये होती नऊ वर्षांनी ती महिना ५० हजार झाली. चौदा वर्षांनी ही मिळकत महिना ३ लाख रुपये झाली. त्यामुळे पैशाने पैसे वाढवायला शिका. त्यातून नवीन संधी निर्माण करा.

८. श्रीमंत माणसांचा आदर्श ठेवा : आपल्यापैकी बहुतेकजण गरीब किंवा मध्यमवर्गीय असल्यामुळे आपले विचार, आपली स्वप्नं ही जवळच्या इतर लोकांसारखीच मर्यादित असतात. मी नेहमी श्रीमंत लोकांचा अभ्यास करायचो आणि त्यांच्यासारखं वागायचा प्रयत्न करायचो. तुम्हीसुद्धा एखादी आदर्श व्यक्ती निवडा आणि त्यांचे अनुकरण करा. बहुतांश श्रीमंत लोकं त्यांच्याजवळील ज्ञान आणि संसाधनं वाटण्याच्या बाबतीत अत्यंत उदार असतात.

९. नेहमी मोठा विचार करा : लोक सगळ्यात मोठी चूक कुठली करत असतील, तर ती चूक मोठा विचार न करणे होय. माझं तुम्हाला हेच सांगणं आहे की, फक्त करोडपती नाही तर अब्जाधीश बनण्याचा प्रयत्न करा. या जगात पैशांची कमतरता नाही, तर मोठा विचार करणार्‍या लोकांची आहे. पण स्मार्ट वर्क करा.

१०. नेटवर्किंग करा : श्रीमंत होण्यासाठी तुमचं नेटवर्क मोठं करा. आज Saturday Club, BIN  यासारखे अनेक नेटवर्किंग क्लब आहेत.

११. स्नेहसंबंध जोपासा : चांगल्या ओळखींमुळे अनेक काम पार पडतात. लोकांचा आदर करा. कधी कोणती व्यक्ती आपल्या कामाला येईल हे सांगता येत नाही. म्हणून माणसं जपा.

१२. पैशाला तुमच्यासाठी काम करायला लावा : श्रीमंत होण्यासाठी गुंतवणूक ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्या कामातून तुम्हाला जितके पैसे मिळतात, त्यापेक्षा जास्त पैसे गुंतवणूकीतून मिळायला पाहिजेत. जर तुमच्याकडे अतिरिक्त पैसा नसेल, तर तुम्ही कधीही गुंतवणूक करू शकणार नाही.

१३. लोकांना त्यांच्या कार्यात यशस्वी होण्यासाठी मदत करा : लोकांना त्यांच्या कार्यात यशस्वी होण्यासाठी, त्यांची स्वप्नं पूर्ण होण्यासाठी मदत करा. मी प्रथम ट्रेनिंग-कोचिंग व्यवसाय सुरू केला. दुसरा हॉटेल व्यवसाय. ‘एस.के. रिसॉर्ट’ चालू करताना मला व माझ्या पत्नीला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. परंतु तेच रिसॉर्ट मला मागील दहा वर्षांपासून दरमहा खूप चांगल उत्पन मिळवून देत आहे.

तिसरी गुंतवणूक रिअल इस्टेटमध्ये केली होती आणि त्यातून मला अजून पैसे मिळतात. गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला अनेक नवीन संधी शोधता येतात. चौथी गुंतवणूक दुकान गाळे बांधून भाड्याने देण्यासाठी केली. त्यातून पॅसिव्ह इन्कम मिळू लागले. लक्षात ठेवा, कालांतराने ‘पैशाने तुमच्यासाठी काम केले पाहिजे, तुम्ही पैशासाठी नव्हे.’

या १३ मार्गांचा अवलंब करा, तुम्ही नक्की श्रीमंत व्हाल. नैतिकता ठेवा, प्रयत्न कधीही सोडू नका आणि एकदा का तुम्ही हे ध्येय साध्य केलं की इतरांनाही मदत करा.

डॉ. संतोष कामेरकर
७३०३४४५४५४
(लेखक बिझनेस व लाइफ कोच आहेत)

Author

  • डॉ. संतोष कामेरकर

    डॉ. संतोष कामेरकर हे एक प्रतिथयश उद्योजक, प्रसिद्ध वक्ते व प्रशिक्षक आहेत. त्यांनी स्वतःला शून्यातून उभं करून आज करोडोंमध्ये पोहोचले आहेत. त्यांचा हा प्रवास अनेक नाउमेद तरुणांना प्रेरणा देणारा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow

फक्त ₹२२२ मध्ये 'स्मार्ट उद्योजक'चे आजीवन सभासद होण्यासाठी येथे क्लिक करा.


WhatsApp Group Join Now
Telegram Channel Subscribe
Facebook Page Follow
error: Content is protected !!
Scroll to Top
उद्योजकाचं व्यक्तिमत्त्व कसं असावं?