उद्योगसंधी

विमा प्रतिनिधी; एक उत्तम जोडव्यवसाय

स्मार्ट उद्योजक® मासिक वर्षभर रजिस्टर पोस्टाने घरपोच मिळवा फक्त ₹४०० मध्ये. आजच वर्गणीदार व्हा! https://bit.ly/2YzFRct


भारतात सध्या मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग नोकरीसोबत जोडधंदा करण्याला प्राधान्य देताना दिसतो. मग व्यवसाय कुठलाही असो, त्या व्यवसायाला मोठे करण्याची, त्यासाठी कष्ट करण्याची व त्यातून योग्य ती सेवा पुरवून विश्वासार्हता जपण्यासाठी प्रयत्नशील असतो. दिवसेंदिवस आपली बदलणारी जीवनशैली ही यामागचे महत्त्वाचे कारण आहे.

आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये व्यावसायिक म्हणून काम करायचे असल्यास संवादकौशल्य, नवनवीन परिचय करणे, वाढवणे, जिद्द, चिकाटी, सातत्य असे महत्त्वाचे काही गुण असावे लागतात.

फक्त ₹२२२ मध्ये स्मार्ट उद्योजक® मासिकाच्या डिजिटल आवृत्तीचे आजीवन वर्गणीदार व्हा आणि अगणित फायदे मिळवा!

अधिक माहितीसाठी : https://rzp.io/l/smartudyojak

विमा व्यवसाय हा असा एक व्यवसाय आहे ज्याने आपल्याला आजच्या काळात व्यवसायाची एक चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे, कारण एकीकडे भारतात एकूण लोकसंख्येपैकी केवळ ३९ टक्के लोकसंख्या विम्याने सुरक्षित आहे, तर दुसरीकडे उर्वरीत लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विमा कंपन्या चांगल्या प्रतिनिधींच्या शोधात आहे.

हा व्यवसाय करण्यासाठी, वाढवण्यासाठी, विमा क्षेत्रामध्ये होणार्‍या बदलांबद्दलची सतत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विमा कंपन्या कार्यरत आहेत. तसे पाहिले तर, विमा प्रतिनिधींची संख्या फारशी कमी नाही, परंतु हे क्षेत्र जितके सोपे वाटते तितके नसल्याने या क्षेत्रात येणार्‍यांची संख्या जरी जास्त असली तरी या क्षेत्रात असलेला स्पर्धेमुळे मात्र फार कमी टिकून आहेत.

पूर्वी अशी परिस्थिती होती की, विम्याविषयी पुरेशी माहिती नव्हती. विमा घेण्यासाठी लोकांची मानसिकता नव्हती किंवा विम्याविषयीची माहिती पुरेशी न मिळाल्याने काही गैरसमज लोकांच्या मनांमध्ये होते; परंतु आता हे चित्र बदललेले दिसते आहे. वेगवेगळ्या जाहिरातींच्या माध्यमातून, लोकांना आलेल्या अनुभवांमुळे, विम्याविषयी केलेल्या जनजागृतीमुळे, विम्याचे महत्त्व लोकांमध्ये वाढले आहे.

सुरक्षा कवच व गुंतवणूक या दोन्ही महत्त्वाच्या उद्देशातून विम्याकडे बघण्याचा लोकांचा कल वाढतो आहे. त्यामुळे आपल्याला ग्राहकांची विम्याविषयीची गरज ओळखून त्याची माहिती देऊन लोकांना योग्य रीतीने समजावून सांगण्याची गरज आहे.

विमा समजावून सांगितल्यापासून तो ग्राहकांनी आपल्याकडून घेणे व त्यानंतर त्या विम्याचे जे काही फायदे आहेत ते त्याला मिळण्यासाठी त्याला मदत करणे ही विमा प्रतिनिधीची महत्त्वाची जबाबदारी आहे. तसेच प्रत्येक ग्राहकाची योग्य आणि खात्रीशीर माहिती कंपनीला देणे ही विमा प्रतिनिची निधी ग्राहकाची मदत करणे ही एक मोठी जबाबदारी आहे.

या व्यवसायामाध्ये येण्याची अजून काही महत्त्वाची कारणे आहेत. काम करण्यासाठी वेळेचे बंधन नसते म्हणजेच वेळेची लवचीकता, उत्पन्न आपल्याला हवे तितके वाढवता येऊ शकते म्हणजेच आर्थिक सुलभता. कमीत कमी भांडवलात हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. वैयक्तिक गाठीभेटी व परिचितांच्या सहकार्याने आपण या व्यवसायाला सुरुवात करू शकतो.

भारतामध्ये सगळ्या विमा कंपन्या व विमा प्रतिनिधी यांच्यावर नियमन करणारी ‘इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथोरिटी ऑफ इंडिया’ म्हणजेच आयआरडीए ही संस्था कार्यरत आहे. विमा प्रतिनिधी होण्यासाठी ‘आयआरडीए’ची परीक्षा उत्तीर्ण होण्याची आवश्यकता असते.

जीवन विमा, आरोग्य विमा व सामान्य विमा असे विम्याचे मुख्यत्वे ती प्रकार पडतात. या सगळ्यासाठी आपल्याला विमा प्रतिनिधी (एजंट), ब्रोकर, याशिवाय इतरही पर्याय उपलब्ध आहेत व या तीनही प्रकारांमध्ये मिळणारे उत्पन्नही वेगवेगळे असते, शिवाय हे एकमेकांना परस्परपूरक असतात.

आपल्या उत्पन्नाचा आलेख चढता ठेवण्यासाठी व ते स्थिर ठेवण्यासाठी आपण विमा प्रतिनिधी म्हणून काम करू शकतो. जीवन विमा क्षेत्रात भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी ही भारतामधील सर्वात जुनी व विश्वासार्ह कंपनी गणली जाते.

जिच्यावर ग्राहकांचा व प्रतिनिधींचासुद्धा विश्वास अधिक आहे. तरीही गेल्या वीस वर्षांत पन्नासहून अधिक खासगी कंपन्या विमा क्षेत्रामधे आल्या आहेत. तसेच आरोग्य विमा आणि इतर विमा क्षेत्रांमध्ये खासगी कंपन्या आल्या असल्याने स्पर्धा तीव्र वाढली आहेत.

गेल्या दहा वर्षांत हा व्यवसाय विमा आणि त्यासोबतच इतर गुंतवणूक पर्यायांमुळे वाढीला लागला आहे. म्हणजे ग्राहकांना एकाच छताखाली जीवन विमा, आरोग्य विमा, अपघात विमा, इतर विमा, सुरक्षित ठेव अर्थात एफडी, म्युच्युअल फंड असे अनेकविध पर्याय देऊ शकल्यामुळे या व्यवसायामध्ये खूप प्रगती करून नाव केल्याची अनेक उदाहरणे आपल्याला बघावयास मिळतील.

– स्वरदा कुलकर्णी
८६९८९७६३६३


Free Newsletter on WhatsApp & Telegram

'स्मार्ट उद्योजक'चे उद्योजकता आणि व्यवसायविषयक लेख वाचण्यासाठी जोडले जा : WhatsApp ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनेलवर.

error: Content is protected !!